जिद्द-३

      ऍड. कुळकर्णीला मारहाण झाली, त्याला हॉस्पिटलात ठेवले आहे हे ऐकून पार्वतीकाकू अंतर्बाह्य हादरल्या. देवासमोर बसून होत्या. देवालाच त्यांनी धारेवर धरले होते.
"कारे बाबा असा छळ मांडला आहेस? असं काय पाप मी केलं होतं? एकदा दृष्टांत घडव आणि  सांगून टाक. मी प्रायश्चित्त घेईन. पण त्या वकिलाच्या जीवावर का उठला आहेस? सच्चाईची काही दुनिया आहे की नाही?"
घडल्या घटनेने देवही मूक-बधीर झाला होता. तो पार्वतीच्या नजरेतून नुसताच आर-पार बघत राहिला. शेवटी पार्वतीकाकू उठल्या. त्यांच्या मनाने घेतले, निदान कुळकर्णी वकिलाला बघून तरी येऊया.
काकू हॉस्पिटलात पोहोचल्या तेव्हा कुळकर्णी वकील जागाच होता. डोक्याला, हाताला पट्ट्या बांधलेल्या. काकूंनी डोळ्याला पदर लावला.
"या काकू," कुळकर्णी वकील हसतच म्हणाला."अहो, काही काळजी करू नका. आत्ता बरा होईन मी."
"माझ्यामुळे तुला उगी मार बसला. पण मी म्हंणते असं का करावं त्यांनी.
"हा..हा..हा.. अहो काकू हा आपला विजय आहे."
"हा? असा? काय डोच्कं फिरलं-बिरलं म्हणायचं काय तुझं?"
"काही फिरलं नाही काकू. चांगलं शाबूत आहे. त्यांचं दांडकं मोडलं, असं भक्कम मडकं आहे माझं."
कुळकर्णी वकिलाला तसं बोलताना पाहून काकूंना हसूच आलं. पण हसू दाबीत त्या म्हणाल्या,
"अरे पण ह्या पट्ट्या आणि बँडेजं बांधली आहेत ती काय डॉक्टरांचा वेळ जात नव्हता म्हणून?"
कुळकर्णी वकील पोट धरून हसला. "ते सोडा काकू. पण आता समोरच्या पार्टीने हार मानल्यासारखंच आहे. कुठलीच मात्रा चालेना आणि आपण खटला हरणार अशी खात्री व्हायला लागली म्हणूनच ते इतक्या खालच्या दर्जाच्या, शेवटच्या उपायाच्या मागे लागले आहेत. तुम्ही काळजी करू नका. आठ-दहा दिवसात मी ठणठणीत बरा होईन. तुम्ही निवांत घरी जा."
कुळकर्णी वकिलाला आवडतात म्हणून खास करून आणलेले रव्याचे लाडू त्यांनी त्याला दिले. कुळकर्णी वकिलाचा अर्धा आजार तिथेच पळाला.

      पार्वतीकाकू घरी परतल्या तशी त्यांच्या मनात पुन्हा वकिलाच्या काळजीने प्रवेश केला. त्याच्या बोलण्यावरून तरी त्याला विशेष मार लागल्याचे वाटत नव्हते. की तो आपल्याला वाईट वाटू नये म्हणून नाटक करीत होता? आणि समजा आत्ता मार लागलाही नसेल पण पुन्हा जीवघेणा हल्ला होणारच नाही कशावरून? आपल्या मुळे वकिलाला प्राण गमवावा लागला तर म्हातारपणी आपल्या तोंडाला काळिमा लागेल. लोक म्हणतील,"म्हातारीला काय तो जमिनीचा तुकडा उरावर घेऊन मसणात जायचं होतं? तिच्या हट्टा पायीच कुळकर्ण्याला प्राण गमवावा लागला.
पण म्हटल्या प्रमाणे खरोखरच १० दिवसात कुळकर्णी वकील ठणठणीत बरा झाला. काकूंना भेटायला आला तेव्हा फक्त कपाळावर एक चिकटपट्टी लावलेली होती. हाताला जखम नव्हती पण जरा सूज दिसत होती. काकूंनी त्याच्या कपाळाला हात लावून पाहिला.
"दुखतंय कारे?" विचारलं. "थोडंसं," तो हसत म्हणाला. काकूंच्या खरखरीत हातातूनही आईची ममता पाझरली. कुळकर्णी वकिलाची आई, तो चवथीत असतानाच, वारली होती. वकिलाचा कंठ दाटून आला पण आपल्या भावना मोठ्या कौशल्याने लपवून हसत - हसत तो म्हणाला," काकू तयारीत राहा. पुढच्या आठवड्यात तारीख आहे."
वकील निघून गेला.

