संध्याकाळी रेवाला बराच वेळ तिष्ठत ठेवून तो आला....
भडकलेली रेवा काही बोलण्याच्या आतच त्याने अक्षरशः दोन्ही हात जोडून तिची माफी मागितली, "बाई गं, येथे रस्त्यात काही नको बोलूस, माझ्यावर तेव्हढी मेहरबानी कर !"
त्याचा तो अवतार पाहून हसावे की रडावे हे न कळलेल्या रेवाचा राग मात्र कुठल्या कुठे पळाला.
"मला हे सांगा, आपणांस ह्या सगळ्या गोष्टी माहीत कुठून झाल्या ?" खुर्चीत बसल्या बसल्याच तिने विचारले.
"स्त्रियांना धीर नाही धरवत का ?" मिश्किलपणे त्याने संभाषण तोडत तिला विचारले "मला एकाच व्यक्तीवर अवलंबून राहायचे नव्हते, तू जर 'मदत करीत नाही...ज्जा' असे सांगितले असतेस तर ?"
"अजून कोणाला पकडले आपण ?"
"काळजी करू नकोस, तो तुला ओळखतही नाही व वासंतीशी संबंधीतही नाही"....
हळूहळू रेवाने त्याला सगळी हकीकत सांगितली. मध्येच रेवाला एखादं दुसरा प्रश्न करीत तो ऐकत होता. तिचे बोलणे त्याने शांतपणे ऐकून घेतले होते....
शेवटी उठण्याच्या आधी रेवाचे टेबलवर आधारासाठी ठेवलेले दोन्ही हात त्याने अचानक हातात घेतले, "तू खरोखर आज मला जी मदत केली आहेस, मी जन्मभर विसरणार नाही."
एक सेकंदासाठी तो क्षण तसाच तेथेच थांबावा असे रेवाला वाटले.
"चल, तुला घरी सोडू ?"
"नको, मी जाईन बसने" रेवाला हो म्हणावेसे वाटत होते पण तिने स्वतःला सावरले.
बसस्टॉप वर बस येई पर्यंत दोघे गप्पा मारीत होते. बस आल्यावर तिला बसमध्ये चढवून तो निघाला तेंव्हा रेवा मागच्या काचेतून तो गेला त्याच दिशेकडे बघत होती......
कुठूनतरी घंटीचा तो मधुर किणकिणाट आपणांस का ऐकू येतो ते मात्र तिला कळत नव्हते.
"रेवा आज मनू आत्या आली होती तुझी !" आईने उत्साहित स्वरांत आल्या आल्या सांगितले.
"अच्छा ? काय म्हणते ?" स्टूलवर बसून सॅंडल्स काढता काढता रेवाने लक्ष असल्यासारखे भासवले !
"त्या स्थळाकडून होकार आलेला आहे" .... रेवा एक क्षण स्तब्ध झाली पण आईच्या उत्साहावर विरजण टाकायची तिची इच्छा नव्हती.
"अग, आई इतकी घाई कशाला करतेस उगीचच, मी अजून नीटपणे विचारही केलेला नाही लग्नाबद्दल"
"अग मुली, आपण साधी माणसं, तुझ्या आत्याने तुझ्यासाठी विचार करूनच स्थळ आणले असेल ना !"
"अगं, पण पिंटू व तुझे कोण बघणार मी गेल्यावर ?" - रेवाने स्वतः:चे घोडे दामटवायचा प्रयत्न सोडला नव्हता.
"तुला काय जन्मभर बांधून ठेवू मी ह्या बंधनात; रेवा?" आई आता हळवी होणार हे पाहून रेवाने माघार घेतली.
"बरं ! मी उद्या आत्याला फोन करून बोलेन तिच्याशी !" इतके बोलून तिने स्वतः:ची सुटका करून घेतली.
रात्री बराच वेळ ती बिछान्यात नुसती पडून होती.... मध्येच आपल्या हातांकडे तिचे लक्ष वळले की, ती गोरीमोरी व्हायची.....मध्येच तिला कुठून तरी घंटी किणकिणल्याचा भास व्हायचा. रात्री झोप केंव्हा आली ते तिला कळलेच नाही.
