ध्येयासक्त

आज २३ मार्च. हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा राजगुरू आणि हुतात्मा सुखदेव याच्या हौतात्म्याचा स्मरणदिन.

हुतात्मा भगतसिंग याचे राष्ट्रकार्य आणि राष्ट्रभक्ति याविषयी सामान्य माणसांनी काय लिहावे? आज या महान क्रांतिकारकांच्या हौतात्म्यदिनी संसदेतील बॊम्ब स्फोटाची हकिकत मी सादर करू इच्छीतो, ज्यात आपल्याला हुतात्मा भगतसिंग यांचा एक नवा पैलू दिसून येइल, आणि तो म्हणजे परखड ध्येयवाद. bhagatsingh

दिल्ली येथे मध्यवर्ती विधानभवनात हुतात्मा भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी दिनांक ८ एप्रिल १९२९ रोजी बॉम्ब्स्फोट केला हे तर सर्वश्रुतच आहे. मात्र या स्फोटा मागची पूर्वपिठीका काय? प्रयोजन काय? परिमाण काय? एकुण परिणाम काय? या कार्याला अपेक्षित यश मिळाले का?

फ्रेंच क्रांतिकारक विलां याच्या शब्दांपासून स्फुर्ती घेत या बॉम्ब्स्फोटाचे प्रयोजन "बहिऱ्या कानांना ऐकू जाण्यासाठी मोठाच आवाज करावा लागतो" हे होते. न्याय व संस्कृतीच्या बाता मारीत आपल्या अंकित जनतेला जुलुमाखाली पिचून टाकाणाऱ्या, त्यांचे शोषण करणाऱ्या, व जगाला शांतता व स्वातंत्र्याची महती सांगत एकीकडे पादाक्रांत देशांतील मानवांना गुलामीत खितपत ठेवणाऱ्या इंग्रजांचे खरे रुप जगासमोर आणायचे हे ते प्रयोजन होते. भारतीयांना अखंड गुलामीतच पिचवून डोके अजिबात वर न काढु देण्यासाठी या दयाळू, न्यायप्रिय व सुसंस्कृत इंग्रज राज्यकर्त्यांनी आपला महान हेतू साध्य व्हावा यासाठी नुकतेच दोन काळे कायदे रचले होते व विधीमंडळाच्या अधिवेशनात ते जनतेच्या मर्जीविरुद्ध संमत करुन घेण्याचा सरकारचा कावा होता. ही दोन विधेयके म्हणजे 'औद्योगिक विवाद विधेयक' व 'सार्वजानिक सुरक्षा विधेयक'. ही दोन विधेयके संमत होणार त्याच सभागृहात त्याच प्रसंगी स्फोट घडवून मदांध राजसत्तेला हादरा द्यायचा हा हिं. स. प्र. से. चा मनसुबा होता. फ्रेंच क्रांतीकारक विलां याने १८९४ मध्ये पॆरिस येथे 'प्रतिनिधी दालनात' असाच स्फोट केला होता.

खरेतर हा स्फोट आधीच होणार होता. त्या काळी होळीच्या दिवशी व्हॊइसरॊय बडे हिंदी अधिकारी, विधीमंडळाचे सदस्य तसेच व्हॉइसरॊयच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य यांना मेजवानी देत असे. त्या वर्षी होळी २५ मार्च रोजी होती. वर्तमानपत्रांमध्ये कार्यक्रम जाहीर होताच व्हॉइसरॊय मेजवानीला जात असतानाच त्याच्या गाडीवर बॊम्ब टाकायचे असे ठरले. व्हॉइसरॊय च्या गाडीपुढे बिनीचा फटफटीस्वार असे तसेच त्याच्या गाडीवर पुढे ताजमहालाचे चित्र असे. हे लक्षात ठेवून कार्यकर्त्यांनी त्या दिवशी त्या मार्गावर उभे राहायचे व गाडी पसार होताच राजगुरूंनी हाताने इशारा करायचा व पुढे काही अंतरावर सज्ज असलेल्या जयदेव कपूर व शिव वर्मा यांनी गाडीत बॊम्ब टाकायचा असे ठरले. सर्वजण आपापली जागा धरून त्या घटकेची वाट पाहत होते. मात्र ती गाडी गेली तरी राजगुरूंचा इशारा न आल्याने सगळेच बुचकळ्यात पडले व परतले. राजगुरुंनी ती गाडी पाहताच त्यांच्या लक्षात आले की आत साहेब मजकूर नसून तीन स्त्रिया आहेत, अर्थातच त्यांनी इशारा केला नाही व निरपराध जीवांची ह्त्या टळली; जीने काहीच साध्य होणार नव्हते व तसा हेतूही नव्हता. sv n jk

