पार्वतीकाकू कोर्टाच्या व्हरांड्यात भिंतीला टेकून बसल्या होत्या. जवळच त्यांची एक जुनी पुराणी पिशवी होती. त्या कापडी पिशवीत होत्या त्यांच्या जमिनीच्या कागदपत्रांच्या प्रती. सुरुवातीच्या काळात नवीन शिवलेल्या त्या पिशवीचा मूळ रंग, रूप आता पार बदललं होतं. पिशवीचंच काय पण त्या काळातल्या, पन्नाशीतल्या ठसठशीत, पार्वतीकाकूही स्वतः आज, सत्तरीत, शरीराने विदीर्ण आणि मनाने उसवलेल्या दिसत होत्या. दुधावर साय जमावी तशी चेहऱ्यावर कातडी जमली होती. पूर्वी हौसेने नीटनेटक्या राहणाऱ्या काकू आज नाईलाजाने, कोर्टात जायचे म्हणून, नवीन लुगडं नेसून आल्या होत्या.
पण,स्वतः पार्वतीकाकूंना त्यांच्या मनाचे वेगळेच चित्र डोळ्यासमोर होते. ते चित्र, ते रूप हाती धगधगती मशाल घेतलेल्या कणखर तरुण पार्वतीचे होते. अन्यायाविरूद्ध लढणाऱ्या शूर झाशीच्या राणीचे.
"हं.." काकूंनी एक उसासा टाकला. भिंतीला टेकल्या-टेकल्या त्यांचा गतकाळ त्यांच्या डोळ्यांसमोर ओघळला.....
* * * * *
त्यांचा संसार सुखाचा होता. त्यांच्या पतीच्या, शंकररावांच्या वाट्याला वडिलोपार्जित १५० एकर शेतजमीन आली होती. त्यांच्या शेताला लागूनच त्यांच्या मोठ्या दिराची, प्रतापरावाची तेवढीच जमीन होती. दोन्ही शेते सुपीक होती. सामायिक विहिरीला बारमाही पाणी होतं. गोठ्यात धष्टपुष्ट बैलजोडी होती. शंकररावांचा आपल्या पत्नी आणि मुला इतकाच बैलजोडीवर, मंगळ्या आणि म्हारत्यावर, जीव होता. मंगळ्या आणि म्हारत्याचा चारा-पाणी केल्याशिवाय, त्यांच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवल्याशिवाय शंकररावांनी कधी भाकरीचा तुकडा मोडला नाही. पुढे त्यांनी विहिरीला पंप बसवला, ट्रॅक्टर घेतला तरी बैलजोडी विकली नाही.
घरात सुबत्ता होती. सर्व सणवार उत्साहात साजरे व्हायचे. प्रतापरावाकडेही लक्ष्मी पाणी भरत होती. पार्वतीकाकूंची जाऊ, आनंदीबाई, शांत आणि कष्टाळू होती. घरात प्रतापरावांचा दरारा होता. मुलं, आनंदीबाई प्रतापरावांना वचकून असायचे. प्रतापरावांचा मित्रपरिवार मोठा होता. शेतावर रात्र-रात्र जागून कोंबडं किंवा बकरा शिजवून त्यांच्या "पार्ट्या" चालायच्या, असेही शंकररावाच्या कानावर आले होते. पण मोठा भाऊ म्हणून शंकररावाने तिकडे दुर्लक्षं केले. पण कुठेतरी शंकररावांना आपल्या दादाचे वागणे पटायचे नाही. दोघांची मुलेही मोठी झाली होती. प्रतापरावांचा मोठा महेश वडिलांसारखा तर धाकटा सुरेश स्वभावाने आईसारखा होता. सुरेशची आपल्या चुलत भावाशी, शंकररावांच्या विनायकाशी, खास दोस्ती होती. लहानपणापासून दोघांनाही एकमेकांचा लळा. सुरेश काकूकडे यायचा. तिथेच जास्त रमायचा. मोठ्या महेशचे अभ्यासात लक्ष नव्हते. तो घरची जीप घेऊन मित्रांबरोबर तालुक्याला जायचा आणि बापाचा पैसा उधळायचा. पण रगेल आणि रंगेल प्रतापरावला त्याचं कौतुक वाटायचं. खुद्द प्रतापराव तालुक्याला तमाशाला जायचा. ही व्यसनं खर्चीक होती. अशानं दादा रसातळाला जाईल ह्याची शंकररावाला भीती वाटायची. प्रतापरावने आपल्या वृत्तीत दुर्गुणांचे तण वाढू दिले होते. गाडीला जुंपलेल्या बैलांच्या कासऱ्यांवर कमालीचा ताबा असणाऱ्या प्रतापरावाने मनाचे वारू हवे तसे उधळू दिले होते. परिणाम........कर्जबाजारी.
एक दिवस प्रतापराव स्वतः शंकररावाकडे बैलजोडी मागायला आला. शंकरला आश्चर्य वाटले. तो म्हणाला,"काय रे दादा! तुझी बैलजोडी काय झाली म्हणायची?"
