मनोगती संमेलन - एक कल्पनाविलास - पूर्णविराम!

मनोगती संमेलनाचा आज शेवटचा दिवस. आतापर्यंतच्या कार्यक्रमांत एका विशिष्ट गटाचे वर्चस्व राहिले असल्याच्या नाराज सुरांनीच या दिवसाची सुरुवात झाली. 'कंपूबाजी नही चलेगी, नही चलेगी','आम्हालाही बोलू द्या, नाहीतर खुर्ची खाली करा' अशा घोषणांनी वातावरण तापत होतेच, तेवढ्यात प्रवेशद्वारातून हळूहळू प्रवासी चालत येताना दिसला. 'हा विद्रोही संमेलनाचा अध्यक्ष काय करतोय इथे?' माधवने जी एस ला विचारले. पण प्रवासी कुणाशीही न बोलता व्यासपीठावर गेला आणि त्याने बोलायला सुरुवात केली.
"मंडळी, मला इथे पाहून आपल्यापैकी काही लोकांना धक्का बसला असेल, काहींना वाईटही वाटले असेल.." चक्रपाणिने सन्जोपकडे पाहून भुवया उंचावल्या. सन्जोपने मानेनेच "मला नाही.."' असे सांगितले. "पण मी इथे का आणि कसा हे मी माझ्याच एका जुन्या गजलेला कल्हई करून सांगतो.." ( "मेलो, सक्काळी सक्काळी गजल! 'मनोगत' वरच्या या गजला संपणार तरी कधी? शायद उनका आखरी हो ये गजल,  हर गजल ये सोचकर हम सह गये... खि... खि... खि..." वात्रटाने त्रासून टग्याकडे बघितले. ) प्रवासी बोलू लागला,
 


अध्यक्ष मी तिकडचा आहे तरी परंतु
मोहात मिस्ळीच्या मी पडताच ठार झालो


श्रीफळे, गुच्छ, शेले भर्जरी फार तेथे
पोटातल्या भुकेने तरीही भिकार झालो


अध्यक्ष मी तिथे, अन पाहुणा या ठिकाणी
वर्गणी तरी चुकवली, मी सावकार झालो


लोकहो सढळहस्ते काढाच द्रव्य काही
खर्चात प्रवासाच्या मी कंगाल पार झालो


चक्रपाणि प्रवाश्याच्या हाताला धरुन मानाच्या खुर्च्यांकडे घेऊन गेला.  दरम्यान जयंताने पहिल्या कार्यक्रमाची घोषणा केली होती.  " आजच्या सत्राची सुरुवात होत आहे वेदश्री आणि सुवर्णमयी यांच्या स्फुट वाचनाने. वाचनाचा विषय आहे, स्त्रीमन कळ्ळंय का कुणाला?"
अगदी एकसारखा पोषाख केलेल्या वेदश्री व सुवर्णमयी व्यासपीठावर आल्या.  वेदश्रीने तेवढ्यात सगळ्यांकडे पाहून गोडसे हसून घेतले आणि सुरुवात केली.

" स्त्रीमन कळ्ळंय का कुणाला?"  वेदश्री
"कुणाला कळ्ळंय का स्त्रीमन?"  सुवर्णमयी
" का कुणाला कळ्ळंय स्त्रीमन?"  वेदश्री
"स्त्रीमन का कळ्ळंय कुणाला?"  सुवर्णमयी

'या न्यायानं चार चोक सोळा तरी कॉम्बिनेशन्स होतील...' मीरा एकलव्याला.
'नाही सोळापेक्षा जास्त...' एकलव्य
'हे बघ, बाकीचे सगळे शब्द तसेच ठेव आणि स्त्रीमनाला पहिल्यापासून चवथ्या पोझीशनपर्यंत फिरव, म्हणजे ही झाली चार....'  मीरा


इकडे वेदश्रीला सूर सापडला होता.  "फुलपाखराच्या रंगीबेरंगी पंखावरुन बागडणारी ही छोटीशी परी.... जीवनाच्या फुलबागेत आली दुडुदुडू धावत आणि निघाली एका गोजिरवाण्या रथातून.  अय्या, अन  पाहते तो काय..."  इथे वेदश्रीने आपल्या इवल्याशा पर्समधून इवलासा रुमाल काढून आपले इवलेसे-सॉरी-आपले नाक पुसले. " पाहते तो काय, रथाला घोडे जोडलेले नवते काई- एकीकडे आपले बाबा आणि दुसरीकडे आपली आई..."

