३०. भोग

‘भोग’ हा दोन संपूर्ण परस्पराविरुद्ध अर्थ असलेला शब्द अध्यात्म समजायला फार उपयोगी आहे. खरं तर असं म्हणायला हवं की स्वरूप गवसलं नाही तर आयुष्य ‘सहन करत राहणं’ या अर्थी भोग आहे आणि स्वरूप गवसलं तर ‘उपभोग’ या अर्थी भोग आहे. म्हणजे आयुष्य एकच आहे पण ते उपभोग होणार की भोग, हे तुमच्या हाती आहे.

एकहार्ट म्हणतो की जीवनातल्या दुःखाचं फक्त एकच कारण आहे आणि ते म्हणजे ‘जे आहे ते नाकारणं’. एका अर्थानं हे अत्यंत खरं आहे कारण स्वीकारानं विरोध मावळतो आणि प्रसंग वस्तुनिष्ठ होतो, प्रसंगातला दंश संपूर्णपणे निघून जातो. पण मुळात प्रश्न असा आहे की प्राप्त परिस्थिती आपण का नाकारतो? आणि याचं कारण फार मजेशीर आहे, प्रसंग आपल्याला स्पर्श करतो!

कृष्णमूर्ती जेव्हा ‘चॉईसलेस अवेअरनेस’ (निर्विकल्प जाणणं) म्हणतात तेव्हा त्यांना असं म्हणायचं असतं की तुम्ही निवड केल्यानी तुमची एकसंध जाणीव विचारात रूपांतरित होते आणि एकदा विचार चालू झाले की मग व्यक्तिमत्त्व सक्रिय होऊन तुम्ही प्रसंगात सापडता. तरी ही आपण निवड करतोच! आणि जोपर्यंत आपण निवड का करतो हे समजत नाही तो पर्यंत श्रेष्ठातला श्रेष्ठ उपभोग देखील यथावकाश सहन करावा लागणारा भोग होतो. म्हणजे मनासारखं झालं तरी क्लेश आणि नाही झालं तर मग काही विचारायलाच नको.

आपण भोगाची किमया बघू, प्रत्येक माणूस प्रत्येक क्षणी आणि जगात कुठंही एकच गोष्ट शोधतोय आणि ती म्हणजे आनंद. तुम्ही नीट बघा, ही गोष्ट तुम्ही नाकारू शकत नाही, प्रत्येक वेळी आनंद हीच माणसाची अभिलाषा आणि दिशा असते. याचं कारण ही तितकंच गमतीशीर आहे, ते असं आहे की आनंद हा अस्तित्वाचा स्वभाव आहे आणि तो गुरुत्वाकर्षणा सारखा सदोदित आपल्याला ओढ लावत राहतो.

उपभोग हा केवळ पाच प्रकारेच होऊ शकतो कारण ज्ञानेंद्रियं पाचच आहेत. बघण्याचं सुख (पर्यटन), ऐकण्याचं सुख (संगीत, सिनेमा, नाटक), स्वादाचं सुख (विविध पदार्थ), गंधाचं सुख (परफ्यूम्स किंवा शरीरगंध) आणि स्पर्शाचं सुख (प्रणय).

अध्यात्मात असं म्हटलंय की इंद्रियगम्य सुखं क्षणिक आहेत आणि त्यामुळे व्यर्थ आहेत पण ते तितकंसं खरं नाही, म्हणजे इंद्रियगम्य सुख क्षणिक आहे हे खरं आहे पण ते व्यर्थ असेल तर अस्तित्वाच्या प्रकटीकरणालाच काही अर्थ उरणार नाही. सर्व भोग कालबद्ध आहे म्हणून तो क्षणिक आहे पण तेच त्याचं स्वरूप आहे आणि म्हणून तो व्यर्थ नाही. मजा अशी आहे की भोग क्षणिक आहे पण जो भोग तुम्हाला स्वतःप्रत आणतो तो तुम्हाला सुख देतो, एका अर्थानं भोगाची सार्थकता तुम्हाला स्वतःप्रत आणण्यात आहे.

