फळ

पावसाने सगळ्या आसमंतावर आपले दाट पांघरूण घातले होते. झाडे आणि दगड चढाओढीने तुकतुकीत शेवाळाची चादर पांघरून बसले होते. तृप्त होऊन सीत्कारणाऱ्या  धरतीचे उसासे धुक्याच्या लोटांत स्वतःला विरवून घेत ऊर्ध्वदिशेला निघाले होते. ठिबकत्या थेंबांचा आवाजही सुस्तावून स्वतःतच गुरफटत होता. मध्येच पावसाचा ताशा जोराने कडाडू लागे. पण लौकरच तो वेग आणि आवेग ओसरून परत डकाव डकाव करीत ठिबकसिंचन सुरू होई.

रस्त्यांवरची चिखलमाती तर धुऊन निघालीच होती, पण बऱ्याच ठिकाणी डांबर-खडी-मुरूम यांचा कसही पणाला लागला होता. रस्त्याच्या कामामध्ये ठेकेदाराने नक्की किती कमावले याचा अंदाज प्रत्येक वाहनचालक परातीच्या (वा त्याहून मोठ्या) आकाराच्या खड्ड्यांतून ठेचकाळताना बांधत होता. अगदीच भावना अनावर झाल्या, तर थेट ठेकेदाराच्या मातोश्रींशी कशा प्रकारचे बंध-संबंध स्थापित करता येऊ शकतील हे जोराने ध्वनित करण्यापर्यंतही काहीजणांची मजल गेली होती. पण झिम-झिम-झिमणाऱ्या पावसाच्या सरसराटात हे ध्वनी जेमतेम बोलणाऱ्याच्या कानापर्यंतच काय ते पोचत होते.

सूर्य आभाळात दिसत नसल्याने वेळेचा अंदाज बांधणे ही एक कसरतच होऊन बसली होती. त्या कसरतीत न गुंतता एवढे म्हणता आले असते, की माध्यान्ह केव्हाच उलटून गेली होती. करड्या अंधार-उजेडाच्या ढगातून एखादा ट्रक खिंडीत अचानक हत्तीसारखा रोरावत उमटे. आणि भेसूर आवाजात किंचाळत डावीकडे वळून घाट उतरायला घेई.

खिंडीतून बाहेर पडून घाट उतरायला सुरुवात होई तिथे एक धाकटा रस्ता खिंडीच्या उजव्या धारेने झपाट्याने उतरत गेला होता. मोठ्या रस्त्यालाच जिथे डांबर-खडी  जेमतेम लज्जारक्षणापुरते मिळत होते तिथे त्या छोट्याला कोण विचारणार? भिकाऱ्याच्या छातीच्या फासळ्यांसारखा आपल्या देहातील दगड नि दगड दाखवीत तो रस्ता घसरगुंडीसारखा खाली गेला होता.

अंधार-उजेडाच्या साठमारीत उजेडाची हार हळूहळू दृग्गोचर होऊ लागली. पावसानेही विलंबित होत चाललेली स्वतःची लय परत सवायकी, दिडकी करीत दुगणीत न्यायला सुरुवात केली. उजेडाने शेवटची निरवानिरव करायला घेतली.

मंद पिवळट उजेड पाडीत ती दुचाकी रेंगाळत खिंडीतून बाहेर आली. घाट उताराच्या सुरुवातीला चालकाने वेग कमी करीत दुचाकी थांबवली. पावसापाण्याचा प्रवास करायचा म्हटला म्हणजे शरीरांतर्गत जे अवयव सकारण नाखुशी दर्शवतात त्यापैकी एका अवयवाला मोकळेपणाचा अनुभव देण्यासाठी एका ठिपकत असलेल्या झाडाखाली त्याने "गळत्यात @@@@चे फावते" ही कोंकणी म्हण सार्थ करायला घेतली.

ते उरकल्यावर मग हुशारून त्याने दुचाकीच्या सामान ठेवण्याच्या जागेत निगुतीने गुंडाळून ठेवलेले धूम्रपानाचे साहित्य बाहेर काढले. आधी आपले हात विजारीच्या खिशात घालून त्याने बोटे खसाखसा चोळली आणि शक्य तेवढी कोरडी केली. मग ठिबकणाऱ्या थेंबांपासून आडोसा करीत त्याने शुभ्रनलिका अलगद ओठांत धरून पेटवली आणि धुराचे कडवट उष्ण करडे ढग तो चवीचवीने छातीत भरून घेऊ लागला.

आडोसा म्हणून त्याने नम्रपणे मान खाली घातली होती. आणि शिवाय एका हाताने पेटत्या निखाऱ्यावर पाखर धरली होती. निखाऱ्याची ईषत उष्णता थंडीत सुखावह वाटत होती.

या नम्रपणामुळेच त्याला रस्त्याला उजवीकडे (म्हणजे त्याच्या सध्याच्या उभे राहण्याच्या जागेसमोर) गेलेला तो बापडा रस्ता दिसला. धूम्रपान संपेस्तोवर त्याने खाली मान घालून विचार केल्यासारखे केले. आणि परत प्रवासाला सुरुवात केल्यावर दुचाकीच्या पिवळट प्रकाशाचा झोत आता वळवून दरीत उतरायला घेतले. तो रस्ता तसा त्या दुचाकीला फारसा योग्य नव्हता. पण एकमेकांना योग्य नसताना माणसे आयुष्यभर संसार रेटवतात. इथे तर काही कालाचाच प्रश्न होता (अशी त्याला आशा होती).

