तिच्या समाजसेवेची गोष्ट

येरवडा महिला मध्यवर्ती कारागृहापाशी पंकजा पोचली तेव्हा आजूबाजूच्या रहदारीत रविवार सकाळचा संथपणा होता. तिने फाटकातून आत नजर टाकली तर तिथेही सामसूम होती. फक्त एक सशस्त्र रखवालदार खुर्चीवर बसला होता. फाटकालगतच्या चौकीत दोन बायका काही कागदपत्रे चाळत बसल्या होत्या. त्यातली एक कारागृह अधीक्षक असावी.

गेल्या आठवड्यात साऱ्या महिला कर्मचाऱ्यांना कंपनीच्या चॅरिटी सेलचे ई-पत्र आले होते.  रविवारी सकाळी येरवडा महिला कारागृहात होळीचा कार्यक्रम ठरवला होता आणि जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन होते. कार्यक्रमाच्या वेगळेपणामुळे बऱ्याच जणींनी उत्सुकता दर्शवली होती पण हळूहळू त्यांच्या लक्षात आले होते की वेळ रविवार सकाळची आहे. मग उत्साह थोडा कमी झाला होता. पंकजाचा निश्चय मात्र टिकून राहिला होता.  होळी साजरी करायची म्हणजे नक्की काय करायचे हे विचारायचे ती विसरून गेली होती. होळी साजरी करून समाजसेवा कशी होणार हेही तिला समजले नव्हते. असो. काय होईल ते पाहू असे म्हणून ती इकडेतिकडे पाहत उभी राहिली.

साडेनऊ वाजत आले तशा भराभरा दहाबारा जणी आल्या. त्या साऱ्या पांढऱ्या वेषात होत्या.  या कार्यक्रमाची सूत्रधार मोनिकाही आली आणि मग गडबड उडाली. चौकीत जाऊन गेटपास घेणे, भ्रमणध्वनी तिथे जमा करणे या गोष्टी होईपर्यंत कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या, चेअरमनच्या पत्नीही आल्या. जुजबी ओळखीचा कार्यक्रम झाला आणि ताफा आत चालू लागला.

आत पाऊल टाकताच तिला जाणवले की आपण इथे पूर्वी आलो आहोत. या बैठ्या कौलारू इमारती, हे अंगण आपण पूर्वी पाहिले आहे. ती थक्क झाली. तिच्या आठवणीत ती इथे पहिल्यांदाच येत होती. मग हे सगळे ओळखीचे का वाटते आहे? विचार करताना तिच्या लक्षात आले की हे सारे तिने चित्रपटांमधून पाहिले आहे. तिच्या  कित्येक आवडत्या आणि अगणित वेळा पाहिलेल्या चित्रपटांचे चित्रीकरण इथे झाले होते. ते चित्रपट कितीतरी वर्षांपूर्वीचे होते. पण इथे काही बदल दिसत नव्हता. काळ जणू थांबला होता.

सारा लवाजमा एका मोठ्या हॉलमध्ये गेला. बऱ्याच स्त्रिया तिथे जमल्या होत्या.  मोनिकाने तिला सांगितले की त्या स्त्रियांच्या  खटल्यांचा निकाल अजून लागायचा होता. गुन्हा शाबीत झालेल्या आणि शिक्षा भोगणाऱ्या स्त्रिया वेगळीकडे होत्या. या स्त्रियांसाठी आपली चॅरिटी सेल विविध उपक्रम चालवते. त्यांच्या लहान मुलांसाठी बालवाडी, स्त्रियांसाठी काही शिवणवर्ग वगैरे.  पंकजाने निरखून पाहिले.  त्या स्त्रिया गुन्हे करून तिथे आलेल्या होत्या. काहीजणी खूनसुद्धा करून आल्या असतील. ती शहारली. तिने कुठेतरी वाचले होते की घडणाऱ्या गुन्ह्यांपैकी निम्म्यांपेक्षा जास्त गुन्हे हे परिस्थितीजन्य किंवा टोकाच्या मानसिक ताणाखाली झालेले असतात. या साऱ्या बायका साधारण परिस्थितीतल्या दिसत होत्या. बरोबर आहे. बऱ्या परिस्थितीतल्या बायका जामीन वगैरे मिळवत असतील. या बायकांचा नाईलाज असेल किंवा गुन्हा अजामीनपात्र असेल...

मोनिका प्रमुख पाहुण्यांसोबत समोर मांडलेल्या खुर्च्यांकडे चालू लागली. तिने पंकजाला खूण केली पण पंकजाने बाजूला ठेवलेल्या खुर्च्यांपैकी एकीवर बसकण मारली. इतर मुलींनीही बसून घेतले. मोनिकाने कंपनीची चॅरिटी सेल, तिचे कार्य इत्यादी माहिती पाच मिनिटांत सांगितली. प्रमुख पाहुण्या वेळात वेळ काढून आल्याबद्दल त्यांचे आभार मानले. मग प्रमुख पाहुण्यांनी सामाजिक जबाबदारी, स्त्रियांचे प्रश्न इत्यादी मुद्दे धरून थोडा वेळ विवेचन केले. मग त्या दोघी पंकजाच्या बाजूला येऊन बसल्या.