      आता पुन्हा कोर्ट कचेऱ्या सुरू. तांदूळ निवडता निवडता पार्वतीकाकूंचे विचारचक्र सुरू होते. ह्या वयातही सर्व घरकाम त्या स्वतःच करायच्या. नाही म्हणायला एक शाळकरी मुलगी यायची केर-कचरा काढायला आणि विहिरीचं पाणी भरायला. काकू जी काही थोडीफार आर्थिक मदत तिला करायच्या त्यातून तिची शाळेची वह्या पुस्तकं यायची. शाळा फुकटच होती. ती कामं उरकून गेली की दिवसभर काकू घरात एकट्याच असायच्या. सोबत होती ती फक्त गतकाळच्या आठवणींची....

* * *  *

      दारू आणि तमाशाच्या नादात प्रतापराव फारच पुढे निघून गेला. शंकरराव आणि प्रतापरावात काही नाते संबंध उरला नाही. प्रतापरावाने डोक्यात राग घालून संबंध तोडून टाकले ह्याची शंकररावाला खंत वाटायची पण त्याचा स्वभाव मानी होता. तो चुकूनही प्रतापरावाच्या दारात गेला नाही. शेतीची कामं, विहिरीचे काम आणि थोडी फार लोकसेवा ह्यातच त्याचा दिवस जायचा. गावकऱ्यांनी मिळून गावात एक शाळा बांधावी असं त्याला वाटायचं. त्यासाठी थोडी आर्थिक मदत तो करू शकत होता. इतर गावकऱ्यांचीही मने त्याने वळवली होती. पुढच्या वर्षी पाऊसकाळ उतरला की दसऱ्याचा मुहूर्त धरावा असे त्याच्या मनात होते. पण... नियतीच्या मनांत अभद्र विचार होता. विहिरीचा पंप दुरुस्त करायला विहिरीत उतरला असता, विजेचा जोरदार झटका बसून, शंकररावाचा जागीच मृत्यू झाला.

पार्वतीवर आभाळ कोसळलं. विनायक शहरात नुकताच नोकरीस लागला होता. तो धावत आला. पोरकं मूल, आईच्या कुशीत ढसढसा रडला. आख्खा गाव हळहळला. प्रेतयात्रेला गावातल्या प्रत्येक घरातून माणूस आला. प्रतापराव काही आला नाही. विनायकाचे मुंडण पाहून काकूंना भडभडून आलं. ह्या दुःखद प्रसंगात कुळकर्णी वकील विनायकाच्या बाजूस सतत उभा होता.

      शंकररावाच्या मृत्यू नंतर तीन महिन्यातच प्रतापरावाने फास आवळला. मधला बंधारा मोडून शंकररावाच्या शेतात नांगर घातला आणि शंकररावाचं शेत हडप केलं. काकूंनी जाब विचारला तर, "ज्जा कोर्टात... आणि मिळव तुझी जमीन परत." असं उर्मट उत्तर त्याने काकूंच्या अंगावर फेकून त्यांची बोळवण केली. काकूंच्या जीवाचा संताप झाला. विनायक शहरात परतला होता. त्याला ही बातमी लागताच त्याचं पत्र आलं. तो म्हणत होता, "सोड ती श्येतं. शहरात ये. सुखात राहू. उगीच म्हातारपणी त्या चांडाळाच्या कारवायांना बळी पडू नकोस." काकाचा खुनशी स्वभाव, त्याचे तलाठ्याच्या ऑफिसातले संबंध आणि मुळात त्याची स्वतःची शेतीविषयी अनास्था ह्या कारणांनी विनायक कोर्टात जाण्याविरुद्ध होता. पण काकूंनी विचार केला," ही जमीन माझ्या नवऱ्याची आहे. त्याने त्यात रक्त शिंपले आहे. मी फसवाफसवीच्या पापापुढे मान तुकवणार नाही. मी लढेन‍, जमीन परत मिळवेन आणि मगच विनायकाच्या घरी शहरात जाईन."