"आईबापाले घोडा म्हण्टे का रे ही पोट्टी? खि..खि..खि.."

"...आणि मग हा रथ आला यौवनाच्या बागेत. या मुग्ध कळीचं झालं एक सुंदरसं फूल.  एक कुमारी, एक प्रिया, एक प्रणयिनी आणि मग एक माता... अनंतकाळची माता..."

"तात्या, आईशप्पत, जगातल्या सर्व मातांना माझे लक्ष लक्ष प्रणाम, असं म्हणालास तर असा थोबाडीन.."  सर्वसाक्षी विसोबाला.  लहान मुलांच्या आयांना मुलाच्या चेहऱ्यावरचे भाव बघूनच हे बाळ काय करणार आहे, हे कळतं, तसा सर्वसाक्षीला तात्याच्या चेहऱ्याकडे बघून अंदाज येतो.

वेदश्रीचे स्फुट वाचून होईपर्यंत सगळं जग म्हणजे मध आणि काकवी यांचा एक महासागर असून त्यात पिठीसाखरेची बेटे तरंगत आहेत, असे (शुद्धीवर असलेल्या) मनोगतींना वाटू लागले होते.

"पुढचा कार्यक्रम" जयन्ता हेलपाटत व्यासपीठावर आला.  "म्हणजे नवीन पाककृती अर्थात कचऱ्यातून कला. यात भाग घेतलेल्या मनोगतींच्या पाककृतींतून तीन पाककृती निवडण्यात आल्या आहेत. त्या विजेत्यांची नावे व पाककृतींची वर्णने मी वाचून दाखवतो. "
पाककृतींचा विषय निघाल्यावर श्रोते तुर्यावस्थेतून अर्धजागृतावस्थेत आले.
 
