मी मिटून डोळे कविता जागत असतो

डोक्यावरती पंखा रोरावत असतो
मी मिटून डोळे कविता जागत असतो

पाऊस रांगडा कुठे बरसतो हल्ली ?
(तो रिमझिम रिमझिम पाट्या टाकत असतो )

बाजूला येतो कुणी, पाहतो, हसतो
इतक्यात अचानक सिग्नल लागत असतो !

जे म्हणायचे अंधूक जाणवत असते
तान्हुला कुणी आईस चाचपत असतो

येणारच नसते गाडी कुठली, कोणी
नुसताच फलाटावर रेंगाळत असतो

मी कधी रिकाम्या दुकानातला नोकर
एकटा स्वतःशी उगाच हासत असतो

अंधारच असतो ह्या खोलीत परंतू
एखादा क्षण घनदाट उजाळत असतो

मी आधी करतो आभाळाची माती
ती माती मग मी भाळी लावत असतो