मग मात्र यावर हिं. स. प्र से. मध्ये बरेच विचारमंथन झाले. अखेर भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी ही कामगिरी भर सभागृहात विधिमंडळाच्या त्या जुलुमी विधेयकांना संमती साठी पटलावर मांडले जाईल तेव्हा त्या क्षणीच पार पाडायची असे ठरले. शिवरायांच्या सवंगड्यांप्रमाणेच अश्या कामगीरीसाठी सारेच सैनिक नुसते उत्सुकच नव्हे तर उतावळे होते. राजगुरू तर हट्टाला पेटले होते. मात्र नियोजनबद्ध कार्यक्षमता, प्रचंड सहनशक्ती, धीरोदात्त स्वभाव, अनिवार्य उत्तेजनेच्या काळीही शांत राहण्याची अलौकिक क्षमता, रचने बरहुकुम कारवाई आणि इंग्रजी वरील प्रभुत्त्व या निकशांवर या दोन वीरांची निवड झाली. शौर्य, धाडस व मरणाला सामोरे जायची तयारी तर सर्वांकडेच होती.

अहिंसेची महती गाणाऱ्यांपैकी कुणालाही शक्य असणे दूरच पण सुचलेही नाही असा बॉम्ब सारख्या संहारक अस्त्राचा इतका अहिंसक उपयोग करून शत्रूला जबरदस्त हादरा आणि देशात जनजागृती हे दुहेरी कार्य या घटनेने योजले व साध्यही केले. या कृत्याबद्दल भगतसिंग तसेच बटुकेश्वर दत्त या दोघांनीही कसलाही प्रतिकार न करता स्वत: ला हसतमुखाने पोलिसांच्या स्वाधीन केले व खटला चालविणे सरकारला भाग पाडले. नेमक्या याच हेतूने तर तो निरुपद्रवी स्फोट घडवला गेला होता. अधिक संहारक शक्तिचा वा अधिक हानीकारक माऱ्याचा बॉम्ब बनविणे सहज शक्य होते, तो इच्छित व्यक्तिच्या थेट अंगावर फेकेणेही सहज शक्य होते, मात्र फक्त संपूर्ण संयत व निषेधप्रदर्शक स्फोट घडवण्यात आला. पुढे खटल्यातील साक्षीच्या वेळी इंग्लंडचे विख्यात अग्निशस्त्र तज्ज्ञ रॊबर्ट चर्चिल यांनाही ते न्यायालयात मान्य करावेच लागले. बॉम्ब फेकल्या नंतरही या दोन देशभक्तांनी पळून जाण्याचा किंवा साध्या प्रतिकाराचा देखिल प्रयत्न केला नाही. आपल्या जवळची निवेदन पत्रके फेकतांच त्यांनी स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले.

