टर्मिनेटर सीड (भाग - ५ )

"चॅटर्जीनं त्याचं संशोधन मोझेन्टोच्या मदतीनं पुढं चालू ठेवलं.  वनस्पतींच्या जीन्समधे फेरफार करुन अपेक्षित निकाल मिळवायला त्याला फारसा वेळ लागला नाही, कारण ते बरचसं संशोधन आम्ही इथे पूर्ण केलेलं होतंच.  संशोधनातला शेवटचा भाग त्याचा त्यानं पूर्ण करुन जेनेटिकली एंजीनीयर्ड सीड तयार केलं.  त्याच्या मायावी बागेतली झाडं ही या जीई सीड्पासून झालेलीच उत्पत्ती आहेत.  चॅटर्जी एवढं करुन थांबला नाही, तर त्यानं जेनेटिकली एंजीनीयर्ड मानवही तयार केला." बोलता बोलताच एक दीर्घ क्षण सर बोलायचे थांबले. 


"म्हणजेच ... रचना...?" घाबरत घाबरत सतीशनं विचारलं, "पण ... हे... शक्य आहे?"


"रचनाच्या आईच्या गर्भाशयात बीजांड तयार झालं, अगदी त्या वेळेपासूनच चॅटर्जीनं त्यावर प्रयोग सुरू केले.  त्या बीजात विशिष्ट प्रकारच्या गुणसूत्रांचं त्यानं रोपण केलं.  विशिष्ट जीन्स निकामी केले आणि थोडक्यात जेनेटिकली एंजीनीयर्ड वनस्पती सहज हाताळू शकेल अशी जेनेटिकली एंजीनीयर्ड व्यक्ती तयार केली.  ती म्हणजेच चॅटर्जीची स्वतःची मुलगी रचना.. म्हणूनच तिचं नावही त्यानं रचना ठेवलं..." थंड आवाजात सरांनी सांगितलं.


सतीश मुळापासून हादरला होता आणि दिग़मूढ होऊन ऐकत होता.  "सर, हे सारं... धक्कादायक... अगदी कल्पनेच्या पलीकडचं आहे."


" हं.. धक्कादायक तर आहेच.  चॅटर्जीबद्दलची सारी माहिती आम्ही मिळवत राहातो.  गुप्तपणे आमची त्याच्यावर नजर पण आहेच.  रचनाची त्यानं निर्मिती केली खरी, पण मी तुला सुरवातीलाच सांगितलं होतं की तू तिच्यापासून दूर रहा, कारण रचनाच्याही संपूर्ण शरीरात, तिच्या जीवसंस्थेत, तिच्या लाइफ सिस्टीम मधे विषद्रव्य खेळतंय.  तिचं चुंबन किंवा तिला मिठीत घेणं तुला सरळ यमसदनाला पाठवू शकतं."


"काय?" सतीशचा स्वतःच्या कानांवर विश्वासच बसेना.


"हो सतीश मी तर म्हणेन मी ती मुलगी मनाने खरंच फार थोर असणार आणि तिचं तुझ्यावर खरंच जिवापाड प्रेम असणार, म्हणूनच ती तुला स्पर्श करू देत नाही. " सर फुटफुटून बोलत होते आणि सतीशचं डोकं गरगरायला लागलं होतं.


"आमच्या माहितीप्रमाणे जीई सीडचं तंत्रज्ञान चॅटर्जीनं मोझेन्टोला देऊन टाकलंय.  तुला माहितीच असेल की शेतात पेरायलादेखील आता मोझेन्टोचं जीई बियाणं मिळतं.  ते चॅटर्जीच्याच तंत्रज्ञानानं बनवलेलं आहे.  बिचाऱ्या शेतकऱ्यांना कल्पनासुध्दा नाही की त्यांच्या शेतांमधून कुठले विषवृक्ष उगवणार आहेत. आम्हाला आता तर अशी माहिती मिळाली आहे की चॅटर्जी आता त्याचं जीई-मानवनिर्मितीचं तंत्रज्ञानही मोझेन्टोच्या हवाली करण्याच्या तयारीत आहे. "


"पण सर... हे ... सारं थांबवायला हवं..." कसंबसं अस्फुट स्वरात सतीश बोलला.  सरांच्या चेहऱ्यावर छद्मी हास्य फुललं.


