गाडी फाटकाबाहेरच्या ट्रॅफिकमध्ये आणि प्रदूषणाच्या ढगामध्ये पोचली आणि तिच्या विचारांची टकळी सुरू झाली.
आता मला कुठला मुलगा आवडतंच नाही हा माझा दोष आहे का? "बघितलेली" सगळी एकजात बावळट तरी वाटतात किंवा "ध्यान" दिसतात. आजूबाजूला दिसणाऱ्यांपैकी जी आवडतात ती अगोदरपासूनच कुठल्यातरी बावळट पोरीच्या प्रेमाततरी असतात नाहीतर "विवाहित". उगाचच "वय वाढतंय" या सबबीखाली कोणाशीही लग्न करायचं का? आणि नाहीच करावसं वाटलं लग्न तर बिघडतं कुठे. हे जेव्हा आई बाबांसमोर बोलले तेव्हा सहा रिश्टर स्केलपेक्षा मोठा भूकंपाचा धक्का बसावा अशी प्रतिक्रिया सर्वांनी दिली होती. सगळे मिडियावाले विनाकारण एकविसाव्या शतकाच्या गप्पा मारतात. जरा मध्यमवर्गियांच्या मनात डोकावून बघा म्हणावं, अजून पेशवाई जशीच्या तशीच आहे.
चहाच्या वेळी आमच्या ग्रुपमधल्या त्या पढीक मूर्खाच्या (हे मी त्याला ठेवलेलं नाव) विश्लेषणाचं गटार परत वाहू लागलं. प्रत्येक गोष्टीचा कीस पाडणे (त्याच्या शब्दात ऒब्जेक्टीव ऍनॅलिसिस करणे) हा त्याचा आवडता छंद आहे. तर आज महाशय म्हणाले आजकाल बऱ्याच पोरींचा फेमिनाइन कोशंटच कमी होत चाललाय. विशेषत: आयटीमधल्या पोरींचा. कुठल्यातरी परदेशी संशोधनाचे दाखले देत याचं विश्लेषण सुरू झालं. कशा आजच्या मुली मुलींसारखं वागणं विसरल्या आहेत. हे निसर्गाच्या कसं विरुद्ध आहे वगैरे. बासचं. आम्ही सगळ्याजणी भांड भांड भांडल्यावर, दृष्टिकोन (perception) वेगवेगळे असू शकतात अशी तात्त्विक पिंक टाकून त्यानं काढता पाय घेतला.
जाग्यावर येऊन बसले. घड्याळाप्रमाणे बरोबर पंधराच मिनिटांनी जागेवर बसत होते तरी लीडबाबा (आमचा प्रोजेक्ट लीडर) "आली चहाच्या निमित्तानं तासभर चकाट्या पिटून" असा नेहमीचा लुक दिला. टीममधली शिला जवळ येऊन सांगू लागली. अग त्या टोपीने काहीच नीट काम केलेले नाहीये. टोपी म्हणजे आमच्या टीममधला स्वयंघोषित डॊट नेट एक्स्पर्ट. तिला म्हणजे त्या टोपीला खाऊ का गिळू असं झालं होतं. एकावेळी दोन दोन प्रोजेक्टवर काम करत असल्यामुळे बरचसं काम याच्याकडून करून घ्यायची जबाबदारी मॅनेजरने आमच्याकडे दिली होती. शिकवण्याच्या हजारएक पद्धती आम्ही दोघींनी आळीपाळीने त्याच्यावर अमलांत आणल्या होत्या. शिला एकदा म्हणाली मी माझ्या लेकालापण त्याच्या पाच वर्षाच्या आयुष्यात एवढ्या प्रेमानं कधी काही सांगितलं नाही. पण त्याचं कामाचं घोडं कुठ अडत होतं काय माहिती! मॅनेजरसाहेबांकडे जाणं भागच होतं. आता तो, आम्ही दोघी आणि न्यायाधीश मॅनेजरसाहेब असा खटला चालू झाला. खूप वादावादी झाली. साहेबांचा पेशन्स जसा जसा संपत होता तसतसा त्यांचा आवाज वाढायला लागला. तरी टोपी काही समेवर यायला तयारच नव्हता. शेवटी साहेबांचा आवाज कॊर्पोरेट संस्कृतीला विसंगत इतका मोठा आणि घोगरा झाल्यावर टोपी बरळला, मला मुलींच्या प्रोजेक्टवर कामच करायचं नाही. आमच्या दोघींच्या डोक्यात शंभर सूर्यांएवढा लख्ख प्रकाश पडला. हसावे की रडावे काहीच कळत नव्हते. काही म्हणणं तर दूरचं राहिलं. प्रसंगावधान राखून शीलाने दुसऱ्या प्रोजेक्टवर महत्त्वाचा कॊल आहे असं सांगितले आणि आम्ही दोघी तिथून बाहेर पडलो. जागेवर येऊन पाच मिनिटं आम्ही काही न बोलता एकमेकींकडं बघत बसलो होतो.
