कधी ठाण मांडून बैसू जरासे-
कविता कराया, मनाशी उसासे-
असे टाकतो मी, तरी येत नाही-
मनातून ओळी, जशी काय शाई-
पुढे जात नाही! अकस्मात आणि-
अशी ओळ माझ्या मनातून जाते
जशी वीजरेखा तमातून जाते-
पुन्हा लुप्त होते, पुन्हा खिन्न होतो
असे वाटते की जरा भिन्न होतो-
तेव्हाच होतो कितीसा बरा मी?
खरा तोच होतो, की आता खरा मी?
शंकाच आहे मनातून माझ्या!
कविता सुचेना! उरातून माझ्या-
तुझी याद आता तरारून येते-
पुन्हा एकदा, तू किती दूर जाते-
’बघूया तरी’, बोलतो, बंद डोळे-
कितीदा करावे, फुकाचेच चाळे-
रिकाम्या मनाचे! रिकामे तरी-
त्यास कैसे म्हणू मी? म्हणालो जरी-
म्हणालो जरी ते कुठे सिद्ध होते?
कविता न शब्दामध्ये बद्ध होते...!
असा मांडता हा व्यथांचा पसारा-
मनाच्या पटाशी, कुठे धुंद वारा-
जरा शोधतो मी, कधी पावसाळा-
जरा मागतो मी, म्हणे वेधशाळा-
की यंदा जरासा तू ही ’लेट’ आहे..
असो बापडा! पण पुन्हा भेट आहे-
भविष्यात! हे ही नसे थोडके..
ऋतू ना असावे तुझ्यासारखे..! -
कवीते! वहीला बसे धूळ आता
उगा मांडले हे नवे खूळ आता-
की यावे, सुचावे, पुन्हा गुप्त व्हावे
पहाटे जसे चांदणे लुप्त व्हावे-
नभातून! तैसा तुझा नाद वेडा-
असे, आपला हा जुना वाद वेडा..
रुसूनी बसावे तुझा छंद आहे-
जुना हा; तरीही नवे द्वंद्व आहे
मला ठाव की हा तुझा हट्ट आहे-
की मी बोलवावे! बरे घट्ट आहे-
नात्यातले हे जुने पाश सारे..
म्हणूनीच मी फारसे भीत नाही,
सखे ही तरीही खरी रीत नाही..!
प्रवासात माझे बुडे रोज तारू-
प्रवाहात, आता किती हाक मारू?
की शब्दामध्ये ना जुना त्वेष माझा
जुना मी, जरासा नवा वेश माझा
तरी देऊ का ओळखीचा पुरावा-
तुला? सांग आता, न साहे दुरावा
त्वरेने निघोनी करी स्पर्श आता
न जाणो निघावा हा निष्कर्श आता-
मनातून माझ्या, की प्रेमाप्रमाणे-
कधी ना कधी तू जरा जीर्ण होते...
कविता कधीही न संपुर्ण होते!
...... कविता कधीही न संपुर्ण होते!
++++++++++++++++++++