अंधश्रद्ध - भाग २ वरुन पुढे चालू
"रीमा, बेटा हे काय चाललंय? कुठे आहेस तू? कशी आहेस?"
"बरी आहे गं आई," आईने कार्यक्रम पाहिला असावा हे जाणून रीमा म्हणाली. "घरात आहे, टीव्हीसमोरच. कार्यक्रम अमावास्येच्या रात्री चित्रित झाला ना! दोन दिवसांपूर्वी. लाइव टेलेकास्ट नाहीये. काळजी करू नकोस."
"ते काही नाही! तू नीघ आत्ता आणि असशील तशी उठून खोपोलीला ये. हे सगळं आत्ताच्या आत्ता थांबायला हवं,"रडवेल्या होऊन वसुंधराताई म्हणाल्या.
"रात्रीचे साडे दहा वाजायला आले आहेत आई. आता कुठे निघू म्हणतेस? ऑफिसात उद्या कामही आहे. पुढच्या आठवड्यात येते, काळजी नको गं करूस. मी बरी आहे. दोन दिवस झाले या गोष्टीला. सगळं काही सुरळीत चाललंय."
"नाही, ते काही नाही. मला काहीही ऐकून घ्यायचे नाही. आत्ताच नीघ, मी नाही धीर धरू शकत उद्या सकाळपर्यंत. खोपोली काही लांब नाही, रात्रीच्यावेळी तासा दिडतासात पोहोचशील. उद्याचा काय भरवसा, तू नवीन कारणे देशील, टाळशील. तुला कधी बघते असं झालंय."
"हम्म! मी अगदी व्यवस्थित आहे." रीमाला काय बोलावे सुचत नव्हते.
"मला खूप काळजी वाटते आहे. नको करूस असली कामं, सोडून दे सोडून दे म्हणून कधीची सांगत होते." वसुंधराताईंना हुंदका आवरला नाही. नानासाहेबांनी त्यांच्या हातातून फोन घेतला.
"रीमा, तुला शक्य होईल का यायला?" शांतपणे त्यांनी विचारले."उद्या सकाळीच नीघ. इतक्या रात्री नको. आई जरा जास्तच हळवी झालीये, तिचं ब्लडप्रेशर वाढलंय असं वाटतंय. मी बघतो तिच्याकडे पण उद्या आलीस तर मलाही बरं वाटेल."
"बाबा, आता तुम्हीही? ठीक आहे. मी उद्या घरी येते."
"पण तुझं काम?"
"आई जरा जास्तच काळजीत दिसत्ये, कसही करून कोणत्याही परिस्थितीत मी येतेच."रीमाने वचन दिले तसा नानासाहेबांनी फोन ठेवून दिला.
रीमा जागेवरून उठली, आईच्या रडण्याने ती पुरी बेचैन झाली होती. याप्रकारानंतर काही विशेष घडलं नव्हतं. तीही गेले दोन दिवस व्यग्रच होती पण आईच्या फोनने मनात दडून बसलेल्या विचारचक्राने फेर घ्यायला सुरुवात केली. 'आताच जावं का? बारा साडेबारा वाजेपर्यंत पोहोचता येईल. थोडाफार उशीर झाला तरी मध्ये गाडी न थांबवता पल्ला गाठता येईल. आई बाबांची बर्याच दिवसांत भेटही नाही.' तिच्या चमूला एक दिवस तिच्या गैरहजेरीत काम पाहणे अशक्य नव्हते. 'उद्या सकाळी फोनवरून त्यांना कळवता येईल,' असा विचार करतानाच तिने कपडे बदलले, पर्स उचलली आणि दरवाजा लॉक करून ती गाडीपाशी आली.
गाडीचा दरवाजा उघडताना मंद प्रकाशात मागे एक सावली हालल्यासारखी तिला वाटली. वळून पाहिले तर, रात्रपाळीची गस्त घालणारा गुरखा आपल्याकडे नजर रोखून बघतो आहे असा तिला भास झाला. तिने नजर उचलून त्याच्याकडे पाहिले. "सलाम मेमशाब!" म्हणून गुरखा निघून गेला. रीमाने स्मितहास्य करून मान झटकली आणि गाडी सुरू केली.
बिल्डिंगच्या बाहेर गाडी काढली तशी वळणावरचा आंधळा भिकारी झटकन उठून उभा राहिला. त्याच्या त्या निष्प्राण डोळ्यांनी आपल्याला तो न्याहाळतो आहे की काय असे रीमाला वाटले पण नंतर तिच्या लक्षात आले की रात्र झाल्याने बहुधा त्याची या जागेवरून उठायची आणि आपल्या जागी परतायची वेळ झाली असावी. स्वत:शीच हसून तिने गाडी हमरस्त्यावर नेली. मुंबईचे रस्ते साडे १० वाजले तरी तुडुंब भरलेले. सिग्नलपाशी गाडी थांबवली तशी वाहतूक हवालदार आपल्याकडे भिवई उंचावून उगीच बघतो आहे असे तिला वाटले, नजर फिरवली तशी बाजूच्या गाडीतील चालक टक लावून तिला पाहत होता. 'हे काय चाललंय? मी घाबरले आहे की भास होताहेत?' तिने क्षणभर डोळे मिटले. पाठच्या गाडीचा कर्णकर्कश्श हॉर्न वाजला तसे हिरवा दिवा पडल्याचे तिच्या लक्षात आले.