खाली उतरताना रस्त्याने आपला 'रस्ते'पणाचा अभिनिवेश पारच सोडून दिला आणि स्वतःला शेजारून वाहणाऱ्या ओहोळांत आणि शेतांच्या बांधांत विरवून टाकले. चिखलदगडांतून उसळ्या घेत दुचाकी वाट काढीत राहिली. आणि ती अजून चालती आहे म्हटल्यावर चालकानेही फारसे मनावर घेतले नाही. शेवटी त्या ओहोळाचे एका डोहात रूपांतर झाले आणि डाव्या हाताला मोठ्ठ्या शेवाळल्या भिंतीचे एक धूड प्रगट झाले. चालकाने दुचाकी त्या भिंतीलगत उभी केली आणि कुठे दरवाजा दिसतो का हे नजरेने चापसायला सुरुवात केली. एव्हाना अंधार जवळजवळ पूर्णत्वाला पोचला होता.

अचानक ती भिंत दुभागल्यासारखे त्यात एक शेवाळमाखले दार उमटले. दुचाकीचालक चमकून काय होते आहे म्हणून पाहायला घेतो तोच त्याच्यावर विजेरीचा शुभ्र भगभगीत झोत पडला, आणि मिठाच्या पाण्यात भिजवलेला आसूड उघड्या पाठीवर फुटावा तशा आवाजात प्रश्न चरचरला, "कोण आहेस? कुठे आणि कशासाठी आला आहेस? "

'अजिबात हालू नकोस', 'प्रश्नाचे खरेखुरे उत्तर दिले नाहीस तर तुझी खैर नाही' अशा उठवळ धमक्या देण्याची त्या आवाजाला गरज नव्हती. उत्तरदात्याची हालण्याची हिंमत मुळीच होणार नाही, उत्तर येणार, आणि ते खरेच येणार, याबद्दल त्या आवाजाला काहीच शंका नव्हती.

"माझ्या नाव सांगण्या वा न सांगण्याने काही फरक पडेल असे वाटत नाही. वाटसरू म्हणा तूर्तास. मन फुटले म्हणून हिंडायला निघालो, जीव द्यायला म्हणून नव्हे. पण जिवंत परत जाण्याची शपथ घेतली आहे असेही नाही. ते असो. इथे रस्ता संपल्यासारखे भासले म्हणून थांबलो. ही तुमची खाजगी मालमत्ता असली तर आल्यावाटेने परत जातो. नाहीतरी कुठे पोचायचे ते न ठरवता निघालो होतो, कुठेही पोचलो तरी हेतू साधलाच म्हणायचे. " वाहनचालकाचा आवाज बराचसा संयत होता, पण त्यात कडेकडेने कोवळीक जाणवत होती.

क्षणभर शांतता पसरली. मग दरवाज्याआडून मनमोकळ्या हसण्याचा आवाज घुमू लागला. "खरं बोललास. तुझ्या नाव-गाव-पत्त्याने काही फरक पडेलसे वाटत नाही. ये. भिजला असशील. "

"पावसाचा बाहेर निघालो होतो म्हणताना थोडा तयारीत होतो. पण पाणकोटाच्या फटींतून पाणी जाऊन जाऊन भिजलोय खरा आतपर्यंत. तसा एक कपडेजोड आणि इतर वस्तू ठेवल्यात दुचाकीच्या कप्प्यात. "

"काढ मग त्या, आमंत्रणाची वाट पाहत बसू नकोस. आणि लौकर आत ये. दुचाकी तिथेच भिंतीसरशी केलीस तरी चालेल. आज रात्री तरी पाऊस खळेलसे दिसत नाही. "

वाटसरू दुचाकी भिंतीच्या कडेला टेकवून आणि कप्प्यातले सामान घेऊन आत आला. दार मिटले. परत शेवाळमाखली भिंत त्या दाराभोवती लपेटली गेली.

आत मधल्या मोकळ्या चौकाच्या चौबाजूंनी, फुटक्या फरशांची का होईना, दीड पुरुष रुंदीची ओवरी पसरली होती. भिंतीचे जागोजाग कपचे उडाले होते. उजव्या आणि डाव्या बाजूच्या भिंतींमध्ये दारांची चौकट होती. त्यातली दारे निखळून/निखळवून नाहीशी झाली होती. आत एकेक ऐसपैस खोलीवजा जागा होती. उजव्या भिंतीतल्या खोलीत त्या आवाजाचे बिऱ्हाड दिसत होते, कारण त्याने वाटसरू डाव्या भिंतीतल्या खोलीकडे वळवला.

मधल्या मोकळ्या चौकाला मागच्या बाजूला एक कामचलाऊ आच्छादन घातलेले दिसत होते. तिथे एका चुलीत निखारे रसरसत होते. दुसरी चूल थंड पडली होती. एकट्या माणसाला दोन चुली कशाला लागतील?

"तुझे काय ते कपडे बदल आणि बाहेर ये उबेला त्या चुलीजवळ. जेवण व्हायचेच असेल. मांस खाशील ना? आणि त्याआधी दारू घेशील का? "

"जेवण व्हायचे आहेच. मांस चालेल. दारू म्हणाल तर.... उगाच माझ्यामुळे तुम्हाला कमी पडायला नको. असल्या आडनिड्या जागेत अजून मिळणारही नाही. "

"ह्या जागेत बाहेरून तू आलाहेस. मी इथेच आहे. त्यामुळे ही जागा आडनिडी आहे का, इथे कायकाय मिळते वा मिळू शकते हे मला अधिक माहीत असावे. आणि तुला मी स्वतःहून विचारले आहे, तेव्हा 'मला कमी पडेल का' हा विचार करण्याचे स्वातंत्र्य मला देशील का? दारू हवी की नाही ते बोल. 'दारू' म्हटल्याने तुझ्या भावना तर दुखावल्या गेल्या नाहीत ना? पण मला उगाचच 'मद्य', 'वारुणी', 'तीर्थ' असल्या शब्दांचे बुरखे पांघरायला आवडत नाही. पिण्याची लाज वाटत नाही तर काय पितो ते बोलून दाखवण्याची का वाटावी? "

"अनाहूत आलेलो आहे, तेव्हा तुम्हाला अडचण होऊ नये असा प्रयत्न करीत होतो. पण असो. थेट विचारताहात तर थेट उत्तर 'दारू हवी' असे आहे. "

विजेरीचा झोत त्या आवाजाच्या हाताने नियंत्रित होत होता, त्यामुळे त्या आवाजाचा उद्गाता कोण ते समजत नव्हते.