"सतीश, बाबारे आम्हीही काही इथं हातावर हात ठेवून बसलेलो नाही.  मानव जातीचा असा संहार आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहू, असं वाटलं तुला? आमचंही काही विशिष्ट संशोधन इथं अखंड चालू आहे.  ज्यावेळेस चॅटर्जीचा जीई-मानव तयार झाला, त्यापाठोपाठच आम्हीही त्या मानवासाठी अँटीडोट म्हणजे विषघ्न तयार केलाय"


सतीशची वाचा बसल्यागत झालं होतं.  काही काळ निःस्तब्धतेत गेला आणि मग काहीतरी विचार करून सर उठले. "बस. मी आलोच दोन मिनिटात." असं म्हणत सर त्यांच्या प्रयोग शाळेत गेले आणि पाच मिनिटांनंतर एक छोटीशी कुपी हातात घेउन बाहेर आले. 


"हे घे सतीश" सतीशच्या हातात कुपी देत सर बोलले " या कुपीत एक विशिष्ट फॉरम्युलेशन आहे. ते रचनाला प्यायला दे."


"सर... हे फॉरम्युलेशन ... म्हणजेच ...अँटीडोट? विषघ्न?" सतीशनं दबकत विचारलं.


"नाही नाही" खुर्चीवर मागे रेलत सर म्हणाले "अरे बाबा अँटीडोट हे फार मोठं तंत्रज्ञान आहे.  हे फॉरम्युलेशन फक्त तुझा आत्ताचा प्रॉब्लेम सोडवण्याकरता आहे रे."


"म्हणजे?" सतीशनं काहीच न कळल्यामुळे विचारलं. 


"सतीश तू आता जास्त विचार करू नकोस.  घरी जा आणि तुझ्या समोरच रचनाला हे फॉरम्युलेशन घ्यायला सांग.  तुझ्या प्रश्नापुरता हा अँटीडोटच आहे असं समज.  कळलं?"


सतीश बधीर झाला होता.  एका पाठोपाठ एक होत असणाऱ्या आघातांनी त्याचं मन अगदी लुळं-पांगळं झालं होतं.  काय करावं काय करु नये, काय योग्य काय अयोग्य हे सारे विचार करण्याची त्याची ताकत संपून गेली होती. 


संध्याकाळ होताच सतीश बागेत आला. रचना आधीपासूनच तिथे हजर होती.  तिच्या टपोऱ्या डोळ्यांमधून प्रेम ओसंडून वहात होतं.  दोन मिनिटांपूर्वी सतिशच्या डोक्यात थैमान घालत असलेलं विचारांचं वादळ रचनाच्या तिथं असण्यानं दूर पळालं.  रचना दृष्टिस पडताच तिच्याबद्दल असलेल्या जिव्हाळ्यानं त्याचं मन उचंबळून आलं.  त्याला आठवलं, तिच्यातल्या ममत्वानं आणि कणखर स्त्रीत्वानं त्याला कित्येक वेळेस मिळवून दिलेली अध्यात्मिक शांतता. त्याला आठवलं त्यानं अगदी जवळून पाहीलेले तिच्या मनस्त्रोताचे निर्मळ आणि पवित्र झरे.  सतीशच्या आयुष्यात कुणीतरी करणी केल्यासारख्या धक्कादायक घटना घडत होत्या.  या घटना म्हणजे भौतिक जगातल्या मायाजालाचंच एक रूप होतं.  रचना मात्र मानव निर्मित असूनही मुशीतून तावून सुलाखून निघाल्या प्रमाणे मनानं अंतर्बाह्य नैसर्गिक शुध्दतेनं परिपूर्ण होती. 


रचनाच्या लक्षात आलं की आज त्या दोघांमधे विचित्र अंतर निर्माण झालं होतं.  बराच वेळ दोघेही नुसतेच बसून होते.  कुणीच कुणाशी काही बोलत नव्हतं.


"रचना..." शांततेचा भंग करत सतीशनं बोलायला सुरवात केली. "रचना... मला सारं काही कळलंय..अगदी सर्व काही..." रचना मान खाली घालून बसली होती. तिचे डोळे पाण्यानं डबडबलेले होते.


