कालाय तस्मै नमः । ----- ३

३. मि. टॉम्किन्स सुट्टी घेतात  --- १
             टॉमकिन्स याना सापेक्षतेच्या शहरातील अनुभवांमुळे खूप गंमत वाटली होती पण त्याविषयी स्पष्टीकरण देण्यासाठी आपले प्राध्यापक मित्र आपल्याबरोबर नाहीत याबद्दल खेदही झाला होता.विशेषतः ब्रेकमन गाडीतील प्रवाशांचे वय कमी राहण्यास  जबाबदार आहे हे तर त्याना मोठेच गूढ वाटले होते. बऱ्याच रात्री स्वप्नात पुन्हा आपण त्या मजेशीर शहरात जाऊ अशी आशा त्याना वाटली होती पण त्याना स्वप्ने क्वचितच पडत व  पडलीच तर ती त्रासदायकच  असत़. उदा: मागील स्वप्नात त्यांच्या बँकेचा मॅनेजर रोजच्या जमाखर्चात त्यानी केलेल्या गफलतीबद्दल त्यांना झाडत असल्याचे त्याना दिसले होते. म्हणून त्यानी सरळ रजा काढून आठवडाभर कुठेतरी समुद्रकिनारी पर्यटनास जाण्याचा विचार केला. त्याचमुळे आता  ते ट्रेनच्या  एका  डब्यात  होते व डब्याच्या  खिडकीतून कौलारू छपरे हळूहळू हिरव्या कुरणात बदलत चाललेली त्याना दिसत होती. थोड्या वेळानंतर वर्तमानपत्र उघडून व्हिएतनामचा संघर्ष कोणत्या टप्प्यावर आला आहे याविषयी समजून घेण्याचा प्रयत्न त्यानी केला पण त्याचाही  त्याना कंटाळा आला . अचानक गाडीला मजेशीर झटका बसला व म्हणून हातातील पेपर डोळ्यापुढून बाजूला घेत त्यानी खिडकीच्या बाहेर नजर टाकली व समोरील दृष्य एकदमच बदललेले त्यांना दिसले.
          झुडपे आणि झाडे यांचे शेंडे अगदी अरुंद  व इटालियन सायप्रससारखे दिसत होते.टेलिग्राफचे खांब इतके जवळ जवळ होते की ते वाय अक्षरासारखे दिसत होते.  समोर त्यांचा (आता)  जुना मित्र  म्हणजे  प्राध्यापकमहाशय बसले होते व खिडकीतून बाहेर न्याहाळत होते. मि. टॉमकिन्स वर्तमानपत्र चाळत असताना ते आत आले असावेत. "आपण सापेक्षतेच्या प्रदेशात आहोत ना प्राध्यापकमहाशय ? "
"अरे वा " प्रा. महाशय उद्गारले"तुम्हाला बरच काही अगोदरच समजलेल दिसतय, कुठे शिकलात हे इतक सगळ ? "
"यापूर्वी  एकदा मी येथे येऊन गेलोय पण त्यावेळी आपली सोबत मिळण्याच सौभाग्य नव्हत"
 "मग यावेळी कदाचित तुम्हीच माझे मार्गदर्शक होणार दिसतेय"म्हातारबुवा हसत हसत उद्गारले.
"तस मात्र नाही हं " टॉमकिन्स त्याना झटकून टाकत म्हणाले "मला बऱ्याच अनाकलनीय गोष्टी पहायला मिळाल्या पण ज्यांच्याशी मी बोललो त्या स्थानिक लोकांपैकी  कोणालाही माझी अडचण काय आहे हे समजू शकले नाही."
