शनिवार दिनांक ३१ मार्च, रात्री आठला मिहिर, कूल, फदि, केशव, धुमकेतू, भक्ती, आरती, अनिता असे नऊ जण जमलो आणि दोन गाड्या घेऊन निघालो. कनकेश्वरास जाण्यासाठी पेण थळ मार्गावरच्या मापगाव या पायथ्याच्या गावी जायचे होते. पुणे- लोणावळा - खोपोली - पनवेल असा एक्स्प्रेसवेने प्रवास करून पुढे मुंबई ग़ोवा महामार्गाने पेणला पोहोचलो. खोपोली पेण रस्ताही नुकताच खूप छान केला आहे, त्याने गेल्यास बरेच अंतर वाचते.
पेणपुढे वडखळ फाट्याला एक रस्ता अलिबागकडे जातो, त्याने पोयनाड ओलांडून कार्लेबिबी खिंडीत चढले की एक रस्ता उजवीकडे थळच्या दिशेने जातो. तिथून पुढे गेल्यावर काही वेळातच उजवीकडे कनकेश्वरास जाणारा फाटा लागतो. रस्त्यावर नीट पाहिले तर कनकेश्वराकडे (३ किमी) अशी पाटीही दिसते. त्या फाट्याने मापगावला पोहोचलो. ग्रामपंचायत कार्यालयात गाड्या लावल्या, 'जा पुढे गेल्यावर पायऱ्यांनी सरळ वर' अशी माहिती गावकऱ्यांकडून मिळवून वाटचाल सुरू केली. एक रेल्वेमार्ग ओलांडला, आणि थोड्याच वेळात रस्ता संपून प्रशस्त दगडी पायऱ्या सुरू झाल्या.
वर पाहिले तर एक ठेंगणे टेकडी दिसू लागली. आणि लोक 'ह्यात काय आहे, पर्वतीएवढेच असेल' असे म्हणत चढू लागले. कनकेश्वर हा कुठला दुर्ग नाही तर ते एक डोंगरमाथ्यावरचे देवस्थान आहे.दगडी पायऱ्यांची उत्तम स्थिती, बाजूला कठडे, अधून मधून छान पार बांधलेली डेरेदार झाडे हे बघता वरचे देवस्थानही सुस्थितीत असणार हे लक्षात येत होते. टेकडी चढून माथा आला म्हणून हुश्श केले तर समोर अजून एक अर्धी पर्वती उभी होती, पण आता जरा वाऱ्याच्या झुळुका तरी येत होत्या. शुक्ल चतुर्दशी असल्याने विजेरीची गरजच भासत नव्हती. खाली आरसीएफचे दिवे झगमगत अजून थोडे पुढे गेल्यावर दुतर्फा चांगलीच दाट झाडी सुरू झाली, दुसरी टेकडी चढल्यावर रस्त्याने वळण घेतले आणि समोर अजून एक टेकाड उभे !! बऱ्याचदा डोंगर अशी फसवणूक करतात. आम्ही आपले चालत राहिलो. मध्ये एकदा रस्ता उतरू लागला तर वाटले की आता पलीकडच्या गावात रस्ता उतरतो की काय. साधारण ऐंशी टक्के चालून झाले की एक पाण्याची बांधीव टाकी लागते. अजून पुढे गेले की शंकराचे एक छोटे पांढरे देऊळ, आणि तिथून थोड्याच अंतरावर देवस्थानाची कमान. उजवीकडे एक प्रशस्त देऊळ आणि घडीव दगडांचे कुंड बघून प्रसन्न झालो. पण पुढे गेलेले धूमकेतू आणि केशव कुठेच दिसेन म्हणून अजून थोडे पुढे गेलो, आणि मग मुख्य देवालयाचे अतिशय विस्तीर्ण आवार दिसले. वर एवढे बांधकाम असेल असे खालून अजिबात वाटत नाही. कनकेश्वराचे काळ्या पाषाणातले भव्य देऊळ, समोर चौरसाकृती मोठे कुंड, आजूबाजूला काही छोटी देवळे, धर्मशाळा, एक पत्र्याचे छत असलेला मोठा उघडा मंडप असा सगळा परिसर होता. देवळाच्या कळसाला रंग देऊन ते सुशोभित करण्याचा प्रयत्न फसला आहे, पण तरीही ते छान दिसते.
रात्रीचा एक वाजून गेला होता. छोट्याशा वाटणाऱ्या या डोंगराने एक दीड तास चांगलेच चालवले होते, त्यात दमट हवेमुळे घामाघूम होऊन सारे कपडे गच्च ओले झाले होते. सुदैवाने वर नळ वगैरे सर्व सुविधा आहेत. अंगतपंगत आटोपून उद्याचे बेत आखत उघड्या मंडपात निद्राधीन झालो.