"तिसऱ्या क्रमांकाची पाककृती आहे.." जयंताने जाहीर केले " प्रभाकर पेठकर यांची मालवणी मटण -प्रकार क्रमांक ३५.  पेठकर यांनी प्रकार क्र. ३६ न लिहीण्याच्या अटीवर हे बक्षिस स्वीकारायचे आहे. ही पाककृती 'मनोगत' च्या पानापानावर पसरलेली असल्याने तिचे वाचन करण्याची गरज नाही असे परीक्षकांचे मत पडले आहे..."
" पार्श्यालिटी.....वशीलेबाजी.." भोमेकाकांच्या कानात पेठकर. 
"दुसऱ्या क्रमांकाची पाककृती आहे, साभार कट्टा यांची घरच्या घरी वर्तमानपत्र ही.  साभार कट्टा हे मनोगत चे गुप्त सदस्य असून लवकरच ते अवतीर्ण होतील असे कळते. वर्तमानपत्राचा पाककृतीशी काय संबंध अशी शंका काही मनोगतींनी विचारली होती.  पण मनोगत वर कशाचा कशाशी संबंध असणे हे बंधनकारक नसल्यामुळे या नाविन्यकारक पाककृतीला दुसऱ्या क्रमांकाचे बक्षिस देण्यात येत आहे.  ती आता मी तुम्हाला वाचून दाखवतो.
साहित्य - काही नाही.
कृती - भरपूर जेवावे. घड्याळात रात्री साडेबाराचा गजर लावावा. झोपावे.  साडेबारा वाजता गजर होईल. उठून साडेतीनचा गजर लावावा.  परत झोपावे. साडेतीन वाजता उठून साडेसहाचा गजर लावावा.  साडेसहा वाजता उठून दार उघडावे. दारात घरच्या घरी तयार झालेले वर्तमानपत्र पडलेले असेल. 
आणि या स्पर्धेचे पहिले पारितिषिक विजेते आहेत, सर्वसाक्षी..!"
टाळ्यांचा कडकडाट झाला. "मी सर्वसाक्षींना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन आपल्या पदार्थाची कृती सांगावी." जयंता म्हणाला.
सर्वसाक्षीने व्यासपीठावरून आपल्या पारितोषिक विजेत्या पदार्थाचे वर्णन सांगायला सुरुवात केली.  'आफ्रिकेत अत्यंत लोकप्रिय असलेल्या 'तीन ताड तिडतांग' या पदार्थाचे भारतीयीकरण करुन मी नशीला आमरस हा पदार्थ तयार केला आहे.
साहित्य- एक वाटी हापूस आंब्याचा आमरस(कृती कोणत्याही चांगल्या पुस्तकातून वाचावी. पेठकरांना विचारू नये, पदार्थ (फस)फसण्याची शक्यता आहे), एक बाटली पहिल्या धारेची हातभट्टी ( हातभट्टी न मिळाल्यास स्कॉच चालेल, पण हातभट्टी वापरल्यास हा पदार्थ अधिक चविष्ट होतो ), चवीपुरता बर्फ
कृती- सर्व पदार्थ एकत्र करून नीट हलवून घ्यावे. (ढवळून घ्यावे असे लिहिणार होतो, पण ते हा पदार्थ पोटात गेल्यावर आपोआप होतेच!), वाटल्यास थोडा (वाटलेला) बर्फ टाकावा.एक ग्लास भरावा. दोन थेंब जमीनीवर टाकावेत. इकडेतिकडे बघावे, शक्य तितक्या जोरात 'बंभोले' असे म्हणावे. डाव्या हाताने नाक दाबून धरावे. उजव्या हाताने ग्लास तोंडाला लावून रिकामा करावा. ग्लास संपेपर्यंत नाक सोडू नये, आमरसाचा उग्र दर्प येतो!"
"कसं लागेल रे?" इथपासून "करून बघायला पाहिजे.." अशा विविध प्रतिसादांत सर्वसाक्षी खाली बसला.

"आता यापुढचा परिसंवाद आहे 'शास्त्रीय संगीतातील राग व लोभ' या विषयावर." जयंताने जाहीर केले.
शास्त्रीय संगीताचं नाव ऐकताच मांडवातून 'ताराबलं चंद्रबलं' ऐकू येताच ब्यांडवाल्याच्या पथकातील ताशावाल्याने हातातली जळती बिडी फेकून डोक्यावरची टोपी मागे सारत तयार व्हावे तसा विसोबा तयार झाला. मागच्या रांगेत बसलेला दिगम्भाही लगबगीने पुढे सरसावला. पण आयत्या वेळेची एंट्री म्हणून मयुरेश आणि अनिकेतसमुद्र यांना पहाताच मैफल अचंभित झाली. या दोघांच्या आयत्या वेळेच्या प्रवेशावर ऑबजेक्षन घ्यावे की काय या विचाराने  विसोबा चिंतित झाला. तेवढ्यात 'लोकप्रिय होण्याचे १०१ मार्ग' या आगामी परिसंवादातील आपला सहभाग त्याला आठवला आणि 'अरे वा, अनि, तू पण का.. आहे ब्बुवा ....मला नव्हतं हो माहिती..' म्हणून त्याने अनिकेतसमुद्रच्या पाठीवर थापबिप मारली आणि चर्चेला सुरुवात झाली.
एखादा बडा ख्याल घेण्यापूर्वी बुवांनी आवाज साफ करून घ्यावा तसे विसोबाने खाकरून घेतले आणि पहिला बॉल टाकला..
"म्हणजे काय आहे, बाबुजी..."
" अहो, कस्ले जुने गायक घेऊन बसलाय तात्या.." एकदम उसळून अनिकेत " तुम्ही दाजींना ऐका दाजींना. व्वा! काय तयारी आहे! लघुरुद्र रागातली शून्यसप्तकाची मींड घ्यावी तर दाजींनीच. ओहोहो....अहो, आक्कांच्या तालमीत तयार झालेला गळा आहे. आक्का म्हण्जे आलं ना लक्षात..."
"आक्का म्हणजे..." जरासं बावरून विसोबा.
"अहो, असं काय करताय तात्या?" अनिकेत पुन्हा जोरात. "गवारभुसार घराण्याची परंपरा चालवणारं आक्कांशिवाय कोण आहे आता? आधी आक्का आणि आता दाजी. दाजींचा आडवातिडवा अडाणा ऐकलाय ना तात्या?"
"आडवातिडवा अडाणा....?" दिगम्भा संपूर्ण खलास.
"हां.. नाव वाटतंय हां ऐकल्यासारखं..." विसोबा सावध.
"वा.वा. दाजींचा आडवातिडवा अडाणा म्हणजे प्रश्नच नाही..." मयुरेश आता रिंगणात. " दाजींचा अडाणा आणि बापूंची बिलवर की तोडी.."
" जसराजसुद्धा बरं का..." विसोबाचा फिरून एकदा प्रयत्न.
"जसराजबिसराज जुने झाले हो तात्या.. जरा काही आजच्या जमान्यातल्या गायकांविषयी बोला. बापूंचा बिलवर की तोडी ऐका तुम्ही दिगम्भा. अयायाया.... छळ आहे हो छळ.."
"बिलवर...?" दिगम्भा आता कोमात गेलेला.
"कस्ले जाणकार हो तुम्ही शास्त्रीय संगीताचे?" अनिकेत दुसऱ्या फेरीत. " निदान बापूंची ती गाजलेली बंदिशतरी ऐकली आहे की नाही तात्या तुम्ही?"
"नाही, मला काय वाटतं, आपण जरा अण्णांविषयी बोलू..." विसोबाच्या घशाला कोरड.
" वा, वा, काय आठवण करून दिलीस तू अनि.." मयुरेश हिरीरीने. "बापूंची तीच ना बंदिश..


