वादळभूमी ४. ०

      ओरिसातलं कोणार्कचं सूर्य मंदिर पाहून झाल्यावर पाहण्यासारखं उरलं होतं ते चिल्का सरोवर. चिल्का सरोवर आणि कोणार्क ही दोन्ही ठिकाणं पुरीपासून साधारणतः सारख्याच अंतरावर आहेत त्यामुळे पुरीचा मुक्काम बराच सोयीचा पडतो. कोणार्कचं मंदिर तर पाहून झालं होतं त्यामुळे चिल्का सरोवर पाहून ओरिसाचा निरोप घेण्याचा मनोदय (किंवा मानस) होता. तत्पूर्वी जगन्नाथ पुरीच्या मंदिराला आम्ही भेट दिली आणि मला जरी एवढं आवडलं नसलं तरी जनहितार्थ ( ) थोडी माहिती देणे आवश्यक आहे.
         पुरीच्या सुदर्शन पटनाईक यांच्या वाळूच्या शिल्पांचे फोटो पेपरात बऱ्याच जणांनी पाहिले असतील शिवाय जगन्नाथ पुरीची यात्रा देखील खूप प्रसिद्ध आहे. हे देवस्थान संस्थानी मालमत्तेत तिरुपती पेक्षाही श्रीमंत आहे बहुधा! या मंदिराचं अध्यात्मिक महात्म्य असलं तरी पाहण्यासारखं काही खास तेथे काहीच नाही त्यामुळे ते बघायला आमच्यातलं कुणी फारसं उत्सुक नव्हतं, तरी बरोबरच्या दोन आजीबाईंचे चेहरे मात्र खास उजळले होते . आख्ख्या भारतवर्षातलं एक पॉवरबाज तीर्थक्षेत्र पाहायला त्या खूपच उत्सुक होत्या.
               एवढं महात्म्य असूनही काटेकोर सुरक्षा भारतातल्या मंदिरांना का लागते हा एक अगम्य प्रश्न आहे. पुरीचं देखील तसंच आहे. मंदिर परिसरात वाहनं बिलकूल चालत नाहीत आणि साहजिकच वाहनतळ खूप लांब आहे. त्यामुळे सायकल-रिक्षा वाल्यांच्या पोटापाण्याची योग्य सोय झाली आहे. (जिवंत अनुभव काय असतो ते त्यादिवशीच कळलं.) कॅमेरा, मोबाईल बिबाईल मंदिरात नेण्यास परवानगी नाही आणि मग चपला वगैरे काढून आपण गर्दीत घुसतो. आत गेल्यावर दिसणारं दृश्य बुचकळ्यात (किंवा दुग्ध्यात) पाडणारं असलं तरी प्रेक्षणीय आहे. दोन्ही बाजूला बरेच भटजी लोक बसलेले दिसतात आणि त्यांच्या पुढ्यात बरीच मडकी असतात. काही मडक्यांमध्ये भात आणि काही मडक्यात घट्ट शिजवलेली डाळ दिसते आणि ह्यातली डाळ त्याच्यात, त्यातला भात याच्यात असा उद्योग सुरु असतो. नुसत्या हाताने घासून ओरपून मडकी रिकामी करणे आणि भक्तगणांना नैवेद्य (म्हणजे देवाला दाखवण्यासाठी! बाकी भक्तगणांना नैवैद्य द्यायला कोण बसलंय?) विकण्याचा व्यापार उदीम सुरु असतो. आपण मात्र त्याकडे लक्ष न देता पुढे जावे हेच उत्तम. पुढे गेल्यावर दारात दुसरे भटजीबुवा उभे असतात आणि आपण आत जाऊ लागताच नाठाळच्या माथी हाणल्यासारखी काठी डोक्यात हाणतात. आपलं पूर्वीचं पाप धुतलं जाऊन पापपुण्याच्या नव्या कोऱ्या वहीसह आपण देवदर्शनाला जावं एवढीच त्यांची अपेक्षा असते. इथे काही भक्तगण मग त्यांच्या हातात काही धातू वा कागदाचे तुकडे ठेवताना दिसतात पण आपण तसे करु नये. त्यामुळे भटजीबुवा थोडे डोळे वटारुन बघतात पण थोडा निगरगट्टपणा दाखवावा.
            खरंतर इथपर्यंतच मला लिहता येईल कारण इथून पुढे मी गेलोच नाही. गर्दी बरीच होती आणि मला स्वतःला घुसमट होणाऱ्या, कोंदट हवेच्या जागा बिलकूल आवडत नाहीत. मात्र आतल्या कृष्ण, बलराम आणि सुभद्रेच्या मूर्ती  दोन्ही आजींना पाहायच्याच असल्याने बाकीचे लोक पुढे गेले. थोड्याच वेळात लोकांचे एकदम  हा हू वगैरे आवाज ऐकू यायला लागले. तेव्हा मधूनच देवाच्या गाभाऱ्याची दारं बंद करतात आणि मग परत उघडताना भक्तगण अत्यानंदाने असे आवाज करतात हे नंतर विश्चसनीय सूत्रांकडून समजलं.
         शेवटी मग मडकेबाजाराजवळ परत आलो. आमची हरवलेली, विसरलेली माणसं गोळा करून निघालो तर एक भटजीबुवा एक भक्ताशी हुज्जत घालत होते. पुरीला पितरांची शांती करवाओ, भोग चढाओ वगैरे बरेच प्रकार चालतात आणि त्यामुळेच काहीतरी पैशांवरुन भांडण पेटले होते. बाकी ओरिसातले भटजी हे देशभरातल्या भटजींसारखेच असले तरी भरभक्कम पोटाचे, मुखरसाचा तोबरा सांभाळणारे आणि मंदिरात उदबत्त्यांबरोबरच विड्यांचा धूर पैदा करणारे या तीन प्रकारात सर्व जण बसायला हरकत नसावी.
         थोडक्यात काय तर पुरीचं मंदीर बघून लवकरच बाहेर आलो आणि क्षुधाशांती करायला हॉटेल गाठून पुरीभाजीची ऑर्डर दिली. राहता राहिलं चिल्का सरोवर! ते दुसऱ्या दिवसावर ढकलण्याबाबत एकमत झाले आणि हॉटेलची वाट पकडली.

