कालाय तस्मै नमः ।------ ८

प्रकरण ५
स्पंदनशील विश्व
      समुद्रकिनाऱ्यावरील त्या हॉटेलातील पहिल्या संध्याकाळी  प्राध्यापकांशी अवकाशविज्ञानावर तर मॉडशी कलाविषयक गप्पा मारत रात्रीचे जेवण घेऊन आपल्या खोलीत आल्यावर टॉमकिन्सने आपल्या बिछान्यावर अंग अगदी झोकूनच दिले आणि रजई अगदी डोक्यावर ओढून घेतली.त्याच्या डोक्यात बॉटिसेलि व बोंडी,साल्वाडोर डाली व फ्रेड हॉयेल लेमैत्र व लाफोन्टेन अशा सगळ्या व्यक्तिमत्वांनी गोंधळ घालून मेंदूला जबरदस्त ताण दिला होता पण शेवटी कसाबसा तो गाढ झोपी गेला- पण मध्येच एकदम जाग येऊन आपण आपल्या मऊमऊ गादीवर नसून एका कठिण पृष्ठभागावर आहोत असे याची जाणीव त्याला झाली.डोळे उघडल्यावर खरोखरच तीस फूट व्यासाच्या एका प्रचंड खडकावर आपण असल्याचे त्याला जाणवले.आणि तोही कोणत्याही आधाराशिवाय हवेत तरंगत आहे हे लक्षात आले.
      खडकावर सर्वत्र हिरव्यागार शेवाळाचा थर होता आणि मधून मधून खडकातील भेगांमधून घोटी झुडुपे डोकावत होती.त्या खडक भोवतीच्या प्रकाशाने चमकत होता आणि वातावरण मात्र धुळीने भरलेले होते.इतकी धूळ मध्यपूर्वेतील धुळीच्या वादळावर काढलेल्या चित्रफितीमध्येही  त्याने पाहिली नव्हती.त्याने आपल्या रुमालाने आपले डोके व नाक झाकून घेतल्यावर जरा बरे वाटू लागले.पण केवळ धुळीपेक्षाही आसमंतात आणखी काहीतरी धोकादायक वस्तु आहेत असे त्याला जाणवले.त्याच्या डोक्यापेक्षाही मोठ्या आकाराचे दगड तो ज्या खडकावर उभा होता त्याच्या आसपास  वातावरणात भिरभिरत होते व मधूनच विचित्र आवाज करून त्या खडकावर आदळतही होते.एवढेच काय पण त्याच्या खडकाच्या आकाराचेही खडक अवकाशात थोड्या दूर फिरताना दिसत होते.हा इतका वेळ निरीक्षण करताना खाली पडून धुळीने भरलेल्या पोकळीत गायब होण्याच्या भीतीने त्याने खडकावरील उंचवट्याना घट्ट पकडून ठेवले होते.पण थोड्याच वेळात त्याने जरा धाडस करून खडकाच्या कडेपर्यंत रांगत येऊन खरोखरच खडकाला कसलाच आधार नाही का हे पहाण्याचा प्रयत्न केला.तसे सरकताना परीघाचा पाव हिस्सा गेल्यावर आपण पडत नसून आपल्या वजनाने त्या खडकाला घट्ट चिकटले असल्याचे जाणवून त्याला आश्चर्य वाटले.त्याचबरोबर खडकास आधार काहीच नाही असे आपल्या मूळ जागेवर दगडांच्या घळीत उभे राहून पाहिल्यावर त्याला दिसले व त्या प्रकाशात आपला प्राध्यापक मित्रही तेथे उभा राहून आपल्या वहीत काहीतरी नोंदवीत असल्याचे पाहून त्याला आश्चर्याचा धक्का बसला. आता त्याच्या डोक्यात हळू हळू प्रकाश पडू लागला.
