नौदलाच्या कराराचा मसुदा(१) (होम्स कथा...)
जुलै महिन्याचे दिवस होते. माझं नुकतंच लग्न झालं होतं. त्या काळात होम्स काही विवक्षित आणि राजकीय महत्त्वाच्या केसेसमधे अगदी गळ्यापर्यंत बुडाला होता. त्यातल्या एका केसमधे इंग्लंडचं राजकीय भवितव्यच नाही तर आंतरराष्ट्रीय राजकारणातील काही मोलाच्या गोष्टींना मोठाच धोका निर्माण झाला होता. सुदैवाने या केसबद्दल बोलण्याची मुभा मला होम्सकडून मिळालेली आहे.
या सगळ्या प्रकरणाला सुरुवात झाली ती एके दिवशी सकाळी मला आलेल्या एका पत्राने. सकाळच्या डाकेने मला माझ्या एका जुन्या शाळामित्राचं पत्र आलं. पर्सी फेप्स त्याचं नाव. हा गडी अतिशय हुशार, खिलाडू आणि सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारा होता. प्रसिद्ध राजकारणी आणि पुढारी लॉर्ड होल्डहर्स्ट हे त्याचे सख्खे मामा. पण त्याला मिळालेल्या अफाट यशाचं पूर्ण श्रेय त्यालाच जातं. मामाच्या लौकिकाला साजेशी कामगिरी त्याच्या मदतीशिवाय पर्सी करून दाखवत होता. वयाने असेल माझ्याएवढाच. पण चांगल्या दोन इयत्ता गाळून तो पुढे गेला. मिळवता येण्याजोगी सगळी बक्षीसं त्याने मिळवली.केंब्रिज कॉलेजची मानाची शिष्ज्यवृत्तीही त्याने पटकावली. तिथेही पठ्ठ्याने गुरुजनांच्या अपेक्षा पूर्ण करत दैदिप्यमान यश मिळवलंन. मग परराष्ट्रीय विभागात त्याला नोकरी मिळाली आणि तो सरसर वर चढला. एखाद्या परिकथेत शोभावी अशी त्याची ही कारकीर्द मला माहीत होती. पण शाळेनंतर आमचा पत्रव्यवहार मात्र कमी होत गेला आणि गेली काही वर्षं तर तो बंदच होता.
अशा पर्सीचं पत्र सकाळच्या डाकेनं टेबलावर येऊन पडलं आणि माझं मन काही क्षण त्या जुन्या रम्य दिवसांमधे भरारी मारून आलं. मोठ्या उत्सुकतेने मी ते पत्र फोडलं आणि वाचू लागलो
"ब्रायरब्री,
वोकिंग
प्रिय वॉटसन,
ओळखलंस का मला? मी 'बेडक्या' फेप्स.
तुला माहीतच असेल की माझ्या मामाच्या, लॉर्ड होल्डहर्स्टच्या दबदब्यामुळे परराष्ट्र खात्यात मी एका चांगल्या हुद्द्यावर नोकरी करतो. माझ्यावर सोपवण्यात आलेली प्रत्येक जबाबदारी आजवर मी मोठ्या सचोटीने आणि निष्ठेने अत्यंत यशस्वीपणे पार पाडत आलो आहे. पण काही दिवसांपूर्वी माझ्यावर असा काही दुर्दैवी प्रसंग ओढवला आहे की माझं सर्वस्व पणाला लागलं आहे. आणि अतिशय लाजिरवाण्या अशा बेअब्रूची तलवार माझ्या डोक्यावर टांगली गेली आहे....
या सगळ्या परिस्थितीबद्दल या पत्रात काहीही सांगणं मला शक्य नाही..जर तू माझ्या म्हणण्याला होकार दिलास तर मी तुला प्रत्यक्षच ते सगळं सांगेन.
गेले नऊ आठवडे मी मेंदूज्वराने आजारी होतो आणि अजूनही त्या थकव्यातून मी बाहेर आलेलो नाही. तू मि. शेरलॉक होम्सनाही तुझ्यासोबत घेऊन येऊ शकशील का? मला या प्रकरणात त्यांचं मत हवं आहे. पोलीसांनी मला आधीच सांगितलं आहे की यात अधिक काही करता येण्याजोगं नाही पण तरीही मला हे प्रकरण त्यांच्या कानावर घालायचं आहे. प्राप्त परिस्थितीत मला एकेक क्षण युगासारखा वाटतो आहे. तुम्ही दोघे शक्य तितक्या लौकर इकडे येऊ शकाल का? खरं तर मी याआधीच हे प्रकरण मि. होम्सना सांगायला हव होतं पण ही घटना घडली तेव्हापासून मी शुद्धीवर असा नव्हतोच. म्हणून या गोष्टीला इतका उशीर झाला आहे. नुकताच मी शुद्धीवर आलो आहे आणि माझी तब्येत इतकी क्षीण झाली आहे की हे पत्र स्वतः लिहिण्याची सुद्धा माझ्यात ताकद नाही. मी हे दुसऱ्याकडून लिहून घेत आहे.
सद्यपरिस्थितीत मला फक्त मि. होम्सचाच आधार वाटतो आहे त्यामुळे निर्णय घेण्याबाबत झालेल्या दिरंगाईबाबत मला क्षमा करून ते शक्य तितक्य लवकर इकडे येऊ शकतील का?.
वॉटसन, कसंही कर आणि त्यांना इकडे घेऊन ये.
येशील ना?
तुझा मित्र
फेप्स."