खुळी स्मरतात स्वप्ने तुजसवे चालायची
परांची ओढ वेडी अंबरा पेलायची
तुझे नसणे असूनी आणि नसता भासणे
कशी समजूत रे माझीच मी घालायची?
कशासाठी करावी अक्षरांची आर्जवे?
इथे अश्रूंसही चोरी असे बोलायची
फुलांची आठवूनी साद गंधित लाघवी
हसूनी कंटकांची दूषणे झेलायची
कशाचे प्रेम? कसले जन्मजन्मींचे दुवे?
जगाची रीत आहे हरघडी बदलायची...