मनोगतावरील काही शब्दांचे (खरे) अर्थ !

मित्रहो, मनोगतावर नेहमी वापरात येणाऱ्या काही शब्दांचे (गर्भित) अर्थ इथे देत आहे. कृपया हलकेच घ्यावे,अर्थातच कुणालाही दुखावण्याचा उद्देश नाही हे सांगणे नलगे.


अशाच अजून काही शब्दांची मनोगतींकडून भर पडल्यास उत्तमच !


वि. सू. या लेखाला प्रतिसाद देताना तरी खालील वाक्यप्रयोग वापरले जाणार नाहीत अशी आशा करतो. winking



चू. भू. घ्या. द्या. - हम्म्म्म्म. आपल्याला जे माहिती होतं ते आपण लिहिलं,कदाचित बरोबर असेल, पण चुकीचं असण्याचीच शक्यता जास्त ए! तेंव्हा काही चुकलं तर आपल्याला जबाबदार धरायचं नाय नि पुढेमागे वादविवाद झालेच तर आपण ह्या शब्दांची आठवण करून द्यायला विसरणार नाही हेपण लक्षात ठेवायचं, काय?


प्रामाणिक मत - ए कंपूबाज म्हणायचं काम नाय हा ! आपण कधी कंपूबाजपणा करत नाय, आपल्याला जे वाट्टेल ते आपण लिहितो. आता तुझा लेखच इतका भंकस आहे की त्याला बराही म्हणता येत नाय, म्हणून त्याची अशी चिरफाड करावी लागली, काय करणार!


राग नसावा - हाहाहा.चिडू नको रे, तुझ्या भल्यासाठीच बोलतो मी.पण मी तरी काय करणार, सत्य हे नेहमीच कटू असते! :(


कळावे - आयला जातो आता, तुला समजावता समजावत फेस आला राव तोंडाला ! नि मी कळावे म्हटलो तरी मला नाय वाटत तुझ्या डोक्यात काही घुसलं असंल, राहूदे.


लोभ असावा - कशाला हवाय रे लोभ? लोक तुला लोभी म्हणतील. त्यापेक्षा आपलं जे चाललंय ते भांडणच पुढे चालू ठेवूयात की, काय?


सुंदर पण ... - हाहाहा.आता तुझी टर उडवायची म्हटल्यावर त्याआधी तुझं काहीतरी कौतुक करायलाच पाहिजे, नाही का? सुंदर हा शब्द त्यासाठीच आहे,पण तू एवढा हुरळून जाऊ नको रे, पुढचं वाच...


सुंदर - आता तू माझ्या कंपूतला म्हणून खरडतो काहीतरी, नाहीतर ग़जल म्हटलं की माझं डोकं उठतं हे तुला माहीत नाय का?


अप्रतिम ! - दोन दिवसात मी माझी नवी कविता टाकतोय, त्याला तुझा प्रतिसाद नको येऊदे, मग बघ, तुझ्या एका तरी लिखाणाला मी प्रतिसाद देतोका !


उत्कृष्ट - माझ्या २ कवितांना प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद, आयला तू पण बरा लिहितोस की राव!


एक वात्रट