 " ते स्वाभाविकच आहे."प्राध्यापक उत्तरले" ती माणसे त्याच जगात जन्मल्यामुळे हे सगळे  स्वाभाविक असेच त्यांना वाटते.पण माझी खात्री आहे की ज्या जगात आपण राहतो त्या जगात ती आली तर त्यानाही असेच आश्चर्य वाटेल. "
"मी एक प्रश्न विचारू का ?" टॉमकिन्स म्हणाले, "मागच्या वेळी मी येथे होतो त्यावेळी मला भेटलेला रेल्वेचा ब्रेकमॅन मला  बजावून  सांगत होता  की गाडी थांबते आणि पुन्हा चालू लागते या कारणामुळे  बाहेरील प्रवाशांच्या तुलनेत गाडीतील प्रवाशांचे वय मंद गतीने वाढते ही काय जादू वगैरे आहे की नव्या विज्ञानानुसार हे सुसंगत आहे ? "
"जादू म्हणून या गोष्टीचे स्पष्टीकरण करण्यास मुळीच वाव नाही " प्राध्यापक म्हणाले, " हे सर्व काही अगदी सरळ आहे" 
 "आइन्स्टाइन यांच्या सिद्धांतातील काल व अवकाश यांच्या कल्पनेप्रमाणे सर्व भौतिक क्रिया त्यांच्या अवकाशचौकटीचा वेग वाढल्यास मंदावतात. आपल्या  परिचयाच्या नेहमीच्या जगात हा  परिणाम न जाणवण्याइतका नगण्य असतो तर या जगातील प्रकाशाच्या कमी गतीमुळे त्या अतिशय ढोबळ होतात.उदाः या जगात अंडे  उकडण्यासाठी फ्राइंग पॅनवर ठेवल्यास पाच मिनिटात उकडले जात असेल तर तेच पॅन हातात हलवत राहिल्यास हालचालीच्या त्या गतीमुळे त्याच क्रियेसाठी सहा मिनिटे लागतील. त्याच पद्धतीने अगदी हालत्या खुर्चीवर बसणाऱ्या किंवा आगगाडीतून प्रवास करणाऱ्या मानवी शरीरातील क्रियाही मंदावतात.त्यातही अवकाशचौकटीच्या गतीत सारखा बदल होत असेल तर अधिक मंदावतात.मग प्रश्न  असा  आहे की  वैज्ञानिकांना नेहमीच्या जगात ही मंदावण्याची क्रिया जाणवते का  याचेही उत्त्तर होकारार्थीच आहे. पण त्यासाठी बऱ्याच प्रावीण्याची गरज असते. तांत्रिक दृष्ट्या त्यासाठी लागणारा एवढा अधिक प्रवेग उपलब्ध होणे अवघड असते. पण बदलत्या गतीने  हालणाऱ्या अवकाशचौकटीमधील अवस्था अतिशय मोठ्या गुरुत्वाखालील चौकटीशी समतुल्य असते उद्वाहकात उभे राहिलेल्या व्यक्तीस सुरवातीस वर जाताना उद्वाहकाच्या प्रवेगामुळे एकदम आपले वजन वाढल्याचा तर खाली जाताना ते कमी झाल्याचा अनुभव येतो. (दोर तुटला तर हा अनुभव अधिक तीव्र असतो) याचे स्पष्टीकरण असे आहे  की पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणात  उद्वाहकाच्या प्रवेगामुळे लक्षणीय घट किंवा वाढ होते‌ सूर्यावर गुरुत्वाकर्षण बल पृथ्वीपेक्षा अनेक पटीने जास्त असल्यामुळे तेथेही सर्व क्रियांचा वेग मंदावतो. अवकाशवैज्ञानिकांना ही गोष्ट जाणवते. पण या निरीक्षणासाठी ते तर सूर्यावर जाऊ शकत नाहीत. आणि त्याची आवश्यकताही नसते‌. सूर्याकडून आपल्याकडे येणाऱ्या प्रकाशाचे ते निरीक्षण करू शकतात‌. सूर्यावरील वातावरणातील वेगवेगळ्या  अणूंच्या कंपनामुळे  हा प्रकाश उद्भवत असतो.