"ही अशी थेट भेटच बरी. आवरायला किती वेळ घेशील? अर्धा तास? "

"अर्धा तास काय करायचाय? पंधरा मिनिटे पुरतील. फक्त हा खोलीतला अंधार मिटवण्यासाठी काही साधन मिळाले तर बरे होईल. "

विजेरीधरल्या हाताने विजेरी फिरवली. भिंतीच्या कोनाड्यातली मेणबत्ती आणि काडेपेटी दृग्गोचर झाली.

विजेरीचा प्रकाश बाहेर गेला. वाटसरूने कोनाडा चापसून काडी पेटवली. त्या पिवळट उजेडात मेणबत्ती शोधून तिची वात उजळवली. मातीच्या भिंती नजरेच्या पडद्यावर उमटू लागल्या. त्यांच्यावरची ओल, त्यांचे निघालेले पोपडे, त्यांतल्या खुंट्यांवर चढलेला शेवाळाचा अंगरखा, सगळे थरथरत्या पिवळ्या प्रकाशात हळूहळू स्थिरावल्यासारखे भासू लागले.

त्या धुमसत्या चुलीला त्या आवाजाने बहुधा पेटवायला घेतले होते. हिरवा धूर सर्वत्र कोंदू लागला. ओलसर लाकडांच्या तडतडण्याचा आवाजही नीटसा उमटू लागला.

अंग कोरडे करून स्वतःचे कपडे बदलणे या क्रियेला खरेच पंधरा मिनिटे अतोनात झाली असती. पण मेणबत्तीचा अपुरा उजेड, अंगात मुरलेला दमट आळस आणि वातावरणातील नि:शब्द शांतता यामुळे अर्धा तास कसा गेला हे वाटसरूला कळलेच नाही. त्याच्या मनगटावरच्या घड्याळाचे झगमगते आकडे नि काटे तेवढे त्या अर्ध्या तासाला साक्ष राहिले.

मेणबत्ती विझती करून वाटसरू बाहेर येईस्तोवर चूल चांगली रसरसलेली होती. एका पातेल्यात काहीतरी रटरटत होते. हिरव्या मिरचीचा, हळदीचा आणि लसणीचा वास त्या वाफेबरोबर बाहेर पडून रुंजी घालत होता. शिजणाऱ्या मांसाचा ओशट वासही त्याच्या बरोबरीने पुढे पुढे करत होता.

चुलीसमोर त्या आवाजाचा मालक कसलेतरी पीठ मळत बसला होता. तेजाळत्या निखाऱ्यांच्या प्रकाशात त्याचा चेहरा अर्धस्पष्ट दिसत होता. मोठ्या हनुवटीचा तो गोरा चेहरा पिवळ्या प्रकाशात तांबूस दिसत होता. चेहऱ्यावर भुवई सोडल्यास एकही केस नव्हता. डोक्यावर काळ्या केसांची महिरप सजलेली होती, पण कानशिलावर येण्याची तिची हिंमत झाली नव्हती. डोळे काजळ घातल्यासारखे काळेभोर होते. देहयष्टी मध्यम उंचीची पण मजबूत होती. अंगावर धोतर आणि बंडी होती.

किंचित दमटलेला सदरा पायजमा घालून वाटसरू चुलीपुढे आला. ओल्या भिजक्या थंडीत ऊब सुखावह वाटत होती. त्याने त्या आवाजाच्या मालकाच्या शेजारच्या दोन पावले मोकळ्या जागेत स्वतःचे बूड टेकवले. मालकाने त्याच्याकडे एक क्षण रोखून पाहिले. त्या पाहण्यात कसलाही खंत खेद विकार नव्हता. जणू फाशी देऊन देऊन हाताला घट्टे पडलेला मारेकरी त्याच्या मूक सावजाकडे पाहत होता.

वाटसरूने सुरुवात केली. "मी तुम्हाला काय म्हणू? म्हणजे, काय नावाने हाक मारू? "

"त्याने काय फरक पडणार आहे? काहीही म्हण. अरविंद म्हण, अब्बास म्हण, अँथनी म्हण, अरिहंत म्हण, अमरिंदर म्हण, अब्राहम म्हण, अँग म्हण.... फक्त हे 'अहो जाहो' सोडून म्हण. तुझ्या मनात नसेल तसे काही, पण आपल्यापेक्षा जरा कोणी वयाने जास्त वाटला की लगेच तुम्ही-आपण करणाऱ्यांचा मला कडकडून जांभई येईस्तोवर कंटाळा येतो. जन्मतारखेतील एका दिवसाच्या फरकाने ज्यांची बढतीची संधी, निवृत्तीची तारीख, निवृत्तिवेतनाचा आकडा बदलतात अशा सरकारी मजुरांचे ठीक आहे. "

