चिंता करी जो विश्वाची ... (१५)

श्री रामदास स्वामी, -- ज्ञानदानाचे व्रत मोठ्या निष्ठेने पूर्णत्वास नेत होते. समर्थांनी स्वतः  लहान वयातच सन्यासी धर्म स्वीकारला होता. घर, संसार, धन, संपत्ती, सगेसोयरे या सर्वांचा त्याग केलेला होता. लोकवस्तीपासून दूर --  डोंगर, दरी, जंगल आणि त्यातील गुहा,  हीच त्यांची आश्रयाची/वास्तव्याची ठिकाणे होती. वैराग्यवृत्ती, संन्यासीधर्म, आणि श्रीराम भक्ती ही त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये होती. त्याचप्रमाणे स्पष्टवक्तेपणा ही प्रकर्षाने दिसत, जाणवत असे. कडू औषधाची मात्रा, शर्करावगुंठीत करून देणे नव्हते. परंतु  इतरांचे अज्ञान, कमीपणा दाखवून देऊन, निव्वळ आत्मप्रौढी मिरविणेही नव्हते. त्यांच्या स्पष्टवक्तेपणाला ज्ञानाची, अनुभवाची, त्यागाची आणि अविरत करत असलेल्या कष्टाची अशी कणखर चौकट होती. इतरांचे अज्ञान दूर करून, त्यांना आयुष्य अधिक चांगल्या प्रकारे जगण्यास प्रवृत्त करणे हाच उदात्त हेतू होता. 
संसारचक्रात गुरफटलेल्या जनलोकांना ते सांगत, की जग हे नश्वर आहे. इथे असलेल्या सर्व सजीवांस एक दिवस मृत्युपंथी जावेच लागणार आहे. हे सत्य आहे तसे स्वीकारणे इष्टं. तसेच स्वतःच्या कर्तुत्वाचा वृथा अभिमान बाळगणे देखिल योग्य नाही. या विशाल विश्वावर कुणा एकाच्या असण्याने अगर  नसण्याने काही फरक पडत नाही. रामकृष्णादी प्रभृती या भूमीवर अवतरल्या, वावरल्या -- कर्तृत्व, कर्तव्ये पार पाडली आणि निघून गेल्या. तरीही विश्वव्यवहार खंडीत झाला नाही. म्हणूनच स्वतःचे क्षुद्रपण समजून घेणे अती आवश्यक आहे. त्याचे आकलन झाले की सर्व वृथा चिंतांचे आपसूकच निरसन होईल. प्रपंच करावा नेटका, परंतु अलिप्तं वृत्तीने कारण,
कोण समयो येईल कैसा । याचा न कळे किं भर्वसा ।
जैसे पक्षी दाही दिशा । उडोन जाती ॥
तैसे वैभव हे सकळ । कोण जाणे कैसी वेळ ।
पुत्रकळत्रादी सकळ । बिघडोन जाती ॥ 
अती मोह, कुटुंबीयाबद्दलची अती माया ही दुःखाची कारणे आहेत. ज्यांच्यात  सुऱ्हुद, सोयरे, सखे, सोबती म्हणून  मनुष्य गुंतलेला असतो, ते सदा सर्वकाळ सहचर्य निभावतात असे नाही. कारण प्रत्येकाला स्वतःचा स्वार्थ प्रिय असतो. परंतु हे सत्य जेव्हा अनपेक्षितपणे सामोरे येते, तेव्हा माणूस पश्चातापाच्या आगी मध्ये होरपळतो, व्यथित होतो. मनुष्य जन्मभर एकटाच असतो आणि एकटाच राहतो. त्याच्या भोवती वेढलेले आप्तस्वकीय हे केवळ कारणपरत्वेच आणि काही कालापुरतेच असतात.  असतात. सुखाच्या, वैभवाच्या काळात सर्व सोबत असतात. परंतु दैन्य, दुःखाची चाहूल लागताच काढता पाय घेतात. मग सारी दुःखे, संकटे मनुष्य एकटाच भोगतो. त्यात वाटेकरी होण्याची कुणाचीच तयारी नसते. ज्यांच्या सुखासाठी कष्टं केले, तेच संकटकाळी दुरावतात. अशा आप्तस्वकीयांच्या नातेसंबंधात गुंतून, दुःखाचा व्यर्थ भार का शिरी घ्यावा? म्हणून समर्थ सांगतात, की संसारात विरक्त, निरपेक्ष वृत्तीने राहिल्यास --   दारूण दुःखाचा, नैराश्याचा सामना करावा लागणार नाही.  
दुःख भोगिले आपुल्या जीवें । तेथे कैची होती सर्वे ।
तैसेचि पुढे एकले जावें । लागेल बापा ॥ 
कैंची माता कैंचा पिता । कैची बहीण कैंचा भ्राता । 
कैंची सुहृदे कैंची वनिता । पुत्रकळत्रादिक ॥
हे तू जाण मावेची (मायेची) । आवघी सोइरी सुखाची । 
हे तुझ्या सुखदुःखाची । सांगाती नव्हेती ॥ 
सर्व नातीगोती जशी अशाश्वत आणि बेभरवशाची आहेत, तद्वतच धन, संपत्तीही नाशिवंत आहे. आज जे आहे, ते उद्या असेलच याची कुणी ग्वाही देऊ शकत नाही. रावाचे रंक झालेले अनेकांनी पाहिलेले आहेत, तसेच कधी यश कीर्तीच्या शिखरावर विराजमान असलेले,  अपयशाच्या गर्तेत पडून उपेक्षित जिणे जगणारेही कमी नाहीत. म्हणून संपत्तीच्या, यशाच्या धुंदीत राहून शाश्वत सत्य दृष्टीआड करणे शहाणपणाचे नाही. कीर्तीच्या, वैभवाच्या काळात देखिल ज्याला अहंकाराचा स्पर्श होत नाही, इतराबरोबर वागताना जो विनम्रतेने, सहानुभूतीने वागतो त्याला ही नश्वरता त्रासदायक वाटत नाही. हे सारे विश्व, ईश्वरीय इच्छेनुसार चालते. सर्व स्थिरचरावर त्याचीच सत्ता आहे, हे ज्ञान आत्मसात केले, की सारे काही सुगम, सुसह्य, सुसंगत वाटू लागते. 
कर्मयोगे सकळ मिळालीं । येके स्थळी जन्मास आली ।
तें तुवा आपुलीं मानिलीं । कैसी रे पढतमूर्खा ॥ 
तुझें तुज नव्हे शरीर । तेथे इतरांचा कोण विचार ।
आता येक भगवंत साचार (मनःपूर्वक) । धरी भावार्थबळे ॥ 
साऱ्या सृष्टीचा रक्षणकर्ता, धारणकर्ता हा परमेश्वर आहे. त्याचा विसर पडला की  दुःखे, संकटे रिंगण धरतात. कुठल्याही दिशेने जावे, तरी त्यांपासून सुटका होत नाही. सर्वात्मक सर्वेश्वराची महती ज्यांस कळली, त्यांस मात्र  सर्वानंदाची प्राप्ती होते. म्हणूनच समर्थ उपदेश करतात... 
घनश्याम हा राम लावण्यरूपी । महाधीर गंभीर पूर्णप्रतापी
करी संकटी सेवकाचा कुडावा (रक्षण) । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ 
बळें आगळा राम कोदंडधारी । महाकाळ विक्राळ तोही थरारी । 
पुढें मानवा किंकरा कोण केवा । प्रभाते नीं राम चिंतीत जावा ॥ 

(क्रमशः)