       आपल्या शालेय जीवनात पृथ्वी म्हणजे एक गोलाकार खडक असून अवकाशात सूर्याभोवती फिरत असतो हे त्याला आठवले त्याचबरोबर दोन्ही टोकालाही आधाराशिवायच दोन प्रदेश दाखवलेले दिसतात हेही जाणवले.त्यामुळे आपण उभे असलेला खडकही तशीच अंतराळातील वस्तु आहे व पृष्ठाभागावरील सर्व वस्तूंना आपल्या आकर्षणात पकडून ठेवलेले आहे.या ग्रहावर तो व प्राध्यापक या दोघांचीच वस्ती आहे.आपण खाली पडत नाही या कल्पनेने त्याच्या जिवात जीव आला.आणि :सुप्रभात"असे प्राध्यापक मित्रास अभिवादन करत आपल्या वहीतून त्याचे लक्ष  विचलित करण्याचा प्रयत्न केला
."इथे प्रभात नसते" आपल्या नोंदवहीतून वर दृष्टी टाकत त्यानी म्हटले"इथे सूर्यच काय पण कोणताच प्रकाशमान तारा नाही.इथल्या वस्तूंमध्ये काही रासायनिक क्रिया चालू आहेत हे माझे भाग्य नाहीतर या अवकाशाचे प्रसरण होत आहे याचा वेध घेण मला जमलच नसत."म्हणून त्यानी आपली नजर पुन्हा आपल्या नोंदवहीकडे वळवली..या ग्रहावरील एकुलता एक प्राणीही आपल्याशी इतका तुटकपणे वागतो हे पाहून टॉमकिन्सला वाईट वाटले.पण अनपेक्षितपणे एक उल्का त्याच्या मदतीस आली आणि त्या छोट्या खडकाचा तुकडा प्राध्यापकाच्या वहीवर पडून ती त्याच्या हातातून निसटली व अवकाशात वेगाने त्यांच्यापासून दूर गेली."ती आता तुमच्या हातात कधीच येणार नाही."अवकाशात दूर जात लहान लहान होणाऱ्या वहीकडे पहात टॉमकिन्स म्हणाला.
" तसे काहीही घडणार नाही "प्राध्यापक उत्तरले.आत्ता आपण ज्या अवकाशात आहोत ते अनंत नाही. होय शाळेत तुला ते अनंत आहे असे शिकवले होते तसेच दोन समांतर रेषा कधीही मिळत नाहीत असेही शिकवले होते.पण इतर मानवप्राणी जेथे रहातात किंवा आत्ता आपण ज्या अवकाशात आहोत तेथे हे लागू पडत नाही..पहिल्या अवकाशाची सध्याची मापे फारच मोठी म्हणजे १०चा २२वा घात  (काही कारणामुळे  मनोगतवरील लेखनमर्यादेमुळे असे लिहावे लागत आहे.)   मैल इतकी मोठी आहेत जी आपल्याला अनंत वाटू शकतील.त्यामुळे माझे पुस्तक त्यावर हरवले तर ते परत मिळायला अतिशय मोठा अवधि लागेल हे खरेच आहे पण या अवकाशाचे तसे नाही.ते माझ्या हातून सुटण्यापूर्वीच या विश्वाचा व्यास फक्त ५ मैल आहे हे मला समजले होते व ते जरी प्रसरणशील असले तरी ते पुस्तक माझ्या हातात परत यायला फारफार तर अर्धा तास लागेल. 
"पण मग तुम्हाला अस म्हणायचय का की ओस्ट्रेलियन आदिवासींच्या बूमरॅंगसारख ते पुस्तक परत फिरेल आणि आणि वक्र मार्ग आक्रमत तुमच्या तुमच्या पायाशी येऊन पडॅल ?" टॉमकिन्सने विचारण्याचे धाडस केले.
