किस्से ज्येष्ठ ग्राहकांचे

                                    
      तीन दशकांच्या बँकेच्या सेवाकालात विविध स्तरांच्या, विविध क्षेत्रातल्या, वेगवेगळ्या वयोमानाच्या लोकांशी संबंध आला.पण सर्वात इंटरेस्टिंग वाटला तो ज्येष्ठ नागरिकांचा वर्ग. त्यांच्याबद्दल मला नेहमीच सॉफ्ट कॉर्नर होता. अजूनही अधुनमधुन मला त्यातल्या काहींची आठवण येत असते.
      बँकेचा दरवाजा उघडताच शिराळी आत यायचे, सोफ्यावर पंख्याखालची जागा पकडून बसायचे आणि बँकेचा इकॉनॉमिक टाईम्स पूर्ण वाचून मगच घरी जायचे. आमच्या शेखरने त्यांना एकदा 'मस्टर साईन केलं का' असे विचारलेही होते.
      नोकरीकरिता चेन्नईहून मुंबईला आलेल्या आमच्या मद्रासी विश्वनाथला मराठी मोदक खाऊ घालणाऱ्या भावेबाईंची आठवण मला मोदक खाताना हमखास येते. 
      लिंकिंग रोडवर खरेदी करताना घासाघीस करणारी  एखादी सिंधी बाई बघितली की 'देना बँकमे साडे नौ टका देते है,बँक ऑफ बरोडामें दस टका देते है, तुम नौ टका तो दो' असे म्हणून व्याजदराचा भाव करणारी तेजी गिडवानी आठवते. (हा विनोद नाही, वस्तुस्थिती आहे.)
      पण ज्येष्ठ ग्राहक म्हटले की सर्वात प्रथम आठवते ती इंद्रा रामचंदानी. मी नवीनच बँकेत लागले होते. फिक्स्ड डिपॉझिटमध्ये बसले होते. सत्तरीच्या घरातली एक सिंधी बाई रिसीट रिन्यू करायला आली होती̮. लेजरवरून माझ्या लक्षात आले की हिची एकच रिसीट आमच्याकडे होती आणि वर्षानुवर्षे ती ती रिसीट फक्त ९१ दिवसांसाठीच रिन्यू करत होती. जास्त मुदतीसाठी ठेवल्यास जास्त व्याज मिळेल असे सांगताच ती बाई तावातावाने मला काहीतरी सिंधीतून सांगू लागली. मला सगळे काही कळले नाही पण इतके जरूर कळले की रिसीट फक्त ९१ दिवसांकरताच रिन्यू करायची. ती गेल्यावर माझ्या मैत्रिणीने मला जी गोष्ट सांगितली ती ऐकून मला खूप वाईट वाटले. इंद्राला स्वत:चे मूलबाळ नव्हते. तिने पुतण्या मन्नूला आपला मुलगा मानले होते. मन्नू एके दिवशी ऑफिसला जायला म्हणून घराबाहेर पडला तो घरी परत आलाच नाही. खूप शोधाशोध केली,पोलिसात तक्रार केली पण काही उपयोग झाला नाही. इंद्राला धक्का बसू नये म्हणून घरच्यांनी तिला खोटेच सांगितले की परदेशी जाऊन मन्नूने 'गोरीशी' लग्न केले आहे म्हणून तो घरी येत नाहीय. तो कधीतरी नक्की येईल या आशेवर  इंद्रा जगत होती. तो येईल तेंव्हा पैसे मिळायला अडचण पडू नये म्हणून ती ९१ दिवसांच्यावर पैसे गुंतवायला तयार नसे.
      मी त्या खात्यात होते तेवढ्या दिवसात इंद्रा ४-५वेळा रिसीट रिन्यू करायला आली होती. काम झाल्यावरही ती बसून राही. तिचे सिंधीमधून मन्नूपुराण चालू असे. मी काम करता करत हिंदीमधून हं हं करीत असे. त्यानंतर माझी दुसऱ्या डिपार्टमेंटला बदली झाली. माझ्या जाग्यावर माझा सिंधी सहकारी श्याम परवानी आला.
