कधीही न विसरू शकणारा अपघात !

हा प्रसंग माझ्यावरच बेतलेला आहे.


सप्टेंबर महिन्याची अखेर होती.


रात्रीचा साधारण पाऊणे आठचा सुमार!


स्थळ: पुण्यातला गर्दीचा समजला जाणारा रस्ता, जंगली महाराज रस्ता.


मी आणि माझे भावी पती (मागच्याच महिन्यात आमचा साखरपुडा पार पडला होता, डिसेंबर मध्ये लग्नाची तारीख होती) दुचाकी वाहनावरून शिवाजीनगर रेल्वेस्थानकाकडे चाललो होतो.  मी रोज नोकरीच्या निमित्ताने आकुर्डी - पुणे प्रवास लोकलने करत असे. त्या दिवशीही ते नेहमीप्रमाणे मला सोडायला येत होते. 


तसे ते गाडी कधीच जोरात चालवत नसत. माझी लोकल सुटायच्या नेहमी ५ मी. आधीच स्थानकावर सोडत.


त्या दिवशीही त्यांचा चालवण्याचा वेग तसा मध्यमच होता. पण आमच्या मागे एक पीएमटी बस होती आणि तिचा वाहनचालक सतत भोंगा वाजवून बाजू देण्यास सांगत होता.  मला नेहमीच बस, ट्रक अशा जड वाहनांची अतिशय भिती वाटत असे. म्हणून मी यांना म्हटले,


''काय कटकट लावली आहे या माणसाने, चला थोडे पुढे जाऊ''


असे म्हटल्यावर यांनी थोडा वेग वाढवला. काही अंतरच पुढे गेलो असू तर एक चष्मेवाला माणूस रस्ता ओलांडू की नको या संभ्रमात दिसला आणि त्याचा विचार अचानक पक्का झाला. आम्हाला काही कळायच्या आतच तो पळत आला आणि ह्यांनी ब्रेक लावेपर्यंत ............... !!!! आमची टक्कर झालेली होती..........!! आणि आमच्या मागे ती मघाचीच पीएमटी करकचून ब्रेक लावून थांबली..... क्षणभर माझ्या जीवाचा थरकाप झाला..... आपुले मरण पाहिले मी आपुल्याच डोळा!!! अशी अवस्था झाली...!


पुढच्या दिव्याच्या काचा फुटल्या !!! आम्ही तिघेही रस्त्यावर आडवे !!!


आता काचेचे तुकडे नाकाला लागल्यामुळे का ह्यांनी घातलेले हेल्मेट (शिरस्त्राण) लागल्यामुळे त्या माणसाच्या नाकातून रक्त येत होते. मला तर आधीच घाबरायला झालेले होते. हातपाय लटपटत होते. आम्हाला दोघांनाही काय झाले हे बघण्याआधी त्या माणसाकडे बघणे जास्त गरजेचे होते. तेवढ्यात त्याचे २-३ सहकारी रस्ता ओलांडून धावत आले... ते त्या माणसाला 'सर, सर' म्हणून बोलवत होते. तशी तरूण मुलेच होती ती...... सरांच्या नाकावरच निभावले आहे हे बघून त्यांनी आता मोर्चा आमच्याकडे वळवला.


''काय रे.... दिसत नाही का तुला माणूस रस्ता ओलांडतोय ते?...... गाडी अशी चालवतात का? मुलगी बरोबर आहे.........'' वगैरे वगैरे..... नेहमीची मुक्ताफळे उधळणे चालू झाले होते!!  पण त्यांना हे कोण समजविणार की रस्ता अशाप्रकारे मधूनच पळत ओलांडत नाहीत ते!! आम्ही समजवण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ ! पायी चालणारा आणि गाडी चालविणारा यांची धडक झाल्यास यात 'गाडीवाल्याचीच चूक नेहमी असते' हा सिद्धांत पुन्हा एकदा खरा ठरविला गेला.


मला वाटलं झालं आता पोलिसस्टेशनची वाट धरावी लागणार की काय? पुढचे सगळे चित्र एका सेकंदात डोळ्यासमोर उभे राहिले! खरंच मन किती वेगाने प्रवास करू शकतं..... पण मग ते तरूणच म्हणायला लागले ''चष्मा फुटला आहे, २००-२५०/- रू. तरी द्यावेच लागतील आणि मलमपट्टीचे वेगळे!''


पण यांच्या खिशात १५० च रु. होते ते निमूटपणे काढून दिले.  मला काही सुचलंच नाही की माझ्या पाकिटात बाकीचे काही पैसे असतील तर द्यावे.


हे म्हणाले ''एवढेच आहेत''


''कृपा करून आम्हाला जाऊद्या.....खरंच एवढेच पैसे आहेत'' मी जरा उरलासुरला धीर गोळा करून हे चार-पाच शब्द म्हटले.


त्यावर त्यांच्यातील एक म्हणाला ''ठीक आहे, पण पुढच्या वेळी जरा सांभाळून..... गाडी चालवा...!''


हे सगळं १० मिनिटात झालं होतं. आता जरा जीवात जीव आला होता मग हँडल तिरके झालेली गाडी बाजूला घेऊन यांनी मला विचारले ''तुला कुठे लागले?''


''जास्त काही नाही, किंचित डोकं दुखतंय'' मी.


(घरी दुसऱ्या दिवशी डोक्याला टेंगूळ येण्याचे कारण रात्री झोपेत भिंतीवर डोके आपटले असे सांगितले, घरच्यांना कितपत पटले माहित नाही. पण खरे सांगितले असते तर लग्न होईपर्यंत भेटणे बंद झाले असते!! असो.)


''तुम्हाला?'' मी विचारले.


''पायाला खरचटलंय थोडंसं होऊन जाईल ठीक''  


''तू जाशील ना घरी नीट का गाडीवरचं सोडायला येऊ तुला घरापर्यंत? (पुणे-आकुर्डी अंतर ३०-३२ कि.मी!!)


पुन्हा पोटात धस्स !! म्हटलं ''नको'' आपली लोकलचं बरी...


मी त्यांना आग्रह केला तुम्ही पण बसनेच जा घरी (कोथरूडला)


''वेडी आहेस का काय? एवढे मोठे काही झालेले नाही. मी ८ वर्ष झाले गाडी चालवतोय, छोट्यामोठ्या गोष्टी होत राहतात''


पण मी मात्र, ते घरी जाऊन त्यांचा सुखरूप पोहोचल्याचा फोन येईपर्यंत देवाचा धावा करत होते.


आता मला बस, ट्रक यांच्याबरोबर रस्ता ओलांडणाऱ्या माणसांची पण भिती वाटायला लागली आहे.................