......................................................................कधी तरी हे मला जमावे ! ...................................................................
सुखाविना मी सुखी असावे...कधी तरी हे मला जमावे !
असूनसुद्धा उदास; गावे...कधी तरी हे मला जमावे !
कळेल गीता; सुचेल ओवी, अशी मुळी शक्यताच नाही...
निदान भिंतीस चालवावे...कधी तरी हे मला जमावे !
अटींत अन् चौकटींत अर्धे जिणे जरी हे निघून गेले...
करू नये ते करून जावे...कधी तरी हे मला जमावे !
अजून मी खोल खोल जावे मुळे स्वतःचीच शोधण्याला
अजून आकाश उंच न्यावे...कधी तरी हे मला जमावे !
जरी तुझा राग येत गेला, जरी तुझी चीड येत गेली...
तुला न काहीच मी म्हणावे...कधी तरी हे मला जमावे !
रडूच येई कुणाकुणाच्या उदास, हळुवार आठवांनी...
कधी कुणाला न आठवावे...कधी तरी हे मला जमावे !
असू नये मी मनी कुणाच्या...असू नये मी जगी कुणाच्या...
कधी तरी हे मला जमावे...कधी तरी हे मला जमावे !
- प्रदीप कुलकर्णी
.......................................
रचनाकाल - ७ ऑक्टोबर २००९
.......................................