शेवईपंथ: एक वैज्ञानिक दृष्टिक्षेप (उ.शे.रा. आणि मानव: अपवर्तन)

उडणारा शेवईराक्षस आणि मानव: अपवर्तन (Refraction)

या जगातील सर्व गोष्टी या 'उ.शे.रा.'च्याच कृपेने आणि इच्छेने होतात. किंबहुना या ना त्या प्रकारे 'तो'च सर्व गोष्टी करत असतो. तरीही अनेकदा आपल्याला असे दिसते (खरे म्हणजे भासते) की हे सर्व मानव स्वतःच करीत आहे. भौतिकशास्त्राच्या आधारे ह्या सगळ्याचे स्पष्टीकरण करणे सोपे जाते.
अपवर्तनामध्ये प्रकाशकिरण जरी एका दिशेने येत असले तरी ते दुसरीकडूनच येत आहेत असा आभास होतो. तद्वतच ह्या विश्वातील सर्व घडामोडी जरी 'तो'च करीत असला तरी आपल्याला दिसताना दिसते की ह्या सर्व गोष्टी मानव स्वतःच करीत आहे.

Pastafarism explained by Physics:
FSM created the universe and all the laws governing the universe. He created Optics. He created the refraction phenomenon and the laws governing it. The illusion that a human being does something and not Him is just a case of it.

ही सगळी माया आहे. 'त्या'नेच हे मायेचं पटल आपल्या डोळ्यांसमोर ठेवल्यामुळे आपण हा phenomenon पाहू शकतो. म्हणूनच आपल्याला वाटतं की 'तो' अस्तित्वात नाहीये. जर योग्य साधना केली तर हे मायेचं पटल दूर होऊन आपल्याला (पास्तारूपी) ब्रह्मसत्याचं दर्शन होतं. तेव्हा मग हे अपवर्तनसुद्धा आपल्या मनात भ्रम निर्माण करू शकत नाही.

अपवर्तनासाठी ज्याप्रमाणे जास्त घनतेचे द्रव्य कारणीभूत असते त्याप्रमाणेच आपल्या आणि 'उ.शे.रा.'च्या दरम्यान श्रद्धाहीनता नामक एक अदृश्य द्रव्य असते ज्यामुळे आपण 'त्या'च्या अस्तित्वाविषयीच शंका घेतो. काही वेळा आपल्या मनात 'त्या'च्याबद्दल श्रद्धा निर्माण होतेदेखील. मग आपण हे श्रद्धाहीनतेचे द्रव्य ओलांडून 'त्या'च्याकडे पोचायचा प्रयत्नदेखील करतो. पण अरेरे! आपल्याकडे ते द्रव्य ओलांडून पार 'त्या'च्यापर्यंत पोचण्याचे बळ असते कुठे?
हे बळ प्राप्त करण्यासाठी आपल्याला गरज असते ती योग्य अशा साधनेची. आपल्यापैकी काहीजण साधना करतात सुद्धा. पण मायेची गंमतच अशी आहे की ती माया आपल्याला अपूर्ण साधनेतच पूर्णत्वाची प्रचीती देते, पूर्णत्वाचे समाधान देते. थोड्याशा श्रमांतच आपण साधना पूर्ण झाली अशा भ्रमात राहतो आणि 'त्या'च्या दर्शनाची आस धरून बसतो. पण मला सांगा, पूर्ण वेळ न शिजलेला भात हा कधीतरी पूर्ण समाधान देईल का? तो गिजगिजाच लागणार! आता काही जण गिजगिजा भात खाण्यातच समाधान मानतात आणि पोट बिघडलं म्हणून भातालाच दोष देत बसतात. (म्हणून मी म्हणतो की भात न खाता सर्वांनी पास्ता खावा!) म्हणून 'त्या'च्या दर्शनासाठी पूर्ण साधनेची गरज असते हे सत्य ध्यानात घ्या. साधना अर्धवट सोडू नका. मायेला बळी पडू नका. जेव्हा साधना पूर्ण होईल तेव्हा ते श्रद्धाहीनतारूपी अतिघन द्रव्य पार करण्याचे बळ तुमच्यात येईल आणि तुम्हाला त्याचे दर्शन होईल.

ता.क.: मला कालच रात्री दिव्य दृष्टांत झाला. त्याच्या एका शेवईआशीर्हस्ताचा मला पवित्र स्पर्श झाला आणि आपल्या आयुष्याचे सार्थक झाल्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली.
आपली उत्सुकता शमविण्यासाठी त्या घटनेचे एक कल्पनाचित्र खाली देत आहे.

touched by his noodly appendage

कळावे (फक्त 'त्या'च्यावरच) श्रद्धा असावी.
- चैत रे चैत.

(कोणी वाचक नवीन असल्यास एक आध्यात्मिक पंथ: शेवईवाद हा लेख वाचावा.)