 "असे मुळीच नाही"त्यानी उत्तर दिले "प्रत्यक्षात काय घडते हे जाणून घ्यायचे असेल तर पृथ्वी गोल आहे हे न जाणणाऱ्या त्या ग्रीक माणसाविषयी विचार कर.समजा त्याने एकाद्या माणसाला सरळ उत्तरेकडे जाण्यास सांगितले आणि तो सरळ जाऊन दिसेनासा हो ऊन पुन्हा दक्षिणेकडून त्याच्याकडे परत येताना दिसला तर त्याला किती आश्चर्य वाटेल.कारण त्याला जगाभोवती ( म्हणजे या बाबतीत पृथ्वीभोबती)प्रवास करण्याची कल्पना नसल्यामुळे तो  माणूस कोठेतरी वाट चुकल्यामुळे परत आला असा त्याचा समज होईल.प्रत्यक्षात त्या माणसाने अगदी सरळ रेषेत प्रवास केल्यामुळे पृथ्वीला प्रदक्षिणा घालून तो विरुद्ध दिशेने परत आलेला असेल.माझ्या वहीच्या बाबतीत असेच घडणार आहे.फक्त वाटेत एकाद्या दगडाचा अडथळा येऊन त्याचा मार्ग बदलायला नको म्हणजे झाले.ही दुर्बीण घे आणि पहा ती वही अजूनही दिसेल तुला.टॉमकिन्सने दुर्बिण डोळ्यास लावली आणि धुळीने धूसर झालेल्या पार्श्वभूमीवरही त्याला ती वही दूर दूर जाताना स्पष्ट दिसली.पण त्या वहीसह सर्वच वस्तूना गुलाबी छटा आलेली पाहून त्याला आश्चर्य वाटले.     
"पण" थोड्याच वेळात तो उद्गारला,"तुमची वही परत येत आहे असे दिसतेय कारण ती आकाराने मोठी मोठी होत चाललीय.
"नाही" प्राध्यापक म्हणाले,"ती अजूनही दूरच जात आहे.ती मोठी होत असल्याचा भास होण्याचे कारण इथल्या किरणांवर या बंदिस्त गोलाकाराचा हॉणारा भिंगात्मक परिणाम आहे.आता पुन्हा एकदा त्या ग्रीक माणसाचे उदाहरण घे.प्रकाशकिरणे पृथ्वीच्या वक्र पृष्ठभागालगत वातावरणातील प्रकाशकिरणांच्या विकीरणाचा परिणाम होऊन त्याच्यापासून दूर जाणारा माणूस अतिशय प्रभावी दुर्बिणीतून पाहिल्यास शेवटपर्यंत पाहू शकेल.पृथ्वीच्या गोलावरच पाहिलेस तर अगदी सरळ काढलेली रेखावृत्ते धृवावरून एकमेकापासून दूर जातात पण विषुववृत्त ओलांडल्यावर पुन्हा विरुद्ध धृवावर एकत्र येतात. या रेखावृत्तावरून जर प्रकाशकिरण जात असतील तर त्यातून पहाणाऱ्यास विषुववृत्तापर्यंत ती व्यक्ती लहान होत असल्याचे दिसेल पण त्यानंतर मात्र ती जवळजवळ येत आहे आणि तिचा आकार वाढत आहे असा भास होईल.आणि विरुद्ध धृवावर गेल्यावर ती अगदी तुमच्या शेजारी उभी असल्यासारखी आकाराने दिसेल पण बहिर्गोल आरशातील प्रतिमेप्रमाणे तिला तुम्ही स्पर्श मात्र करू शकणार नाही.  या द्विमिती उदाहरणाशी तुलना करता  विचित्र पद्धतीने वक्र झालेल्या त्रिमिती अवकाशातून जाणाऱ्या प्रकाशकिरणांचे काय होत असेल याची कल्पना करू शकशील.आता तर त्या वहीचे प्रतिबंब अगदी जवळ आले आहे असे मला वाटते." खर तर दुर्बिण दूर सारल्यावरही वही काही यार्ड अंतरावरच आहे असे टॉमकिन्सला वाटले.पण तिचा आकार विचित्र वाटत होता.वहीच्या कडा स्पष्ट दिसत नव्हत्या.व मजकूरही अस्पष्ट दिसत होता.प्राध्यापकानी लिहिलेली सूत्रे वाचणे तर शक्यच नव्हते आणि कॅमेरा नीट केंद्रित न केल्यामुळे निघणाऱ्या व नीट मुद्रण न झालेल्या  छायाचित्राप्रमाणे  ते पुस्तक दिसत होते.