"तेव्हा, उगाचच 'तुम्ही'ची माळ न जपता काय म्हणायचे असेल ते म्हण. मी तुला माझे नाव सांगावे अशी तुझी इच्छा असेल तर ती अपुरीच राहील. कारण 'माझे नाव काय' या प्रश्नाचे तथाकथित उत्तर तुला मिळेल, पण ते 'हे नाव खरे कशावरून' या उपप्रश्नाला जन्म देऊन जाईल. आणि पुढे प्रत्येक प्रश्न डुकरिणीसारखा उपप्रश्न प्रसवत जाईल. "

"माझी आवड म्हणशील तर तू मला मायाकुमार म्हण. बुडबुड्यांच्या या जगात सगळी मायाच. मग पुढे कुमारी असो वा कुमार. पण तरीही तू ठरव काय ते. आणि मी तुला काय म्हणू? तुझी आवड काय? "

"मला अशोक म्हण. एकीकडे आपण चक्रवर्ती सम्राट असल्याचा भास आणि दुसरीकडे 'ज्याला शोक नाही तो' असा योगी असल्याचा भास. स्वप्नपतंगच उडवायचे तर मग एकावर का थांबा? "

"ठीक. आता दारूचे पाहशील का? माझ्या खोलीच्या उंबऱ्याच्या आड शिसा आहे तो जपून घेऊन ये. तिथेच दोन पेलेही आहेत. पाणी इथे या घागरीत आहे. "

अशोक दारूचा शिसा नि पेले घेऊन आला. मग आठवण झाल्यासारखे त्याने पायजम्याच्या खिशातून धूम्रपानाचे साहित्य बाहेर काढले. शुभ्रनलिका जरा ओलसर वाटल्या म्हणून त्याने त्या चुलीसमोर एका कोपऱ्यात ठेवून दिल्या. एव्हाना मायाकुमारचे पीठ मळून झाले होते. त्याने उठून घागर कलती करून हात विसळले आणि धोतराला पुसले. मग सरळ उभे राहून त्याने रवी घुसळल्यासारखा शरीराचा कमरेपासून वरचा भाग उलटासुलटा फिरवला आणि कडाडून पाठ मोकळी केली. मग अर्धवट खाली वाकून त्याने हे सगळे मुकाट पाहत बसलेल्या अशोककडे पाहिले आणि म्हणाला, "तू काय खरोखरीच सम्राट झाला आहेस की काय? जरा चटचट पेला भर तुझा. माझा नको भरूस, मीच भरेन. दारू पिण्याइतका धडधाकट, पण पेला दुसऱ्याने भरून द्यावा लागतो इतका दुबळा असे एकाचवेळेस कोण कसे असू शकते हा मला नेहमीच पडत आलेला प्रश्न आहे. "

"आणि दारूचा शिसा अजून आहे एक. प्यायलाच बसला आहेस तर मन आवरू नको. अर्थात या दारूचा झणका पाहता हाच शिसा पुरा पडेल असे मला वाटते, पण सांगून ठेवतो. "

अशोकने त्या ऍल्युमिनियमच्या वा तत्सम पेल्यात अंदाजाने दारू ओतली. मग घागर कलती करून त्यात थोडे पाणी घालायचा प्रयत्न केला. निम्मे पाणी भसकन पेल्याच्या दोबाजूंना सांडले.

"पाणी आणायला झालेच आहे. ठिकाण सांगेन तुला ही घागर संपली की. "

अशोकने पेला दोन्ही हातांच्या उघड्या पंज्यामध्ये नीट धरला. मायाकुमारने सराईतपणे त्याच्या स्वतःच्या पेल्यात दारू ओतली आणि घागरीतून पेला काठापर्यंत भरला. "हं काही म्हणायचे असले तर म्हण, 'चिअर्स', 'चांगभलं', 'फेस्टिना लेंटे' नाहीतर 'माओला लाल सलाम'. तसल्या काही सवयी नसल्या तर घे घोट. "

पहिला घोट अशोकला चांगलाच जड गेला. नाकातून पाण्याचा झरा फुटला आहे आणि कानांतून वाफेचे लोट बाहेर पडत आहेत असे त्याला एकसमयावच्छेदेकरून भासले. डोळे गपकन बंद करून त्यांतून घळघळा वाहणाऱ्या पाण्याच्या साक्षीने त्याने हंबरडा फोडल्यासारख्या आवाजात ठसका काढला.

मायाकुमारने हे सर्व निर्विकारपणे पाहिले नि दुसरा घोट घेतला. जरा वेळ "सूंक सूंक" करून अशोकही ताळ्यावर आला. दुसऱ्या घोटाचा प्रयत्न करण्याआधी त्याने घागरीतून पाणी जपून ओतत आपला पेला नीट भरला.

"धूम्रपानाचे साहित्य तुला कमी पडणार नसेल तर मला काही शुभनलिका देशील का? 'नाही' असे लख्ख म्हणायला तू मोकळा आहेस हे आधीच सांगतो. धूम्रपान करून मला काही वर्षे झाली आहेत. आज पुन्हा करावे अशी चिमूटभर इच्छा झाली म्हणून विचारले, गरज आहे म्हणून नव्हे. गरज असती तर दारूबरोबर धूम्रपानाचीही माझी व्यवस्था करून ठेवली असती. "

"खरंतर मीही काही नेहमी धूम्रपान करणारा नव्हे. शुभ्रनलिकांचा गुच्छ घेऊन हिंडणारा तर नव्हेच नव्हे. आज दुपारी अचानक वाटले की सरळ बाहेर पडावे. त्याक्षणी जे जे सुचले ते बरोबर घेतले. त्यात ह्या शुभ्रनलिका घेतल्या. असले तर असावेत म्हणून दोन गलेलठ्ठ चिरूटही आहेत. तेव्हा, तुला पाहिजे तेवढ्या शुभ्रनलिका घे. चिरूट हवा असला तर सांग, आतून आणतो. "

