"मीच चंद्रमोहन" हे उद्गार ऐकून मी तर आ वासून आणि डोळे फाडून त्याच्याकडे पहातच राहिलो. या बेट्या शुक्राचार्याने भलतेच प्रगत तंत्रज्ञान भारतात आयात केलेले दिसतेय.आयझॅक असिमोवनेदेखील चंद्रमोहनला पाहून तोंडात बोट घातले असते.तेवढ्यात दूरध्वनिदर्शकाची रिंग वाजली आणि माझ्याअगोदरच चंद्रमोहन आत शिरला मी त्याच्यापाठोपाठ घरात शिरलो आणि तो मला म्हणाला ," युवर फोन सर,आणि मी तो हातात घेताच पटलावर डॉ. शुक्राचार्यांचा चेहरा दिसू लागला आणि पाठोपाठ घनगंभीर आवाज ऐकू यायला लागला,"नमस्कार प्रोफेसर सहस्त्रबुद्धे,यांत्रव चम्द्रमोहन आपल्याघरी सुखरूप पोचला की नाही हे विचारण्यासाठी आपल्याला दूरध्वनी केला,.
"थॅंक्स डॉ. शुक्राचार्य आपल्या तत्पर सेवेबद्दल धन्यवाद,"मी म्हणालो
" ओ,इटस माय प्लेक्षर यांत्रव मूल्याचा दुसरा आणि शेवटचा हप्ता अडीच लाखाचा पंधरा डिसेंबरपूर्वी मयासूर यांत्रव केंद्राच्या विश्व बँकेतील आपल्याला दिलेल्या खाते क्रमांकावर भरण्याची कृपा करावी " अंतर्धान पावतापावता आठवण करून देत ते म्हणाले म्हातारा व्यवहाराला पक्का होता आमचे संभाषण चालू असतानाच चंद्रमोहनने घराचा ताबा घेतला होता आणि तो व्हॅक्युम क्लीनरने घर साफ करू लागला होता शिवाय त्याचबरोबर चुटके ,विनोदी गोष्टी सांगून मिनीचेही मनोरंजन करत होता.
दोनच दिवसात मोहनने आम्हाला अगदी अंकित करून टाकले,विद्या तर त्याच्यावर बेहद्द खूष होती. अगोदर तो काम फारच व्यवस्थित करायचा आणि तरीही तिने काही सूचना केल्या तर कल्पनेसारख " मॅडम,(कल्पनाची भाषा) मला असेच काम जमेल ते बरे वाटत असेल तर रहाते नाहीतर ही मी निघाले"असा त्रागा न करता हसतमुखाने ऐकून घेऊन "येस मॅडम,आपण म्हणता तसेच करतो." असे आदबशीरपणे म्हणायचा आणि लगेच तिच्या सूचना अमलात आणायचा.
मोहनकाकाचा लळा मिनीलाही फारच लागला होता आणि ते स्वाभाविकच होते कारण आमच्यापेक्षा ती त्याच्या सहवासातच जास्त वेळ असायचीअकाळी तिला जागे करण्यापासून ते तिला शाळेत सोडणे,घरी आणणे,तिची करमणूक करणे,तिचा अभ्यास घेणे शिवाय तिला गोष्टी सांगून गाणी म्हणून तिची करमणूक करणे सार काही तो वेळच्यावेळी आणि अगदी शिस्तीत पार पाडत असे.एकूण आमचा लेबर प्रॉब्लेम पूर्णपणे सुटला होता पण त्यामुळे कल्पना मात्र त्याच्यावर जळत होती.पण ती काही करूही शकत नव्हती.
रविवारी सकाळी विश्वास शीळ घालीतच आमच्या घरात शिरला. स्वारी अगदी खुषीत होती आणि का असणार नाही कारण त्याच्याबरोबर एक सुंदर पोरगी पण होती.त्याना पाहून मी जवळजवळ ओरडलोच,"लेका विश्या, आम्हाला अगदी पत्ताही लागू न देता बार उडवलास काही लाजलज्जा आहे की नाही तुला ?"विद्या पण न राहवून म्हणाली" कमाल आहे बरका भावजी निदान लग्नाच निमंत्रण तरी द्यायच फारच बाई आतल्या गाठीचे घालात" "हो हो हो !" आम्हाला थांबवत तो म्हणाला," सुध्या वहिनी, कमाल आहे बुवा तुमच्या दोघांची ही माझी बायको नाही की वाग्दत्त वधूही नाही.मागील आठवड्यात आपण कोठे गेलो तेथे काय पाहिल सगळ विसरलात की काय आणि तुमच्या लेकीला घेऊन बसलाय तो कोण म्हणून मी विचारू का?तो जिथून आलाय तेथूनच ही आलीय,नीट लक्ष देऊन ऐका ही आहे माझी रूबी उर्फ यंत्रसुंदरी स्मिता ! स्मिता मीट माय फ्रेंड प्रोफ़ेसर सुधीर अंड हिज वाइफ विद्या " यावर तिने " हॅलो,हाउ डु यु डू " असे गोड आवाजात म्हणून आमच्या दोघांशीही हस्तांदोलन केले.मी मात्र खरोखरच मत्सरग्रस्त होऊन म्हटले"लेका विश्या मजा आहे तुझी"
"अरे काही विचारू नकोस,"विश्या रंगात येऊन म्हणाला,"आपण तर बुवा अगदी मजेत आहोत,सकाळी मंजूळ आवाजात गाणे म्हणून ती मला जागे करते,लगेच गरम चहाचा कप हातात येतो.कामावर निघताना मस्तपैकी ब्रेकफास्ट,कामावरून घरी येईपरयंत सर्व कामे पार पाडून घर चकाचक करून ठेवते,घरात प्रवेश केला की दारातच माझ्या स्वागतासाठी सज्ज असते.मला बूटसुद्धा काढू देत नाही."