सर्व क्रियांबरोबर या कंपनाची गतीही तेथे मंदावत असते. व सूर्याकडून व इतर ताऱ्यांकडून येणाऱ्या प्रकाशाची तुलना करता हा फरक जाणवतो. "
" हो पण तुम्हाला आता आपण ज्या छोट्या स्थानकावरून जात आहोत त्याचे नाव माहीत आहे का? " मध्येच निवेदन थांबवत प्राध्यापकमहाशयांनी विचारले. त्यावेळी गाडी एका ग्रामीण भागातील छोट्या स्थानकावर  थांबत होती आणि तेथे स्टेशन मास्तर व सामानाच्या ढकलगाडीवर बसून पेपर वाचणारा  एक हमाल वगळता कोणीच नव्हते.अचानक स्टेशनमास्तरांनी  आपले हात हवेत वर झटकले आणि ते जमिनीकडे तोंड करून खाली पडले.मि. टॉमकिन्सना गोळीबाराचा आवाज ऐकू आला नाही. कदाचित गाडीच्या खडखडाटात तो विलीन झाला असावा. पण स्टेशन मास्तरांच्या शरीराभोवती जमलेले रक्ताचे थारोळे पाहिल्यावर त्यात शंका घेण्यास जागा नव्हती.
           प्राध्यापकानी लगेच साखळी ओढली व एक धक्का देऊन गाडी थांबली.ते दोघे डब्यातून बाहेर पडले तेव्हा तो हमाल खाली पडलेल्या व्यक्तीच्या निष्प्राण देहाकडे  धावत गेला आणि त्याचवेळी एक पोलिस तेथे अवतीर्ण झाला. "बरोबर काळजावरच गोळी लागलीय" तो म्हणाला आणि मृतदेहाची तपासणी करून एकदम त्या हमालाचा खांदा  आपल्या मजबूत हातात पकडत म्हणाला, "स्टेशनमास्तरच्या खुनाबद्दल मी तुला अटक करत आहे. "  "पण मी त्याना मारले नाही. "तो दुर्दैवी हमाल उद्गारला, "मी पेपर वाचत होतो तेव्हां मी सुद्धा गोळीचा आवाज ऐकला. या दोघा गृहस्थांनी गाडीतून हा सगळा प्रकार पाहिला आणि तेच सांगतील की माझा या प्रकाराशी काही संबंध नाही"
"खर आहे" टॉम्किन्स म्हणाले, "स्टेशन मास्तरांना जेव्हां गोळी लागली त्यावेळी हा खरोखरच पेपर वाचत होता हे माझ्या डोळ्यानी मी पाहिले हवे तर बायबलची शपथ घेऊन सांगायला मी तयार आहे. "
 "पण तुम्ही तर चालत्या गाडीत होता" आपल्या हुकमी आवाजात पोलिस म्हणाला "त्यामुळे तुम्ही जे काय पाहिले तो पुरावा समजता येणार नाही" फलाटावरून पाहिल्यास हा माणूस त्यावेळी गोळी घालत असण्याची शक्यता आहे. तुम्ही कोठून पाहता यावरूनच घटना एकाच वेळी घडल्या की नाही हे ठरते इतकेही माहीत नाही का तुम्हाला? चल रे "हमालाकडे वळून म्हणाला.