"दारूबरोबर तोंड चाळवायला काही असले तर काढ. थोडी भूक जाणवायला लागली आहे. "

मायाकुमारने चुलीतले निखारे विस्कटले आणि आतून साल काजळून गेलेले अख्खे बटाटे बाहेर काढले. त्यातले दोन अशोककडे ढकलून त्याने एक शुभ्रनलिका तोंडात घेतली आणि मान झुकवून एका निखाऱ्यावर पेटवली. किंचित सर्दावलेले तंबाखूचे कण चटचट आवाज करीत धुमसले नि निखारा फुलारला. मोठ्ठी जांभई दिल्यासारखा मायाकुमारने श्वास आत ओढून घेतला आणि तोंड-डोळे मिटून नाकातून धुराच्या दोन लडी उलगडल्या.

चटके देणाऱ्या गरम बटाट्याला गोंजारत अशोकने बोटे काळी करायला घेतली होती. त्याला हातानेच थांबवून मायाकुमारने पातेल्यावरच्या ताटलीतले उलथने काढले नि एका बटाट्याची कचकन दोन शकले केली. "आता जरा दम खा. चारदोन मिनिटांत सोलायला घेता येईल. आणि सोलायचे फार सोपस्कार करायच्या भानगडीत पडू नकोस, काहीच उरणार नाही. समजूत घालण्यापुरते सोल नि चावल्यासारखे करून पोटात ढकल. रिकाम्यापोटी दारू पिताना भाजलेल्या बटाट्यासारखा खात्रीचा सोबती नाही. जरा भूक भागल्यासारखे वाटले की मग जिभेकरता काय ते खा. "

काही क्षण शांततेत गेले. अखेर दोन्ही बटाटे अशोकच्या पोटात गेले आणि मायाकुमारचे धूम्रपानही संपले. दोघांचे पेलेही रिते झाले. यावेळेस अशोकने सराईतपणे आपला पेला भरला.

"मी कोण, इथे अचानक कसा आलो, याबद्दल तुला कुतूहल वाटत असेल ना मायाकुमार? "

"मला कुतूहल वाटत असो वा नसो, ते सांगायची तुला मात्र तीव्र इच्छा झालेली आहे हे निश्चित. मग मला खरेच कुतूहल वाटते आहे की नाही हे गौणच झाले. 'मी इथे एकटाच कसा राहतो, या सर्व वस्तू कुठून आणतो याबद्दल तुला कुतूहल वाटत असेल ना अशोक? ' असा प्रश्न विचारून मीही स्वतःच उत्तरपक्ष करू शकतो, पण मला त्याची अजिबात इच्छा नाही. "

"पण तुला जे सांगायचे असेल ते निर्धास्त सांग. नुसते ऐकून घ्यायला माझी अजिबात हरकत नाही. सल्ला वगैरे विचारू नकोस म्हणजे झाले. लख्ख तिऱ्हाईताला सल्ला विचारणे जितके निरर्थक तितकेच त्याप्रमाणे वागणे वा ना वागणेही निरर्थक. सतत कुणाचातरी 'स्व' सुखावायचा वा दुखावायचा हा उद्योग कशाला? त्यापेक्षा तू तुला काय वाटेल ते बोल किंवा बोलू नकोस, मी मला वाटली तर प्रतिक्रिया देईन किंवा देणार नाही. फक्त दुसऱ्याने काय करावे यावर आपले नियंत्रण नाही हे दोघांच्याही लक्षात असू दे म्हणजे झाले. "

मायाकुमारने पातेल्यावरची झाकणी काढून उलथन्याने कालवण तळापासून ढवळले. मग एक मांसाचा तुकडा उलथन्यावर घेऊन त्याने नखाने कुरतडून पाहिला. परत झाकण ठेवून खालची लाकडे जरा मागे ओढली. आणि खालच्या निखाऱ्यांवर चारपाच बटाटे आणि दोनतीन कांदे ठेवून दिले. कांदे पाणावलेले होते. त्यांचा बाहेरचा पापुद्रा चरचरत जळाला आणि ओलसर धूर परत अशोकला ठसका आणण्यात यशस्वी झाला. पण यावेळेस त्याने विषच विषाला मारते या न्यायाने तत्परतेने एक मोठा घोट घशाखाली उतरवला आणि 'हूस्स्स' करून निःश्वास टाकीत त्याने एक शुभ्रनलिका पेटवली.

तिच्या साथीने पटापट घोट घेत त्याने पेला संपवला नि नवीन भरून घेतला.

"मन फुटले म्हणून प्रवासाला निघालो असे सांगितले खरे, पण मन पहिल्यांदाच फुटले असे मात्र नव्हे. किंबहुना, नियमित मन फुटण्याने डोके भिरभिरून गेले नि प्रवासाला निघालो हे जास्ती खरे होईल. फोडणारी व्यक्ती वेगळी, शस्त्र वेगळे, घावांची खोली वेगळी, पण मन मात्र तेच आणि वेदना तशीच. "

"आणि प्रत्येक वेळेला तेच रटाळ गणित मांडत बसा. कोण चुकले, कोण बरोबर याचा फैसला करा. चुकणाऱ्याने बरोबर असणाऱ्याची माफी मागा. 'बरोबर' असणाऱ्याने अर्धे दुर्लक्ष आणि अर्धा आढ्यताखोरपणा यांचे संतापजनक मिश्रण चेहऱ्यावर लिंपून ती माफी स्वीकृत करा. मग मागितलेल्या / मागण्यास भाग पडलेल्या माफीबद्दल कुणाला काय सांगायचे याचे हिशेब दोन्ही बाजूंकडच्या माणसांनी करीत बसा. "