सकाळी भराभर आवरले, देवदर्शन घेतले आणि पळत पळतच खाली उतरलो. उतरताना भेटलेल्या काही गावकऱ्यांनी मिहिरला कनकेश्वराची हकिकत सांगितली. शंकराने कनकासूर नावाच्या एका राक्षसाचा वध केला ते हे ठिकाण, पण त्या राक्षसाने मरता मरता आपले नावही शंकराबरोबर जोडले जावे असा वर मागून घेतला म्हणून या स्थळाचे नाव कनकेश्वर.
कनकेश्वराचा निरोप घेऊन अर्ध्या तासात थळला पोहोचलो. खांदेरी, उंदेरी हे दोन्ही तसे खोल समुद्रातले सागरी दुर्ग आहेत, बोटवाले तिकडे यायला सहजासहजी तयार होत नाहीत. दत्तात्रेय कोळी दोन चिल्ल्यापिल्ल्यांसह यायला तयार झाले ( पंधराशे रुपये). त्यांच्या बोटीला भरतीचे पाणी लागेपर्यंत, सुक्या माशांचा सुगंध सक्तीने घेत, एका बाजूने होडी भरभरून येणारे मासे तर दुसऱ्या बाजूला तन्मयतेने एक एक मासा गळ टाकून पकडणारी बरीच बारकी बघत बसलो. आमच्यातल्या काहींनी बराच प्रयत्न केला, पण ते काही एवढे सोपे काम नाही हे लगेच लक्षात आले. किनाऱ्यावर सीगल्सचे थवे च्या थवे मासेमारीत गर्क होते.
बोटीने समुद्रात शिरलो. समोरच्या उंदेरीला मागे टाकून खोल समुद्रात शिरलो आणि खांदेरी दिसू लागला. जवळूनही नजरेत मावेल एवढे आटोपशीर बेट, दक्षिणेला एक टेकाड आणि त्यावर एक दीपगृह. उंचसखल जमिनीवर बांधलेली मजबूत तटबंदी, आणि बाहेरच्या बाजूला तटबंदीचे समुद्रापासून रक्षण करण्यासाठी टाकलेले मोठमोठे दगडधोंडे . आत प्रवेश करण्यासाठी एक पुर्वाभिमुख छोटा धक्का. त्या छोट्या धक्क्याला बोट लावली आणि दीपगृहाच्या छोट्या टेकाडावर चढून गेलो. तिथून फिरण्याची परवानगी घेऊन पुन्हा खाली उतरलो ते एका खांदेरीचे एक अद्भुत वैशिष्ट्य अशा धातूचा आवाज येणाऱ्या खडकाच्या शोधात. आधी दोन तीन दगडांवर दगड आपटून पाहिले, मग जो तो दिसेल त्या मोठ्या दगडावर दगड आपटून हा आवाज धातूसारखा आहे असा दावा करू लागला. अखेरीस वर वडाच्या झाडाजवळ तो मोठा पाषाण सापडला. त्यावर दगडाने आघात करताच शाळेची मोठी घंटा वाजवल्यासारखा आवाज येऊ लागला. त्याला बिलगलेल्या बाजूच्या कुठल्याही दगडावर दगड आपटला की दगडासारखाच आवाज, पण हा दगड काही वेगळाच. बराच वेळ दगड बडवल्यावर सर्वांचे समाधान झाले आणि दुर्गप्रदक्षिणा सुरू केली.
दुर्गाची तटबंदी अगदी मजबूत अशी पाच सहा फूट रुंद आहे, मध्ये तेवढेच मजबूत असे साधारण बारा बुरूज आहेत, काही बुरुजाखालून समुद्रात उतरण्यास दरवाजे बांधून काढले आहेत. वर्दळीपासून तसा बराच सुरक्षित असल्याने बुरुजांवर भरपूर तोफा अजूनही आहेत. तटबंदीला लगटून चालताना उकडत होते, पण जरा डोके बुरुजाबाहेर काढले की समुद्रावरचे गार वारे अंगाला भिडत होते. गडाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे अवाढव्य पसारा वाढलेला वटवृक्ष, पेमगिरीच्या किल्ल्याजवळ दोन एकरात पसरलेला एक वटवृक्ष आहे. हाही त्याच तोलामोलाचा म्हणावा लागेल, खूप जुना तर आहेच आणि एवढे वृक्ष आणि पारंब्यांचे जंजाळ की कुठला मूळ असेल ते काही काळ कळतच नाही. वटवृक्षाच्या या जंगलात खेळणे आणि वनभोजन करणे हाच एक दिवसाच सुरेख कार्यक्रम होऊ शकेल. गडावर एक मोठा गोड्या पाण्याचा तलाव आहे, एक छोटा तलावही आहेत. चार पाच विहिरी दिसल्या पण त्या मात्र कोरड्या आहेत.