आता पांढऱ्या पोषाखातल्या मुली पुढे झाल्या.  साऱ्या पंचविशीच्या आसपास आणि उत्साहाने रसरसलेल्या होत्या. बहुतेक साऱ्या अमराठी होत्या असे तिला बाहेर ओळख परेड झाली तेव्हा समजले होते. मुलींचा कार्यक्रम ठरलेला दिसत नव्हता त्यामुळे थोडा विस्कळीतपणा होता. पण एकूण तेथील स्त्रियांचे मनोरंजन करायचे आणि सुमारे तासभर त्यांना त्यांचे दुःख आणि ताण विसरायला लावायचे असे मध्यवर्ती सूत्र होते. एका मुलीने "इतनी शक्ती हमें देना दाता" हे गाणे सुरू केले. तिचा आवाज गोड होता आणि ती तन्मयतेने म्हणत होती. पंकजाने खाली बसलेल्या बायकांचे निरीक्षण केले. त्या तल्लीन झालेल्या दिसत होत्या. सर्व वयोगटातल्या स्त्रिया तिथे होत्या. एखादी गरोदर दिसत होती. काहींजवळ लहान मुले दिसत होती. ती आईचा पदर धरून बसली होती. निरागस या शब्दाचा अर्थ त्यांच्या चेहऱ्यावर लिहिलेला होता. पंकजाला आठवले की फक्त सहा वर्षांपर्यंतच ही मुले आईबरोबर राहू शकतात. नंतर त्यांना कोणी सांभाळणारे नसेल तर रिमांड होममध्ये पाठवण्यात येते. तिथे ही मुले कायकाय शिकत असतील कोणास ठाऊक!  ज्या बायकांना थोडी मोठी मुले असतील त्यांना मुलांची किती काळजी वाटत असेल! त्यांचे काय होत असेल?

समोरचे गाणे संपून आता नाटुकले सुरू झाले होते. तेही उत्स्फूर्त होते आणि मधूनच समोर बसलेल्या बायकांबरोबर सवालजबाब सुरू होते. त्या बायका हळूहळू मोकळ्या होत होत्या. या बायकांच्या घरचे लोक भेटायला येत असतील का? पंकजाला प्रश्न पडला. यांचे गुन्हे सिद्ध होऊन जन्मठेपेची वगैरे शिक्षा झाली तर नवरा दुसरे लग्न करत असेल का? तिला कॉलेजात असताना पाहिलेला आणि त्यामुळे खूप परिणामकारक वाटलेला 'उंबरठा' चित्रपटातला, स्मिता पाटील घरी येते तो प्रसंग आठवला. नंतर कित्येक वेळा तिने तो चित्रपट पाहिला तरी तिथे ती अडखळत असे. "तू इथे राहू शकतेस, आपण पूर्वीसारखे असू शकतो... " या वाक्याशी तिचे डोळे हमखास भरून येत.

समोर होळीची गाणी आणि नृत्य सुरू झाले होते. हिंदी चित्रपटगीतांनी ही मोठी सोय करून ठेवली आहे, तिच्या मनात आले. कुठलाही प्रसंग, कुठलीही भावना असो. त्याला साजेशी कितीतरी चित्रपटगीते तयार असतात. काही इतकी समर्पक असतात की वेगळा विचारच करावा लागत नाही.  तिला हसू आले. समोर बसलेल्या बायका टाळ्या वाजवून दाद देत होत्या. एक हुशार, चुणचुणीत सतरा-अठरा वर्षांची मुलगी समोर येऊन नाचू लागली. मध्येच मुलींनी बरोबर आणलेल्या गुलालाच्या छोट्या पुड्या उघडल्या आणि चिमूटभर गुलाल उधळला. पंकजाने प्रमुख पाहुण्यांकडे पाहिले. त्यांचे डोळे समोर होते पण चेहऱ्यावर किंचित उशीर होतो आहे असा भाव होता. त्यांना बहुतेक लवकर निघायचे असावे. शेवटी त्या उठल्याच. त्यांनी मुलींना 'तुमचे चालू द्या' अशी खूण केली आणि त्या वाट काढत बाहेर पडल्या. मोनिका त्यांना गाडीपर्यंत पोचवायला गेली.

आता अंताक्षरी सुरू झाली होती. तुरूंगातल्या बायका विरूद्ध बाहेरच्या असा सामना होता. "देखिये हम लोग हारके जानेवाले हैं. आप सब बहुत बढिया खेल रही हैं" कोणीतरी ओरडले. वातावरणात खरोखरच जोश निर्माण झाला. चुणचुणीत मुलगी अगदी अटीतटीला येऊन गाणी म्हणत होती. ही सगळी वर्षानुवर्षे ऐकलेली आणि म्हटलेली गाणी, त्या बायकांच्या तोंडून ऐकायला वेगळी वाटत होती. मध्येच एखादी वयस्कर स्त्री एखादे जुने गाणे गुणगुणू लागे. मग साऱ्या तिला प्रोत्साहन देत. ते पाहता पाहता पंकजाला गलबलून आले.