"कंटाळा आला. "

"मुलगा म्हणून, नातू म्हणून, भाचा/पुतण्या म्हणून, विद्यार्थी म्हणून, प्रियकर म्हणून, पती म्हणून, जावई म्हणून... मुखवटे बदलत गेलो, पण मन दर वेळेस भरतीच्या लाटेसारखे अटळपणे फुटत गेले. "

"आणि प्रत्येक वेळेला ऐकायला मिळणारे ते भडका उडवणारे अटळ वाक्य. 'तुझ्या अपेक्षाच अवास्तव आहेत'. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनी चकवा लागलेल्या पोपटासारखे एकच एक वाक्य घोकत बसावे? आणि सगळेजण तेच म्हणतात म्हणून ते खरे? हजार गाढवे एकत्र एकासुरात रेकली तर केवळ रेकणारे कंठ हजार म्हणून ते वेदवाक्य? "

"मलाही काही विचार करता येतो, मलाही काही मत आहे, मलाही बुद्धी आहे हे कुणीच का मानायला तयार नाही? तुमचे परंपरागत चालत आलेले प्रस्थापित शहाणपण जर मला पटत नसेल, तर ते बदलायची वेळ आली असेल असे का नाही उमगत कुणाला? "

"ताडमाड उंच बापाला धोतर अपुरे पडून जर पोटऱ्या उघड्या पडत असलीत, तर त्याच्या बुटबैंगण मुलाने पोटऱ्या उघड्या टाकण्याकरता धोतर निम्मे करून नेसावे हे आणि असे यांचे प्रस्थापित शहाणपण. पण मग त्या वंशात पुन्हा कुणी उंच पुरुष निपजला तर निम्म्या केलेल्या धोतराने त्याच्या पोटऱ्याच काय, मांड्याही उघड्या पडतील याची कुणाला जाणीव आहे का? मग ही जाणीव झाली म्हणून माझ्या अपेक्षा अवास्तव? "

"लहानाचा मोठा झालो, शिकलो, कमावू लागलो, जोडीदार शोधला, संसाराला लागलो. पण जिच्याबरोबर शरीरच नव्हे, तर मनही जुळले आहे याची खात्री होती त्या जोडीदाराकडूनही तोच शब्दप्रहार? जिची साथ असेल तर सर्व दुनियेला बेदखल करण्याची माझी हिंमत, त्या जोडीदाराकडूनच असा विश्वासघात? मग कशाला अर्थ उरला? "

"डोके भणभणले नि निघालो. आता जरा शांतावल्यासारखे वाटते आहे, पण उत्तर मात्र नाही मिळालेले. ते मिळेल की नाही ह्याबद्दलच शंका येऊ लागली आहे आता. आणि हेच जर 'जगणे' असेल तर ते चालू ठेवावे की नाही याबद्दलही प्रश्न पडू लागला आहे. " पेल्यातले उरलेले द्रव्य अशोकने झपकन घशाखाली उतरवले आणि परत पेला भरावा की नाही या विचारात त्याने डोळे किलकिले करून पेल्याकडे पाहिले. त्याचा आवाज जरा जडावल्यासारखे भासत होते.

मायाकुमारने आपले पेयपान एका गतीत नियमित सुरू ठेवले होते. मधूनच पातेल्यावरचे झाकण उघडून ते ढवळण्याचे कामही त्याने एका गतीत नियमित सुरू ठेवले होते. अशोकच्या बोलण्यावर त्याने प्रतिक्रिया अशी व्यक्त एवढीच केली, की निखाऱ्यांवरचे कांदे नि बटाटे पटकन मागे काढले आणि धुमसती लाकडे पार बाहेर काढून दुसऱ्या चुलीत घुसवून ठेवली.

मग चुलीच्या मागे ठेवलेला तवा बाहेर काढून त्याने तिथल्याच एका फडक्याने पुसला, त्या दुसऱ्या चुलीवर ठेवला, त्यातली लाकडे नीट पेटती केली आणि पीठ मळून ठेवलेली परात पुढे ओढली.

अशोक या सगळ्याकडे निर्विकार पण अस्थिर नजरेने पाहत होता.

"अजून पेला भरून घे हवा असेल तर. असा अनिश्चिततेच्या गर्तेत सापडल्यासारखा हताश बसू नकोस. आता भाकऱ्या करतो म्हणजे जेवायला घेऊ. तोवर खायला हे कांदे नि बटाटे घे. कांद्याचा फक्त वरचा पापुद्रा काढ नि अख्खा लाडू खाल्ल्यासारखा खा. गूळ-खोबरे झक मारेल. "

खडा मारल्यावर गायीने कातडी थरथरवावी तसे अशोकने डोके हलवले. तरीही सर्व जग स्थिर-स्थावर आहे हे जाणवल्यावर त्याला जरा हायसे वाटले. यावेळेस पेला भरताना त्याने कष्टपूर्वक दारू-पाणी हे गुणोत्तर व्यस्त करण्याचा प्रयत्न केला. तो कितपत जमला याबद्दलची त्याची शंका पहिला घोट घेईस्तोवर टिकून राहिली.