खुजली खुजावत सैंया
खरखर
खुजली खुजावत सैंया"  

"क्काय...?" विसोबा व दिगम्भा समूहस्वरात.

"लाज ना आवे आज
खाज को कैसी लाज
झड गया सारा माज
मन करे ता तक थैया
खुजली खुजावत सैंया
खरखर
खुजली खुजावत सैंया" अनिकेत व मयुरेश समूहस्वरात.

"इथे 'माज' हा मराठी शब्द या हिंदी बंदिशीत कसा पाचर बसावी तसा फिट्ट बसलाय ना तात्या?" अनिकेत उत्साहाने.
विसोबाचा चेहराच पाचर बसावी तसा झालेला. " महाराज....क्षमा करा.... अशी काहीशी क्षीण पुटपुट.


"पुढे ऐका तात्या


एक अकेले में होवे या
आसपास हो सबजन
दाद, खाज, खुजली का दुशमन
बी टेक्स मल्हम बी टेक्स लोशन..."


म्हणजे बघा, खाज, तिचे वर्णन आणि तिच्यावरील उपाय असा तिय्या कसा साधलाय इथे. हीच शास्त्रीय संगीताची कमाल आहे महाराजा..."

"अरे.. अरे.. पाणी आणा... हवा येऊ द्या हवा.." असे काही आवाज व्यासपीठाकडून आले. एकच गोंधळ उडाला....

"काय परिसंवाद आहे की चेष्टा..."
"बाकी काही म्हणा.. हे होणारंच होतं एक दिवस..."
"काय पोरकट्पणा आहे..."
"अहो, पण मी म्हणतो खाजवून खरुज काढावीच कशाला..."
"ते दोघेही हेच म्हणत होते ना.. खुजली खुजावत सैंया..खि...खि...खि..."
"बंद करा असली संमेलनं.."
"हे कोण बोलले अतिशहाणे..."
"आम्ही काय वाट्टेल ते बोलू... आमच्या पैशावर..."
"क्काय डॉलरमस्ती.."
"तोंड आवर..."
"थोबाड फोडीन...."


आणि या गोंधळातच संमेलनाचे सूप वाजले! 


 


(गुंडाळून) संपूर्ण.

विशेषः विनोद व विरंगुळा आठवावे!