तिसरा अंक (शेवट)

हातात वाफ़ाळत्या कॉफ़ीचा मग घेऊन अक्षय खिडकीपाशी उभा होता. बाहेर कोसळणाऱ्या पावसात कुठलंतरी शून्य बघण्यात त्याचे डोळे हरवले होते. कदाचित दहा महिन्यांपूर्वी पडलेल्या याच प्रश्नांची उजळणी  चालू होती.


दहा महिन्यांपूर्वी मुंबईतल्या प्रलयंकारी पावसाने त्याच्या कॉफ़ीवर पाणी फ़िरवलं होतं. उरलं होतं ते फ़क्त फोनवर बोलणं. जेमतेम अर्ध्या-पाऊण तासाचं. आजही त्याला ते स्पष्ट ऐकू येत होतं.


*******


"अक्षय, मी संहिता"


"हं बोल गं. कुठे भेटायचंय?"


"भेटायलाच पाहिजे का? फोनवर बोलूया का?"


"म्हणजे? तू दुपारी म्हणालीस संध्याकाळी भेटूया, म्हणून मी सगळा वेळ मोकळा ठेवलाय. चार तासांनी मी निघतोय. फ़्लाइट आहे माझी"


"हो रे, मी म्हणाले होते भेटूया म्हणून, पण भैरवीचं प्लेन उशीरा सुटलं आणि आता तुझ्याकडेही जास्त वेळ नसेल ना! म्हणून..."


"पण अगं, मला जे बोलायचंय ते असं फ़ोनवर नाही बोलता येणार"


"तुला काय बोलायचंय मला माहितीये. आणि कदाचित माझं उत्तर तुलासुद्धा माहितीये. अक्षय.., तू तिकडे इतक्या दूर जाताना इतकं वाईट वाटून घेऊन जातो आहेस हे माझ्याच्याने बघवणार नाही रे. म्हणून म्हटलं फ़ोनवरच बोलूया म्हणून.  तुझी सगळी उत्तरं तुला देणंही तेव्हढंच आवश्यक आहे, असं मला वाटतं. मी तुला माझा एक चांगला मित्र मानते, बास. तू जेव्हढ्या इंटेन्सिटीने माझ्यावर प्रेम करतोस, तेव्हढ्या किंवा त्यापेक्षा जास्त इंटेन्सिटीने मी तुझ्यात नाही गुंतलेय् रे. आणि तसं म्युच्युअल फ़ीलिंग नसेल तर आता आपल्यात जी मैत्री आहे, त्यापलीकडचं नातं गुंफण्यात काय अर्थ आहे? भैरवीला सी ऑफ़ केल्यानंतर मी प्राचीच्या घरी बसले होते. तिकडेच मी याबद्दल खूप विचार केला आणि मगच तुला हे सगळं सांगतेय्. खरंतर मला हे सगळं पहिल्यांदा कळलं, तेव्हाच मी स्वतःच तुझ्याशी याबाबत बोलणार होते. पण परीक्षा, अभ्यास, दररोजचे रूटीन, मग आपण दोघेच बोलत असताना सगळ्यांनी चालू केलेली चिडवाचिडवी या सगळ्यामुळे इतका संकोच वाटायचा की याबाबत कधी मोकळेपणाने बोलताच आलं नाही... हॅलो,...अक्षय..??"


"....."


"तुला माझ्यापेक्षाही चांगली सहचरी मिळेल. अगदी तुला साजेलशी. कदाचित मी ती नाही, आणि ते आपण स्वीकारलं पाहिजे. आणि या सगळ्यामुळे माझ्या मनात एक मित्र म्हणून तुझ्याविषयी असलें प्रेम, आपली मैत्री यावर काही परिणाम होणार नाही"


"ह्म्म्म"


"सो आता याचा जास्त विचार करायचा नाही. कॉन्सन्ट्रेट ऑन योर स्टडीज़. तिकडे पोचलास की मेल कर. आणि आपण चॅटवर तर भेटूच की! मी तुला इकडचे हालहवाल कळवत राहीन"


"ह्म्म"


"हॅपी जर्नी. टेक केअर"


शेवटचं वाक्य तिने फोन खाली ठेवायच्या घाईतच उच्चारलं हे अक्षयला जाणवल्याशिवाय राहिलं नाही. तिने तसं जाणवू न द्यायचा प्रयत्न करूनही. पण अक्षयला त्याची सगळी उत्तरं मिळाली होती. गॅलरीतून त्याने अशीच रस्त्यावर नजर टाकली. "पिल्ल्या, दूध घेतोस ना रे" म्हणून आईने हाक माऱली नसती, तर अजून बराच वेळ तो सोनमोहोराच्या पिवळ्या फुलांकडे तसाच एकटक बघत उभा राहिला असता.


अमेरिकेत स्थिरस्थावर झाल्यावर अक्षयने संहिताला मेल लिहिला. त्याच्या उत्तरासाठी त्याला दोन आठवडे वाट पहायला लागली. पण संहिताने उत्तर दिलं, हेच त्याला पुरेसं होतं, भले ते चार ओळींचं का असेना. मग तिच्या वाढदिवसादिवशी त्याने तिला विश करायला फ़ोन केला. का कोण जाणे, पण दोन मिनिटातच तो कट झाला. तिने कट तर केला नसेल ना, अशी शंकेची पाल त्याच्या मनात चुकचुकली. पण नंतर दुसऱ्याच क्षणी त्याने ती शंका मनातून काढून टाकली. दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला फोन केला, तर तिच्या बाबांनी उचलला. ती फ़ोनवर भेटलीच नाही.