"आता हे बघ ,ही पुस्तकाची केवळ प्रतिमा आहे. विश्वाच्या अर्ध्या भागावरून प्रवास करणाऱ्या प्रकाशकिरणांनी अतिशय विस्कटलेल्या स्वरुपात दिसत आहे.त्या पलिकडील दगडाचे तुकडेही त्यांच्या पानापलिकडून दिसत आहेत." टॉमकिन्सने पुस्तकाला हात लावण्याचा प्रयत्न केला पण तो हवेमधून जावा तसा कोणताही विरोध न होता त्या प्रतिमेतून गेला.,"ते पुस्तक आता विश्वाच्या विरुद्ध धृवाच्या अगदी जवळ आहे. आणि आता तू इथे जे काही पहात आहेस त्या त्याच्या दोन प्रतिमा आहेत.एक प्रतिमा अगदी तुझ्या पाठीमागे आहे.खरे पुस्तक विरुद्ध धृवावर पोचेल तेव्हां दोन्ही प्रतिमा एकत्र येतील" टॉमकिन्स आपल्या विचारात इतका दंग झाला होता की त्याला काही ऐकू येत नव्हते.अंतर्गोल आरसे व भिंगे यातून मिळणाऱ्या प्रतिमांविषयी प्राथमिक विज्ञानात शिकलेल्या माहितीची तो उजळणी करत होता व त्यातील काहीच न आठवल्यामुळे त्याने तो नाद सोडून दिला आणि त्या दोब प्रतिमा आता एकमेकापासून दूर जात असताना त्याला दिसल्या.
"पण मग अवकाश वक्र कसे होते आणि असे विचित्र परिणाम कसे होतात ?" त्याबे प्राध्यापकाना विचारले.
 " वजनदार वस्तूंच्या अस्तित्त्वामुळे ." उत्तर मिळाले." जेव्हां न्यूटनला गुरुत्वशक्तीच्या अस्तित्वाची माहिती झाली त्यावेळी दोन पदार्थाना जोडणाऱ्या लवचिक दोरीमुळे निर्माण होणाऱ्या शक्तीसारखीच ती एक शक्ती आहे असे त्याला वाटले.पण वस्तुमान व वजन कितीही असले तरी गुरुत्वबलामुळे होणारे त्वरण मात्र हवेच्या घर्षणाचा परिणाम वगळता तेच असते या बाबीचे गूढ मात्र कायमच राहिले.आइन्स्टाइनने हे प्रथम निदर्शनास आणले की वजनदार वतूंच्या अस्तित्त्वामुळे अवकाशास वक्रता प्ताप्त होते.गुरुत्वक्षेत्रात फिरणाऱ्या सर्व पदार्थांच्या कक्षा वक्र असतात.व त्याचे कारण अवकाशही वक्र असते हे आहे.पण पुरेशा गणिती ज्ञानाशिवाय हे तुला आकलन होणे अवघड आहे असे मला वाटते."
" हे खरेच आहे".:टॉमकिन्स म्हणाला,"पण मला एक सांगा की असे द्रव्यच नसते तर आम्ही शाळेत शिकलेली भूमितीच सर्वत्र लागू पडली असती आणि समांतर रेषा कधीच मिळू शकल्या नसत्या का ?"
"त्या मिळाल्या नसत्या"प्राध्यापक उत्तरले "पण त्याचबरोबर हे पडताळून पहायला कोणी जीवही अस्तित्त्वात नसता.म्हणजे अशा केवळ मोकळ्या अवकाशाच्या भूमितीची मांडणी करणारा युक्लिडही नसता ." पण अशा काल्पनिक चर्चेत प्राध्यापकांना रस नव्हता आणि तितक्यात पुस्तकाची प्रतिमा अतिदूर जावून पुन्हा परत यायला सुरवात झाली होती. आता तर पहिल्यापेक्षा अधिकच अगदी ओळखू न येण्याइतकी  दुर्दशा तिची झाली होती.आणि प्राध्यापकांच्या मते त्याचे कारण प्रकाशकिरण सर्व विश्वाभोवती फिरून आल्याचा तो परिणाम होता.