प्रणयाचं सुख स्पर्शात भासतं पण खरं सुख आहे ते त्या प्रक्रियेतल्या रिलॅक्सेशनमध्ये, जाणीव स्वतःकडे परतून येते, विचार थांबल्यामुळे आणि शरीर विश्रांत झाल्यामुळे आपण स्वतःला पुन्हा भेटतो हे त्या सुखाचं खरं रहस्य आहे.

मानसिक सुखांच्या बाबतीत हे तुम्हाला प्रकर्षानं लक्षात येईल. चंद्रावर पाऊल ठेवण्याची अनेक माणसांची अनेक युगं इच्छा होती, जेव्हा माणूस चंद्रावर पोहोचला तेव्हा क्षणभरासाठी त्याची आणि ती इच्छा असणाऱ्या सर्वांची संवेदना त्या दुर्दम्य इच्छेपासून मुक्त होऊन परत स्वतःप्रत आली, तो तिथे सुखी झाला, बाकीचे इथे सुखी झाले! स्वतःचं स्वतःशी पुनर्मिलन, जे इच्छेमुळे दुष्पूर झालं होतं ते इच्छा राहिली नाही किंवा पूर्ण झाली तर जाणीव स्वतःकडे परत फिरल्यानं होतं हे सगळ्या सुखाचं गमक आहे!

आयुष्य हा भोग वाटण्याचं कारण प्रसंग नाही तर तुमचं स्वतःपासून दुरावणं आहे, तुम्ही जर स्वतःशी एकरूप असाल तर प्रसंग आणि तुम्ही समोरासमोर राहता, एकमेकात गुंतत नाही मग प्रत्येक प्रसंग उपभोग होतो, तुमची पूर्ण सृजनक्षमता त्या प्रसंगी कामी येते. मजा म्हणजे एकहार्ट म्हणतो तसे तुम्ही कोणत्याही प्रसंगाला नकार देत नाही किंवा कृष्णमूर्ती म्हणतात तशी निर्विकल्प जाणीव तुम्हाला अनायासे उपलब्ध होते.

स्वतःशी एकरूप असाल तर सर्व भोग तुम्हाला सारखे होतात, सम होतात, आयुष्य भोग न राहता उपभोग होतं या अर्थानं ज्ञानी सदैव सम-भोगाचं सुख उपभोगतो असं म्हटलंय.

याचा एक फार काव्यात्मक पैलू देखील आहे, सर्व प्रकटीकरण आणि भोग हे दोन पोलॅरिटीज मधल्या आकर्षणावर अवलंबून आहेत, म्हणजे भोजन हा उपभोग घेतला तर भूक ही स्त्रीधर्मी पोलॅरिटी  आहे आणि अन्न ही पुरुषधर्मी पोलॅरिटी आहे, भूक अन्नाला आकर्षित करते, ज्ञानी या भोगाचा फक्त साक्षी होतो, त्याच्या उपस्थितीमुळे भुकेला जेवढं सुख मिळतं तेवढंच अन्नाला मिळतं, उपभोगाचं सुख दोन्हीकडे समं राहतं आणि भूक, अन्न आणि ज्ञानी एकावेळी तृप्त होतात. अन्न भुकेत आणि भूक अन्नात मिसळून तृप्त होतात, शरीर हे अन्नाचंच रुपांतर असल्यामुळे शरीर तृप्त होतं आणि ज्ञानी या सम-भोगात  अभोगता राहून तृप्त होतो! त्यामुळे ज्ञानी सकळ करोनी अकर्ता आणि सकळ भोगोनी अभोक्ता राहतो, सर्व भोगात जसाच्या तसा राहतो कारण मुळात तो व्यक्ती नसून निराकार जाणीव असतो. ज्ञानेश्वरांनी या स्थितीचं किती समर्पक वर्णन केलं आहे ते पहा:

ज्ञानियांचा राजा भोगतो जाणीवं

अंगणात झाड, कैवल्याचे..

संजय