एका रात्रीची गोष्ट!

गेलेल्या लोकलकडे ओझरता दृष्टिक्षेप टाकून पंकजाने पायर्‍या चढायला सुरुवात केली. खाड खाड खाड...रिकाम्या स्थानकात तिच्या बुटांचा आवाज घुमू लागला. लोकलमधून उतरलेले चार-पाचजण केव्हाच निघून गेले होते. स्थानक रक्षकही दृष्टीपथात नव्हता. मघाशी पायर्‍या उतरताना एकाऐवजी दोन दोन पायर्‍या एकदम उतरल्या असत्या तर शेवटची लोकल चुकली नसती, तिला वाटून गेले. पण लोकल चुकण्याचे खरे कारण ती जाणून होती. तिला ही आठवडाअखेर अगदी रिकामी हवी होती, मग शुक्रवारी कितीही वेळ काम करायची तयारी होती. घरी काम नेता आले असते पण घरी जाताच ती अतिश्रमाने आडवीच होई. नंतर उठून पुन्हा धागेदोरे शोधून 'प्रकल्प सद्यस्थिती' आणि 'प्रकल्पातील धोके व्यवस्थापन' हे दोन  रिपोर्ट पूर्ण करणे तिला जड गेले असते. आज संध्याकाळची ग्राहकाबरोबरची बैठक मनात ताजी असतानाच ते करायला हवे होते. 'प्रकल्पाची सद्यस्थिती' फारच गंभीर होती. 'मर्फी'च्या नियमानुसार जे जे चुकू शकते ते ते सर्व चुकलेले होते. सर्वावर कडी म्हणजे 'प्रकल्पातील धोके' या आधीच्या रिपोर्टमधे नसलेला धोका खुद्द प्रकल्प व्यवस्थापकाने दिला होता! बुडते जहाज सोडून त्याने चक्क पळ काढला होता! कदाचित तिच्या सचोटीवर विसंबूनच त्याने पलायनाचा निर्णय घेतला असावा! कुठल्याही परिस्थितीत पंकजा या प्रकल्पाची तड लावल्याशिवाय रहाणार नाही हे त्याला माहीत होते. कंपनीच्या तत्पर व्यवस्थापनाने ताबडतोब 'नगास नग' या न्यायाने दुसर्‍या एका प्रकल्प व्यवस्थापकाची नियुक्ती केली होती, पण तो खरोखरच नग निघाला! त्याला 'प्रकल्पाची सद्यस्थिती' समजावून सांगण्यातच तिचा निम्मा दिवस जाई. तिने तक्रार करताच 'प्रकल्पाचे व्यवस्थापन तिने स्वतःच हाती घ्यावे' असा सल्ला तिला मिळाला होता. त्यामुळे ती सध्या दूरदेशातल्या उंटावर राहून बंगळूरातल्या शेळ्या हाकीत होती. बंगळूरातल्या आपल्या चमूची आठवण होताच तिला जरा बरे वाटले. शिवा आणि बिपीन नक्की असतील अजून कार्यालयात... आज ते संगणक प्रणालीला नवीन ठिगळ जोडणार होते. त्यामुळे आपले नव्वद टक्के काम होईल असे त्यांनी तिला आश्वासन दिले होते. फारच उत्साही होते ते दोघे! तिच्या मागच्या प्रकल्पातही ते होते आणि त्यांच्या कामगिरीवर खूष होऊन या प्रकल्पासाठी तिने त्यांना मागून घेतले होते. बाकीच्या चमूपैकी अकराजण फक्त दिलेले काम चोख करत आणि चार तेही नीट करत नसत. त्यांच्याशी पुन्हा एकदा बोलले पाहिजे, तिच्या मनाने नोंद घेतली. ती इथे आल्यापासून परिस्थितीत निश्चितच सकारात्मक बदल होत होता. ग्राहकाला दोन पावले मागे सरकवून आणि प्रकल्पाला चार पावले पुढे सरकवून तिने बरीच पेनल्टी वाचवली होती!

