चौर्य/अनुकरण

सुरेश भट यांची 'केव्हातरी पहाटे' ही गज़ल मला अत्यंत आवडते. ती कितीदा वाचली आणि कितीदा ऐकली याची गणती नाही. गेले काही दिवस त्या गज़लेच्या छंदात, आणि तिचाच रदिफ़ व काफ़िया असलेल्या ओळी सुचू लागल्या.आधी मी त्याकडे साफ दुर्लक्ष केले. तरीही त्या येत राहिल्या, मला छळू लागल्या,दुसरे काही लिहावे म्हटलं तर सुचेना.अखेर नाईलाजाने मी त्या लिहून काढल्या.यास चौर्य म्हणावे,अनुकरण म्हणावे,प्रमाद म्हणावा,आदरांजली म्हणावे वा आणखी काही हे तुम्ही ठरवा.गज़लेच्या प्रांतात असं दुसर्‍याचा रदिफ़, काफ़िया वापरून शेर रचणे चालते वा नाही हे सुभाषचंद्रांसारखे जाणकार सांगू शकतील.


हलकेच भावविश्वा स्पर्शून रात्र गेली
तृष्णा युगायुगांची विझवून रात्र गेली


गालातल्या खळीला खुलवून रात्र गेली
लटका तुझा अबोला ठरवून रात्र गेली


नक्षत्रदीपमाला गेही प्रदीप्त झाली
ज्योत्स्नेत अंग माझे भिजवून रात्र गेली


झाली विलीन ज्योती ओजात भास्कराच्या
नाते समर्पणाचे उमजून रात्र गेली


येती उधाण लाटा ओथंबल्या क्षणांच्या
संकोचल्या मनाला वळवून रात्र गेली


होते जडावलेल्या नयनात चंद्र-तारे
स्वप्नील लोचनांना निजवून रात्र गेली


शृंगारली गुलाबी प्राची प्रभातकाळी
रंगात व्योम न्हाले, हरपून रात्र गेली


आदित्यबिंब ल्याली, कुंकू जणू कपाळी
सौभाग्यसाज जैसे मिरवून रात्र गेली


'केव्हातरी पहाटे' वरून अजून एक विचार सुचलाय त्यावर मनोगतींचे मत हवय.याच छंदातील दुसरी दोन गाणी आहेत- 'दाटून कंठ येतो' (चित्रपट अष्टविनायक), आणि 'ही वाट दूर जाते'. 'ही वाट'ची चाल थोडी वेगली आहे, परंतु 'केव्हातरी' व 'दाटून'च्या चालींमधील साम्य योगायोगापलीकडील वाटते. संगीतात गती असणारे मनोगती खुलासा करतील काय?तसेच यापैकी कोणते गाणे आधी आले ह्याबद्दल कुतुहल आहे.