      काही दिवसांनी श्याम हसत हसत माझ्या टेबलाजवळ येऊन म्हणाला, "जरा माझ्या डिपार्टमेंटला येतेस? तुझी नानी आली आहे रिसीट रिन्यू करायला. रिसीट माझ्या हातात द्यायला तयार नाही. म्हणते सिंध्यावर माझा विश्वास नाही. मराठी मुलीला बोलव. मी तिला भेटल्यावर तिने रिसीट माझ्या हवाली केली. मी तिचे काम करून दिले. ती खूश होऊन गेली. 
      दोन दिवसांच्या सुट्टीनंतर बँक उघडली होती. त्यामुळे बँकेत तुफान गर्दी होती. माझ्या टेबलासमोर भली मोठी रांग होती. तेवढ्यात एक गृहस्थ मला म्हणाले ," मला माझ्या बायकोच्या खात्यात पैसे भरायचे आहेत. पण मला तिचा अकाउंट नंबर माहीत नाही. मला जरा सांगाल का?"   
      आदल्या महिन्यात नवऱ्याला बॅलंस सांगितला म्हणून एका बाईने केलेला हंगामा माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला..( नेहमी पासबुक भरून नेणारा नवरा अचानक 'थर्ड पार्टी' झाला होता) ते आठवून मी म्हटले," माफ करा. मी ही माहिती तुम्हाला देऊ शकत नाही. पण घरी चौकशी करायची असेल तर आमचा फोन तुम्ही खुशाल वापरू शकता." 
      ते म्हणाले," परवा माझे लंग्जचे मेजर ऑपरेशन आहे. खात्यात आज पैसे भरतोय म्हटल्यावर बायको घाबरेल म्हणून तिच्या नकळत पैसे भरायचे आहेत." 
      त्यांच्या बोलण्यातला खरेपणा मला जाणवला म्हणून मी त्यांना नंबर शोधून दिला. खाते २२ वर्षांपूर्वीचे होते म्हणून शोधायला फार वेळ लागला. तोपर्यंत माझ्या समोरची रांग  आणखी वाढली होती. ते पैसे भरायला गेले. मी माझ्या कामाला लागले. थोड्या वेळाने माझी सहज नजर गेली तर कामत पुन्हा रांगेत उभे दिसले. 'आता आणखी काय' असा विचार मनात आला. त्यांचा नंबर आला तेंव्हा त्यांनी आपले विजिटिंग कार्ड मला देत म्हटले," तुम्हाला कधी फियाट घ्यायची असेल तेंव्हा सांगा. चांगला पीस काढून देईन"कार्डावर नजर घातली तेंव्हा कळले की कामत प्रिमियरमध्ये जनरल मॅनेजर होते. नजिकच्या भविष्यकाळात मी गाडी घेण्याची सुतराम शक्यता नव्हती. तरीही कामतांच्या या कृतीने मी सुखावले. प्रकृती आणि मन:स्थिती दोन्ही ठीक नसताना केवळ एवढे सांगण्यासाठी ते वीसेक मिनिटे रांगेत उभे राहिले होते.