जिना चढून जमिनीवर आल्यावर पंकजाने गार मोकळ्या हवेत दीर्घ श्वास घेतला आणि घड्याळात पाहिले. सव्वाबारा वाजले होते.  टॅक्सी करून घरी जावे की काय याबाबत तिच्या मनाचा निर्णय होईना. मागे एकदा  रात्री साडेअकरा वाजता ती टॅक्सीने घरी गेली होती, तो अनुभव ताजा होता. पन्नास मिनिटांचा प्रवास तिला पन्नास तासांचा वाटला होता.  टॅक्सीचालकाने सुरूवातीला हवापाण्याच्या गप्पा मारण्याचा प्रयत्न केला आणि तिने ओठ जे घट्ट मिटून घेतले, ते घर आल्यावर 'थांबवा!' असे सांगण्यासाठीच उघडले. प्रत्येक वेळी चालकाने आरशातून मागे पाहिले की तो मागची वाहने पहात नसून आपल्याकडेच पहात आहे अशी तिची खात्री होत असे. छे! नकोच ते! मग करावे काय? पूर्ण साडेतीन मिनिटे विचार केल्यावर तिच्या लक्षात आले की तिच्याकडे फार पर्याय नाहीत. तिच्या कार्यालयाजवळ तिच्या मित्रमंडळींपैकी कोणीही रहात नव्हते. अखेर तिने कार्यालयात परत जाण्याचा निर्णय घेतला. सकाळी पहिली लोकल सव्वापाचची होती. तिने घरी जाता आले असते.

अचानक बराच वेळ उपलब्ध झाल्याने एवढ्या वेळाचे काय काय करता येईल याबद्दल चालता चालता तिच्या मनात विचार चालू झाले. रस्त्यावर आता कोणी नव्हते. शुक्रवार संध्याकाळ साजरी करून महानगर झोपले होते. दूर हायवेवर वेगवान वाहनांचा तुरळक आवाज येत होता. दिवसा  प्रचंड गतीने फिरणार्‍या महानगराचा वेग मंदावला होता. मायदेशातही आता सगळे निवांत असतील...तिला वाटले. मक्या आज पार्टीला जाणार होता. त्याचा मोठा प्रकल्प सुरू होणार होता. पार्टीला त्याच्या स्त्री सहकारीही असतील...तिच्या कपाळावर आठी उमटली. परवा मक्याने ट्रेकचे फोटो पाठवले होते, त्यात त्यांचेही फोटो होते. डोंगर चढायला या कार्ट्या पोहण्याचा पोषाख घालून का आल्या होत्या, देव जाणे! तिच्या मनात कसनुसे झाले. तिला इकडे येऊन दोन महिने झाले होते, आणखी दोन महिने तरी लागणार होते. ग्राहक पेटला होता आणि अग्निशमनासाठी तिची खास नेमणूक करण्यात आली होती. तिला नेमणूक नाकारण्याचा अधिकार नक्की होता, पण हाताबाहेर गेलेला प्रकल्प ताळ्यावर आणणे तिला आव्हानात्मक वाटले होते. डोंबलाचे आव्हान! तिकडे मक्या काय गुण उधळत असेल कोणास ठाऊक...! तिने मान झटकली. नाही नाही, मक्या असले काही करणे शक्य नाही, ती त्याला गेली दहा वर्षे ओळखत होती. पहिली सहा वर्षे मित्र म्हणून आणि नंतरची चार नवरा म्हणून. आज आपल्या मनात 'नकारात्मक' विचार का येत आहेत ते तिला कळेना.

कार्यालयाच्या गल्लीत ती वळली आणि तिथले अंधाराचे साम्राज्य तिच्या डोळ्यात भरले. सराईतपणे ती कार्यालयाच्या इमारतीपाशी आली. मोठा सुरक्षा दरवाजा उघडून आत जाताना तिच्या मनाने नोंद घेतली की मघाशी जाताना सातव्या मजल्यावर दिसणारा प्रकाश आता नाही. पूर्ण इमारत अंधारात आहे. तिच्या मनात भीतीची लहर चमकून गेली. तिने पुन्हा मनाला समजावले. रोजचे तर कार्यालय! रात्र झाली म्हणून काय ते बदलले थोडेच! या देशातली सुरक्षा व्यवस्था तर जगप्रसिद्ध आहे. तिचे दुसरे मन म्हणाले, सुरक्षा व्यवस्था एवढी भारी आहे तर परवा टीव्हीवर दरोडयाची बातमी होती त्याचे काय! शिवाय तो अजून उकल न झालेला खून, एका लहान मुलाचे अपहरण, एका परदेशी महिलेवर झालेला बलात्कार...! तिचा थरकाप झाला. आपण इकडे परत यायचा निर्णय घेऊन चूक तर केली नाही ना, असे तिला वाटू लागले. टॅक्सीमधे पन्नास मिनिटे जीव मुठीत धरून काढली असती तर नंतरची रात्र तरी शांत झोपेत गेली असती. पण आता मागे जाण्यात अर्थ नव्हता. एव्हाना पाऊण वाजला होता. लिफ्ट्मधून बाहेर पडून कॉरीडॉरमधून चालताना तिची नजर सुरक्षा कॅमेर्‍याकडे गेली आणि ती दचकली. या कॅमेर्‍याच्या रेकॉर्डिंगमधे उद्या माझ्या मागून चालणार्‍या दोन काळ्या आकृती वगैरे दिसतील का? तिच्या घशाला कोरड पडली. एकटी असताना अजिबात भयपट पहायचे नाहीत असे तिने ठरवून टाकले. पण आजच्या रात्रीचे काय! तिने पळतच कार्यालयाचे दार उघडले आणि आत जाऊन दार घट्ट लावून टाकले.