मायाकुमारने भाकरी थापायला घेतली. पाण्याचा एक छोटा गडू त्याने परातीजवळ घेतला. त्यातून पाणी शिंपून घेत त्याने मळलेल्या पिठाचा एक उंडा घेतला. परातीतच एका बाजूला ठेवून दिलेले पीठ आणि मळलेला पिठाचा गोळा हे दोन्ही टाळत पुरेशी जागा केली. उजव्या हाताचा संपूर्ण उघडलेला पंजा खाली थापटता थापटता सराईतपणे गर्रकन काटकोनात फिरवत त्याने उंड्याचे भाकरीत रूपांतर केले. मग पाण्याने भिजलेली तर्जनी तव्यावर टेकवून त्याने चटकन वर उचलली आणि आलेला चरचरल्याचा आवाज त्याने तंबोरा सुरात जुळला आहे की नाही हे पाहणाऱ्या गवयाच्या तन्मयतेने ऐकला.

अखेर समाधान पावून त्याने थापलेली भाकरी नदीत पणती सोडल्यासारखी तव्यावर अलगद सोडली आणि इतक्या कष्टांचे फळ म्हणून एक मोठा घोट हक्काने घशाखाली उतरवला. एक शुभ्रनलिका पेटवीत त्याने भाकरीकडे नीट लक्ष देऊन पाहिले. सगळे काही मनासारखे चालले आहे हे कळल्यावर त्याने अजून एक मोठा घोट घेत पेला रिकामा केला आणि एका हाताने पुढचा उंडा सपाट करायला घेतला.

"माझा पेला भरशील का? मी दुबळा झालोय म्हणून नव्हे, तर खरकटा हात धुऊन पेला भरून परत भाकरी थापायला घेईस्तोवर आधीची करपेल म्हणून. स्वतःचा पेला भरत असल्यासारखा भर म्हणजे प्रमाण फार चुकणार नाही. "

"आता तू जे काही बोललास त्याबद्दल मी काही मत प्रदर्शित करणे अपेक्षित आहे हे माहीत आहे मला. पण दुर्दैवाने मला जे जाणवते ते बोलायची सवय आहे. दुर्दैवाने यासाठी, की आधी बरीचशी बोलणी त्यापायी नासून गेलेली आहेत. "

अशोकने थरथरत्या हाताने का होईना, मायाकुमारचा पेला भरला. आणि आठवण झाल्यासारखा स्वतःचाही.

"तू ना नात्याचा ना गोत्याचा असा आला आहेस, पण मला सर्वात जास्त भावणाऱ्या पावसाळ्यात आला आहेस. आणि माझ्या या वेळेला आला आहेस, म्हणताना तुला उजवी वागणूक द्यावी असा मनाचा कौल मिळाला म्हणून बोलतो. "

मायाकुमारने भाकरीच्या वरच्या बाजूला पाण्याचा हात फिरवला होता. त्याने ती उलटली. चरचर आवाज करत भाकरीने निषेध नोंदवला. त्याकडे दुर्लक्ष करीत त्याने दोन मिनिटे वाट पाहिली, आणि लाकडे बाहेर ओढून त्यावर दुसरी बाजू नीट भाजून घेतली. बघता बघता दोन पापुद्रे सुटून भाकरी चेंडूसारखी टम्म फुगली. ती एका ताटात काढून त्याने लाकडे पुढे सरकवली, आणि तवा पुरेसा गरम झाल्याची खात्री पूर्वीप्रमाणेच करून दुसरी भाकरी त्यावर सोडली.

"मला तुझे नाव-गाव-पत्ता-जात-पात-गोत्र काहीच माहीत नाही आणि तू मला दोन तासांपूर्वी माहीतही नव्हतास. माहीत असल्याने काही फरक पडला असता असे वाटत नाही, पण माहीत नसल्याने मी एक अलिप्त निरिक्षक आणि श्रोता आहे एवढेच नोंदवून ठेवतो. "

"तू जे काही बोललास ते तुझ्या दृष्टीकोनातून तर योग्य असणारच, पण बाहेरून पाहतानाही मला ते योग्य असू शकेल असे वाटत होते. अर्थात परत मी या नाट्यात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कुठलीच भूमिका निभावत नसताना मी तुला 'योग्य' म्हणणे हे एखाद्या घारीने कुणा देवमाशाला प्रामाणिकपणाबद्दल प्रशस्तीपत्र देण्यासारखे झाले. "

भाकरीच्या वरच्या भागावरून पाणी फिरवून मायाकुमारने एक मोठासा घोट घेतला.

"नातेसंबंधांबद्दल तू बोललास. मनापासून बोललास, तिडिकीने बोललास. कुठल्याही नात्यात गुंतणारा कुठलाही माणूस हा तितकाच सच्चा असतो, त्यात सानथोर काही नसते. रजवाड्यांचे ते राजपुत्र, आणि बाकीच्यांची ती कारटी हे भाषेत जरी ठीक असले, तरी प्रत्यक्षात मात्र हीच नव्हे, तर सगळीच नाती एका पातळीवर येतात. प्रेमात पडणाऱ्या प्रत्येकाला वाटत असते की 'खरे' प्रेम म्हणजे काय हे फक्त तिला/त्याला समजले आहे. आपल्या अपत्याला उराशी कवटाळताना प्रत्येक मातेला वाटत असते की वात्सल्याचा असला उमाळा दुसऱ्या कुणाच्याही उरातून फुटणे शक्य नाही. आणि असे प्रत्येकालाच वाटत असते. "

"आता यात खरे काय? "

"मला समजलेले, आणि प्रत्येकाला निर्विवाद मंजूर असेल असे, एवढेच, की प्रत्येकजण खरा आहे. "

"आणि प्रत्येकाला साफ नामंजूर असलेला भाग म्हणजे सर्वजण एकाच पातळीवर आहेत. मानवी भावनांची तुलना करणे हे 'हा आंबा अधिक गोड की तो ससा अधिक वेगवान' असला वाभरट प्रश्न विचारण्यासारखे आहे. "

भाकरी उलटून त्याने दोन मिनिटांनी लाकडे बाहेर ओढून तीही निखाऱ्यांवर फुगवून घेतली. मग तो लाकडांवर पाण्याचा हबका मारून आणि चुलीमागे जाऊन हात नीट धुऊन आला.