"भित्यापाठी ब्रह्मराक्षस!" तिने आपल्या मनाला बजावले. गाडी आता हायवेला लागली होती. दिवसाच्या मानाने आता रात्रीच्या वेळी रहदारी तुरळक होती. बाहेर थोडं वारं सुटलं होतं. चंद्राची कोर ढगांशी लपंडाव खेळत होती. अंधार नेहमीपेक्षा जास्तच गडद असावा की काय कोणास ठाऊक, क्षितिजावर मध्येच एखादी वीज चमकत होती. हळूहळू पावसाचे थेंब काचेवर पडायला सुरुवात झाली. रीमाने गाडीच्या काचा वर चढवल्या. गाडीच्या आरशात तिला मागून येणार्या ट्रकचे फक्त दिवेच दिसत होते. वायपरच्या मंद पार्श्वसंगीतावर रीमा गाडी हाकत होती. का कोण जाणे, गाडीत आपण एकटेच नाही हा वेडा विचार तिच्या मनात डोकावला. तिने आरशात नजर टाकली. 'मागच्या सीटवर कोणीतरी असले तर?' तिच्या अंगावर सर्रकन काटा उभा राहिला. घाईघाईने तिने खिडकीची काच खाली सरकवली, पावसाच्या थंड पाण्याचा शिडकावा तोंडावर झाला तसे तिला थोडे बरे वाटले .
अचानक मागचा ट्रक जवळ आल्यासारखा वाटला. 'या मागच्या ट्रकचे दिवे जरा जास्तच प्रखर वाटताहेत का .... ह्यॅ॒! आज फारच शंका येताहेत मनात बुवा. या मातोश्रींनी स्वत:बरोबर मलाही घोर लावला.' आता बरेच अंतर कापले होते. रिमझिम पाऊस पडतच होता. मागच्या गाडीच्या प्रखर दिव्यांचा अजूनही तिला त्रास होत होता. मध्येच मागचा ट्रक फारच जवळ आला की काय असा तिला वाटून गेले. लख्खकन दिव्यांचा प्रकाश तिच्या डोळ्यात गेला आणि क्षणभर तिला गाडीवरील ताबा सुटल्यासारखे वाटले. 'हम्म! किती घाई झालीये याला. ओवरटेक करून जा की, कशाला छळतोय मला!' रीमा स्वत:शीच पुटपुटली आणि त्या मागच्या ट्रकने बाजूने निघून जावे म्हणून तिने गाडी हळू केली, मागचा ट्रक आता फारच जवळ आला होता.
---
रात्रीचे बारा वाजून गेले होते. पाऊस आता जोमाने कोसळत होता. रीमाने गाडी घराकडे जाणार्या रस्त्यावर घेतली. तो ट्रकवाला अजूनही तिच्या मागेच होता. तिला थोडेसे विचित्र वाटले. 'हा माझा पाठलाग तर नाही ना करत?' पावसाने आता जोर धरला होता. घरापाशी जाणार्या गल्लीत तिने गाडी वळवली तरी तो ट्रक तिला मागेमागेच असल्यासारखा वाटला. तिने घाईघाईत गाडी बंगल्यात घेतली आणि ती उतरून धावतच दारापाशी आली आणि तिने दोन चारवेळा बेल दाबली. आतून काही चाहूल लागली नाही तशी तिने आईच्या नावाने हाका मारायला सुरुवात केली. 'आई! दार उघड. मी आल्येय. लवकर ये. दार उघड प्लीज!!'
काहीतरी चाहूल लागली असे वाटून वसुंधराताई सोफ्यावरून उठल्या आणि धीमी पावले टाकत दरवाज्यापाशी गेल्या. त्यांचा हात कडीवर गेला पण त्यांनी दरवाजा उघडला नाही, बंद दारावर आपले डोके टेकवले आणि त्या लहान मुलासारख्या ओक्साबोक्शी रडू लागल्या. रीमा बाहेरून जिवाच्या आकांताने आईला हाका मारत होती."मी आल्येय आई! तुम्हाला सांगितलं होतं ना की येईन. दार उघड, मला आत घे प्लीज!"
आतमध्ये नानासाहेब थरथरत्या हाताने अजूनही पोलिसांशी बोलत होते. पंधरा वीस मिनिटांपूर्वी त्यांना पोलिस ठाण्यातून फोन आला होता. खोपोलीजवळच रीमाचा अपघात झाला होता. मागून येणार्या भरधाव ट्रकने तिच्या कारला धडक दिली. अपघात मोठा होता, रीमाचा जागीच मृत्यू झाला असावा. कारमध्ये रीमाच्या डायरीत घरचा पत्ता सापडला त्यावरून पोलिसांनी झाली बातमी कळवण्यासाठी लगोलग नानासाहेबांना फोन केला होता.
(समाप्त)