जॅकेट काढून तिने हँगरला लावले आणि पहिला फोन बंगळूरच्या कार्यालयात केला. शिवा आणि बिपीन जेवायला गेले आहेत असे समजले. 'आल्याबरोबर फोन करायला सांगा' असा निरोप ठेवून तिने तिचे यंत्र चालू केले. यंत्र चालू झाल्यावर जादूचा पेटाराच उघडला. तिच्या 'प्रकल्पाची सद्यस्थिती' ठळक नजरेसमोर आली. आजच्या बैठकीची मिनिट्स अजून करायचीच होती. ती करण्यात अर्धा तास गेला. तिने संबंधितांना ती पाठवून दिली. आता सोमवार सकाळपर्यंतचे काम झाले होते. तिचा चमू शनिवारी काम करणार होता, त्यांना फक्त फोन करून 'माझे लक्ष आहे' असे अधूनमधून जाणवून दिले की झाले! आता काय करावे? झोप येणे तर शक्यच नव्हते. तिला आठवले, प्रियाची मधुबालाच्या गाण्यांची डीव्हीडी तिच्याकडेच होती. ती यंत्रात टाकल्यावर एक तास छान गेला. शेवटचे गाणे 'सीनेमें सुलगते हैं ...'. तिचे मन मक्याच्या आठवणीने व्याकुळ झाले. डोळे पुसत तिने घरी फोन लावला. फोनवर काकू होत्या.

"अगंबाई पंकजा! कशी आहेस? मकरंद आला नाही अजून. आल्यावर फोन करायला सांगू का?"
"नाही, तसं काही महत्त्वाचं नाही...उद्या बोलूच आम्ही...तुम्ही कशा आहात काकू?"
"मी ठीक आहे की. अगं परवा ..." काकूंशी बोलण्यात आणखी पंधरा मिनिटे मस्त गेली.
"...आणि प्राणायाम करत जा रोज सकाळी. तुला तिकडे कामाचा खूप ताण आहे असं मकरंद म्हणत होता...तब्येत ठीक तर सगळं ठीक!"
"हो हो. बरं ठेवते मी फोन. गुडनाईट!" तिने फोन ठेवला. सकाळचा प्राणायाम! सकाळी जेमतेम दूध ढोसून लोकल गाठायला पळत जावे लागे. पण हे आणखी दोनच महिने...नंतर तब्येतीची छान काळजी घ्यायची...तिने मनाला कितव्यांदातरी बजावले. पुढच्या वर्षी पहिला 'चान्स' घ्यायचा होता. तिची आई केव्हाची मागे लागली होती...एक जे काय व्हायचे ते वेळेत होऊन जाऊ दे. पण पूर्ण एक वर्षाची सवड फक्त तिलाच काढावी लागणार होती, मक्याला नाही. त्याच त्या विचार करून गुळगुळीत झालेल्या वाटेवर तिचे मन घरंगळत गेले.  

आता अंग अगदी आंबून गेले होते. तिने कार्यालयात दोन फेर्‍या मारल्या. टॉमच्या टेबलावर एका फ्रेममधे तो आणि त्याची पत्नी दिलखुलास हसत होते. चाँगच्या टेबलावर तीन जाड पुस्तके पडली होती. त्यातले 'डिझाईन पॅटर्न्स'चे पुस्तक तिने त्याला काल मागितले होते आणि त्याने सोमवारी द्यायचे कबूल केले होते. पण आत्ता त्याला हातही लावावासा तिला वाटेना.  आयुमीच्या टेबलावर दोन चॉकलेट्स सापडली. त्यातले एक तिने घेतले आणि पुन्हा ठेवून दिले. चॉकलेट नको, तिच्याकडे काजूकंद होता! काजूकंदाचा तुकडा तोंडात टाकताच तिला छान वाटले. मनाने ती तिच्या गावात, पार गल्लीत गेली! बखळीत खेळलेला लपंडाव, सूरपारंब्या, विहीरीत टाकलेल्या उड्या,...तिला एकदम निर्भीड, धाडसी आणि छान वाटले. त्याच भरात तिने पॅन्ट्रीमधे जाऊन कॉफी मेकरमधे ताजी कॉफी करायला ठेवली. क्षणभर तिला असेही वाटले की बाहेर बाल्कनीत जाऊन थोडी ताजी हवा खावी, पण तिच्या मनाने कौल दिला की हे अंमळ जास्तच धाडसी होतंय.