 " तुझे डोके जरा वळवून पहा माझी वही जगाभोवतीचा प्रवास पुरा करून परत येताना तुला दिसेल."प्राध्यापक टॉमकिन्सला असे म्हणाले आणि लगेचच आपला हात लांबवून आपली नोंदवही त्यानी हस्तगत केली व आपल्या खिशात कोंबली.
"या जगात इतकी धूळ व धोंडे आहेत की त्याभोवती पहाणे अशक्यच आहे.आपल्याजवळ या आकृतिहीन सावल्या तुला ज्या दिसतात त्या आपल्याव आपल्यासभोवतीच्या वस्तूंच्या प्रतिमा आहेत.पण त्या धूळ आणि अवकाशाच्या वक्रतेची अनियमितता यामुळे इतक्या विस्कळित झाल्या आहेत की कोणाची कोणती हे मीही सांगू शकत नाही."
"आपण रहात होतो त्या मोठ्या विश्वातही हाच प्रकार घडतो का?"टॉमकिन्सने विचारले.  
" अर्थातच " उत्तर मिळाले,"पण आपले विश्व इतके मोठे आहे की त्याभोवती जाण्यास प्रकाशाला कोट्यावधी वर्षे लागतात.तुझी हजामत कशी झाली आहे हे तुला आरसा न घेता दिसेल पण त्याला सलूनमध्ये गेल्यानंतर कोट्यावधी वर्षे वाट पहावी लागेल.शिवाय वातावरणातील धुळीमुळे ती प्रतिमा पूर्णपणे दिसेनाशी झाली असेल हे वेगळेच.एका इंग्रज अंतराळशास्त्रज्ञाने विनोदाने असे म्हटले की आपण सध्या जे तारे पहातो आहे त्यातील काही पूर्वी अस्तित्त्वात असणाऱ्या ताऱ्यांच्या प्रतिमाच आहेत. "
           हे सगळे स्पष्टीकरण समजून घेण्याच्या प्रयत्नानी बिचारा टॉमकिन्स अगदी थकून गेला आणि जरा इकडे तिकडे पाहू लागला आणि आश्चर्याची गोष्ट  म्हणजे आकाशाचा चेहरामोहरा अगदी बदलून गेल्यासारखे त्याला दिसले.आता धुळीचे प्रमाण खूपच क्मी झाले असे पाहून त्याने अजूनही चेहऱ्यावर बांधलेला रुमाल काढून घेतला. तरंगणाऱ्या लहान लहान दगडांचे प्रमाण आणि त्यांचा पृष्ठभागावर आदळण्याचा वेग कमी झालेले जाणवले.तो ज्या मोठ्या खडकावर होता तसे मोठे खडक तर इतके दूर गेले की जवळ जवळ दिसेनासे झाले होते.
" एकूण इथले जीवन बरेच सुसह्य होत चालले आहे" टॉमकिन्सला वाटले,"मला तर भीती वाटत होती की या दगडांपैकी एकादा दगड माझा कपाळमोक्ष करणार  आपल्या भोवती असा बदल कसा घडला हे सांगू शकाल का?"त्याने प्राध्यापकाकडे वळून विचारले.
" हो निश्चितच,आपले हे छोटे विश्व वेगाने प्रसरण पावत आहे व आपण इथे आल्यापासून त्याची मापे पाच मैलापासून शंभर मैल इतकी वाढली आहेत.मी येथे पाय ठेवल्यापासून दूरवरच्या वस्तू लाल होत असल्याचे पाहून मला या प्रसरणाचा अंदाज आला."
