"आम्ही काय गुलाम आहोत?"

सहज दीक्षाभूमीसमोर फिरत होतो. एका स्टॉलवर जिजाई प्रकाशनाची बरीच पुस्तके दिसली. श्रीमंत कोकाट्यांचं 'खरा शिक्षकदिन-२८ नोव्हेंबर'; पुरुषोत्तम खेडेकरांचं 'आरक्षण वाढवा,देश वाचवा'; चंद्रशेखर शिखरे सरांचं 'प्रतिइतिहास' आणखी खूप काही! आपल्या घरची माणसं भेटल्यासारखं वाटलं. आणि जी माणसं स्टॉल चालवत होती त्याच्याशी दोन गोष्टी कराव्याश्या वाटल्या. अशी पुस्तकं विकणारी माणसं सहसा धंदेवाईक प्रकाशक नसतात.तर आपला विचार समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहचावा एवढ्याचसाठी न नफा न तोटा या तत्त्वावर काम करणारी जागरूक माणसं असतात हा माझा वैयक्तीक अनुभव!


दोघही प्राथमिक शिक्षक,दसऱ्याच्या दोन दिवसांच्या सुटीचा फायदा घेत विचार पसरवायला निघाली होती.थोड्याश्या ओळखीनंतर घरगुती गोष्टी सुरू झाल्या. सरांनी त्यांच्या तिसरीतल्या मुलाची एक गोष्ट सांगितली-


शेजाऱ्यांच्या घरी सत्यनारायणची पूजा. मुलांना प्रसाद घ्यायला बोलवण्यासाठी त्यांच्याकडून कुणी बाई आली. अन् मुलाला म्हटलं-
"चल रे प्रसाद घ्यायला!"
"नाही येणार."
"का?"
"आम्ही काय गुलाम आहोत?"


ते उत्तर ऐकून मीच एवढा थक्क झालो तर त्या बाईचं काय झालं असेल विचारच करायला नको.


फक्त ८-९ वर्षांची मुलं, पण त्यांनाही कळतं- सत्यनारायण, गणपती, घटस्थापना ही गुलामगिरी आहे. हे ज्यांना अजुनही कळत नाही त्यांनी काहीतरी या मुलांपासून शिकायला हवं.


मला बाबासाहेबांच्या २२ प्रतिज्ञा आठवत होत्या-


१) मी ब्रह्म, विष्णू, महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची पूजा करणार नाही.
२)मी राम कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची पूजा करणार नाही.
३)मी गौरी गणपती किंवा हिंदू धर्मातील कुठल्याही देवतेला देव मानणार नाही किंवा त्यांची पूजा करणार नाही.
४)देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही.
६)बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे हा प्रचार खोटा आणि खोडसाळ आहे अहे मी मानतो.


मी एकेक प्रतिज्ञा आठवत होतो. मी मनातल्या मनात स्वतःला गौरवान्वित feel करत होतो.
"आम्ही काय गुलाम आहोत?"


             अशी पिढी घडली तर माझं बहुजन भारतात राहण्याचं स्वप्न माझ्या उतार वयापर्यंत तरी निश्चीतच पुर्ण होईल.