जी. ए. कुलकर्णी यांची 'माणूस नावाचा बेटा' ही कथा 'मनोगत' वर उतरवून काढताना मला खूप आनंद मिळाला. या निमित्ताने हीच कथा मला का लिहावीशी वाटली या प्रश्नाचे उत्तर मिळवण्याचा हा प्रयत्न:
जी.एं. चे लेखन इतके बहुस्पर्शी आणि विपुल आहे की ते सगळे वाचून पचवणे हेही तसे अवघडच. त्यात सरस निरस करणे तर जवळजवळ अशक्यप्रायच. तद्दन टाकाऊ किंवा हिणकस असे जी ए लिखाण जवळजवळ नाहीच. मग 'विदूषक', 'दूत', 'कसाब', 'अंजन' अशा कितीतरी एकाहून एक कथा असताना 'माणूस...' मला अधिक आवडली याचे पहिले कारण म्हणजे मला ती बरीचशी आत्मचरित्रात्मक वाटते. एखाद्या लेखकाच्या लिखाणावर प्रेम करणारा वाचक नकळत एक व्यक्ती म्हणून त्या लेखकातही गुंतत जातोच. जी.एं. चे व्यक्तिमत्व तर गूढ व त्यामुळे उत्सुकता अधिक चाळवणारे. स्वतःच्या आयुष्याला असे कडीकुलुपात बंदिस्त ठेवणाऱ्या जी.एं. नी एका बेसावध क्षणी एका झुळुकीसरशी आपल्या आयुष्यावरचा जाड पडदा किंचित बाजूला होऊ दिला आणि वाचकाला आपल्या खाजगी आयुष्यात थोडेसे डोकावू दिले. या कथेतील दत्तूसाठी जी.एं. ना दुसरीकडे कुठे पहावे लागले नसावेच.
'माणूस...' ही मला जी.एं.च्या भाषाशैलीचे एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून मुद्दम सांगावीशी वाटते. पातळ कणकीप्रमाणे हसणारे हेडमास्तर, लोखंडी दुकानासारखी दिसणारी शाळा,विश्वप्रेमाचा तागा काखोटीस मारून देशादेशात लंगोट्या वाटीत हिंडणे, ओल्या मडक्यासारख्या चेहऱ्याचे मदलूर,वडारणीच्या आडदांड आलिंगनाप्रमाणे रासवट उग्र दर्पाची चार मिनार सिगारेट, कणकेच्या गोळ्यातील अळीप्रमाणे जगून कलाप्रेम पसरवणारा वसंतकुमारीचा आत्मा, सद्गुणाची एक जाडजूड व्हेरिकोज नर्व्ह झालेले सगळे महान लोक.... जी.एं.च्या सगळ्या उपमा -उत्प्रेक्षांची उदाहरणे द्यायची झाली तर सगळी कथाच परत उतरवून काढावी लागेल!
स्त्रियांविषयी जी.ए. क्वचित विकृत वाटावेत असा पूर्वगृह बाळगून होते. 'स्त्री-पुरुष संबंधामधील माधुर्य मला कुणी समजावून सांगावे इतका मी दुधखुळा नाही' असे त्यांनी म.द. हातकणंगलेकरांना म्हटले होते, पण एकंदरीत स्त्री जातीकडे पहाण्याची जी.एं. ची दृष्टी निकोप नव्हती. 'माणूस...' मधील स्त्री-पुरुष संबंधातही चोरटेपणा, अपराधीपणा आहे. हेही जी.एं. च्या वैयक्तिक मताचे चित्र त्यांच्या कथेत उमटले आहे. त्यांच्या कथांमधील आई, बहीण, मावशी अशी पात्रे जी. ए. थोर, उदात्त रंगवतात, पण बायको, प्रेयसी यांच्याविषयी लिहिताना त्यांची लेखणी कमालीची विषारी होते. मांसाच्या हप्त्याहप्त्यानी खाली उतरणारी, खुळयासारखी टाळी वाजवणारी, उथळ व बटबटीत वसंतकुमारी साठे, दत्तूला आपल्या मादक जाळ्यात अडकवणाऱ्या इंदिरा व वासंती पोतदार, पुरुषाचा उपभोग घेऊन झाल्यावर जिभल्या चाटणाऱ्या मांजराप्रमाणे दिसणारे वासंती पोतदारच्या चेहऱ्यावरचे विजयी हास्य, अशक्त, फिकट हातावर भरपूर केस असणारी मांजरपाटी चेहऱ्याची, इयररिंग्ज सतत हालवणारी घाणेरड्या अक्षराची शांता दीक्षीत.... बापरे! - कधी कधी या कडवटपणाचा अतिरेक होतो की काय असे वाटते. वासंती पोतदारची रेशमी ब्रा असे उल्लेख अनावश्यक वाटतात. मिरचीभजी विकणाऱ्या बाईच्या टंचपणाचे उल्लेखही तसेच. पण 'तिचा गळा फार सुरेख आहे, गोल लिलीसारखा आहे, हाताचा स्पर्श होताच क्रूरपणे कुस्करावा असे वाटण्याइतपत आकर्षक आहे. त्याखाली तीळ आहे, थोडा जांभळसरच.' ही खास पुरुषी भावना. Why men destroy things they love? माणसातली ही विकृत वाटणारी आसक्ती जी.एं. नी नेमकी टिपली आहे.
