पार्वतीकाकूंना चरितार्थाची समस्या नव्हती. मुलगा समंजस होता. शहरात चांगल्या पगारावर नोकरीला होता. वरचेवर काकूंसाठी मनिऑर्डर पाठवायचा. सणासुदीला बायको-मुलांना घेऊन गावी आला की काकूंजवळ चांगली रक्कम सोडून जायचा. आईला विनवायचा,"सोड ह्या कोर्ट कचेऱ्या. आपल्याला काय कमी आहे? शहरात माझ्या जवळ येऊन सुखात राहा." सूनबाईही विनवायची," या नं आई आमच्याकडे. इथे खेड्यात राहण्यापेक्षा, देवाच्या दयेने परिस्थिती उत्तम आहे, एकत्र राहू"
काकू म्हणायच्या," येईन हो येईन. नक्की येईन. पण कोर्टाचा निकाल माझ्या बाजूने लागू दे, मगच येईन."
आईला आणि मुलाला एकमेकांचे मन कळत होते त्यामुळे दूर राहूनही नात्यात कधी कटुता आली नाही. विनायक आला की ऍड. कुळकर्ण्याला भेटूनच जायचा. खटला कुठपर्यंत आलाय? काही आशा आहे का? वगैरे चौकश्या करायचा. अविनाशला फी देऊ करायचा पण अविनाश म्हणायचा," अरे विन्या. हा खटला आता माझ्यासाठी प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. मी पैशासाठी लढत नाहीये. आणि पैसे घेतलेच तर खटला जिंकल्यावर आणि काकूंकडूनच घेईन." विनायकाला भरून यायचे. तोही भूतकाळ विसरला नव्हता.
* * * *
प्रतापरावाने ५० एकर जमीन विकली ही बातमी शंकररावाच्या कानी आली तेव्हा त्याला मोठा धक्का बसला. शंकर जेवला नाही. त्याचे डोळे रात्रभर वाहत होते. पार्वती शेजारीच बसून होती.
"दादाला काय ही अवदसा आठवली. नवीन श्येतं विकत घ्यायची की चांगली आहेत ती विकायची?"
"हं! भावजींची कर्ज फार झालीत असं ऐकलं," पार्वती चाचरत म्हणाली.
"ही दारू आणि तमाशा रसातळाला नेतोय गड्याला. ते काही नाही दोन शब्द बोललच पाहिजे."
दुसऱ्या दिवशी रामप्रहरी शंकर दादाच्या घरी गेला. अंगणातला गोठा रिकामाच होता. मंगळ्या-म्हारत्या कुठे दिसेनात. शंकराच्या मनात पाल चुकचुकली.पण त्याने विचार केला सोडली असतील चरायला. असतील जवळच. जातात कुठं. माणसाला नसली तरी जनावरांना माणसांची, घराची ओढ तगडी असते.
|
दादा ओट्यावरच झोपाळ्यावर बसला होता. "ये,ये शंकऱ्या. इकडे कुणीकडे वाट वाकडी केली म्हणायची?" "काही नाही, असंच," काय बोलावं, कसं बोलावं शंकरला उमगेना. प्रतापराव रोखून बघत होता. काहीतरी विषय चालवायचा म्हणून शंकराने विचारलं,"मंगळ्या आणि म्हारत्या कुठे गेले सकाळ-सकाळ?" |
"आरे! बैस" प्रतापराव म्हणाला."टेक जरा. मंगळ्या आणि म्हारत्याचं काय येवढं घेऊन बसलायस?"
भिंतीलगत दगडी बैठकीवर शंकर टेकला पण त्याच्या मनातून विषय जाईना.
नाही पण दादा, येवढ्या सकाळला जनावरं कुणीकडं नेली?"
"कसली जनावरं आणि कसलं काय. हरामखोर साली. काही कामाची नव्हती. तुज्याकडे नुसती बसून बसून आळसावलेली होती. काही कामच करायला मागीनात बघ."
"मग?" शंकर घाबरला. मंगळ्या म्हारत्याला हरामखोर म्हंटलेलं त्याला आवडलं नाही. हं.. म्हारत्या जरा वांड होता. चारा जास्त खायचा. मंगळ्याशी धक्का धक्की करायचा येता जाता. पण कामचुकार नव्हता.
"देऊन टाकली धनाजीशेटला."
धनाजीशेट म्हणजे तोच ज्याला ५० एकर जमीन विकली होती. प्रतापरावाच्या "बैठकीतला".
"आरे दादा, पण आपली होती ती बैलजोडी. तुला जड झाली होती तर मला परत करायचीस. त्या धनाजीशेठच्या गोठ्यात का म्हणून बांधायची?"
प्रतापराव काही सेकंद कांहीच बोलला नाही. पायाने झोका हलवत नुसता बसून राहिला. त्याने शंकरावर रोखलेली नजर आता हटवली होती.
मग शंकरच्या नजरेला नजर न भिडवता म्हणाला, "जमिनीची बोली बैलजोडीसकट झाली होती." शंकराकडे पाहत पुढे म्हणाला, "आणि तुला तरी काय करायची रे बैलजोडी? ट्रॅक्टर आहे की तुझा जोरात. आता मीही ठरवलय शंकऱ्या, एक ट्रॅक्टर घेऊन टाकायचा.ही बैलांची झंझटच नको, साली."
