मराठी शब्द सुचवा स्पर्धा.

माझ्या मनात बऱ्याच दिवसापासून मराठी भाषेच्या संबंधी एक उपक्रम सुरू करावा असे आहे. जेणेकरून आजच्या स्पर्धामय वातावरणाचा मराठीसाठी योग्य आणि अचूक वापर करता येईल.

मराठी बोलीभाषेत अकारणच अनेक परकीय शब्द धुडगूस घालत असतात. तेच तेच शब्द कानावर पडत असल्यामुळे नकळतच असे शब्द मूळ भाषेतील शब्दांना जवळपास बोलीभाषेतून हाकलूनच लावतात.

यासाठी जास्त तार्किक चर्चा न करता, आपण दैनंदिन वापरातील काही वाक्ये एखाद्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध करावीत ( एखाद्या सदराखाली) आणि वाचकांना त्या शब्दासाठी त्यांना वाटणारा समर्पक शब्द सुचवावा अश्या प्रकारची स्पर्धा घ्यावी. दुसऱ्या दिवशी / किंवा आठवड्यातून  आलेल्या पत्रातून विजेत्या स्पर्धकाचा उल्लेख करावा आणि आलेल्या मराठी भाषेतील शब्दांचा वापर करून परत तीच वाक्ये त्याच वर्तमानपत्रात छापावीत.

या स्पर्धांमुळे सर्वसामान्यांना मराठीमधील शब्द हुडकत राहण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि नकळतच मराठी भाषेचे होणारे प्रदूषण कमी होण्यासाठी वावही मिळेल.

याबाबत मी जो काही विचार केला आहे तो असा,

१. प्रत्येक दिवशी अशी १० वाक्ये चांगल्या प्रख्यात वर्तमानपत्रात प्रसिद्ध करावी.
२. त्याला वाचकांनी प्रतिसाद पोस्टकार्डा मार्फत अथवा पत्राद्वारे कळवावी.
३. त्यातील उत्तम प्रतिसादास काही पारितोषिक पेश्यांद्वारे, पुस्तकाच्या द्वारे अथवा मराठीतील नाटकाच्या, चित्रपटाच्या ध्वनिफीत देऊन करावा.
४. १० वाक्यात सोपी शब्द असलेली, अवघड शब्द आणि कोठे कोठे मराठीत नवीन शब्द शोधण्यास वाव मिळेल अशी वाक्ये असावीत. जेणे करून स्पर्धकांना मौज वाटेल आणि मराठीत शब्दांची वानवा नाही हे कळत नकळत लक्षातही येईल.
५. ही स्पर्धा (किमान) १०० दिवस चालावी.
६. या स्पर्धेत मध्ये केवळ इंग्रजी शब्दांनाच नव्हे तर, फारसी आणि इतर परकीय शब्दांना देखील प्रतिशब्द मिळावा अशी अपेक्षा आहे. उदा. अर्ज, परवानगी, दोस्त, माफी, तक्रार इत्यादी इत्यादी.
७. मराठीतील अनावश्यक संस्कृतप्रचूर शब्दांना देखील सोप्या आणि सहज शब्दांचा पर्याय मिळाव.


आता मला मनोगतवर कार्यरत असलेल्या मित्र आणि मैत्रिणींकडून खालील अपेक्षा आहे.

१. स्पर्धा अजून परिणामकारक होण्यासाठी काही सूचना आहेत काय?
२. आपणही अश्या वाक्यांना माझ्या पर्यंत व्यक्तिगत निरोपाद्वारे अथवा मनोगतावर प्रतिसादांतर्गत पाठवू शकाल. जेणेकरून अनायास माझ्याकडे स्पर्धेसाठी वाक्यांचे संकलन होत जाईल आणि मला माझा तितका सहभाग कमी ठेवता येईल.
३. मराठीभाषेच्या संवर्धनासाठी अश्याच काही योजना असतील तर मला कळवू शकता.
४. पुण्यातील मराठी प्रेमी या उपक्रमात सक्रिय भाग घेणार असतील तर त्यांचेही स्वागतच आहे.
५. स्पर्धेसाठी चांगले शीर्षक मिळाले तर अजून बरे होईल.


आपला,

द्वारकानाथ कलंत्री. 



( पोस्टकार्डासाठीचा शब्द सूचवा.)