" पोलिसदादा,माफ करा मला" प्राध्यापकमहाशय आपले घोडे पुढे दामटत म्हणाले," पण तुमचे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. आणि मला नाही वाटत पोलिस मुख्यालयात तुमचे हे अज्ञान खपवून घेतले जाईल.या देशात घटनां एकाच वेळी घडण्याच्या शक्यतेची सापेक्षता अधिक प्रमाणात आहे हे खरेच आहे.   दोन ठिकाणी घडणाऱ्या दोन घटना एकाच वेळी घडल्या की नाही हे निरीक्षकाच्या हालचालीच्या वेगावर अवलंबून असते हेही तितकेच खरे पण त्याचबरोबर तुमच्या या देशातही घटनेचा परिणाम घटना घडण्यापूर्वीच कोणत्याही निरीक्षकास पहाता येणार नाही हे मात्र निश्चित.तुम्हाला तारघरातून तार  करण्यापूर्वीच ती मिळत नाही किंवा दारूची बाटली उघडण्यापूर्वीच दारू चढायला सुरवात होत नाही.तसे माझ्या समजुतीप्रमाणे तुम्हाला असे वाटतेय की गाडीच्या वेगामुळे गोळीबाराची घटना प्रत्यक्ष तिच्या परिणामानंतर आम्हाला दिसली आणि आम्ही गाडीतून बाहेर पडताना आम्ही स्टेशन मास्तरना खाली पडताना पाहिले तरी त्यापूर्वीची गोळीबाराची घटना मात्र आम्हाला तोपर्यंत दिसलीच नव्हती.माझ्या माहितीप्रमाणे पोलिस दलात तुम्हाला मिळालेल्या लिखित सूचनांचे पालन करण्यास शिकवलेले असते त्याप्रमाणे तुमच्या नियमावलीच्या पुस्तकात याविषयी काय लिहिले आहे हे जरा तपासून  पहाता का?" 
     प्राध्यापकांच्या स्वरातली जरब पोलिसाला जाणवली आणि आपली नियमावली काढून ती सावकाश वाचण्यास त्याने सुरवात केली आणि शरमल्यासारखे हास्य आपल्या लालबुंद जाडजूड चेहऱ्यावर आणून " अहो खरेच की," तो म्हणाला,"इथे स्पष्टच दिले आहे ,भाग ३७,उपविभाग १२,परिच्छेद ई नुसार गुन्ह्या घडताना त्यावेळी कोणत्त्याही हालत्या अवकाशचौकटीतील किंवा +cd (c नैसर्गिक वेगमर्यादा व d  हे घटनास्थळापासून अंतर) इतके काल अंतर असलेल्या स्थळावरील निरीक्षकाचे मत तेथील उपस्थितीचा पुरावा म्हणून ग्राह्य मानण्यात यावे " आणि हमालाकडे वळून;" भल्या माणसा,तू आता जाऊ शकतोस " असे म्हणून प्राध्यापकाकडे पहात तो पुढे म्हणाला,
" महाशय,धन्यवाद,मोठ्या संकटातून मला आपण वाचवलेत नाहीतर मुख्यालयात माझी चांगलीच पंचाईत झाली असती.मी नुक्ताच पोलिसदलात भरती झालो आहे त्यामुळे नियमांची अजून मला फारशी माहिती झालेली नाही,पण आता खुनाची माहिती  मात्र मला कळवायला पाहिजे." असे म्हणून तो टेलिफोनबूथकडे गेला मिनिटाभरातच तो प्लॅटफॉर्मवर येऊन मोठ्याने ओरडून त्याने सांगितले,"सगळे काही ठीक झाले आहे त्यानी खऱ्या खुन्याला तो पळून जात असताना पकडलय. आणि तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद !"
" मी कदाचित मूर्ख असेल" ट्रेन पुन्हा सुरू झाल्यावर टॉमकिन्स मनातल्या मनात म्हणाले " पण घटनांच्या समकालीनत्वाविषयीची हा काय प्रकार आहे?या देशात त्या गोष्टीस काहीच महत्व नाही की काय ?"