कॉफीचा ठोल्या कप हातात घेऊन तिने आयपॉड कानाला लावला. लगेचच तिच्या लक्षात आले की तसे केले तर बाकीचे आवाज ऐकू येणार नाहीत. मग तिने यंत्रावर तिची आवडते संगीत लावले. ती अगदी गुंगून गेली...असा किती काळ गेला तिला समजलेच नाही. ती भानावर आली तेव्हा वसंतराव गात होते..."कुणी जाल का...सांगाल का...". तिचे मन आर्त झाले. तिने ते गीत मोजून चार वेळा ऐकले आणि तिच्या डोळ्यांतून पाणी आले. ती सुन्न अवस्थेत काही काळ बसून राहिली.

'ठक ठक ठक' आवाजाने तिची तंद्री भंगली. कुणीतरी काहीतरी ठोकत होते! दरोडेखोर आले की काय शेवटी! या शहरात माफिया आहे हे ती ऐकून होती. तिचा थरकाप झाला. तिने थोडा वेळ कानोसा घेतला. पण आवाज न वाढता तेवढाच राहिला. मग धीर एकवटून तिने सगळीकडे एक चक्कर मारली. पॅन्ट्रीत नळ पूर्ण बंद झाला नव्हता. टप टप एकेक थेंब पाणी पडत होते! तिला हायसे वाटले. नळ बंद करून ती तशीच पुढे गेली. स्वच्छतागृहाची किलकिली असलेली खिडकी पूर्ण बंद करून ती पुन्हा जागेवर आली. आत्ताशी साडेचार वाजले होते. अजून जवळजवळ तासभर काढायचा होता.

तिने बंगळूर कार्यालयात फोन लावला. शिवा आणि बिपीन दोघेही जागेवर नव्हते. सिगारेट फुंकायला नाहीतर कॉफी ढोसायला गेले असतील! ते कार्यालयात असणार आहेत म्हणून तिने इकडे परत यायचा निर्णय घेतला होता आणि त्यांच्याशी रात्रभरात एकदाही संपर्क झाला नव्हता. अर्थात ते बंगळूरला कार्यालयात आहेत या भरवशावर तिने इकडे दूरदेशातल्या कार्यालयात निर्धास्त असणे म्हणजे बिरबलाच्या खिचडीपेक्षा विनोदी गोष्ट होती! त्यांना इमेल पाठवून ठेवू, आले की वाचतील म्हणून ती तिच्या जागेवर गेली. इमेल्स चाळताना तिच्या लक्षात आले की दोन इमेल्स तिने वाचल्या नव्हत्या, कदाचित कमी महत्वाच्या समजून नंतर वाचण्यासाठी ठेवल्या होत्या. पहिली बिपीनची होती, "आम्ही जेवण करून चित्रपटास जात आहोत, आज पुन्हा कार्यालयात न येता उद्या सकाळी लवकर येऊ. आपल्याकडे संगणकप्रणालीला ठिगळ लावून फटी तपासण्यास पुरेसा वेळ आहे, त्यामुळे काळजी करू नये इ.इ.". पंकजाभोवती पूर्ण कार्यालय गर्रकन फिरले. तिला विलक्षण एकटे वाटले, पण पाच मिनिटात ती सावरली. आता निघायला फक्त अर्धा तास राहिला होता. जिथे एवढा वेळ काढला आहे, तिथे अर्ध्या तासाची काय कथा! दुसरी इमेल मक्याची होती. आजची पार्टी रद्द झाली होती आणि तो गप्पा मारायला नितीनकडे जाणार होता. तिच्या कामात व्यत्यय नको म्हणून तो फोन करणार नव्हता. तिचे काम झाल्यावर तिने त्याला फोन करायचा होता. आता मात्र  यंत्र बंद करून ती टेबलावर डोके ठेवून स्वस्थ बसली - मन पूर्ण निर्विचार करून.

तिला जाग आली तेव्हा फटफटले होते. तिने घड्याळात पाहिले - पावणेसहा! पहिली लोकल जाऊन आणखीही तीनचार लोकल्स गेल्या होत्या. उठून तिने तोंडावर पाणी मारले आणि सामान गोळा करून जायच्या तयारीला लागली. कार्यालय बंद करताना तिला समजेना की रात्री आपल्याला एवढे घाबरायला काय झाले होते... कदाचित तिच्याऐवजी दुसरे कोणी असते तर खाली कार्पेटवर रद्दी पसरून रात्रभर सुरेख झोपही काढली असती! तिने सकाळी सकाळी मनात आलेले 'नकारात्मक' विचार झटकून टाकले आणि स्थानकावर जाण्यासाठी ती नव्या उमेदीने पावले टाकू लागली.