 
     
          दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर चिल्काला निघालो तेव्हा भलतंच उत्साही वाटत होतं. अर्थात थंड हिरव्यागार रस्त्याचा हा परिणाम होता का, गाडीवानाने आग्रहाखातर लावलेल्या उडीया गाण्यांचा होता हे सांगणे अवघड आहे. चिल्काकडे जाणाऱ्या रस्त्याला आपल्यासारखीच शेतं दिसतात मात्र ती पाण्याने भरलेली असतात आणि त्यात धनधान्याऐवजी माशांचे भरघोस पीक येत असावे. याचं कारण अगदी उघड होतं कारण पाण्यातूनच गेलेल्या विजेच्या तारांवर ( म्हणजे पाण्यात खांब आणि त्यावरून तारा असे वाचावे.) किंगफिशर घोळक्याने बसले होते आणि पाण्यातल्या मत्स्यावतारांचे निरीक्षण आणि भक्षण, आलटूनपालटून चालू होतं.


     
        हा प्रवास माझ्या विशेष लक्षात राहिला आहे कारण मध्येच एखाददुसरं कमळांचं शेत अवतीर्ण होत असे आणि थांबा थांबा अशा आरोळ्या होत. त्या अर्थातच ड्रायव्हरला कळत नसल्याने गाडी तोवर पुढे आलेली असे. या गोंधळातच अजून एक शेत दिसू लागे, मग रोको!रोको! अशा आरोळ्या झाल्याने  ड्रायव्हरला गाडी थांबवावी लागत असे. ओरिसातल्या भरघोस मंदिरांमुळे बक्कळ कमळं  लागत असावीत. पुढे बराच वेळ कंटाळा येईस्तोवर रस्त्याच्या दुतर्फा ही शेतं दिसत होती. मात्र पांढऱ्या, निळ्या, गुलाबी कमळांचे भरगच्च तलाव आणि त्यातच अंघोळ करत असलेले काटक अंगाचे उडीया तरूण, हे दृश्य आजही माझ्या डोळ्यांसमोर आहे.