      कुळकर्णी वकिलाला कळलं तसा तो भेटायला आला. आपण लढूया म्हणाला. दोघांनी मिळून सगळ्या जुन्या-जुन्या अस्सल कागदपत्रांची जुळवाजुळव केली. .....खटला उभा राहिला.

     गेल्या वीस वर्षात अनेक घटना घडल्या होत्या. अनेक चढ-उतार येऊन गेले. खालच्या कोर्टात निकाल विरुद्ध लागला. लगोलग वरच्या कोर्टात धावल्या काकू. ह्या सर्वात शारीरिक ताकद खर्ची होत गेली. गुडघेदुखी, कंबरदुखी मागे लागली. चेहरा सुरुकुतला, हाताची त्वचाही सुरुकुतली. वजन घटलं. लांबची नजर ८-१० फुटांवर आली. हातांमध्ये कंप जाणवू लागला होता. पण मन.... मनांत हाती धगधगती मशाल घेतलेली कणखर पार्वती दुर्गाचं रूप धारण करून होती.

      प्रतापरावाने तलाठ्याच्या कचेरीत पैसे चारून सर्व नोंदी त्याला हव्या तशा बदलून घेतल्या होत्या. शंकररावांच्या खोट्या सहीचे बक्षिसपत्र बनवून घेतले होते.
पण कुळकर्णी वाकीलही इरेस पडला होता. खटला त्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न झाला होता. त्याने प्रतापरावाचा, त्याच्या मोठ्या मुलाचा, मित्र धनाजीरावाचा सर्व पूर्वेतिहास कोर्टात मांडला, तमासगीरणीची साक्ष झाली. खोटं बोलल्यास तुरुंगात जावं लागेल ह्या भीतीपोटी ती खरं-खरं बोलली. ती साक्ष प्रतापरावाच्या विरोधात गेली. खोटं बक्षिसपत्र तमासगीरणीच्या घरीच बनविलं होतं. हौसा तमासगीरणीचा भूतकाळ रंजक होता. पैशाच्या वादातून तिच्या आधीच्या प्रियकराचा खून झाला होता. त्यात तीही तितकीच सामील होती. पण पुराव्या अभावी सुटली होती. ती केस पुन्हा उकरून वर काढली तर तिला ते फार त्रासदायक होणार होते. कदाचित तिचा सहभाग शाबीत होऊन तिला शिक्षाही झाली असती. त्यामुळे कुळकर्णी वकील तिला भेटायला आला आणि ह्या सर्वाची तिला कल्पना दिली तेव्हा ती लगेच प्रतापरावाविरुद्ध साक्ष द्यायला तयार झाली. तलाठ्याच्या कचेरीतही कुळकर्णी वकिलाने मुख्य कारकुनाला प्रतापराव लवकरच लटकणार असल्याची बातमी दिली. आणि स्वतःची मान सोडवून घेण्याचा सल्ला दिला. प्रतापरावाचे एक एक बुरूज  ढासळले. प्रतापराव उघडा पडला. असाहाय्य झाला आणि खटल्याचा निकाल प्रतापरावाच्या विरोधात गेला.

     २० वर्षांनी, वयाच्या सत्तरीत पार्वतीकाकूंना न्याय मिळाला. त्यांच्या सुरुकुतलेल्या चेहऱ्यावर समाधान विलसलं. डोळ्यात आनंदाश्रू तरळले. त्या अश्रूंच्या पार त्यांना शंकररावांचा चेहरा दिसला. कौतुकाने आपल्या पार्वतीकडे पाहणारा. काकू लाजल्या. तसाच आठवला विनायक. थोडासा नेभळट. पण आईवर मनापासून प्रेम करणारा. त्यांनी डोळे पुसले.
     