दादा म्हणाला," अरे अम्मळ आजार पडलाय दोघांवर. तुझ्याकडे ट्रॅक्टर आहे. तुझे मंगळ्या-म्हारत्या नुसते बसूनच आहेत तर देईनास का जरा मला. माझी नांगरण झाली की देतो पाठवून."
शंकराची बैलजोडी प्रतापच्या शेतात पाहून शंकरचा मित्र संध्याकाळी शंकरला भेटायला आला. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर त्याने शंकरला आतली बातमी पुरवली. प्रतापचे बैल आजारी वगैरे काही नव्हते. सावकाराचा कर्जफेडीचा तगादा लागला म्हणून प्रतापने त्याची बैलजोडी विकून टाकली होती. शंकररावाला धक्का बसला. पण मोठ्या भावाला जाब कसा विचारायचा. तरीपण बैलजोडी परत करायला आला की विषय काढू असा शंकररावाने विचार केला. पण, प्रतापराव बरेच दिवस भावाकडे फिरकलाच नाही. आज देतो, उद्या देतो अशी टाळाटाळ करीत प्रतापरावाने शंकररावाची बैलजोडी आपल्या गोठ्यात बांधली ती कायमचीच. शंकररावाने विचार केला, जाऊ दे. नाहीतरी काम नसल्यामुळे त्याचे कामसू मंगळ्या-म्हारत्या अस्वस्थच असायचे. त्यांना रग जिरवायला काम मिळाले होते. दादाने त्यांना सुखात ठेवावे एवढीच अपेक्षा त्याने बाळगली. पण पार्वतीला शंकररावांचे हे विचार पटायचे नाहीत. भाऊजींनी स्वतःच्या व्यसनापोटी कर्जबाजारी होऊन स्वतःची बैलजोडी विकली तशीच एक दिवस आपलीही विकतील, असं तिला वाटायचे. पण शंकररावाने "छ्या! छ्या! दादा तसं काही करायचा नाही," असं म्हणून तो विचार झटकून टाकला. पार्वतीला ठाऊक होतं. तिचा नवरा नांवाप्रमाणे भोळा असला तरी निर्बुद्ध नव्हता. कुठेतरी खोल त्याला पार्वतीचे म्हणणे पटत होते पण संकोची स्वभावामुळे दादासमोर उभं राहून बैलजोडी परत मागावी हे त्याला जमण्यासारखं नव्हतं. तीने नाद सोडला. आपला नवरा तसा नाही ह्यातच आपण सुख मानावं असा तिने विचार केला. पण लवकरच बातमी आली प्रतापरावाने ५० एकर जमीन विकली.
* * * *
संध्याकाळ होता होता कुळकर्णी वकील कोर्टातून परतला. पार्वतीकाकू जमिनीला, कंबरेला हात टेकत उभ्या राहिल्या. बसून-बसून आंबलेली हाडं कुरकुरली. मोठ्या आशेने त्यांनी कुळकर्णी वकिलाच्या चेहऱ्याकडे बघितलं. पण त्याच्या चेहऱ्यावरची निराशा बोलकी होती. पार्वतीकाकू समजल्या. पुढची तारीख पडली होती. खालमानेने कुळकर्णी वकील म्हणाला,"तीन महिने." पार्वतीकाकूंनी बटव्यातून रुपयाचं नाणं काढून वकिलाच्या हातावर ठेवलं आणि म्हणाल्या, "जा बाळा, चहा पिऊन ये. दिवसभर कोर्टात बडबड करीत असतोस, जा, घशाला जरा शेक तरी मिळेल." शहरात चहा चार रुपये झाला आहे हे काकूंना ठाऊक नव्हते. ठाऊक असण्याचे काही कारणही नव्हते. त्या कधी हॉटेलात गेल्या नव्हत्या. पण हे रुपया प्रकरण नेहमीचे होते. काकू प्रेमाने रुपया द्यायच्या. कुळकर्णी वकीलही तो रुपया, "बरं" म्हणून ठेवून घ्यायचा.
कुळकर्णी वकील म्हणजे पार्वती काकूंच्या विनायकचा वर्गमित्र. पुढे शिक्षणासाठी शहरात गेलेला विनायक नोकरी निमित्ताने तिथेच स्थायिक झाला आणि शहरात वकिलीचे शिक्षण पूर्ण करून अविनाश कुळकर्णी ऍड. कुळकर्णी म्हणून गावी परतला होता. हुशार अविनाशने लवकरच व्यवसायात जम बसवला. काकूंची केस त्याने घरची म्हणून, मित्रकर्तव्यापोटी घेतली होती. अर्थात, काकू नेहमी म्हणायच्या," एकदा निकाल आपल्या बाजूने लागू दे बाबा. तुझी सगळी फी मी एकरकमी देईन." तो मंद हसायचा. काकूंच्या पाया पडायचा आणि म्हणायचा," तुम्ही फक्त आशीर्वाद द्या."