आहे बरेच काही सांगायला मला- आस्वाद

चित्त ह्यांची मूळ गझल


http://www.manogat.com/node/8521 येथे आहे. प्रत्येक शेरात एक सहजता व माधुर्य दडले आहे.


ही गझल आम्हाला खूप आवडली. वाचताच काही शेर माहितीवजा वाटले पण नंतर लगेच ध्यानात आले की प्रत्येक शेरात एकाहून जास्त अर्थ आहेत. आम्हाला समजलेली गझल ही अशी:


आहे बरेच काही सांगायला मला
काळीज ठेव तूही ऐकायला मला!


ह्या शेरात एकाहून अनेक अर्थपदर दडले आहेत. फारच छान.

1. ह्या शेरात कवीला त्याच्या प्रेयसीला खूप काही सांगायचे आहे. कानाने ऐकायचे असते, पण कवी तिला ' काळीज ठेव' असे म्हणतो. कवी जे सांगणार आहे ते हळवे बोल, प्रीतीचे बोल ऐकायला हृदयाची गरज आहे असे सुचवायचे आहे. प्रेयसी पाषाणहृदयी असावी....


२. कवी जे सांगणार आहे ते ऐकायला हिम्मत हवी, त्यामुळे मन घट्ट कर असेही सुचवायचे आहे.


३.  कवीला मनातले जे सांगायचे आहे ते प्रेयसीला सांगेपर्यंत उशीर तर होणार नाही ना?प्रिये धीर धर, आणि काही जिवाचे बरे वाईट करु नकोस. जिवंत राहा तर हृद य शिल्लक राहील.


ठेवून ओळ गेली माझ्या वहीत ती
(झाला उशीर थोडा वाचायला मला)
वा! ह्यात दडलेली खंत तर फार बोचरी आहे.

१. प्रेयसीने मनातले त्याला सांगितले पण ते कळायला वेळ लागला, खंत व्यक्त झाली आहे.


'वहीत ठेऊन गेली' ह्यात प्रेयसी अबोल असावी पण तरीही तिने इशारा केला. पण कवीला तिने जे सांगितले ते समजण्यास उशीर झाला असेही सुचवायचे आहे.


२. ह्यात कवी स्वतःतच अथवा इतर व्यापात एवढा मग्न होता की त्याने आपल्या माणसाकडेही दूर्लक्ष केले त्यामुळे माणसे दुरावली हे सुद्धा अभिप्रेत असावे.


३.  प्रेयसीने दिलेले छुपे इशारे, प्रेमाची कबुली कवीला कळायला उशीर लागला हाही अर्थ घेता येईल.


४. प्रेयसी शिवाय एखाद्या व्यक्तीलाही ह्या शेरातील काही लागू होऊ शकते.


का रात्र मी अमेची जागून काढली?
येणार चंद्र नव्हता भेटायला मला


१.अमावस्या आहे चंद्र दिसणार नाही याची कल्पना आहे तरी कवी का मी जागलो असे विचारतो आहे.


२. प्रेयसीने पाठ फिरवली आहे तरी ती भेटावी अशी आस मनात आहे , त्यामुळे कवी वाट पाहातो आहे त्याचे वाट पहाणे किती व्यर्थ् आहे हे ह्या ओळीतून दिसते.


३. कित्येकदा जे साध्य होणार नाही याची खात्री असूनही माणसे आशेमुळे प्रयत्न करत राहतात. ते प्रयत्न किती व्यर्थ आहेत अशा ध्येयवेड्या माणसांना उद्देशूनही हा शेर होऊ शकतो.


४. आपले प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर आलेली विषण्णता ह्या शेरातून व्यक्त झाली आहे.


भेटायला हवे ते, का भेटले कधी?
आले नको नको ते बिलगायला मला!


१. ज्यांनी भेटायला यावे ते न भेटता जी माणसे नको होती तीच गळ्यात पडली.


२. परमेश्वराची आस होती पण मार्गात खूप अडथळे होते, परमेश्वर न भेटता कामक्रोधादि शत्रूंनी मला घेरले.


३. मला माझे ध्येय दिसलेच नाही उलट मी माझ्या ध्येयापासून दूर गेलो नि पसंत नसणारे काम नित्य करावे लागले.


असतो कधी इथे मी, असतो कधी तिथे
जावे कुण्या दिशेने शोधायला मला?


१. ह्या शेरात कवी स्वतःला शोधायचा प्रयत्न करतो आहे.


२. त्याला नेमके काय हवे आहे याचा शोधही तो घेतो आहे.


हलकेच हात मीही हातात घेतला
होतेच शब्द कोठे बोलायला मला?
सुंदर.


१. कित्येकदा शब्दांची कसर एक स्पर्श भरून काढतो.


२. शब्दाविना जे सांगायचे ते समजले.


३. कवी कुणाचे सांत्वन करतो आहे असेसुद्धा सुचवायचे असावे.


चित्त आपल्याला याशिवाय काही वेगळे म्हणायचे असेल तर जरूर सांगा. वाचकांना विनंती की त्यांनी सुद्धा आपले मत द्या. आम्हाला अधिक चांगला अर्थ समजेल.
चू. भू. द्या. घ्या.