      निकालाची प्रत हाती घेतलेला त्यांचा वकील समोर उभा होता. ऍड. अविनाश कुळकर्णी. काकूंना मुलासारखाच. काकू अविनाशकडे पाहतंच राहिल्या. गेल्या २० वर्षातील त्यांच्या लढाईतला बिनीचा शिलेदार अभिमानाने समोर उभा होता. चेहऱ्यावर मंद स्मित होतं. पण काकूंना प्रकर्षाने जाणवलं ह्या २० वर्षात अविनाशही वयाच्या उतारावर पोहोचला होता. केस तुरळक पांढरे दिसू लागले होते. नाकावर असलेल्या चष्म्याची भिंगे आता बऱ्यापैकी जाड झाली होती. पोट किंचित सुटलं होतं. खांदे झुकले होते. हालचालीत एकप्रकारचं प्रौढत्व आलं होतं. विनायकाच्या बरोबरीचा, म्हणजे ह्यानेही पन्नाशी ओलांडली असणारंच.
ऍड. अविनाश कुळकर्णीच्या हातावर पार्वतीकाकूंनी चहासाठी रुपया ठेवला. अविनाशने तो स्वीकारला. काकूंच्या पायाला स्पर्श करून म्हणाला, "काकू, आशीर्वाद द्या."

*  *  *  *

       आता विनायक गावी येईल. नातवंड येतील. सूनबाई येईल. सर्वांना घेऊन आपल्या शेतावर जाऊ. गरम-गरम भाकरी आणि वांग्याचे भरीत करू. एक रात्र तिथेच राहू. त्या मातीचा स्पर्श, गंध रोमारोमात साठवून घेऊ.
आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर एकट्याच बसलेल्या काकू विचार करीत होत्या. आनंदी होत्या. बाकावर बसल्या-बसल्या विचारांमध्ये बुडून मध्येच दोन्ही पायांना झोका देत होत्या. भानावर येऊन, कोणी पाहत तर नाही नं? ह्या विचारांनी कावऱ्या-बावऱ्या होत होत्या. शंकररावाच्या आठवणीने व्याकूळ होत होत्या, त्याला समोरच उभा ठाकलेला पाहून झकास लाजतही होत्या. आज काकूंचं विश्व  त्यांच्या अवतीभवती ४-५ फुटात जमलं होतं. सर्वांच्या नजरेत कौतुक होतं.

     गाडी आली तीही रिकामीच होती. गर्दी अशी नव्हतीच. खिडकीजवळची सिंगल सीट मिळाली. मिळाली कसली एका पागोटंवाल्या खेडूताने उठून स्वतःची जागा त्यांना दिली. आणि तो दरवाज्यात जाऊन बाहेर पाय मोकळे सोडून बसला. त्याचं ते भलंथोरलं पागोटं पाहून काकूंना हसूच आलं. पुढच्या स्टेशनवर खिडकीजवळ चहावाला आला असता, चहा ३ रुपये असूनही, काकूंनी कपभर घेतला. गाडी सुटल्यावर त्या डोकं टेकून बसल्या असताना, शेताचा, खटल्याचा विचार करता करता  गार वाऱ्याने त्यांना झोप लागली.

*  *  *  *

        जयसिंगपूर स्टेशनात नुकत्याच शिरलेल्या गाडीच्या C-१२ डब्यासमोर गर्दी जमली होती. स्टेशनमास्तर, २ हमाल रिकाम्या डब्यात शिरले होते. खिडकीजवळच्या सिंगल सीटवर एक म्हातारी डोळे मिटल्या अवस्थेत होती. स्टेशनमास्तरच्या ओळखीच्या एका प्रवासी डॉक्टराने तिला मृत घोषित केली होती. 

तिच्या बोचक्यात ऍड. अविनाश आणि विनायकाचा फोन नंबर मिळाला होता. स्टेशनमास्तर त्या दोघांना फोन लावत होता. सर्व सोपस्कार उरकून म्हातारीचा मृतदेह जनरल हॉस्पिटलच्या शवागारात पाठविण्यात आला.

      म्हातारीच्या पदराआड दडलेल्या हाताने कोर्टाच्या निकालाची प्रत घट्ट धरून ठेवली होती.

प्रभाकर पेठकर

 

 

मराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं
The views expressed here are strictly personal and manogat administration does not necessarily subscribe to them.