इतर छोट्या देवळांबरोबरच गडावरचे मुख्य देऊळ म्हणजे वेताळाचे देऊळ. वेताळ पाच एक फूट उंच आणि तेवढ्याच घेऱाचा आहे, तो आधी जेमतेम एक फुटाचा होता आणि दरवर्षी आपोआप वाढत चालला आहे असे दत्ताने सांगितले. काही काळाने बहुधा ते देऊळ त्याला पुरेनासे होईल.
परत फिरलो आणि उंदेरीकडे आलो. भरती फार जोरात होती, लाटा उंदेरीच्या तटाला जोरदार धडका देत होत्या. तिथे वस्ती नाही आणि बोट लावायला जागाही नाही. खडकांमुळे दत्ता तर बोट जवळ न्यायलाही राजी नव्हता. बाजूनेच प्रदक्षिणा घालून किल्ला बघून म्हणाला, तरी प्रवेशद्वाराच्या थोडे जवळ बोट न्यायला तयार झाला, शंभर एक फुटांवर बोट बंद करून नांगर टाकला, अजून थोडी मनधरणी केल्यावर मग त्याने एक दोर घेऊन समुद्रात उडीच टाकली, तटाजवळ एका खडकाला दोर बांधला. त्याच्या सहकाऱ्यांनी तो ओढून बोट थोडी अजून जवळ नेण्याचा प्रयत्न केला, पण एका अंतरावर मात्र अजून पुढे जायला नकार दिला. समुद्रात पोहण्याचा काही अनुभव नव्हता, उधाणही चांगलेच होते पण मग शेवटी शिवरायांचे नाव घेऊन मी, धूमकेतू आणि केशव अशा तिघांनी समुद्रात उडी टाकली, पोहत प्रवेशद्वार गाठले. दुर्गात प्रवेश केला आणि उन्हामुळे चटका बसणारी पावले चटाचट उचलत गड पाहू लागलो. बेट खूपच छोटे आहे. इथेही गोड पाण्याची टाकी आहेत, तट आहे, त्याला निरीक्षण खिडक्या आहेत, बुरूज आहेत, तोफा आहेत, बांधकामाचे अवशेष आहेत. निर्मनुष्य जागा होती म्हणून ठीक नाहीतर त्या किल्ल्यावर उन्हात अनवाणी पावलाने उघडेबंब फिरणारे आम्ही तीन जीव भयंकर विनोदी दिसत होतो यात शंका नाही.
लगेच प्रवेशद्वारापाशी आलो, अर्ध्याच तासापूर्वी इतका सुरेख किल्ला एवढ्या दूर येऊन न बघताच जावा लागणार म्हणून जरा उदास झालेल्या आमचा आनंद आता मात्र ओसंडून वाहत होता. भटकंतीतला हा अनुभव नक्कीच कधी विसरला जाणार नाही. शिवरायांबरोबर या ठिकाणी समुद्रावरच्या शिवाजीचा म्हणजे कान्होजी आंग्रेंचा जयजयकारही अपरिहार्याच होता. पोहत बोट गाठली. अंग इतके जड झालेले, की वर चढणे हे एक दिव्यच होते, ते वरच्यांची करमणूक करत कसेबसे पार केले आणि परतीचा प्रवास करून थळला पोहोचलो.
दोन वाजले होते. अलिबागला जाऊन आकंठ जेवलो. या भागातली उत्तम जेवण्याची ठिकाणे माहीत नाहीत महाराष्ट्रातल्या सर्वच खास खाण्याच्या ठिकाणांचे एकदा संकलन करायला पाहिजे. आलोच आहोत तर बघण्याच्या यादीत अजून एक गोष्ट होती, ती म्हणजे सासवण्याचे करमरकर शिल्पालय. कर्मठ डोंगरयात्रींसारखे सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त उपयोग करून पदभ्रमणाचे कार्यक्रम पार पाडावेत की गाड्या न्याव्यात अशी आमची नेहमी चर्चा होत असते, पण गाडी घेऊन गेले तर जवळपासचे बरेच काही चांगले बघता येते.
अलिबाग रेवस रस्त्यावर किहिमच्या पुढच्या आवास बीचच्या जवळ हे सासवणे गाव आहे. करमरकरांचा छोटासा बंगला आहे, त्याचेच आता शिल्पालयात रुपांतर केले आहे. बाहेर हिरवळीवरच एक खरी वाटेल अशी म्हैस बसली आहे, कुत्रा आहे, कोकणचा मनुष्य आहे. वर दोन दालनात मिळून उणेपुरे शे-दोनशे शिल्पे असतील, पण ते बघून थक्क होतो आपण. शिवरायांचे तर सुरेख पुतळे आहेतच, पण प्रत्येक शिल्पात दाखवलेले तपशील आणि जिवंतपणा याला तोड नाही. त्या भागात गेलात तर बघायलाच हवे असे छोटेखानी प्रदर्शन आहे हे.
अनेक गोष्टी देणाऱ्या या ट्रेकचे समाधान मनात बाळगत चारच्या सुमारास परत पुण्याकडे निघालो.