भरल्या वांग्याची भाजी - (प्राजक्ता स्टाईल)

  • छोटी वांगी - ८-१० (शक्यतो हिरवी)
  • २ मध्यम आकाराचे कांदे, लसूण पाकळ्या - ८/१०
  • आलं - १ ", दाण्याचे कूट - १ वाटी.
  • ओला नारळाच चव - १/२ वाटी, अर्ध्या लिंबाचा रस
  • गोडा मसाला - १टी. स्पून, कांदा लसूण मसाला - १ टी‌ स्पून,
  • मीठ, गूळ - थोडा, कोथिंबीर, धने -जीरे पावडर - १टी‌ स्पून.
३० मिनिटे
३-४ जण

वांग्याचे देठ थोडे कापून टाकवे , पूर्ण काढून टाकू नये. त्यानंतर मसाला भरण्याच्या द्रुष्टीने, वांग्याला + या चिन्हासरखे कापावे.. देठापर्यंत कापू नये. वांग्याचा तुकडा पडता कामा नये. अशी सगळी वांगी चिरून पाण्यामध्ये ठेवावीत.

मसाला : कांदे बारिक चिरून घ्यावेत. त्यात दाण्याचे कूट, ओल्या नारळाचा चव, गोडा मसाला, कांदालसूण मसाला, गूळ, लिंबाचा रस, धने-जिरे पावडर घालून घ्यावी. आता त्यात आलं आणि लसूण पाकळ्या छोट्या खिसणीने खिसून घालाव्यात. कोथिंबीर घालावी. मीठ(चवीप्रमाणे) आणि थोडे तेल घालून हा मसाला चांगला मळून घ्यावा.

हा मसाला आता वांग्यांमध्ये भरून घ्यावा.

छोट्या कुकरमध्ये तेल घालून नेहमी सारखी फोडणी करून त्यात एक एक वांगं टाकावं. सगळी वांगी टाकली की, एकदा कुकर हाताने धरून वांगी वर खाली हसडून(हा आईचा शब्द आहे) घ्यावी. उरलेला सगळा मसाला त्यात घालावा आणि सधारण ३/४ कप पाणी घालून कुकरचे झाकण बंद करून टाकवे.

छान दोन शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करावा.

गूळाचे प्रमाण भाजी किती गोड हवी यावर ठरवावे.

जांभळ्या रंगाच्या वांग्याला आमच्या कोल्हापूर-सांगली या बाजूला मिळणाऱ्या हिरव्या वांग्यांची चव नाही. या हिरव्या वांग्यांना क्रुष्णाकाठची वांगी असे म्हणतात. त्यामुळे हिरव्या वांग्याच्या भाजीची मजा वेगळीच असते. अशा भरल्या वांग्याच्या भाजी सोबत गरम गरम ज्वारीची भाकरी. बस्स्स!! परदेशात फक्त आठवणी काढायच्या...

माझी आई.