       
                 अशाप्रकारे ही निसर्गशोभा बघत , निसर्गाची अनुभूती घेत, त्याच्याशी तादात्म्य पावत सकाळी आठ वाजता आम्ही चिल्का सरोवराला पोहोचलो. ही बाब विशेष नमूद करण्यासारखी आहे, कारण सगळ्यांचे आवरुन, पुरीवरुन निघून, तिथे आठ वाजता पोहोचण्यास बरेच कष्ट पडले. गेलो तर आम्हीच लकी 'कष्ट''मर' नं.१ असल्याचं लक्षात आलं. सातशे रुपये भरुन दहा लोकांची बोट ठरवली, बोहनी केली आणि चिल्कात उतरलो.


        
                   चिल्का सरोवर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे आणि पक्षीगणांसाठी प्रसिद्ध आहे हे बहुतांनी भूगोलाच्या पुस्तकात वाचलेलं वाक्य खरं आहे. पाणी तर खारट होतं पण पक्ष्यांमधलं मात्र मला ओ की ठो कळत नाही. ( शहरी जीवनात पारव्यांनी बाकीच्या पक्ष्यांना अल्पसंख्यांक करुन टाकलं आहे आणि का कोण जाणे, पारवा दिसताच त्याचा गळा दाबावा असं मला नेहमी वाटतं.) त्यामुळे जलविहाराचाच आनंद अधिक होता.
  

             सरोवराचं किंचीत हिरवी छटा असलेलं निळंशार पाणी मात्र डोळ्यांनीच अनुभवायला हवं. तबियत एकदम खूष होऊन जाते. सरोवरात डॉल्फिन देखील आहेत पण श्वास घ्यायला वर येतात न येतात तोच ते पाण्यात नाहीसे होतात आणि बऱ्याचदा आपण बावळटासारखे पाण्यावरचे तरंग बघत बसतो. (इथे थोडी अजून जनहितार्थ माहिती दिली पाहिजे कारण परदेशातले डॉल्फिन शो बघितलेल्यांची प्रचंड निराशा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बोटीत बसण्याआधीच जवळच्या फलकावरचे चित्र नीट पाहून घ्यावे आणि सहलीवरुन आल्यावर पिडणाऱ्यांसाठी छायाचित्र घेऊन ठेवावं.)


         
            असा एक दीड तासाचा प्रवास केला आणि  चिल्का सरोवर जिथं समुद्राला मिळतं तिथे जाऊन उतरलो. येथे एक विस्तीर्ण किनारा आहे आणि चारपाच झावळ्यांची (म्हणजे झावळ्यांनी बांधलेली) दुकाने आहेत. पिणाऱ्यांसाठी फेसाळते द्राव आणि खाणाऱ्यांसाठी ताज्या माशांचे 'मसालेवाईक' नमुने मिळण्याची सोय आहे. नारळाचं पाणी आहे तसेच तुमच्यासमोर उघडलेल्या कालवातले मोती विकत घेण्याची सोय आहे (प्रत्येकी पंचवीस रुपये). (नंतर परतल्यावर एका दुकानात हेच मोती पाच रुपयाला एक या हिशोबाने मिळत होते तोपर्यंत बराच उशीर झाला होता, त्यामुळे आधी मिळालेलेच ताजे आहेत यावर दुसऱ्यांदा एकमत झाले.


                
                असा त्या किनाऱ्यावर दोनएक तास वेळ काढला, थोडं भटकून घेतलं. लवकरच निघायची वेळ झाली. नाखव्याने दोरी ओढली, इंजिन धडाडलं आणि सरोवरात लोटलेलं आमचं डिझेल तारु माघारी निघालं. आमची एकच काय ती बोट परतत होती आणि नव्याने आलेले पर्यटक एखाद्या मोर्च्यासारखे आम्हाला सामोरे येत होते. रणरणत्या उन्हात सगळे डॉल्फिन गायब झाले होते आणि आम्हाला दिसलेली त्यांची काळी कुळकुळीत नाकंसुद्धा या लोकांच्या नशिबी नसल्याने मला खूप म्हणजे खूपच वाईट वाटत होतं.

-सौरभ.