नाताळची चाहूल!

नोव्हेंबर सरत आला की नाताळची चाहूल लागते.दुकानादुकानातून मोठीमोठी ख्रिसमसची झाडे सजू लागतात.दिव्यांच्या रोषणाईने करड्या,ढगाळ  संध्याकाळी थोड्या रंगीत होतात,त्यात 'जान' आल्यासारखी वाटते.पोस्टातून भेटकार्डे, भेटपाकिटे पाठवण्यासाठी गर्दी होते.नाताळचे खास बाजार मैदानात,चर्चच्या आवारांत, नदीकाठी भरायला लागतात.हौशे,गवशे आणि नवशांची गर्दी तेथे व्हायला लागते.मेणबत्त्यांचे असंख्य प्रकार,चांदण्यांच्या आकाराचे आकाशदिवे, रेनडियरची वीजेवर लुकलुकणारी गाडी,दिव्यांच्या रंगीत माळा,फुगे, भेटकार्डे, नाताळभेटी देण्यासाठी आकर्षक डबे,रंगीबेरंगी भेटकागद, नाताळची चित्रे असलेले टी-सेट,पेले..काय नसतं तिथे? संध्याकाळी कळपाकळपाने लोक हिंडू लागतात‌. संगीताच्या तालावर सारेच डोलत,नाचत, खातपीत असतात. जणू जत्राच फुललेली असते!
खाद्यपेयांचे गाळे तर ठिकठिकाणी असतात.तिथली गर्दी पाहून वाटतं ह्या लोकांच्या घरी स्वैपाकघर आहे की नाही?खाण्यात मुख्य स्टॉल असतात वुर्ष्ट म्हणजे सॉसेजेसचे! अशा थंडीतही आइस्क्रीमच्या स्टॉलवर गर्दी असतेच. अनेक प्रकारचे बिअर आणि वाइन चे स्टॉल्स असतात.त्यातही नाताळच्या बाजारात मुख्य उठाव असतो तो ग्लु-वाइनला! रेड वाइन उकळवून त्यात विशिष्ट मसाले घालतात आणि कपातून गरम गरम पितात.इथली खासियत आहे 'एब्बेलवाय' म्हणजे ऍपलवाइन.ती ही लोक यावेळी गरम पितात.या गरम वाइन्समुळे आणि
उत्सवी वातावरणामुळे थंडीचा कडाका कमी होत असावा!
नाताळच्या पूर्वसंध्येच्या आधीच्या चार रविवारांना 'आडव्हेंट झोनटाग' म्हणतात. पहिल्या रविवारी एक मेणबत्ती संध्याकाळी जेवताना लावतात,दुसऱ्या रविवारी पहिली अधिक एक  असे चार रविवार एकेक मेणबत्ती वाढवतात आणि जेवताना लावतात.या रविवारपासून ते नाताळच्या पूर्वसंध्येपर्यंतचे 'आडव्हेंट कॅलेंडर' बाजारात दिसतेच पण कितीतरी उत्साही मंडळी ते घरी करतात.रोजच्या पानावर काही सुविचार,लेखकांची वचने,सुंदर कविता उद्धृत करतात.हा 'एर्स्ट आडव्हेंट' यायच्या आधीच घरं लख्ख होतात‌.तळघरातील कोठीच्या खोलीतल्या खास नाताळच्या वस्तू,ठेवणीतले टेबलक्लॉथ,ताटल्या, कपबशा बाहेर येतात.चांदीचे काटेचमचे चकाकू लागतात, शनिवारीच घरावर, अंगणातल्या ख्रिसमसच्या झाडावर दिव्यांच्या माळा लागतात,फराळाची तयारी सुरू होते.हे सगळं उत्सवी वातावरण आपल्या गणपती,दिवाळीच्या दिवसांची आठवण करून देतं. 