दिखाऊपणा, नाटकीपणा, खुळचट आदर्शवाद याविषयी जी.एं. च्या मनात कमालीचा तिरस्कार होता. तोंडदेखले नवी पिढी, राष्ट्राचे भवितव्य, शिक्षणं परमो धर्म: असे म्हणून खाजगी शिकवणीला येण्यासाठी दमदाटी करणारे हेडमास्तर, सासरा गव्हर्निंग बॉडीवर आहे म्हणून गुरगुरणारा, खुळ्या कोंबडीचा चेहरा असलेला सुपरवायझर इंगळे, जगातल्या साऱ्या सद्गुणांच्या पाकळ्या उधळल्या जाणारा, पंधरा लाखाची मालमत्ता जमवलेला कुणी दीडदमडीचा पुढारी, पहिल्याच धुण्यात मांजराच्या कातड्यासारखे होणारे कापड गळ्यात मारणारा धूर्त व्यापारी, भर दुपारी पिंपळ सळसळतो, हृदयातील कळ लाल जागवते, आभाळाच्या निळ्या स्मशानी भूत पहाते मी भविष्याचे, महात्मा गांधींचा मृत्यूदिन, ये सुभाष राजसा अशा बटबटीत कविता लिहून कलासक्ती टिकवण्याचे एअरकन्डीशन्ड प्रयत्न करणारी वसंतकुमारी साठे, कानकाप्या व्हॅन गॉफ, जुगारी डोस्टोव्हस्की आणि लिंगपिसाट मोपासाँ यांच्याविषयी गरळ ओकून कुठल्या खांसाहेबांच्या निर्व्यसनीपणाचे गोडवे गाणारे ढोंगी लोक, म्युनिसिपालिटीचे साफसफाई पथक डी ड़ी. टी. मारत जाते त्याप्रमाणे ठिकठिकाणी पचक पचक विशिष्ट शिक्क्याचे मांगल्य टाकत जाणारे केतकरशास्त्री ... हे सगळे आपल्या आसपासच दिसणारे लोक! प्रत्यक्ष आयुष्यात जी.ए. या असल्या केरकचऱ्यापासून हातभर दूरच राहिले. अर्थात त्याने काय फरक पडतो म्हणा! The meek shall inherit the earth....
दिव्यावर झेप घेऊन पतंगाप्रमाणे जळून जाणाऱ्या झगझगीत आयुष्यांबद्दल जी.ए. मनात कुतुहल आणि आदर बाळगून होते. गणपतनाना हे असेच एक उदाहरण. पण गणपतनानांच्या रंगढंगालाही एक खानदानी अदब असते. उघडपणे बाहेरख्यालीपणा करणारे गणपतनाना पत्नीला एक शब्द उर्मटपणे बोलताच त्या कोकिलकंठी कुलवतीला भर अंगणात वेताने फोडून काढतात तेंव्हा ते एक ऐयाश व्यसनी न वाटता कुलीन रसिक वाटतात. त्यांच्या या शौकामागे स्वकष्टाची कमाई आहे, पण ती लयाला गेल्यावरही एका खोलीत या राजाची मैफिल सुरुच आहे!
आयुष्यातले कुरुप, बीभत्स जे जे त्याकडे डोळेझाक न करता त्याला आयुष्याचा भाग मानून स्वीकारण्याची जी. एं. ची वृत्ती 'माणूस...' मध्येही दिसून येते. लाल मांस दाखवणारे आवाळू घेऊन गाडी ओढत जाणारा बैल, गुलमोहोराच्या झाडाखाली आंधळी बोटे चाचपडत बसलेला भिकारी, मरणाच्या दारात उभा असलेला हाडेकातडी झालेला नाईकचा कुत्रा किंग,ब्रेडचे कचाकचा लचके तोडून उसळीत बुचक बुडवून दाढी वाढलेला माणूस , ठिकठिकाणी मचामचा हलत असलेली निरनिराळ्या आकाराची तोंडे, किडक्या, वेड्यावाकड्या, पिवळसर दाताची मचमचगिरणी, कंबर खाजवीत, तोंडात चिवडा भरीत असलेला कोपऱ्यातील माणूस, महारोगाने शरीर कुजत चालले असतानाही न मेलेली महारोग्याची वासना.... पु. लं. म्हणायचे की जगात हे सगळे आहेच, मग ते मुद्दाम अधोरेखित कशाला करायचे? जी.एं. ना जगातले सुंदर काही दिसलेच नसेल असे नाही. मग जे असुंदर त्याविषयी लिहिताना जी.ए. जास्तच रमल्यासारखे वाटतात. असे का असावे?