"हो खरेच लांबच्या वस्तू गुलाबी होत आहेत,पण त्यावरून प्रसरणशीलतेचा अंदाज कसा करता येत.?" टॉमकिन्सने विचारले, "
 "तू कधी अनुभव घेतला आहेस का ?’प्राध्यापकांनी विचारले ,"की आपल्या दिशेने येणाऱ्या आगगाडीची शिट्टी अगदी कर्कश वाटते पण तीच शिट्टी आगगाडी आपल्याजवळून दूर जाऊ लागल्यावर कमी तीव्र वाटते.याला ध्वनीची तीव्रता ध्वनिस्रोताच्या गतीवर अवलंबून आहे हे दर्शवणारा डॉपलर परिणाम म्हणतात.सगळे विश्व प्रसरण पावत असताना त्यातील प्रत्येक पदार्थ गतिशील होतो व ती गती त्या पदार्थाच्या निरीक्षकापासूनच्या अंतराशी समप्रमाण असते आणि त्यामुळे त्या पदार्थापासून निघणारा प्रकाश अधिक तांबडा होतो जो प्रकाशपटलात खालच्या स्तरावर असतो.(तांनापिहिनिपाजा या प्रकाशपटलात तांबडा सगळ्यात खालच्या तर जांभळा सगळ्यात वरच्या पातळीवर असतो)वस्तु जितकी दूर तितका वेग अधिक आणि ताम्रता अधिक वाढते. आपले विश्वही असेच प्रसरण पावत असल्यामुळे हा ताम्रता परिणाम (red shift) अंतराळ वैज्ञानिकाना अतिदूर अंतरावरील ताऱ्यांची अंतरे जाणून घेण्यास उपयोगी पडतो.उदा:अगदी जवळच्या ऍन्ड्रोमेडा नेब्युला ०.०५% ताम्रीभवन दर्शवतो ज्यावरून त्याचे अंतर आठशे हजार (८,००,०००) प्रकाशवर्षे एवढे आहे तर दुर्बिणीतून पहाता येणाऱ्या काही ताऱ्यांचे ताम्रीभवन १५% हे त्यांचे अंतर कित्येक हजारो दशलक्ष (१०९) प्रकाशवर्षे असल्याचे दर्शवतात. संभवत: ते नेब्युले अतिविशाल विश्वाच्या विषुववृत्ताच्या निम्म्या अंतरावर स्थित असावेत. अंतरालस्थिती वैज्ञानिकाना (terrrestrial astronomers)माहीत असलेले घनफळ या विशाल विश्वाचा बराच मोठा भाग आहे.  या विश्वाचा सध्या प्रसरण पावण्याचा दर प्रतिवर्ष साधारण ०.०००,०००,०१% एवढा आहे. थोडक्यात विश्वाची त्रिज्या प्रत्येक सेकंदास १०७ मैल इतकी वाढते.आपले हे छोटे विश्व त्यामानाने फारच झपाट्याने वाढते आहे आणि त्याच्या मापात प्रत्येक मिनिटास १% वाढ होत आहे.
"हे प्रसरण कधीच थांबणार नाही का?" टॉमकिन्सने विचारले. "अर्थातच ते थांबणार" प्राध्यापक म्हणाले "आणि नंतर त्याचे आकुंचन सुरू होईल.प्रत्येक विश्व असे अगदी लहान त्रिज्या अतिमहान त्रिज्या यामध्ये दोलायमान होत असते.मोठ्या विश्वासाठी स्पंदनाचा हा कालावधि कित्येक हजार दशलक्ष (१०चा नववा घात )वर्षे इतका अधिक असतो मात्र आपल्या या छोठ्या विश्वाचा मात्र तो फक्त दोन तासांचा आहे.आता त्याचा आकार जास्तीत जास्त मोठा झाला असावा . आता किती थंड वाटत आहे हे जाणवते ना तुला?"
प्रत्यक्षात या विश्वास उत्सर्जनाने मिळणारी उष्णता त्याच्या विस्तारित प्रदेशावर वाटली जाऊन तिच्या या छोट्या ग्रहाला मिळणाऱ्या अतिशय तुटपुंज्या प्रमाणामुळे तेथील तपमान अगदी गोठणबिंदूइतके खाली घसरले होते.   
