महाराष्ट्र दरिद्री नाही हे सिद्ध करा : श्रीराम लागू ह्यांचे विचार

आजच्या ईसकाळ मध्ये ही बातमी वाचायला मिळाली. सर्वांना माहिती व्हावी आणि तीवर विचारांची देवाणघेवाण करता यावी ह्या हेतूने ती येथे उतरवून ठेवलेली आहे.

ईसकाळमधील बातमी : महाराष्ट्र दरिद्री नाही हे सिद्ध करा - श्रीराम लागू

पुणे, ता. १४ - ""हा मुलगा इतकी मेहनत करून ऑलिंपिकपर्यंत गेला आहे. त्याच्यासाठी पैशाचा इतका सुद्धा भार पेलता येणार नाही, इतके आपले राज्य दरिद्री नाही, हे सिद्ध करायची जबाबदारी महाराष्ट्राची आहे. मी महाराष्ट्राचा आहे आणि मदत करणे हे माझेसुद्धा कर्तव्य आहे,'' अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त करीत ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांनी वीरधवल खाडे याला दहा हजार रुपयांची मदत दिली आहे. .......
कोल्हापूरचा मेहनती जलतरणपटू वीरधवलच्या "मिशन बीजिंग ऑलिंपिक'साठी निधी उभारण्याकरिता "सकाळ'ने पुढाकार घेतला आहे. "सकाळ'ने आवाहन केल्यानंतर सर्व क्षेत्रांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आज श्रीराम लागू यांनी मदत दिली. आपली भावना व्यक्त करताना ते म्हणाले, ""वीरधवलला मी मुलगा म्हणतो; कारण तो माझ्यापेक्षा खूप लहान आहे; मात्र तो करीत असलेले काम खूप मोठे आहे. याचे कारण ऑलिंपिकमध्ये आपण यशाच्या जवळ क्वचितच गेलो आहोत. अशा वेळी वीरधवलसारख्या गुणी खेळाडूला मदत करणे हे महाराष्ट्राचे कर्तव्यच नाही का?''

वीरधवलविषयी मला इतकी तळमळ वाटण्याचे कारण सांगताना श्रीराम लागू पुढे म्हणाले, की मी लहानपणी खूप वेड्यासारखा पोहायचो. मला पोहायची विलक्षण आवड होती. तेव्हा "टारझन'ची भूमिका करणारा जॉनी वेसमुल्लर आमचा "हिरो' होता. त्याने एक पुस्तक लिहिले होते. "स्वीमिंग दी अमेरिकन क्रॉल' असे त्या पुस्तकाचे नाव होते. तेच आमचे "बायबल' होते. हे पुस्तक घेऊन मी पुण्यातील टिळक टॅंकवर जायचो आणि देहभान हरपून पोहायचो. नंतर कामाच्या व्यापामुळे मला नेहमीच पोहणे शक्‍य व्हायचे नाही; मात्र अजूनही मी शक्‍य तेव्हा पोहतो.

दरम्यान, इतर क्षेत्रांबरोबरच क्रीडा क्षेत्राचाही पुढाकार लक्षणीय ठरतो आहे. पुणे जिल्हा आंतरकचेरी क्रीडा संघटनेतर्फे पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष रमेश विपट आणि सल्लागार समितीचे सदस्य उदय पुंडे यांनी एका पत्राद्वारे वीरधवलला उज्ज्वल कारकिर्दीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

"हिरा कन्स्ट्रक्‍शन'तर्फे तानाजी रामचंद्र काळभोर यांनी दीड हजार रुपये दिले. काळभोर यांनी म्हटले आहे, की वीरधवल, तुझ्या नावातच तुझे यश आहे. तू महाराष्ट्राचा मान, तर भारतमातेची शान आहेस. तुझा आम्हाला अभिमान वाटतो.

*************************************************
वीरधवलसाठी "सकाळ'ने एक लाख रुपयांचा निधी जाहीर करून मदतीचे आवाहन केले. त्यानंतर राज्य सरकारने पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. "सकाळ'कडे आतापर्यंत सुमारे पावणेतीन लाख रुपये जमले आहेत. वीरधवलला ऑलिंपिकच्या तयारीसाठी १५ लाख रुपयांची गरज आहे. त्यामुळे त्याला आणखी सुमारे सुमारे साडेसात लाख रुपयांची गरज आहे. "सकाळ'च्या पुणे, मुंबई, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, सोलापूर, जळगाव, सातारा, नगर येथील कार्यालयांत मदत स्वीकारण्यात येत आहे. इच्छुकांनी "वीरधवल विक्रम खाडे' या नावाने धनादेश द्यावेत.

*************************************************
दि. १४ एप्रिल २००७ ची जमा रक्कम -
डॉ. महेंद्र वंटे - १००१, दिशा दिवाकर जोशी - ५००, तानाजी रामचंद्र काळभोर - १५००, महादेव अनंत बोडस - १०००, विनित थोरात - १०००, मनीष श्रीकांत काळे - ५०००, सोमवार पेठ गोसावीपुरा सार्वजनिक गणेश मंडळ - ५०००, आशुतोष एस. खेडकर - ६०१, त्रिंबक बाबूराव जाधव - ३०००, नेहा पोतदार - १०००, सायली शशिकांत कोकाटे - ५०१, व्ही. एम. पुरंदरे - ५००, पै. मिलन परदेशी - २५०१, जय आपटे - १०००, अजय आपटे - १०००, संपदा उज्ज्वल कुंटे - ५०००, राजेश अभ्यंकर - ११११, पुणे जिल्हा इंटर ऑफिसेस स्पोर्टस असोसिएशन - ५०००, अ. बा. सावंत - १०००, अमिता विश्‍वास उडपीकर - १०,०००, रेणुका आर. कुलकर्णी - ५०००, श्रीराम लागू - १०,०००, दिनकर शिवाजी तुरुके - ५०१, मेघराज व ओंकार सुनील जाधव - १००, सुभाष कृष्णराव फुले - १०००, उषा जोशी - ५००, पांडुरंग साहेबराव मेमाणे - ५०१, निश्‍चय सुनील परदेशी - ५०१, देवेन नवले - १०५, राणी धनंजय उंबरजकर, मुंबई - ५००.

दि. १३ एप्रिल २००७ पर्यंतचा जमा निधी रु. १,७५,५८८/- "सकाळ'चे एक लाख धरून २,७५,५८८