नियतीशरणता हेही जी.एं. च्या लिखाणाचे वैशिष्ट्य मानावे लागेल. रंगीबेरंगी छबीन्यासारखी सुलभा कुणाचेतरी पोर पोटात घेऊन आत्महत्या करते, निशिगंधाची फुले हातावर ठेवणाऱ्या रेखाला नकार देण्याची तडजोड दत्तूला करावी लागते, टी सेटमधील किटली फुटली म्हणून दत्तूसमोर लाथ मारणाऱ्या आणि मूल होत नाही म्हणून टाकून देणाऱ्या नवऱ्याबरोबर दत्तूच्या बहिणीला संसार करावा लागतो आणि अशा नराधमाला शेवटी हात जोडून मरून जावे लागते, सात्त्विकतेचा पुतळा असलेल्या दादांचा सख्खा भाऊ त्यांना लुबाडतो, त्यांच्या शर्टाची चांदीची बटणे त्यांच्या मृत्यूनंतर कुणीतरी लांबवतो, अपेक्षा एका पानाची असते आणि पान निघते भलतेच.बाभळीचे रोपटे जरी लावले असते तरी ते जळून जाईल अशा फुटक्या हाताचा मोरे. त्याने चालवायला घेतलेले हॉटेल बंद पडते, बायको बाळंतपणात खलास होते, मालाने भरलेली वेंगुर्ल्याला निघालेली ट्रक सातव्या मैलाजवळ उलटते, आणि आता त्याचा थोरला दहा वर्षाचा मुलगा टायफॉईडने मरण पावतो.... तरी तो खोट्या आशेने क्लबात येतो आहे, पिंजारलेल्या केसाने, वखवखलेल्या मनाने जुगार खेळतो आहे, जसा जिंकणाऱ्याचा कैफ, तसा हरणाऱ्याचाही! जी.एं. चे हे निरीक्षण अतीव सूक्ष्म, अती तलम आहे, त्यांच्या प्रतिभेसमोर नतमस्तक करायला लावणारे आहे. देव या संकल्पनेवरही 'माणूस...' मध्ये जी.एं. नी केलेले भाष्य विचार करायला लावणारे आहे.
जी. एं. चा विनोद हाही तसा सरळ नाही. त्यातही त्यांचा खास तिरकसपणा आहेच. पुढाऱ्याच्या दुखवट्याला स्तब्ध उभे असलेले हेडमास्तर पहाताना असाच थोडा वेळ गेला तर खुद्द त्यांचीच दुखवट्याची सभा घ्यावी लागणार अशी भीती वाटणे, सी. राजगोपालाचारी व टकल्या मानेचे गिधाड यांच्या संयोगातून निर्माण झाल्याप्रमाणे दिसणारा कट्टी मास्तर, आत येणाऱ्या मंडळींमध्ये इतका गंभीरपणा की एखाद्याला वाटावे की ते खांद्यावरील प्रेत बाहेर ठेऊन आत काही तरी न्यायला आले आहेत, चरित्रनायकाचे वर्णन करताना ' शेजारच्या कावेरीच्या बाहुलीचे लग्न असता त्याने नि:स्वार्थीपणे आपली सोवळ्याची लंगोटी लुगडे म्हणून देऊन टाकली. नंतर वडीलांसमोर उभे राहून अत्यंत धैर्याने त्यांनी ती गोष्ट मान्य केली. वडीलांना या गोष्टीचे इतके कौतुक वाटले की त्यांनी दुसरी लंगोटीदेखील खिडकीतून बाहेर फेकून दिली. पान अट्ठेचाळीसवरील मुंजीत काढलेल्या फोटोत ती लंगोटी स्पष्ट दिसत आहे' हा कडवट तिरकस विनोद, केतकरशास्त्रींची ओकारी आणणारी भाबडी तत्त्वनिष्ठा आणि त्यांच्या समोर बसलेली, पुस्तकात फक्त सेन्सॉरशमनार्थच वस्त्रार्थे किंचित चड्डी घातलेल्या अमेरिकन नटींचे पौष्टिक फोटो ठेवणारी पोरे हा कडेलोट विरोधाभास... हे सगळे खास जी.ए. शैलीचे विनोद!
'माणूस...' मध्ये जी.एं. च्या जबरदस्त वाचनाची व व्यासंगाची उदाहरणे जागोजागी दिसतात.