 "आपण सुदैवी आहोत:",प्राध्यापक म्हणाले," की निदान सुरवातीला उत्सर्जनाने इतकी उष्णता मिळाली होती की आताच्या प्रसरण पावण्याच्या अवस्थेतही ती टिकून राहिली आहे नाहीतर थंडी इतकी वाढली असती की आपल्याभोवतीची हवाही द्रवीभूत होऊन आपण गोठून मृत झालो असतो.पण आता आकुंचनही सुरू झाले आहे आणि त्याबरोबर तपमानही वाढेल."
आकाशाकडे पाहिल्यावर सगळ्या वस्तूंचा गुलाबी रंग बदलून त्या जांभळट दिसू लागल्या होत्या याचे कारण प्राध्यापकांनी सांगितल्याप्रमाणे सर्व अंतराळस्थित वस्तु आता त्यांच्या दिशेने येऊ लागल्या होत्या.आणि आगगाडीच्या शिट्टीचे उदाहरणही त्याला आठवले त्याचबरोबर आणखी एका भीतीने तो पछाडला गेला आणि त्याने विचारले,"असे सर्वत्र आकुंचन चालू झाल्यावर ते मोठे खडकही जवळ येऊन आपण त्यांच्याखाली चिरडून तर जाणार नाही?"   
"तसेच होणार आहे "प्राध्यापक अगदी शांतपणे म्हणाले,"पण त्याही पूर्वी हे तपमान इतके वाढेल की आपले  अणूंमध्ये विघटन होईल.थोडक्यात आपल्या विश्वाचा अंत कसा होणार याची ही छोटी आवृत्ती आहे.सर्व सजीव निर्जीव वस्तूंचे एका गरंम वायुरूप गोळ्यात एकत्रिकरण होईलआणि पुन्हा नव्या प्रसरणाने नव्या जीवनाची सुरुवात होईल.  
"अरे बापरे " टॉमकिन्स दचकून ओरडला,"आताच तर आपल्या विश्वाच्या अंताला शेकडो दशलक्ष वर्षे आहेत असे तुम्ही सांगितले आणि आता तर हे भलतेच  लवकर घडणार असे दिसते.  इतके गरम होत आहे की माझी विजारसुद्धा काढून टाकावी असे वाटू लागले आहे."
"असे काही करू नकोस,"प्राध्यापक म्हणाले,"कारण त्याचा काहीही उपयोग होणार नाही,नुसता काहीही न करता पडून रहा आणि शक्य असेल तर काय घडते ते पहा."
       गरम हवा इतकी असह्य होती की उत्तर देणेही टॉमकिन्सला अशक्य वाटले.धुळीचा जाड थर त्याच्याभोवती जमला आणि आपण मऊ गरम पांघरुणात गुंडाळले जात आहोत असे त्याला वाटले.त्यातून मोकळे होण्याची धडपड त्याने केली आणि आपला हात बाहेर काढल्यावर एकदम थंड हवेचा स्पर्श हाताला झाला.
"अरेच्च्या मी त्या असह्य विश्वाला भोक तर पाडले नाही ना"असा विचार त्याच्या मनात डोकावून गेला.प्राध्यापकांना त्याविषयी विचारावे असे त्याला वाटले.पण ते तेथे कुठे होते ?उलट पहाटेच्या मंद प्रकाशात आपल्या परिचित शयनकक्षातील वस्तु त्याला दिसल्या.आपल्या गरम पांघरुणात लपेटून बिछाब्यावर आपण झोपलेलो आहोत व आपला हात त्याच्या बाहेर आपण मोकळा केलेला आहे हे त्याच्या लक्षात आले .
"आता प्रसरणानंतरच्या जीवनाची सुरुबात झाली वाटत " प्राध्याप्कांच्या शब्दांची आठवण होऊन तो मनाशी पुटपुटला."भाग्यच आमच की अजून आम्ही प्रसरण पावत आहोत.आणि स्नान करण्यासाठी तो उठला.