      आठवड्यात एक तरी चक्कर मारणारे दांडेकर पुष्कळ दिवसांनी आले . मी त्यांना'कुठे बाहेरगावी गेला होता?' असे विचारल्यावर म्हणाले,"बाहेरगावी कसला जातोय? आजारी होतो." मग त्यांनी त्यांच्या आजाराची आणि उपचारांची सविस्तर माहिती दिली व शेवटी म्हणाले,"आता हे असच चालायचं. वय झालं ना. येत्या सात तारखेला बाहत्तर पुरी होतील. "
      सात तारखेला मला अचानक आठवले की आज दांडेकरांचा वाढदिवस. मी फोनवरून त्यांना शुभेच्छा दिल्या. आजूबाजूचे माझे सहकारीही त्यांच्याशी बोलले.दुपारी जेवणानंतर दांडेकर बँकेतील सर्वांसाठी ब्लॅक फॉरेस्ट घेऊन आले.आमच्या तंबीच्या हवाली केक करून ते आमच्याशी गप्पा मारू लागले.चीफ मॅनेजरांनी इंटरकॉमवरून केक कुणातर्फे याची चौकशी केली तेंव्हा मी दांडेकरांचे नाव सांगितले. सी. एम.नी दांडेकरांशी ओळख करून द्यायला सांगितले. दांडेकरांना घेऊन मी सी.एम.कडे जाईपर्यंत त्यांनी पुष्पगुच्छ मागवला. तो येईपर्यंत दांडेकरांना गप्पात गुंतवून ठेवले. आम्ही सगळे बँकिंग हॉलमध्ये जमलो. सी. एम. नी दांडेकरांना फुले दिली. छोटेसे भाषणही केले. आणखीही तिघे-चौघे बोलले. दांडेकर भारावून गेले. 'थँक्यू, थँक्यू वेरी मच' या खेरीज त्यांना काही बोलणे सुचेना. ते आनंदून घरी गेले. त्यांच्या आनंदाने (आणि केक खाऊन) आम्हीही आनंदलो. अनपेक्षितपणे एक दिवस मजेत गेला.
      डॉ. रामन हे बी.ए.आर. सी.मधून निवृत्त झाले होते. अतिशय बुद्धिमान  माणूस. पण जितके हुशार तितकेच रागीट आणि गर्विष्ठ. त्यांच्या चालण्या बोलण्यात, बघण्यातही अहंमन्यता डोकावत असे. रामन बँकेत आले आणि कुणालाही न फटकारता गेले असे कधी झालेच नाही. दोन अडीच महिन्यात रामन बँकेत फिरकले नव्हते. कुणीतरी म्हणालेसुद्धा'बरेच दिवसात रामनचा फेरा आला नाही'. आणि पुढच्याच आठवड्यात ते बँकेत आले. क्षणभर मी त्यांना ओळखलेच नाही. नेहमी मार्चिंगच्या थाटात चालणारे रामन पाय ओढत येत होते. ते फार खंगले होते. चेहराही काळवंडला होता. नेहमीसारखे काउंटरवर न जाता ते माझ्या टेबलापाशी आले. समोरच्या खुर्चीत दम खात बसले. थोड्या वेळाने माझ्यासमोर एक चेक धरत म्हणाले,"मी नुकताच एका मोठ्या आजारातून उठलो आहे. पैशाची गरज आहे म्हणून आलो पण रांगेत उभं राहायची ताकद नाही. तुम्ही मला काही मदत कराल का?"
      चेकची रक्कम फक्त अडीचशे रुपये होती. माझ्याजवळचे पैसे त्यांना देत मी म्हटले,"या चेकचे पैसे मी नंतर घेईन. पण  मला सांगा  तुम्ही नीट घरी जाल की कुणाला सोबत देऊ?" 
      स्वत:च्या अगतिकतेने की मी दाखवलेल्या सहानुभूतीने, मला ठाऊक नाही, पण रामन एकाएकी रडू लागले. हमसाहमशी रडू लागले. या प्रकारामुळे मी पार बावचळून गेले. काय बोलावे, कसे वागावे ते मला सुचेचना. आजूबाजूचे लोकही काम थांबवून आमच्याकडे बघू लागले. रामनना त्याची जाणीव झाली असावी. त्यांनी स्वत:ला आवरले. पैसे खिशात टाकत ते म्हणाले,"नको‌. सोबत नको. मी जवळच राहतो. जाईन हळूहळू." जाण्यासाठी ते उभे राहिले.आणि माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले,"गॉड ब्लेस यू, माय चाइल्ड"
      रामन पाय ओढत ओढत निघून गेले. जाताना वातावरण सुन्न करून गेले. तीच त्यांची आणि आमची शेवटची भेट. महिन्याभरात रामन गेल्याची बातमी कानी आली. अधून मधून त्यांची आठवण येते. पण आठवतात ते फक्त शेवटल्या भेटीतले रामन.