'दिल जो न कह सका'- संपन्न संगीतानुभव
संगीतकार अनिल विश्वास यांच्या 'माधुर्य' परंपरेतील ( 'मेलडी' स्कूल ) एक प्रमुख शागिर्द संगीतकार रोशन यांच्या हिंदी चित्रपटगीतांवर आधारित 'दिल जो न कह सका' हा कार्यक्रम काल रात्री पुण्यात झाला. उपजत गुणवत्ता, वाद्यांवरची हुकुमत, शास्त्रीय संगीताची तयारी, अर्थपूर्ण काव्य देणारे शायर आणि रफी, लता, आशा, मुकेश, तलत असे उपलब्ध असलेले एकाहून एक सरस गायक या सगळ्याच्या आधारावर रोशनचं संगीत कमालीचं श्रवणीय बनून राहिलं आहे. यात सर्वाधिक वाटा अर्थातच रोशनच्या गुणवत्तेचा आणि मेहनतीचा. पण अवीट गोडीचं संगीत देणाऱ्या या संगीतकाराच्या माथी देखील 'आर्थिक दृष्ट्या अपयशी' असाच शिक्का बसला आहे. अर्थात यामुळं रोशनचं मोठेपण कमी होत नाही, हा भाग वेगळा.
अशा मनात घर करून राहिलेल्या गाण्यांचे कार्यक्रम ऐकण्यामध्ये एक मोठा धोका असतो. ही गाणी सादर करणारे गायक-वादक जर तितक्या तयारीचे नसतील, तर आपल्या मनातल्या त्या गाण्यांच्या प्रतिमेलाच तडा जाण्याची शक्यता असते. म्हणूनच की काय, पण रोशनच्या संगीताच्या शिवधनुष्याला हात घालण्याचं धाडस आजपर्यंत कुणी केलेलं नव्हतं. 'हमलोग' ने सादर केलेल्या या कार्यक्रमात विभावरी आपटे-जोशी, मधुरा दातार आणि प्रमोद रानडे हे तर परिचित आणि तयारीचे कलाकार होते. प्रशांत नासेरी हा बाकी मी न ऐकलेला गायक. म्हणून तो रफीचा आवाज कसा काय पेलेतो ही उत्सुकता होती.
(पुण्याच्या परंपरेनुसार) वीस मिनिटं उशीरा पडदा बाजूला गेला आणि निवेदिका मंजिरी धामणकरनं सूत्रं हाती घेतली. निवेदक या जातीला मी पत्रकारांपेक्षा जास्त घाबरतो. तलतच्या गाण्याचे श्रीकांत पारगावकरांचे कार्यक्रम मी इतक्या वेळा ऐकले, पण प्रत्येक वेळी त्यातला निवेदक स्वतःच पायात चाळ बांधून तलतच्या आवाजाला फरफटत नेतोय असं वाटलं होतं. मंजिरीनं बाकी 'दोन रेशमी सुरावटींमधली एक सुरावट' ही भूमिका अतिशय सुरेख बजावली. 'चित्रलेखा' च्या 'मन रे तू काहे ना' चा पहिला आलाप प्रशांतच्या स्वरात ऐकला आणि अंगावर काटा उभा राहिला. 'कारवाँ गुजर गया' या पुस्तकाच्या प्रस्तावनेत मंगेश तेंडुलकरांनी म्हटलंय,' जी माणसं १९५० ते १९७० या काळात इथल्या चित्रपट संगीताशी पार गाण्यापासून ऐकण्यापर्यंत संबंधित होती, ती संपूर्ण मानवजातीच्या इतिहासात सर्वाधिक भाग्यवान असावीत'. त्याची प्रचिती यावी अशी ही गाणी. त्यानंतरचं विभावरीनं म्हटलेलं 'हमलोग' मधलं ' छुन छुन छुन बाजे पायल मोरी' ही असंच रंगलं. त्या मानानं प्रमोदचं 'अनहोनी' मधलं 'मैं दिल हूं इक अरमान भरा' हेच फिकं वाटलं. तलतच्या आवाजाचा बाजच वेगळा आहे. ती प्रयत्नानं साध्य होणारी गोष्ट नव्हे. तो परीसस्पर्श अल्लातालाच्या घरूनच व्हावा लागतो.