" म्हणजे बूट काढू न देता आणखी काय करते ती?"
" तस नाही रे म्हणजे माझे बूटही तीच उतरवते,"
"आणि कपडेसुद्धा?" मी
"ए,उगीच चावटपणा करू नकोस सुध्या,अरे निदान शेजारी वहिनी आहेत याच तरी भान ठेव"विश्या मला चापत म्हणाला.
" काही सांगू नका भावजी, त्याऐवजी त्याना म्हणाव द्या मला घटस्फोट आणि आणून ठेवा एकादी यंत्रस्मिताच घरात."वीज कडाडावी तशी विद्या गरजली .तिची समजूत घालणे आता माझ्या आवाक्याबाहेरच काम असल्यामुळे गप्प रहाणे मी पसंत केले.तेवढ्यात चहा घेऊब चंद्रमोहनच तेथे आल्यामुळे त्या कठिण प्रसंगातून माझी सुटका झाली.
चंद्रमोहनचे नवेपण संपत आले सुरवातीला काही दिवस शेजारीपाजारी मुद्दाम तो काम कसे करतो हे पहाण्याच्या उत्सुकतेने आमच्याकडे डोकावत.कधी त्याच्या अंगाला हात लावून बघत पण त्या बिचाऱ्याने असिमॉवचे नियम कटाक्षाने पाळत त्याना कधीही विरोध दर्शवला नाही वा नाराजी व्यक्त केली नाही.
कधीकधी मात्र गंमतही व्हायची. संगणकतक्ते बदलण्याची आठवण विद्याला राहिली नाही तर तो मिनीला पुन्हापुन्हा जुन्याच गोष्टी,चुटके सांगायचा आणि मग ती चिडचिड करायची.किंवा संगणक प्रणालीत कधी उलटसुलट झाल्यास कामातही उलटापालट करायचा म्हणजे कपडे डिशवॉशरमध्ये तर भांडी वॉशिंग मशीनमध्ये तर कधी मिनीऐवजी विद्यालाच शाळेत पोचवायला निघायचा अशावेळी मिनीची छान करमणूक व्हायची अर्थात विद्या दक्ष रहात असल्याने असे प्रसंग क्वचितच येत.
आम्ही कामावर आणि मिनी शाळेत गेल्यावर मोहन घरातली कामे करायला सुरवात करी.त्याने दार बंद केल्यावर आम्ही ठरवलेल्या संकेतानुसार घंटी वाजली तरच तो दार उघडत असे .इतरांसाठी बाहेर निरोप लिहिण्यासाठी वही ठेवलेली असे त्यात निरोप लिहावयास तो सांगत असे त्यामुळे आमच्या अनुपस्थितीत कोणी परकी व्यक्ती घरी येऊन काही गोंधळ करण्याची शक्यता नसे. पूर्वकल्पना न देता येणाऱ्या पाहुण्याना मात्र आम्ही येईपर्यंत तो घरात घेत नसे आणि जर आम्ही घंटीचा संकेत विसरलो तर अगदी शिवाजी राजांच्या मावळ्यासारखा आम्हालाही ! एकूण सर्व व्यवस्था चोख झाली असे वाटू लागते न लागते तोच या सुखानो या चे जा सुखानो जा मध्ये रूपांतर होते की काय वाटू लागले.
त्यादिवशी घरी यायला मला नेहमीपेक्षा जरा जास्तच उशीर झाला होता. अणि मिनी आणि विद्या माझ्याआधी आल्यामुळे मोहनबरोबर त्यांचे मनोरंजन चालू असेल असा माझा अंदाज होता पण घरात प्रवेश करतो तो काय मिनी आणि विद्या गळ्यात गळा घालून चक्क ढसाढसा रडत होत्या.
" काय झाल?" मी धास्तावून विचारले.आमच्या सासूबाईंची तब्येत ठीक नसल्याचा ई-संदेश सकाळीच आला होता त्यामुळे त्यांच तर काही बरवाईट झाल नसेल ना अशी शंकेची पाल मनात चुकचुकून गेली.