"रचना... या झाडांच्या जीन्समध्ये केलेले फेरफार ... इतकंच काय पण तुझ्या जीन्समधे केलेले फेरफार... वगैरे सगळं काही माहिती झालंय मला... "


"सतीश ... मी तुला अगदी खरं सांगते... माझ्या शरीरात विष खेळत असलं, तरीही माझं मन अगदी स्वछ आहे रे ... सतीश माझं शरीर माझ्या वडिलांनी बनवलेलं असलं तरी माझं मन देवानंच घडवलंय... त्यात अगदी एवढंसं सुध्दा काळं काही नाही..." रचनाच्या डोळ्यांना अश्रूची धार लागली होती.  " सतीश माझं तुझ्यावर ... खरंखुरं प्रेम आहे ... अगदी शंभर टक्के ... सरळ निरागस प्रेम... "


"रचना मलाही ते माहिती नाही का? आणि माझंही तुझ्यावर तितकंच प्रेम आहे..."


काही क्षण पुन्हा निःस्तब्धतेत गेले आणि सतीशनं बरोबर आणलेली कुपी बाहेर काढली.  "रचना मी तुझ्यासाठी एक फॉरम्युलेशन घेऊन आलोय.  तुझ्या शरीरात खेळत असलेल्या विषद्रव्यावरचा हा उतारा आहे.  आपल्यातले सारे प्रश्न हे औषध संपवेल आणि मग आपण दोघं आपल्या मनाजोगं आयुष्य जगू शकू.  हे घे... स्वीट हार्ट... पिऊन टाक."


रचनानं अवाक्षरही न बोलता सतीशच्या हातातली कुपी घेतली आणि उघडून सरळ ओठाला लावली. एका घोटातच सारं औषध तिनं घशाखाली ढकललं.


"रचना... रचना... बेटी हे काय घेतेस तू? सांगितलं होतं ना मला दाखवल्याशिवाय कुठलीही गोष्ट घ्यायची नाही म्हणून.  काय आहे ते?... बघू बरं ... आण इकडे." जोरजोरात ओरडत डॉक्टर चॅटर्जी बंगल्यातून धावत बाहेर आले.  रचनाच्या हातात रिकामी कुपी तशीच होती.  तिच्या अश्रूंना अजूनही खंड नव्हता. 


"डॅडी माझ्या आयुष्याचा तर पूर्ण खेळखंडोबा केलातच तुम्ही... आता या शापातून निदान बाहेर तरी पडू देत मला... प्लीज डॅडी.."


"रचना मूर्खासारखं बोलू नकोस.  कुठला शाप? मी तर तुला अद्वितीय अशी ताकत दिली आहे.  माझ्या खडतर परिश्रमांमुळेच तुला कुठलाही आजार होऊ शकत नाही.  तुझं हे स्वर्गिय सौंदर्य हेही माझ्या संशोधनानंच तुला बहाल केलंय आणि याला तू शाप म्हणतेस?"


"पण डॅडी..." रचनाला अचानक बोलायला त्रास होऊ लागला."डॅडी पण प्रेमाचं काय? तुमच्या संशोधनापायीच मला माझ्या प्रेमापासून वंचित रहायला लागतंय.  मी जर सर्वसाधारण मानवच राहिले असते तर प्रेमाचं परमोच्च सुख तरी मला अनुभवायला मिळालं असतं.  माझ्या लेखी प्रेमाच्या समोर तुमचं हे व्यावहारिक संशोधन अगदी क्षुद्र आहे... डॅडी... आह..." अन बोलता बोलताच रचना जमिनीवर कोसळली.  डॉक्टर चॅटर्जींनी रचनाला धरण्याचा प्रयत्न केला. 


सतीश धावतच रचनाच्या जवळ गेला.  "सतीश... मला... माफ कर राजा... मी तर चालले ... आता..."


"रचना... नाही ... नाही.  वेड्यासारखं बोलू नकोस." सतीशला रडू आवरेना. 


"नाही सतीश ... बाय... आता... सारं संपलं रे राजा ... आय लव्ह यू ... सतीश" अन रचनानं मान टाकली.  रचनाच्या पायाजवळच सतीश मटकन खाली बसला अन हमसाहमशी रडू लागला.


माणसाचं बुध्दीचातुर्य प्रेमाला गळा दाबून ठार मारण्यात यशस्वी झालं.


त्याच वेळेस वरती सतीशच्या खोलीच्या खिडकीत अनिखिंडी सर आले आणि तिथूनच ओरडले "चॅटर्जी आलं का आता लक्षात?  जेवढं तुझं रिसर्च सक्सेसफुल झालंय तेवढंच माझंही रिसर्च सक्सेसफुल झालंय. "


- समाप्त