मात्र या खटल्यामुळे या महान क्रांतिकारकांना जे जे हवे होते ते सर्वच्या सर्व साध्य झाले. सर्वप्रथम या खटल्यात सरकारने दाखल केलेले आरोपपत्र व आरोपींनी केलेला बचावाचा युक्तिवाद यातून साऱ्या देशाच्या असंतोषाला वाचा फुटली व सत्य जगापुढे आले. या खटल्याच्या निमित्ताने न्यायप्रेमाचे गोडवे गाणारे इंग्रज किती अनितीमान आहेत व व ते आपल्या सोयीसाठी न्यायव्यवस्था कशी वेठीला धरतात हेही साऱ्या देशाला व जगाला दिसले. हिंदुस्थानी उच्चशिक्षीत लोक न्यायाधीशाच्या पदापर्यंत पोहोचेले तरी त्यांना सरकारचे गुलाम म्हणूनच रहावे लागते व त्यांच्या सोयीचाच निवाडा करावा लागतो हेही सिद्ध झाले. सर्वात महत्वाचे म्हणजे हिं. स. प्र. से. ही हिंसक व खुनशी वृत्तीच्या तरुणांची एक बेबंद संघटना आहे हा अपप्रचार या स्फोटाने साफ खोटा पाडला. उलट आपल्या सर्वोच्च ध्येयाखातर हिंसक अस्त्राचा अत्यंत अहिंसक पण परिणामकारक वापर उत्कृष्ठ रीत्या करता येतो; मात्र त्यासाठी आत्मसमर्पणाचा निश्चय व धैर्य अंगी असावे लागते हेही या स्फोटाने दाखवून दिले. आपण व आपले सहकारी यांच्या विरुद्ध गांधींसारख्या प्रस्थापीत, स्वकिय नेत्यांनी जनमानसात वाईट प्रतिमा निर्माण केली आहे, सरकारही देशभक्तांना चोर दरवडेखोर ठरवायला पाहते आहे तेव्हा हे प्रयत्न हाणून पाडून हौताम्य म्हणजे काय, क्रांती म्हणजे काय व जाज्वल्य देशभक्ती म्हणजे काय हे साऱ्या जगाला दाखवून देण्यासाठी हिं. स. प्र. से. च्या योद्ध्यांनी हा स्फोट घडवून आणला.

bomb या स्फोटाचे महत्त्व इतके अनन्यसाधारण आहे, की पुढे २२ वर्षांनतर जेव्हा आझाद हिंद सेनेला आपला माघार घ्यायची वेळ आली, नेताजी कालवश झालेले, जपानचा पाठिंबा अमेरिकेच्या अणुबॊम्ब ह्ल्याने नष्ट झालेला, जवळची शस्त्रे व रसद संपलेली तेव्हा सरसकट बलिदान करण्या ऐवजी आझाद हिंद च्या त्रिमुर्तीनी - प्रेम सेहगल, शाहनवाज खान व गुरूबक्षसिंग धिल्लॊं यांनी स्वत:ला इंग्रजांच्या हाती स्वाधीन केले. ही शरणागती या स्फोटाच्याच प्रेरणेतून होती. लढून मेले असते व हे तीन वीरही हुतात्मे ठरले असते व सुखाने स्वर्गस्थ झाले असते. पण कदाचित आझाद हिंद सेना; तिच्या मागचा हेतू, तिला मिळालेला जनाधार, जगातला सन्मान, तिची उद्दिष्टे व तिचा पराक्रन जगापुढे कधीच आले नसते, तीच्यावर 'गद्दारांची' फौज हा डाग कायम राहीला असता. आझाद हिंद सेना व नेताजी यांचे खरे रूप व असामान्य कार्य जगापुढे यावे यासाठीच या त्रिमुर्तीने स्वत:ला इंग्रजांच्या स्वाधीन केले ज्यायोगे त्यांच्यावर अभियोग चालविणे सरकारला भाग पडले व स्वत:च्या युक्तिवादात आझाद हिंद सेना व नेताजी यांची अलौकिक कामगिरी जगापुढे प्रकट झाली. न पेक्षा परकिय व प्रस्थापित सत्ताभिलाषी स्वकिय या दोहोंकडून आझाद हिंद बद्दल जनसामान्यांना चुकिचा इतिहास शिकवीला गेला असता व ते दु:ख आझाद हिंद च्या वीरांना मरणापेक्षा वा पराभवापेक्षा असह्य ठरले असते.

याच स्फोटाद्वारे हिं. स. प्र. से. ने जणू सरकारला इशारा दिला की स्वाभिमान जागृत होवुन गुलामीविरुद्ध बंड करून उठलेले जे हिंदुस्थानी असा निरुपद्रवी बोम्ब स्फोट घडवून मरणाला सामोरे जाण्याचे धैर्य दाखवितात तेच हिंदुस्थानी उद्या विध्वंसक बोम्बने साम्राज्याचा चिंधड्य़ा उडवतील. जे धैर्यशाली पुरूष हातात भरलेले पिस्तूल असूनही पोलिसांच्या स्वाधीन झाले ते उद्या अत्याचारी राज्यकर्त्यांना त्यांच्या राजासनावर कंठस्नान घालतील. आज हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा राजगुरू व हुतात्मा सुखदेव यांच्या पुढे नतमस्तक होवून म्हणावेसे वाटते,

जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान
सफल जाहले तुझेच हे रे तुझेच बलिदान.