" चंदू ---आपला मोहन " एवढेच शब्द त्या दोघींच्या तोंडून बाहेर पडले.मी आजूबाजूला पाहिले चंद्रमोहन कुठे दिसत नव्हता.मी सगळ्या खोल्यातून शोध घेतला पण त्याचा कुठेच पत्ता नव्हता कुठ गेला हा. मी मनातल्या मनात म्हणालो.
तेवढ्यात विश्वासही वेड्यासारखा धावतधावत घरात शिरला.त्याचा अवतार अगदी पहाण्यासारखा होता,केस पिंजारलेले,शर्ट पँटमधून अर्धवट बाहेर आलेला,पायात बूट होते पण मोज्यांचा पत्ता नव्हता,"काय रे काय झाल तरी काय ?" मी त्याला विचारले."अरे माझी स्मिता"
"तिच काय झाल?"प्रतिप्रश्न करत मी विचारले आणि मग त्याचा पश्चाताप मला झाला कारण तो प्रश्न ऐकून होणारा विश्वासच आक्रोश रामाच्या 'हा सीते' या शोकापेक्षा किंवा संस्कृत साहित्यात अमर झालेल्या अजविलापापेक्षाही अधिक हृदयद्रावक होता त्यामुळे आपल्यावरील आपत्ती क्षणभर बाजूला ठेऊन त्याची समजूत काढणे हे मित्र या नात्याने माझे कर्तव्य असल्याने मी त्याचे सांत्वन करत म्हणालो,"अरे वेड्या,एवढा आक्रोश करायला काय झाल ती काय तुझी लग्नाची बायको थोडीच होती?" पण या सांत्वनाने त्याच्या संतापाच्या आगीवर पाणी टाकण्याऐवजी मी जणु तेलच ओतले कारण माझे उद्गार ऐकून भडकून विश्या ओरडला ,"अरे,गधड्या कसे सांगू तुला,बायको गेली असती तर एकवेळ परवडल असत (अर्थात हे उद्गार केवळ त्याचे लग्न न झाल्यामुळेच काढायला तो धजावला)"
"उलट बरच वाटल असत का?" एवढ्या संकटातही माझी विनोदबुद्धी शाबूत होती याचा प्रत्यय देत मी म्हणालो.पण शेजारी विद्या आहे हे लक्षात आल्यावर आणखी भयानक संकटाला तर आपण बोलावल नाही ना अशी भीती क्षणभर मनात चमकून गेली पण सुदैवाने त्या दोघीही मोहन गेल्याच्या दु: खातच इतक्या आकंठ बुडाल्या होत्या की माझ्या आगाऊपणाची त्यानी दखल घेतली नाही. पण या अचानक कोसळलेल्या आपत्तीमुळे विश्याचा मात्र तोल फारच ढळला असावा कारण तो पुढे गाढवासारख बरळला,"सॉरी वहिनी पण इट इज अ फॅक्ट बायको एक गेली तर दुसरी मिळेल पण स्मिता ?"
"वेड्या,स्मिता तर काय केंद्रावरून एकच काय छप्पन्न आणता येतील" मी त्याला धीर दिला. "अरे गाढवा एक स्मिता आणायला आयुष्याची कमाई खर्च करावी लागते,उलट बायको येताना डबोल घेऊन येते"आणखीच व्याकुळतेने विश्वास बरळला.
"उगी उगी आमचा चंद्रमोहबही बेपत्ता आहे"
"त्याने तर नसेल ना माझ्या स्मिताला पळवले?"स्मिता नाहीशी झाल्यामुळे विश्याच्या बुद्धीचा इतका बोऱ्या वाजला असेल असे मला वाटले नव्हते.तरीही त्याला चुचकारत मी म्हणालो,"काही काळजी करू नको आपण मयासुर केंद्रावर फोन करूया."
"अरे शहाण्या,मी फोन केला नसेल असे वाटले का तुला? फोन कोणीही उचलत नाही " विश्याच्या बोलण्यातून केवळ माझ्यावरचाच नव्हे तर सगळ्या जगावरचा संताप डोकावत होता.
" ठीक आहे आपण प्रत्यक्षच केंद्रावर जाऊन पाहूया."मी माझ्या मनावरील ताबा ढळू न देण्याचा प्रयत्न करीत म्हणालो.
आम्ही सगळेच मग कारमध्ये बसलो कारण मोहन नसताना विद्या आणि मिनीलाही घरात थोडेच चैन पडणार होत.आमची कार केंद्रावर पोचेपर्यंत विश्या आणि विद्या याना धीर देण्याचा मी आटोकाट प्रयत्न करीत होतो.आमची कार केंद्राव्र म्हणजे केंद्र ज्या जागेवर होते त्या जागेवर पोचली आणि पहातो तो काय तेथे केंद्राचा मागमूशी नव्हता केवळ एक उजाड माळ तेथे पसरला होता.
या कथेचा शेवट येथे न देता मुद्दामच राखून ठेवत आहे.मनोगतीना जर काही शेवट सुचत असेल तर त्यानी अवश्य कळवावा. काही प्रतिसादांची वाट पाहून मला सुचलेला शेवट देत आहे.