चिरंजीव/ चिरंजीवी

प्रियाली यांच्या 'चिरंजीव चिन्मयीस' ह्या लेखातून निर्माण झालेला प्रश्न


पत्रलेखनात मुलाला चिरंजीव लिहितात तसे मुलीला चिरंजीवी लिहिणे योग्य आहे का? त्याठिकाणी याविषयी अधिक चर्चा करुन मूळ लेखापासून प्रतिसाद भलतीकडे जाऊ नयेत म्हणून ही चर्चा. तेथील प्रतिसाद इथे नमूद करत आहे.  सदस्यांनी याविषयावर इथे मत द्यावे अशी विनंती.


पत्राच्या सुरूवातीला येणारे चिरंजीव हे विशेषण म्हणून वापरले आहे आणि म्हणून चिरंजीवी होणार नाही. खालचे स्पष्टीकरण पहा पटते का ते सांगावे, व्याकरणात रूची असणाऱ्या सदस्यांचे याविषयी मत जाणून घ्यायला आवडेल.



  1. आपण आपल्या शिक्षकांना पत्र लिहीताना माननीय/ आदरणीय जे काही लिहीता ते लिहीताना, माननीय देशमुख गुरुजी ( सर ) असे लिहाल. पण हेच पत्र जर देशमुख बाईंना (मॅडम) ना लिहायचे असेल तर माननीया लिहीणार का?
    वाचून पहा
    माननीया देशमुख बाई लिहिणे हे मराठीत चूक आहे. 

  2. आई व वडील दोघांना तीर्थरूप लिहीतात, ते विशेषण आहे म्हणून दोघांना सारखेच लिहीतात. हाच नियम तीर्थस्वरूपला लागू होतो.

    व्याकरणात रूची असणाऱ्या सदस्यांचे याविषयी मत जाणून घ्यायला आवडेल.

 अवांतर


चिरंजीव हा मूळ शब्द 'विशेषण' आहे. मोल्सवर्थ् चा शब्दकोष आपण दिलात. आमच्या जवळच्या शब्दकोशाची प्रत जाळ्यावर आहे की नाही ते माहिती नाही. चिरंजीव ह्या शब्दाचा अर्थ असणारे अमर, अविनाशी, प्राचीन ,पुरातन शब्द सुद्धा विशेषण म्हणून वापरले जातात. अशा वेळी विशेषणाचे लिंग न बदलता , त्यापुढे येणाऱ्या नामाचे रूप बदलणे आवश्यक आहे,


प्रशासकांना विनंती की शक्य असेल तर त्या लेखाचे व्याकरण विषयक सर्व प्रतिसाद इथे वळवावे.


आभार.