शंकर धनाजीशेटला चांगला ओळखत होता. स्वतःचा बाप पोसायला जड झाला त्याला. त्याने बापाला गावच्या देवळात दिला सोडून भीक मागायला. तो काय बैलजोडीची काळजी घेणार? शंकरच्या डोळ्यांत पाणी तरळलं. मंगळ्या-म्हारत्यासाठी त्याचा जीव तुटू लागला. तो हताश मनाने परतला. त्याने धनाजीशेठची गाठ घेऊन बैलजोडी परत विकत मागितली. पण धनाजीने दिली नाही. बैलांचे शेवटचे दर्शन घेऊन, त्यांच्या पाठीवर हात फिरवून शंकर परतला. बैलांनी हंबरून साद घातली पण पुन्हा मागे वळून बघण्याचं त्याला धाडस झालं नाही. डोळ्यांचं पाणी काही केल्या थांबेना.
पुढे प्रतापने ट्रॅक्टर तर काही घेतलाच नाही. शेती विकून आलेल्या पैशातले अर्धे पैसे कर्जफेडीत गेले. उरलेले तमासगिरिणीवर उधळले. दोन भावांतले संबंध तसे संपुष्टातच आले होते. पण एक दिवस प्रतापराव स्वतः शंकररावाकडे आला. हसत हसत इकडच्या-तिकडच्या गप्पा मारू लागला. शंकररावाला कळेना हे काय प्रकरण आहे? दादाचा मनसुबा काय? चहा पाणी झाल्यावर प्रतापरावाने मिशा पुसत पुसत धाकट्या भावाकडे ट्रॅक्टरची दोन दिवसांसाठी मागणी केली.
म्हणाला, "मागचं सगळं विसर गड्या. आता मी इमानदारीत मेहनत करायचं ठरवलय."
पण ह्या वेळी शंकर बधणार नव्हता. त्याने स्पष्ट शब्दात नकार दिला. प्रतापरावाने खूप विनवण्या केल्या. स्वयंपाकघराच्या दरवाजाआड वहिनी उभी होती. शंकरराव बधत नाही म्हंटल्यावर प्रतापराव उसकला. शंकऱ्याला बरंच उलट-सुलट बोलला. बायकोच्या पदराआड शहाणपणा शिकतोय म्हणाला. शंकरारावाने हात जोडून दादाला जायला सांगितलं. प्रतापरावाचा अपमान झाला. धाकट्या वहिनीमुळे.... असा त्याने ग्रह करून घेतला.
दोन भावांमध्ये कायमचा दुरावा निर्माण झाला. प्रतापरावाने 'सख्खा भाऊ उलटला', 'बाईच्या अकलेने चालतो' असा बराच कांगावा गावभर केला. पण शंकररावाची पुण्याई कमी नव्हती. प्रतापरावाकडे गावकऱ्यांनी दुर्लक्ष केलं.
* * * *
ह्या सर्व गोष्टी पार्वतीकाकूंना अगदी काल घडल्यासारख्या लख्ख आठवत होत्या. गावाकडून दर तारखेला न चुकता कोर्टात यायचं. केस पुकारे पर्यंत ताटकळत बसायचं, नव्या प्रश्नांना उत्तरं द्यायची, पुन्हा कुळकर्णी वकिलाची वाट पाहत व्हरांड्यात बसून राहायचं. हे सर्व आता, गेल्या २० वर्षात, त्यांच्या अंगवळणी पडलं होतं. दरवेळी काही न् काही कारणाने पुढच्या तारखा पडायच्या. जज बदलले, कारकून बदलले, काकू म्हाताऱ्या झाल्या.
खालच्या कोर्टात खटल्याचा निकाल विरुद्ध गेला तेव्हा काकू खचल्या. लढण्याची , जगण्याची उमेद ढासळू लागली. पण कुळकर्णी वकिलाने मानसिक आधार दिला. "आपण वरच्या कोर्टात दाद मागू" म्हणाला. "तुम्ही मनाने हरू नका. खंबीर राहा. आज न उद्या सत्याचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही."
पार्वतीकाकूंचा विनायक मात्र ह्या सर्वाच्या विरोधात होता. "जमिनीच्या तुकड्यापेक्षा आईचा जीव जास्त मोलाचा आहे. तिचं स्वास्थ जास्त महत्त्वाचं आहे," असं त्याला वाटायचं. शहरातील दोघांचीही नोकरी सोडून गावात परतणं त्याला शक्य नव्हतं. त्याच्या जीवाची घालमेल व्हायची. पण ऍड. कुळकर्णीने त्याला समजावलं, "प्रश्न फक्त जमिनीचा नाही. आईच्या निर्धाराचा आहे. तुझ्या वडिलांनी त्या जमिनीवर केलेल्या प्रेमाचा आहे."
गावातील काही नतद्रष्टांनी कुळकर्णी वकील विरुद्ध पार्टीला,प्रतापरावाला, सामील आहे अशी बातमी पसरवली. पार्वतीकाकूंची मनःस्थिती द्विधा झाली. पण वेळीच कुळकर्णी वकील भेटायला आला. म्हणाला," काकू जसा तुम्हाला विनायक तसाच मी. मुलगा आईला फसवेल का? माझ्याकडून तसे पाप कदापि घडणार नाही. तसा काही विचार मनात यायच्या आधीच मी वाकिली सोडून घरी बसेन. तुम्ही निश्चिंत राहा. अहो, आपण ही केस जिंकू ह्या भीतीपोटीच प्रतापराव मुद्दाम अशा बातम्या पसरवतो आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. मी काही नवीन धागेदोरे, पुरावे आणले आहेत. प्रतापरावाचे साक्षीदार फोडले आहेत. निर्णायक घाव घालण्याची हीच वेळ आहे. तुम्ही धीर सोडू नका."
केस वरच्या कोर्टात दाखल झाली.
त्या रात्री गावात वकिलाला मारहाण झाली. कुळकर्णी वकील हॉस्पिटलात भरती झाला.