"आता नातेसंबंधातल्या आशा-अपेक्षा-निराशा याबद्दल बोलायचे झाले तर, कुठल्याही मानवाचा कुणाशीही जडलेला कसलाही नातेसंबंध हा एखाद्या फळासारखा असतो. फळ पिकायला वेळ द्यावा लागतो तसा ते नाते स्थापित व्हायला नि स्थिरावायला वेळ द्यायला लागतो. त्याआधीच त्यात दात रोवले तर अपेक्षाभंगाच्या अन निराशेच्या आंबट-तुरट चवी जिभेवर उमलतात. "

"अर्थात तू वर्णिलेले प्रश्न हे तू नातेसंबंध स्थिरावायच्या आधीच फळाचा चावा घेतल्याने उत्पन्न झालेले नाहीयेत. ते आलेत दुसऱ्याच उगमस्थळातून. "

"एखादा नातेसंबंध नीट पिकल्यावर त्याचा आस्वाद एका विशिष्ट मर्यादेत घेणे आवश्यक असते. आयुष्यभर एकमेकांबद्दल टिकेल अशी भावना अजून तरी जन्माला यायची आहे. नातेसंबंधांबद्दल बोलायचे झाले तर सर्वात गहन संबंध म्हणजे विवाह. पण प्रत्येक विवाहात एक घटस्फोट दडलेला असतो. काहीजण तो घेतात, उरलेले घेत नाहीत. "

"अशा पिकून बाद झालेल्या फळात दात रोवल्यावर जे होते, त्या अतिगोड नासक्या वासाने डोके भिरभिरायला लागते, ते तुझे झाले आहे. कारण तुला एक गंमत लक्षात आलेली नाही. घटस्फोट घ्यायचा नसेल, तर ते नाते कसे टिकवायचे? तर त्या फळाला वरून सोनेरी-चंदेरी मुलामा देऊन त्याचा पूजेतला नारळ करायचा. जगाला दिसायला श्रीफळ. आत काय कुजते आहे याची कुणालाही दखल नसते. पण जगाला दिसते आहे त्यावर जन्म काढतात लोक. शिवाय 'संसारवेलीवर उमललेली फुले' असे गोंडस नाव धारण करणारे राक्षस धुमाकूळ घालायला सज्ज असतातच. त्यांचे लाडकोड पुरवायचे आणि आपण आदर्श मातापिता आहोत या ग्लानीत, हुतात्मा असल्याच्या धुंदीत, जगायचे. "

"तुला माझे बोलणे कडू वाटेल बहुतेक. पण फक्त 'जीवनसाथी' एवढाच संबंध नव्हे, तर प्रत्येक मानवाचा त्याच्या/तिच्या आयुष्याशी असलेला संबंधही असाच फळासारखा असतो. त्याचा आस्वाद घेण्याची मुदत उलटून गेल्यावरही जर तसेच आयुष्य जगत राहिले, तर त्या सडक्या वासाने डोके भणभणायला लागते. आणि ते इतके असहनीय असते, की त्यापासून सुटका होण्यासाठी जिवंत राहूनही करता येईल असे एखादे व्यसन जोपासणे एवढाच काय तो मार्ग उरतो. मग मद्याच्या आहारी जा, अफू-भांग-गांजा यांच्या, कुठल्या रासायनिक चूर्णांच्या, नाहीतर संशोधनाच्या, धर्माच्या किंवा समाजसेवेच्या. "

"एवढेच म्हणेन, की दुर्दैवाने अशा आहारी जाणाऱ्या लोकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे. काहीही करून समोर दिसणारे सत्य पडद्याआड सरकवणे यात सगळेच तरबेज होऊ लागलेत. "

"आणि नातेसंबंधांशिवाय माणसाच्या आयुष्याला 'पूर्णत्त्व' येत नाही असे तुला वाटत असले, तर ते खरे आहे. फक्त 'नातेसंबंध चिरंजीवी नसतात' एवढी टीप जोडली की झाले. एकच नातेसंबंध चिरंजीव असतो, तो म्हणजे स्वतःचा स्वतःशीच असलेला. आणि तो कधी तोडायचा याचे नीट भान ठेवून जगले की मग 'मन फुटणे' हा केवळ पोरखेळ होऊन जातो. "

"असो. तुला वाटले ते तू बोललास, मला वाटली ती प्रतिक्रिया दिली. आता जेवून घेऊ. तुला एक भाकरी पुरेल असा अंदाज बांधला आहे. त्याहून जास्त लागणार असेल तर पटकन टाकीन. फक्त 'अजून लागणार आहे' हे एक भाकरी संपल्यावर सांग. दारू प्यायल्यावर भुकेचेच नव्हे तर सगळेच अंदाज बऱ्याच वेळेला चुकतात. आणि मला मागे काही ठेवायला आवडत नाही. "

धुमसत्या लाकडांच्या साथीने त्यांचे जेवण उरकले. अशोकला अजून भाकरीची गरज पडली नाही. जेवण झाल्यावर नीट झाकपाक करून दोघेही आपापल्या खोल्यांत झोपायला गेले.

पाऊस तडतडत राहिला.

सकाळी दिशा जरा उजळल्या तेव्हा पावसाने हळूहळू काढता पाय घेतला. अशोकच्या साथीला त्या आवारात फक्त सायनाईडने निळा पडलेला मायाकुमारचा निष्प्राण देह होता.