सगळे पत्तेच, सगळी माणसेच! इसेक्स जहाज बुडाल्यावर बाराशे मैलाच्या प्रवासात कॅप्टन एकेकाला मारून त्यांचे रक्त पिऊन स्वतः जगतो, तर टिटॅनिक बुडताना एक म्हातारा खलाशी आपल्या कुत्र्यासाठी माघारी येतो, व कुत्र्याबरोबर बुडून मरतो. किरकोळ भांडणात मुलगा जन्मदात्या आईच्या जिव्हारी लाथ मारतो, बहीण भावाचा विश्वासघात करते, तर सिडनी कार्टन कुणाच्यासाठी मरतो. डेस्डेमोनाचा दीप अंथरुणात विझतो, आणि वासंती नायलॉनचे पातळ लयीत हलवत हसत निघून जाते. एखादी वेडी पतीच्या मृत्यूने छातीत सुरी खुपसून घेते, तर दुसरे चेंगरलेल्या स्तनांमध्ये लॉकेट रुतवून घेते. एक जण तारुण्यातील एका आठवणीवर आयुष्याला धार लावत बसतो, तर दुसरा चौदाव्या दिवशी बोहल्यावर चढतो. मालकंसाचा भव्य विस्तार, मोटारीखालची किंकाळी, बाळंत होत असतानाचा आक्रोश, विमानहल्ल्याचा मन फाडणारा आवाज, चुंबनाचे चुटुकसंगीत, प्रेत बाहेर नेत असतानाची कालवाकालव. सारी माणसेच, सारे माणसांचे आवाज! रशिया - जर्मनीमध्ये कँपमध्ये ब्रेडच्या तुकड्यासाठी एक तरुणी पंधरा जणांना जाहीरपणे शरीराचे दान करते. दान घेणारी व देणारी माणसेच. दाराच्या फटीत बोटे घालून चिरडणारी, नखाखाली टाचण्या खुपसणारी! बेलसेनमध्ये कैद्यांना जिवंत जाळणारी माणसेच. हिरोशिमामध्ये अपंग झालेली हजारो माणसे - व तो प्रसंग त्यांच्यावर आणणारी! आपले मांस कपोताना देणारा शिबी, आणि नररुंडांचा गोपूर रचणारा तैमूर! क्रूसावर हातापायाला खिळे ठोकल्यावर वेदनेने Eloi,Eloi, असे उद्गार काढणारा ख्रिस्त, आणि त्याच क्रूसाखाली त्याचे कपडे कुणाला मिळावे यासाठी कवड्या खुळखुळवणारे पहारेकरी - दोघेही माणसेच! या साऱ्याच बिंदूंना छेदून जाणारे ते विशाल वर्तुळ तरी कोणते? सगळा माणूस तरी जाऊ दे, पण त्याच्या नुसत्या पावलांविषयी हीच गत आहे. त्याचा पूर्वज दिनोसॉर याचे चोपन्न इंच लांबीचे अजस्त्र पाऊल, बुटक्या ओबडधोबड पावलांचा टूलो लॉट्रेक, सारे शरीर अमर करून घोट्यातच रात्रंदिवस मृत्यू बाळगून ठेवणारा ऍकिलिस, आणि गिझेलची नृत्यरम्य कहाणी सांगणारी युलानोव्हाची कबूतरासारखी पावले!
हा एक उतारा म्हणजे तर 'जी.ए. आम्हाला कळत नाहीत' असे म्हणणाऱ्यांच्या हातात देण्यासाठी तयार केलेले शस्त्रच वाटते. पण जी.एं. च्या व्यासंगाविषयी दुमत असू नये!
काळ्या वारेमुंग्यांची ही न संपणारी रांग, काळे पांढरे ठिपके, न सुटलेले आयुष्याचे कोडे आणि आसापास असलेली खुजी, बुटकी वेडीविद्री माणसे, जन्म मृत्यूचे पीळ पडलेली, वासना, विकार, विकृतींनी किडलेली आयुष्ये आणि एक तारीख -पगाराचा दिवस आणि शिकवण्या! विविध प्रसंगांचे, व्यक्तींचे धागे पसरवून नंतर त्याचे एक पेळूदार सूत काढावे तशी kraftmanship मला 'माणूस...'मध्ये दिसली.
अर्थात याचा अर्थ 'माणूस..' संपूर्णपणे निर्दोष आहे असे नाही. 'माणूस नावाचा बेटा' हे शीर्षक ऐनवेळी दुसरे काही सुचले नाही म्हणून लिहिल्यासारखे वाटते. काही उल्लेख अनावश्यक वाटतात. शेवटचे वाक्य तर anticlimax च वाटते.
एवढे सगळे असूनही मला 'माणूस नावाचा बेटा' फार आवडते