दोन दिवस तिचे ऑफिसमध्ये कामांत लक्ष लागलेले नव्हते. घरीही आई एक विचारायची तर ती उत्तर दुसरेच द्यायची. 'आत्याला फोन केलास का' ची भुणभूण आईने मागे लावली होती. बस स्टॉपवर रेंगाळून शेवटी दोन तीन बस गेल्यानंतर कंटाळून पुढची बस पकडायची..... हळूहळू तिच्या लक्षांत आले की, आपण फिरोज़ची आतुरतेने वाट पाहत आहोत.
अचानक एक दिवस 'रेवती, तुमचा फोन.....' मोकाशींनी सांगितले.
आईचा तर नसेल ना ह्याची काळजी करीत ती फोनकडे वळली... "हॅलो....." पलीकडे स्तब्धता...."हॅलो...." ह्यावेळी जरा तिचा स्वर वाढला....
"अग रेवा, मी वासंती बोलतेय "
"अय्या...वसू ? कुठून बोलतेस तू ?"
"फोन मधून गं !"
"ए मस्करी सोड, कुठे आहेस ते बोल आणी आज अचानक फोन केलास !"
"अगं, संध्याकाळी काय करते आहेस ? भेटायचे का ? ऑफिसच्या खालीच भेटू, मला खूप गप्पा मारायच्या आहेत तुझ्याशी"
"चालेल,पण वेळेवर ये बाई.... मला घरी जायची घाई असते !"
"अगं राजशी ओळख करून द्यायची आहे तुझी"
"काय ? म्हणजे तू अजून....." पुढचे बोलणे तिला थांबवावेच लागले कारण आसपासच्या बहुतेक सर्वांचीच उत्सुकता वाढलेली होती....
जेमतेम बोलणं संपवून तिने फोन ठेवला तेंव्हा मोकाशींसह सगळे जण उत्सुकतेने आपल्याकडे बघत असल्याचे तिला जाणवले....
रेवा खाली उतरली तेंव्हा वासंती वाट बघत उभीच होती. 'स्वागत' च्याच वरच्या माळ्यावर वासंती तिला घेऊन गेली
"अगं राजला सांगितलेय यायला.... कधी वेळेवर आला तर शप्पथ ! तोवर आपण काहीतरी खाता खाता गप्पा मारू "
"अगं तुझ्या बाबांना माहीत पडले तर ?" रेवाचा स्वर काळजीचा होता.
"नाही गं, त्यांनी शेवटी परवानगी दिली आमच्या लग्नाला.... राज घरी आला होता, त्याने स्पष्ट सांगितले की, 'तुम्ही वासंतीला कुठे डांबून ठेवले आहे ते मला माहीत आहे; पळून जाऊन लग्न करायची आमची तयारी आहे पण जर तुम्ही आशीर्वाद दिलात तर सगळेच सुखी होतील !' "
"बापरे... बराच धीट दिसतोय तुझा राज !"
"मग काय, मी उगीच भाळली का त्याच्यावर ? तो ना एकदमच डॅशींग आहे"
नंतर खाताखाता वासंतीची टकळी सुरूच होती.... राजचे कौतुक अगदी भरभरून चालले होते.
अचानक रेवाला फिरोज़ची आठवण झाली.
"अग वसू, तुझ्या राजचा मित्र मला येऊन भेटला... तुझ्या गांवचा पत्ता मीच त्याला दिला होता....."
"राजचा मित्र ? कोण ? मला नाही बाई ठाऊक राजचा कोणी मित्र....." हे बोलत असतानाच फिरोज़ स्वागतचा माळा चढून वर येताना रेवतीला दिसला.
ती काही बोलणार इतक्यांत वासंती आनंदाने चित्कारली...."किती रे वेळ लावलास यायला....आज तरी लवकर यायचे नाही का ?
ओह रेवा; मीट माय लव्ह...राज !....
राज, धिस इज रेवा, माय बेस्ट फ़्रेंड "
राज....फिरोज़.....फिरोज़....राज ......रेवाला 'स्वागत' गोल फिरल्याचे भास होत होते.
"वासंती मला राज म्हणते; माझे नांव तेच आहे - फिरोज़ खंबाटा !"
कुठूनतरी घंटीच्या किणकिणत्या स्वरांऐवजी एक कळ उठली..... तेंव्हा रेवाला कळले तो घंटीचा स्वर आपल्या हृदयांतून येत होता.....
-समाप्त-