त्यानंतर अक्षयने तिला असंख्य मेल लिहिले असतील, पण एकालाही उत्तर आलं नाही. तिचा बदललेला मोबाईल नंबरसुद्धा अक्षयला भैरवीकडून मिळाला, तिने स्वतः कळवलाच नाही. आणि तो केवळ संहितेने स्वतः दिला नाही, म्हणून त्यावर फोन करायचा नाही, असं अक्षयने ठरवलं. स्वाभिमान आणि अगतिकता यांच्यातला फ़रक न कळण्याएव्हढा तो कमकुवत कधीच नव्हता. वर्गातल्या मित्रमैत्रिणींच्या रि-युनिअनच्या वेळीही संहिता सोडून त्याला सगळ्यांशी बोलायला मिळालं. म्हैसूरच्या सहलीचे फ़ोटोसुद्धा तिने पाठवले नाहीत. तिचा आवाज, तिचं हसू केवळ त्याच्या मनातूनच ऐकायला, बघायला मिळत होतं. नेहमीसारखाच तो तिला स्वतःच्या कवितांमधून पाहत राहिला, अनुभवत राहिला. बाकीच्या मित्रमैत्रिणींकडून तिची खुशाली समजून घेत राहिला. तसं केल्यावर मनावरचं कित्येक मणांचं ओझं उतरल्यागत त्याला वाटायचं... आणि तेच ओझं पुन्हा, नव्याने वाहण्याचं बळसुद्धा मिळायचं.


'माणूस आयुष्यातलं पहिलं प्रेम नि पहिलं अपयश कधीच विसरत नाही', हे शाळेतल्या बाईंचं वाक्य अक्षयच्या मनात नीट नोंदलं गेलं होतं. त्याच्यासाठी त्याचं पहिलं प्रेम हेच लौकिकार्थानं पहिलं अपयशसुद्धा होतं. पण दररोज संहितेच्या यशासाठी आणि सुखासाठी देवाकडे मनापासून प्रार्थना करताना, आपलं प्रेम किती यशस्वी झालंय, याची त्याला नेहमीच प्रचिती यायची आणि त्यातूनच तो खूप सुखावला जायचा.


संहिता दुसऱ्या कोणात तरी गुंतली आहे, हे भैरवीकडून कळल्यावर तर अक्षय स्वतःचासुद्धा उरला नाही. तिचं मेल्सना उत्तर न देणं, बदललेला फ़ोन नंबर न कळवणं, या सगळ्यामागचा उलगडा त्याला आता हळूहळू होत होता. आणि त्याचबरोबर 'माझ्या मनात एक मित्र म्हणून तुझ्याविषयी असलें प्रेम, आपली मैत्री यावर काही परिणाम होणार नाही', या वाक्यातल्या पोकळपणा त्याला भयानक अस्वस्थ करून जायचा. मनातल्या भावना मोकळेपणाने प्रकट करण्यात त्याला कधीच काही अडचण आली नाही, की वावगं वाटलं नाही. पण या घटनेनंतर त्याच्यासाठी स्वतःला, मनातल्या भावनांना प्रकट करणंसुद्धा कठीण जाऊ लागलं. कॉलेजच्या ऑर्केस्ट्रात आपल्या गाण्यावर समोरच्यांची पावलं थिरकायला लावणारा, त्यांच्या टाळ्या घेणारा अक्षय हल्ली पहिली ओळ पूर्ण गाणं तर सोडाच, पण गुणगुणतानाही अडखळायला लागला होता. आपण पहिल्यांदाच कोणालातरी ओळखण्यात चूक तर नाही ना केली, अशा अपराधी भावनेनं त्याची चिडचिड व्हायला लागली. पण गणपतीबाप्पाकडे दररोज संहितेसाठी केलेली एक प्रार्थना या सगळ्यातून त्याला बाहेर घेऊन यायची.


पाचेक वर्षांपूर्वी नव्या जीवनाची, नव्या स्वनांची संहिता तो आपणहून लिहायला बसला होता, पण त्या स्वप्नांचा तिसरा अंक त्याने लिहिलेल्या संहितेबरहुकूम रंगलेलाच नाही. 'If you dream with your heart, then the whole universe conspires in your favour', हे वाक्य त्याने लिहिलेल्या संहितेच्या संदर्भात आतापर्यंत पूर्ण चुकीचे ठरले आहे. पण अजून हा तिसरा अंक संपलेला नाही, कारण पडदा अर्धवट पडला आहे. संहितेने तिचे सगळे संवाद म्हणून झालेत. तिने एक्झिटही घेतली; पण अक्षयची एक्झिट अजून बाकीच आहे.


*******


 आज पार्टीनंतर संहितेला फ़ोन करून हा तिसरा अंक संपवण्याचा नि एक्झिट घेण्याचा विचार त्याच्या मनात आला होता. पण एक मोठं, कधीही न संपणारं स्वगत संहितेने त्याच्या स्वप्नसंहितेत लिहून ठेवलं होतं. उर्वरीत आयुष्याचं हे स्वगत, कोणत्याही संहितेशिवाय म्हणून, त्यावर टाळ्या घेतल्याखेरीज त्याला सध्याचा मेक-अप उतरवता येणार नाही. म्हणूनच आज त्याला कवितेपेक्षा सिगरेट जवळची झाली होती.


(समाप्त)


*******


(अनुभवाधिष्ठित)