अतिवृष्टि मानव-निर्मित?

मुंबईचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान २००० ते २५०० मि.मी. आहे. पण जुलै २००५ च्या शेवटच्या आठवड्यांत मुंबईंत एकदा चोवीस तासांच्या अवधींत सुमारे ९५० मि.मी. पाऊस पडला. त्याचप्रमाणे या वर्षीही राज्यभर कधी नव्हे इतकी अतिवृष्टी होत आहे. या घटना, विशेषतः गेल्या वर्षीची मुंबईंतील अतिवृष्टि, अनैसर्गिक वटतात.


शीतयुद्धाच्या काळांत बलाढ्य राष्ट्रे पर्यावरण युद्धविषयक तंत्रज्ञान विकसित करीत असल्याचे वाचनांत आले होते. त्यांत प्रगत विज्ञान व तंत्रज्ञान यांच्या साह्याने शत्रूच्या प्रदेशांत दूरस्थ नियंत्रणाने भूकंप, अतिवृष्टि, चक्रीवादळे आणि इतर विध्वंसक उत्पात घडवून आणून शत्रूचे नुकसान करता येते असे बोलले जात होते. काही वर्षांपूर्वी मोरवी धरण फुटले त्याबद्दलची माहिती येथील प्रसारमाध्यमांना समजण्याअगोदरच बीबीसी वृत्तवाहिनीने उपग्रहाच्या साह्याने घेतलेल्या छायाचित्रांसकट प्रसारित केली होती. त्या संदर्भांतही पर्यावरण युद्धाच्या चाचणीची शक्यता वर्तविल्याचे वाचनांत आले होते.


गेल्या काही वर्षांत जगभरांत झालेले अनेक उत्पात (यांत त्सुनामीचाही अंतर्भाव व्हावा) व उपरोल्लेखित अतिवृष्टि ह्याही (अणु-चाचण्यांप्रमाणेच) पर्यावरण युद्धतंत्राच्या चाचण्या असण्याची शक्यता आहे. ज्या प्रगत देशांनी हे तंत्रज्ञान विकसित केले असेल त्यांनीच या चाचण्या घेतल्या असतील असे नाही. पण ते एखाद्या युद्धपिपासू राष्ट्रप्रमुखाच्या किंवा दहशतवादी संघटनेच्या हाती लागले असेल तर त्याचा दुरुपयोग केला जात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.


(वरील आशयाचे पत्र मी दिनांक ५ ऑगस्ट २००५ ला सर्व प्रमुख वृत्तपत्रांकडे पाठविले होते. ते २२ ऑगस्टच्या "सकाळ"मध्ये व २३ ऑगस्टच्या "सामना"मध्ये छापून आले होते.)


आपणास वरील शक्यतेविषयी काय वाटते?