मुंबई दिनांक

आज सायंकाळी पुन्हा एकदा स्फोट-मालिका. ऐन गर्दीच्या वेळी उपनगरी गाडीत कामाचा दिवस भरून  घराकडे डोळे लावून परत निघालेल्या मुंबईकरांवर पुन्हा एकदा क्रूर आघात. सगळे वातावरण सुन्न आहे. घरी परतलेला प्रत्येक मुंबईकर मनात म्हणतोय 'आज ते गेले कदाचित उद्या मी.......'


मन बधिर होतंय. संवेदना फिकट होत आहेत. प्रत्येकाच्या मनात एकच पाल चुकचुकत आहे, 'त्यांत आपले तर कुणी नसेल ना?'. दूरध्वनी घणघणत आहेत. संचारध्वनी मूके झाले आहेत. संपर्कजाल मृत झाले आहे. अनेक कर्मचाऱ्यांना कचेरीतच थांबवण्यात आले आहे. घरातले बाहेर गेलेल्यांशी संपर्क साधायचा प्रयत्न करीत आहेत. डोळ्यात प्राण आणून वाट पाहत आहेत.


आता नेते येतील. झेड पहाऱ्यात बसून दूरदर्शन द्वारे जनतेला धीराने वागण्याचा, संयम राखण्याचा उपदेश करतील. आपले सरकार जागृत असून नेटाने तपास करेल व गुन्हेगारांना अटक करून कडक शासन करेल असा निर्वाळा देतील. पोलीस जनतेला मदतीचे आवाहन करतील, गुन्हेगारांना पकडण्यासाठी जनतेनेच पुढे येऊन माहिती देण्याचे आवाहन करतील. सर्व राजकीय पक्ष निषेध करतील.


कदाचित काही गुन्हेगारांना अटक होईल. मग पाठोपाठ ते निरपराध असल्याचा व आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांना सन्मानाने वागविण्याचा व सर्व सुखसोयी उपलब्ध करून देण्याचा आग्रह मानवतेचे पाठीराखे धरतील. कुण्या अधिकाऱ्याने या गुन्हेगारांना 'बोलते' करायचा प्रयत्न केलाच तर त्यांना निलंबित करून त्यांच्यावर खटला भरायची मागणी करायला मानवाधिकार वाले सरसावतील. गुन्हेगार जामिनावर सुटतील. खटले वर्षानुवर्षे चालू राहतील. साक्षीदार मरतील. पुरावे सडतील, न्यायाधीश निवृत्त होतील.


इकडे रात्र संपताच पुन्हा नव्या जोमाने पोटार्थी मुंबईकर त्याच स्थानकातून तीच गाडी पकडून कामावर निघेल. सर्व कचेऱ्या ओसंडून वाहतील. लगोलग शहरात फलक लागतील -


" ११ जुलै सायंकाळी ७ भीषण स्फोट


 १२ जुलै सकाळी १० वाजता कचेऱ्यांमध्ये ९८% उपस्थिती.


सलाम मुंबई "


रहाट गाडगे सुरूच राहील. पुढच्या अरिष्टाची काळजी न करता फक्त वाट पाहत मुंबईकर गेला दिवस आपला असे म्हणत आला दिवस साजरा करीत राहील.