बाजारातही आता नाताळच्या फराळांचे पुडे,डबे दिसायला लागतात. निरनिराळ्या प्रकारची आणि आकाराची बिस्किटे आकर्षक पिशव्यातून दुकानादुकानात दिसतात‌. 'ष्टोलन' हा यीस्टचा (बेकिंगपावडर नाही) रममध्ये भिजवलेले बेदाणे घालून केलेला,पीठीसाखरेत घोळवलेला, पूर्व जर्मनीतील ड्रेस्डनची खासियत असलेला केक फक्त आताच सगळीकडे मिळतो.तसेच बायरिश 'लेबकुकन' ही लवंग,दालचिनी,जायफळ घालून केलेली बिस्किटे सुद्धा याच सीझनला मिळतात.चॉकलेटांचा तर पूर आलेला असतो. पहिल्या आडव्हेंटच्या दिवशी सगळी लहान मुले लवकर उठून प्रवेशदाराकडे पळतात,तिथे त्यांच्यासाठी 'निकोलाऊस मान' रात्री खाऊ ठेवून गेलेला असतो! इथे 'सँटाक्लॉज' नाताळच्या दिवशी खाऊ देत नाही तर 'निकोलाऊस मान' मुलांना खाऊ पहिल्या आडव्हेंटच्या पहाटे देतो.आणि नाताळच्या भेटवस्तू 'वाईनाक्ट्स मान' आणतो.पहिल्या ऍडव्हेंटला 'निकोलाऊस मान' आमच्या दारापाशीही खाऊचा पुडा ठेवतो!अगदी पहिल्यांदा असा खाऊ दारातल्या मांडणीवर पाहून आम्ही आश्चर्याने गोंधळून गेलो होतो.निकोलाऊस मानने ठेवलेला खाऊ आवडला का? असं जेव्हा आकिम आजोबांनी डोळे मिचकावून विचारले तेव्हा उलगडा झाला.
इकडे आता त्सेंटा आजीची लगबग सुरू होते."आता वाइनाक्ट्स गेबेक (नाताळचा फराळ)  करायला सुरुवात करायला हवी.."या तिच्या वाक्याने मी पटकन लहान होते, आठवतात  आईची,आजीची वाक्यं  "दिवाळी आठवड्यावर आली, डाळीचं पीठ,भाजण्या दळून आणायला हव्या,पोह्यांना उन्हं दाखवायला हवीत.." ह्या दोन्हीत काही फरक वाटत नाही! तीच लगबग,'फराळाचं' करण्याची तीच घाई! "बाजारात सगळं मिळतं ग,पण मी घरीच करते फराळ!" हे वाक्य  एखाद्या रमाकाकू म्हणतील ना तश्शाच ठसक्यात आजी म्हणते.मग अनेक प्रकारची बिस्किटे,केक करायला सुरुवात होते. बाजारात कधीच न पाहिलेले बिस्किटांचे प्रकार सुद्धा तयार होतात."ही आकिमच्या आईची कृती,ती माझ्या आईची आणि ती काल केली ना आपण, ती बिस्किटे माझी आजी करायची!"मी आजीकडे अवाक होऊन पाहत असते. मग तीही हळवी होऊन आपल्या वहीतून पेन्सिलीने लिहिलेल्या आता पुसट झालेल्या पाककृतीतून आपल्या आईचे, आजीचे,सासूचे अक्षर दाखवते,हळूच डोळ्याच्या कडा टिपते.अशा वेळी काय करायचं ते मला कळत नाही.मग आकिमआजोबा आपल्या हातात सूत्र घेतात."चला,चला आता ही ताजी ताजी बिस्किटे मस्त गरम कॉफीबरोबर घेऊया.."
आपण जशी दिवाळीच्या फराळाची ताटं शेजाऱ्यांना,मित्रमंडळींना देतो तसे इथेही नाताळचे फराळ एकमेकांना देतात.८५ वर्षांचे विमेलमान आजीआजोबा  हे आमच्या आजीआजोबांचे मित्र त्यांच्या सगळ्या ग्रुपबरोबरोबर आम्हालाही नाताळची बिस्किटे आणि आडव्हेंट  कॅलेंडर  देतात, आणि हे दोन्ही ते आजीआजोबा स्वतः घरी करतात!
गल्लीत इतर घराघरांतूनही ते परिचित गोड वास यायला लागतात.आपल्या कडे कसे लाडूसाठीचे बेसन भाजल्याचे वास दिवाळीच्या आधी सगळीकडून येतात,तसेच!
घरदार आता नाताळच्या स्वागताला सज्ज झालेले असते.