" निश्चितच आहे" उत्तर मिळाले " पण मर्यादित प्रमाणात. नाहीतर हमालाला मदत करणे मला जमलेच नसते.हे पहा, कोणत्याही वस्तूच्या हालचालीच्या  किंवा संकेतवहनाच्या वेगाच्या नैसर्गिक मर्यादेचे अस्तित्व समकालीनत्वाच्या आपल्या कल्पनेतील अर्थच नाहीसा करते.  तुन्हाला ते अधिक सोपे वाटेल अशा पद्धतीने असे सांगावे लागेल. समजा दूरच्या एका शहरात रहाणाऱ्या मित्राशी तुम्ही पत्रद्वारे संपर्क साधत आहात.ते पत्र आणण्यासाठी टपालगाडी हे जलद वहनाचे साधन आहे.समजा रविवारी तुम्हाला काही तरी झाले आणि तसेच तुमच्या मित्रालाही होणार आहे ही गोष्ट तुम्हाला कळली  तर हे त्याला बुधवारपूर्वी कळवणे तुम्हाला शक्य होणार नाही,याउलट तुमच्या बाबतीत घडणाऱ्या या घटनेची कल्पना मित्राला असेल तर ते तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी मागील गुरुवारीच त्याला पत्रद्वारे संपर्क साधणे आवश्यक ठरले असते .थोडक्यात मागील गुरुवार ते पुढील बुधवार या सहा दिवसात तुमच्या मित्रास तुमच्या बाबतीत घडणाऱ्या घटनेविषयी तुम्हाला कल्पना देणे किंवा घडलेल्या घटनेविषयी जाणून घेणे शक्य नव्हते,म्हणजे हे सहा दिवस या घटनेच्या संदर्भात तो तुमच्या संपर्कात नव्हता असे म्हणावे लागेल
’ तार करणे शक्य असेल तर ?" मि.टॉमकिन्सनी विचारले.
" पण मी अगोदरच सांगितले आहे की ट्रेनचा वेग हीच अधिकतम वेगाची मर्यादा आहे आणि या देशापुरते ते खरेही आहे.आपल्याकडेही प्रकाशाची गती हीच वेगाची अधिकतम मर्यादा आहे तरी रेडिओलहरींपेक्षा जलद गतीने संकेतवहन होत नाही. "
"पण तरीही" मि.टॉमकिन्स म्हणाले."जरी टपालगाडीपेक्षा अधिक वेग शक्य नसला तरी त्यामुळे समकालीनत्वावर कसा काय परिणाम
होईल ? कारण तरीही माझा मित्र आणि मी दोघेही रविवार रात्रीचे भोजन एकाच वेळी घेण्याची शक्यता नाही काय ?"
" नाही,त्या विधानाला मग काही अर्थच उरत नाही.एक निरीक्षक कदाचित ते मान्य करेल पण पण काही निरनिराळ्या आगगाडीतून प्रवास करणारे निरीक्षक मात्र हे मान्य करणार नाहीत त्यांच्या मते तुमचे रविवार रात्रीचे जेवण तुमच्या मित्राच्या शुक्रवारच्या न्याहरीच्या वेळी किंवा मंगळवारच्या रात्रीच्या जेवणाच्या वेळी घेत असाल.पण कोणत्याही परिस्थितीत तुमच्या जेवणाच्या वेळा जुळल्याचे निरीक्षण तीन दिवसापेक्षा जास्त दिवसांच्या फरकाने घडलेले आढळणार नाही. "
" पण हे सगळे असे कसे घडेल?" गोंधळून जाऊन मि. टॉमकिन्स यांनी विचारले.
" अगदी सोप्पे आहे माझ्या व्याख्यानातून तुमच्या लक्षात आले असेल की कोणत्याही चल अवस्थेतून निरीक्षण केल्यास वेगाची अधिकतम मर्यादा ही नेहमी तीच रहाते हे एकदा आपण मान्य केले की त्यावरून निष्कर्ष निघतो की ---- "पण त्याच वेळी ट्रेन मि.टॉमकिन्सना ज्या स्थानकावर उतरावयाचे होते तेथे  शिरल्यामुळे त्यांच्या संभाषणात खंड पडला.