त्या नवीन मॅनेजरकडे जाऊन त्याला परत एकदा आठवण करून दिली. साईटवर कमिशनिंगसाठी पाठवणार म्हणून (मनातल्या मनात: गाजर दाखवून) एक महिना झाला होता त्याची. अजून कशी काही हालचाल नाही म्हणून विचारलं तर म्हणाला बरं झालं आलीस. तुझ्याकडून काही गोष्टी कंफर्म करायच्या होत्या. म्हणजे साईटवरच्या कामात बरेच धोके असतात. बरंच शारीरिक कष्टाचं काम असतं. उंचावर जावं लागत. तासतासभर उभारावं लागतं. आता तुला जमणार नाही असं मला म्हणायचं नाही पण परत एकदा कंफर्म करायचं होतं. मी एन. सी. सी., युथ एक्सचेंज इत्यादी कार्यक्रमांच्या माध्यमातून सर्व तथाकथित पुरुषी कसरती करून आले आहे हे फिरून एकवार त्याला सांगितलं. सर्टिफिकेटं आणून दाखवू का, एवढंच विचारायचं बाकी राहिलं होतं. तरी मुलींकडून डबल कंफर्मेशन घेणं गरजेच आहे असं विकट हास्य करत तो बोलला.
बरोबर साडेपाच वाजता काम उरकून मशीन बंद करणार इतक्यात मी निघणार हे अंतर्ज्ञानानं कळल्यासारखा लीडबाबा उठून माझ्या जागेवर आला आणि एक महत्त्वाचं काम समजावून द्यायला लागला. निघायच्या वेळेसच महत्त्वाची कामं डिस्कस करण्याची याची सवय आता चांगलीच माहिती झाली होती. त्याला तोडत मी आजच काम झालंय हे उद्या केलं तर नाही चालणार का? असं विचारलं तेव्हा त्यानं एकवार घड्याळाकडं आणि एकवार माझ्याकडे बघितलं. घड्याळाच्या काट्याबरोबर यायचं आणि जायचं अस कस चालेल आयटी कंपनीत. एवढ्या लवकर जायचं तर तुम्ही येताच कशाला आयटी कंपनीत. येऊन आमच्यावर काय उपकार करता का तुम्ही. या अर्थाचे सगळे भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटले. पण प्रत्यक्षात माझ्या कामाच्या काटेकोरपणामुळे ठीक आहे एवढंच तो म्हणू शकला.
पार्किंगमधून गाडी बाहेर काढताना, विश्लेषणवीर पढीक बाय करून गेला आणि "फेमिनाइन कोशंट" आठवला. विचारांची टकळी पुन्हा सुरू झाली. समान वागणुकीच्या बोंबा तर मारायच्या पण नेहमी उपकार करत असल्याची, सांभाळून घेत असल्याची, फेवर करत असल्याची भावना. नोकरीवालीच बायको पाहिजे पण तिचा पगार आपल्यापेक्षा जास्त असता कामा नये. मुलींच्या प्रोजेक्टमध्ये काम करायचं नाही. लीड म्हणून मुली नकोत. यांची चार चार पोरं कमिशन साईटवर राडा करून आलीत पण आम्हाला मात्र संधी न देताच आमच्या कुवतीवर शंका घ्यायची. त्या शीलाचा नवरा फक्त सकाळी उठल्यावर चादरीच्या घड्या घालतो आणि चहा करतो पण मित्रमंडळीमध्ये बायकोला घरकामात पूर्ण मदत करतो असं सांगत फिरतो. हे लोक ऒनसाईटवर डाळभात खाऊन जगणार आणि सगळा स्वयंपाक येत असल्याच्या तोऱ्यात मिरवणार. व्यवस्थित प्लॅन करून, वक्तशीरपणे कामं करता येतात. पण जेव्हा सगळं ऒफिस रिकामं होणार असतं तेव्हाच हे अगदी मन लावून काम करणार. जणू काही ते वेळेत घरी गेले तर दुसऱ्या दिवशी सकाळी कंपनीचा स्टॊक मार्केटवरचा शेअर खालीच घसरणार आहे आणि तो वरती रोखून धरायचं काम यांना रात्री उशीरापर्यंत करायचंय. काम करायला ऒक्सिजन (आग आणि मूर्ख विरुद्ध टोकाला असणारी तंबाखूची कांडी) लागतो असं म्हणत दर तासाला पंधरा पंधरा मिनिट गायब राहणार. मग काय हे लोक बारा बारा तास ऒफिसमध्ये बसलेले दिसणारंच. आम्ही पाच मिनिट मोबाईलवर आलेला कॊल घ्यायला जागेवरून उठलं की यांच्या डोळ्यावर येणार. पण प्रोजेक्ट डिस्कशनच्या नावाखाली तासतासभर क्रिकेट, स्टॊक मार्केट, रिअल इस्टेटपासून मोबाईल, कार्स, कपडे, हेअरस्टाइल यापर्यंत सगळ्या विषयांवर गप्पा मारत बसणार.
मेट्रोसेक्शुअल मेल असं म्हणत यांचा फेमिनाइन कोशंट वाढत चाललाय. मग मुलींचा कमी झालेला दिसला तर बिघडलं कुठं?