हे जग किती वेगळे होते. आपण आपली दुःखे कुरवाळत बसतो, ती किती तकलादू असतात! या बायकांच्या काय कर्मकहाण्या असतील कोणास ठाऊक. आपली ट्रेन किंवा फ्लाईट लेट झाली तर एकदोन तास वाया गेले म्हणून आपण चरफडतो, इथे आयुष्ये वाया चालली होती.

आपली समाजसेवेची समजही काय असते! लहानपणी वृद्धांना, अपंगांना रस्ता ओलांडून देणे, मोलकरणीच्या मुलीला मुळाक्षरे शिकवणे, कॉलेजात असताना कुठेतरी कँप काढून साफसफाई करणे किंवा रक्तदान शिबीर आयोजित करणे... पण तेव्हा निदान तेवढे तरी केले जाते. पुढे आयुष्यात आपण एवढे कसे निर्ढावत जातो! समाजाच्या ज्या स्तरात आपण राहतो त्याच्या बाहेर डोकावून पाहण्याचा प्रयत्नही फारसा होत नाही. महिन्याच्या पगारातून शेपाचशे रुपये चॅरिटीला देऊन त्यावर आयकर वाचवणार! तिला फार लाज वाटली. मोनिकाला विचारून इथल्या स्त्रियांच्या मुलांसाठी काहीतरी भरघोस करावे असे तिने ठरवले. मनातल्या मनात तिने विविध पुस्तके आणि खेळ त्या मुलांच्या हातातही ठेवला. त्यांचे डोळे काय लकाकतील!

समोर आता समारोप सुरू झालेला होता. ठरल्याप्रमाणे मोनिकाची टीम अंताक्षरी हरली होती आणि तिथल्या स्त्रिया जिंकल्या होत्या. त्या खूष दिसत होत्या पण कार्यक्रम संपल्याची हुरहुरही दिसत होती.

नंतर विविध बॉक्सेसमधून साबण, कंगवा, फेस पावडर, इत्यादींचे वाटप सुरू झाले. मोनिकाने तिच्या हातात एकेक सेट कोंबायला सुरूवात केली. समोर येणाऱ्या स्त्रियांच्या हातात ती ते ठेवू लागली. "ती सुमन आजारी आहे म्हणून आली नाहीये. तिचं माझ्याकडेच द्या. " समोरची बाई पंकजाला म्हणत होती. त्यांची सुपरवायझर त्या बाईच्या अंगावर खेकसली. पंकजाला क्षणभर कसनुसे झाले. इथून पटकन बाहेर पडून मोकळा श्वास घ्यावा असे तिला वाटू लागले. यथावकाश वाटप संपले. मग वेगवेगळ्या इमारतींमध्ये जाऊन विविध उपक्रमांची माहिती दिली गेली. विणकाम चालू होते तिथे पंकजाने एक वेगळा टाका शिकवला.

जाण्याची वेळ झाली तसा पंकजाचा पाय निघेना. अजून काहीतरी करून जावे असे तिला वाटू लागले. सगळ्याजणी फाटकाबाहेर पडल्या तसे पंकजाला निघावे लागले. तिने मोनिकाकडे काय काय करता येईल याची चौकशी केली. मोनिकाने तिच्याबरोबर सोमवारी लंचची वेळ ठरवून टाकली. बाकीच्या मुली बहुतेक कारागृहाला विसरल्या होत्या. संध्याकाळी कोणाचीतरी बर्थडे पार्टी होती तिकडे जाण्याचा प्लॅन चालला होता. तिला नवल वाटले. याच मुली आतमध्ये समरसून कार्यक्रम सादर करत होत्या आणि आता इतक्या सुटसुटीत मोकळ्या कशा झाल्या!

अगदी निघता निघता तिला आठवले की सोमवारी तिला तिच्या टीमबरोबर लंच घ्यायचे होते.  एक अवघड गोष्ट तिला त्यांच्या गळी उतरवायची होती, त्यामुळे त्यांच्याबरोबर लंच स्वतःच्या गळी उतरवण्याला पर्याय नव्हता. तो कार्यक्रम मंगळवारवर ढकलता येईल का, याची तिने मनोमन चाचपणी केली पण तसे करणे योग्य नव्हते. मोनिकाबरोबरचे लंच पुढे ढकलणे भाग होते. तिने मोनिकाला हाक मारून ते सांगितले. मोनिकाला पुढचे चार दिवस वेळ नव्हता, त्यामुळे त्यापुढच्या आठवड्यात पाहू असे ठरले आणि मनातली चलबिचल दाबून टाकत पंकजाने घराकडे मोर्चा वळवला.