गाढवही गेले..

सार्‍या निमंत्रितांना पडला सवाल आता
हा कोण ब्रह्मचारी केला हलाल आता


डोळे तिचे शराबी, चढली नशा जराशी
सांगू पुढे कसे मी, सारे हसाल आता


पुरता पहा अडकलो, पाशात बायकी मी
पाहून हाल माझे, टाळ्या पिटाल आता


स्वछंद जीव होता, ना बंध ना गुलामी
जाळ्यात पारध्याच्या मजला पहाल आता


होते समर्थ ज्ञानी, वेळीच जे पळाले
झाला विलंब मजला, बस हालहाल आता


धाडेल मंडईला, बांधेल दावणीला
आला कसा कपाळी हा राहुकाल आता


मी चाललो सुळावर, तुम्हास काय त्याचे
घ्या हादडून, लेको, नाचा खुशाल आता