लहानगे कोडे

फारच लहानसे आहे हे कोडे. याचे उत्तर एका शब्दात द्यायचे आहे.
मराठीत शब्दांना लिंग असते - पुल्लिंग/स्त्रीलिंग/नपुंसकलिंग यापैकी कुठले तरी.
काही अपवादात्मक शब्द दोन लिंगांचे असू शकतात.
उदा. त्याचा असा समज झाला, त्याची समज थोडी कमी आहे,
तालाची लय जरा चुकते आहे, जसा उत्कर्ष होतो तसा लयही होतो
पण असा कोणता शब्द आहे जो तिन्ही लिंगांत वापरला जातो ?

याला निदान (मला माहीत असलेले) एक तरी उत्तर आहे निश्चित.
आणखी काही आपण मंडळी शोधून देऊ शकलात तर अधिकच मजा येईल.

* हा शब्द परभाषिक नाही. (तशा शब्दांचा वापर वाट्टेल त्या लिंगात केला जातो, पण इथे त्याचा संबंध नाही)
* एखाद्या प्रादेशिक बोली-भाषेतला हा शब्द नाही.
* देशी म्हणा हवं तर, पण अस्सल मराठीच शब्द आहे हा.
* आता कदाचित जुना वाटेल, पण अजून बोलण्यातून गेलेला नाही. वाङ्मयात तर सर्रास सापडतो.


शोधा आता !

(उत्तर ३ दिवसांनी)