धुळीस मिळालेले मराठी सिंहासन पुन्हा कधी तळपणार? ... ...

(घुसळलेले लोणी - २८)


-------------------------बातमी सुरवात-----------------------------
सर्व राज्यांत शिवरायांचे स्मारक उभारण्याचा संकल्पही धुळीला


तुषार खरात / सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ - शिवाजी महाराजांचे कार्य सर्वदूर पोचावे म्हणून भारतातील सर्व राज्यांच्या राजधान्यांमध्येही शिवरायांची स्मारके उभारण्याचा संकल्प श्री छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल नॅशनल कमिटीने केला होता. परंतु, कमिटीतीलच काही मराठी मावळ्यांनी दिल्ली येथील स्मारकाची जागा विकल्याने हा संकल्पही धुळीस मिळाला, अशी नवी माहिती आता पुढे आली आहे. .......
शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी इंदिरा गांधींनी दिलेला एक एकराचा भूखंड बिल्डरांना विकल्याचे वृत्त आज "सकाळ'ने प्रसिद्ध केले होते. शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कमिटीचे अध्यक्षपद कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत साठे यांच्याकडे देण्यात आले होते. हे पद आजतागायत त्यांच्याकडेच आहे. शिवरायांचे स्मारक उभारण्याचा इंदिरा गांधींनी संकल्प सोडला, त्या सुमारास वसंत साठे यांचे केंद्रातील माहिती व प्रसारण खात्याचे मंत्रिपद गेले होते. त्यामुळे कॉंग्रेसचे दुसरे नेते माधवराव शिंदे यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल नॅशनल कमिटीच्या अध्यक्षपदावर वसंत साठे यांची नेमणूक व्हावी, असे सुचवले. साठे हे मराठी असल्याने आणि दिल्लीतही त्यांचे वजन असल्याने सर्वांनीच त्यांच्या अध्यक्षपदाला पाठिंबा दिला; पण दुर्दैवाने त्यांच्याच अकार्यक्षमतेमुळे शिवरायांच्या स्मारकाच्या संकल्पनेची वाताहत झाली, असा आरोप कमिटीच्या उपाध्यक्षा सुमतीदेवी धनवटे यांनी "सकाळ'शी बोलताना केला. या कमिटीमध्ये साठे यांच्यासह विजय नवल पाटील, माझ्या थोरल्या भगिनी व "श्‍यामची आई' चित्रपटाच्या नायिका वनमालादेवी, सातारा राजघराण्यातील सुमित्राराजे भोसले आणि मी आदींचा समावेश होता, असेही त्यांनी सांगितले. वसंत साठे अध्यक्ष असल्यामुळे ते स्मारकाचे काम सहजपणे पूर्ण करतील, असा आमचा विश्‍वास होता. रवींद्रनाथ टागोर यांचे सर्व राज्यांमध्ये स्मारक उभारण्यात आले आहे. त्याच धरतीवर शिवरायांचेही सर्व राज्यांत स्मारक उभारण्याचा निर्णय कमिटीने घेतला होता. केंद्र सरकार व संबंधित राज्य सरकारे यांनी प्रत्येकी निम्मा खर्च सोसण्यासंदर्भातही त्या वेळी चर्चा झाली होती. १९९३ च्या सुमारास स्मारकाच्या जागेवर झोपड्या उभ्या राहिल्याची माहिती साठे यांनी आम
्हाला दिली. या झोपड्या हटविणे कमिटीला शक्‍य नसल्याचे सांगून त्यांनी जमिनीचा काही हिस्सा एका बिल्डरला विकण्याचा निर्णय घेतला. ही जमीन प्रत्यक्ष २५ कोटी रुपयांना विकली असतानाही ती पाच कोटी रुपयांना विकल्याचे दाखविले, असा आरोपही धनवटे यांनी केला.

शिवरायांच्या पहिल्याच नियोजित स्मारकाच्या संकल्पामागे अशी विघ्ने लागल्याने सर्व राज्यांत स्मारक उभारण्याची कल्पना आपोआपच मागे पडली.

शिवाजी महाराजांनी केलेले कार्य थक्क करणारे आहे. मात्र त्यांच्या या कार्याचा अभ्यास करण्यासाठी देशात एकही स्मारक नसावे, ही खरोखरच लाजिरवाणी बाब आहे. इंदिरा गांधींनी शिवरायांचे हे कार्य लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला; मात्र तो आमच्या अकार्यक्षम अध्यक्षांमुळे धुळीस मिळाला, असे त्या म्हणाल्या.

दरम्यान, ही जमीन बिल्डरला विकल्याच्या प्रकाराचा माथाडी कामगारांचे नेते बाबूराव रामिष्टे यांनी तीव्र निषेध केला आहे. या गैरप्रकाराच्या विरोधात आपण जोरदार आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
-------------------------बातमी संपली-----------------------------


ही बातमी वाचली... मन उदास झाले... ... ... ... काही विचार मनात डोकावले. त्याच ओघात ही बातमी येथे चिकटवली आणि या दोन चार ओळी लिहिल्या ... ...


देशाबाहेरील आणि महाराष्ट्राबाहेरील नेत्यांनी, जनतेने आणि विचारवंतांनी शिवरायांच्या कार्याची योग्य ती दखल घेतली नाही... किंबहुना या देदीप्यमान इतिहासाची अवहेलनाच केली अशी अनेक उदाहरणे देता येतील. पण आपल्याच मातीतील माणसांच्या हाती विकले जाण्याचे करंटेपणही मराठी माणसाच्या कपाळी युगानुयुगांपासून लिहिलेले आहे. 


मराठी मनाचे/भाग्याचे हे ग्रहण या नवीन युगात तरी मिटेल असे वाटते किंवा तसे ते निपटले जावे यासाठी काही करता येईल काय असा एकच प्रश्न या निमित्याने मनात उभा राहतो.


मराठी मातीच्या प्रेमाने येथे एकवटलेल्या मराठी मतीसमोर ही जाणीव प्रगट करणे हे त्या दिशेने टाकलेले एक चिमुकले पाऊल...