शेतकऱ्यांच्या आत्महत्या.

विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्ते मागे एकच कारण आहे किंवा असेल असं मला वाटत नाही. फक्त उरावर कर्ज आहे या एकाच कारणासाठी  आत्महत्या करण्याइतकी कुठलीच जनता लोचीपोची नक्कीच नसते.

 कर्ज आहे, ते फेडण्याची इच्छा आणि हिंमतही आहे पण उत्पन्न अगदीच शून्य, हिच लाजिरवाणी, पण जीवघेणी यातना "आत्महत्ये" पर्यंत नेण्यास कारणीभूत असते. कर्जापेक्षा कमी उत्पन्न हेच मूळ कारण आहे.

शेतीतून सरासरी उत्पन्न १६००० रुपये, महागडी बी-बियाणे, खते, कीटकनाशके, यांचा खर्च सरासरी ११००० रुपये, शेतीची मशागत, पोटाची भुख, मुलां-मुलीच शिक्षण, हुंडा, लग्न,  कसं भागणार ? मग घे कर्ज. ठेव जमिनी गहाण, यातच तो पुरता अडकतो.

मग सरकार पुढे येते आणि कमी व्याज दराच्या कर्जाचा फास्ट इफेक्टिव वेदनाशामक डोस देते. वर्तमानपत्रात भल्या हेर्डिंग मध्ये जाहीर करतात, चांगली व ताबडतोब उपाययोजना केले असा भास केला जातो, पण त्याचा उपयोग या गरीब शेतकऱ्यांना होतच नाही. कारण नियमा प्रमाणे "कमी दराचं" कर्ज घ्यायलाही जमिनी गहाणच ठेवाव्या लागतात, पण त्या तर पहिल्याच कर्जासाठी गहाण पडलेल्या असतात ना?.

सरकारच्या अश्या चिल्लर आणि भन्नाट फालतू योजनांचा फायदा मग फक्त ४-५% बागायतदार शेतकरी पुरेपूर करून किंवा करवून घेतात. मंत्री, संत्री मदतीचे "पॅकेज" जाहीर करतात, त्याचाही फायदा होत नाही, किंबहुना होणार नाही याचीच काळजी ह्या राजकारणी मंडळीकडून घेतली जाते अस कुणाला वाटलं तर त्या गैर ते काय? "पॅकेज" मधील जवळजवळ ६०% रक्कम तुम्ही फक्त सिंचनासाठी बाजूला ठेवत असाल तर होणाऱ्या आत्महत्या तत्काळ थांबूच शकत नाहीत. अरे खडकाळ रास्त्यावरून ओझे वाहता वाहता मरणाऱ्या बैलांच्या अंगावरील ओझं तत्काळ कमी करायचं सोडून, बैलाच्या भविष्यातील सोयीसाठी, खडकाळ रस्ता दुरुस्त करण्यात वेळ आणि पैसा वाया घालवला तर तो नक्की मरणारच. मरणाऱ्या शेतकऱ्यांचा डोक्यावरील कर्जाच ओझं कमी करायचं सोडून "सिंचना"च्यासाठी २/३ रक्कम राखून ठेवाल तर त्याचा तत्काळ उपयोग शून्यच ना?

चीन मधील शेतकऱ्यांना सगळ्या सोयी सवलती सह ०% व्याजाने कर्जे मिळते. आपली वाटचाल शून्य टक्क्यांकडे केव्हा होणार? ६%नी कर्ज देतो म्हणाले होते, मग किती जणांना ६%नी कर्ज भेटलंय ते कळेल का?. बांगलादेशाच्या अहमद साहेबांची यशस्वी "मायक्रोफायनांस" सारखी एखादी चांगली योजना राबवण्याचा विचार केव्हा करणार आपण?  कर्जाचा डोंगर का वाढतोय?, तो कसा कमी करता येईल याचा विचार कधी होणार?

विदर्भातील आत्महत्यांचा आणि पर्यायानं शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन गेली २.५ वर्षे आपण काढलीयेत, पण अजूनही योग्य उपाय सापडलाय का? मरण पावलेल्या ७,७०० शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा, त्यांच्या "त्या" निर्णयाचा त्यांच्या मागे राहिलेल्या कुटुबियांना,नातेवाईकांना काही फायदा तरी झालाय काय?

त्यांच्या आत्महत्या व्यर्थच गेल्या ना?.

"मरूनही काहीच फायदा होत नाही" हे कळल्यामुळे जेव्हा आत्महत्या थांबतील, तो दिवस मात्र कळस असेल सरकारच्या आणि आपल्याही . . . . ...निष्क्रियपणाचा आणि निर्लज्जपणाचाही.

.सचिन, नारायणगांव, पुणे.