बाहेरची कामे आटोपून दुपारचा घरी आलो व जेवायला बसणार इतक्यात कुरियरवाला आला. "जिनी जॉनी ऍपरल्स" नावाच्या कुठल्यातरी तयार कपड्यांच्या दुकानाकडून 'धाकट्या मुलीचा वाढदिवस येतोय व त्यासाठी कपडे घ्यायला आमच्याच दुकानात या' असे आग्रहाचे निमंत्रण होते. आपले उत्पादन विकण्याचा हा अनोखा प्रकार पाहून, आश्चर्याने बोटेच नव्हे, आख्खा हात तोंडात घालायची वेळ आली..... मागे कधीतरी सौने मुलींसाठी त्यांच्या दुकानातून कपडे घेतले होते व त्यांनी अगत्याने दोन्ही मुलींचे वाढदिवस नोंदवून घेतले होते. तेव्हापासून वाढदिवसाची आठवण करणारी पत्रे, वाढदिवसाच्या दिवशी छोटेसे शुभेच्छापत्र व सणासुदीसाठी तयार कपडे आमच्याकडूनच घेण्याचा लकडा लावणारी पत्रे सातत्याने येतात, असे सौने सांगितले.
आमच्या बालपणीचा काळ झर्रकन डोळ्यासमोरून गेला.... दिघूकाकांकडे अर्धा मीटरचे कापड दिले की बुशकोट तयार होऊन घरपोच यायचा. संक्रांतीला टाकलेला सदरा दिवाळीला मिळेल या बेताने माप व कापड दिघूकाकांना दिले की त्यांना कडकी कधी लागते ह्याची वाट बघत बसायची. कडकी लागली की हा माणूस फटाफट जुन्या 'ऑर्डर्स'पूर्ण करायचा !
दिघू नाईक, खरं नाव दिगंबर असावे; पण आम्ही सर्वच त्यांना 'दिघूकाका' म्हणायचो, 'ग' चा अपभ्रंश 'घ' कसा झाला ते त्यांनाही कधी कळले नाही. आई 'दिघू भाऊजी' म्हणायची व दादा (ते समोर नसताना) 'दिघ्या' म्हणायचे ! ही एक वल्लीच होती. एक तासावर एका जागी बसून त्यांनी कधी काम केलेच नसेल. अर्धा पाऊण तास कपडे शिवून झाले की, मग एक चक्कर मारण्याच्या निमित्ताने ते उठत व चांगले तासभर गायब होत. ह्या वेळेत त्यांची 'सोशल' कामेच अधिक होत असत. रस्त्यावरून आल्या-गेल्याला हाका मारून, शिवणयंत्राच्या बाजूला डुगडुगणाऱ्या लाकडी स्टूलवर बसवून, कंटाळा येईपर्यंत गप्पा मारायचा त्यांचा जोडधंदा होता. तसे त्यांचे जोडधंदे बरेच होते..... ओळखीच्या कुटुंबापैकी कोणी निवर्तल्यावर तिरडीचे सामान आणून, ती बांधून, त्याचा अग्निसंस्कार होईपर्यंत दिघूकाका नक्की थांबायचे. कोणाच्या मुलाला मुंबई-पुण्याला महाविद्यालयात दाखला मिळाला की, आपल्या ओळखीच्या मंडळींचे पत्ते ते त्या मुला/मुलीला देत व 'काही अडीअडचण आली तर बेधडक माझे नाव घेऊन जा, तुला तो नक्की मदत करील,' असे आश्वासन देत. माझी मोठी बहीण केईएमला असताना तिच्याकडे पेशंट्स पाठवायचे कार्य ते आवडीने करीत. मधल्या बहिणीला स्टेट बॅंकेत नोकरी मिळताच जेवढा आनंद माझ्या आई-वडिलांना झाला असेल, त्याच्या द्विगुणित आनंद त्यांना झाला. रस्त्यात कोणीही भेटला व तो स्टेट बॅंकेत जात असेल, तर "अरे, जयूला सांग काम करायला, म्हणावं दिघूकाकांनी पाठवलंय." त्यांचा शब्द कोणीच कधी खाली पडू दिला नाही; यात त्यांच्या व्यावसायिक श्रेयाइतकेच त्या व्यक्तीच्या स्वभावाचे श्रेय असावे. गंमत म्हणजे फक्त आमच्याच कुटुंबाशी नव्हे; तर आसपासच्या बहुतांश कुटुंबांशी त्यांचे तेवढेच जिव्हाळ्याचे संबंध होते.
भुसावळला, आमच्या मागच्या वकील गल्लीतल्या, प्रथितयश नाईक वकिलांच्या वाड्यात, जिन्याखाली जेमतेम ५ बाय ८/१० च्या खोपटात, ह्या माणसाने कपडे शिवण्याचा व्यवसाय सुरू केला, तेव्हा माझा जन्मही झाला नव्हता. दिघू, सुधा व बाळा ही तीन भावंडे. आई-वडील अगदी लहानपणी गेलेले, नाईक वकिलांनी आसरा देऊन मोठ्याचे बस्तान बसवले. मग दिघूकाकांनी सुधाकाकांना मदतीला घेतले. बाळाकाका रेल्वेत तिकीट तपासनिसाच्या नोकरीला लागले. या सर्व त्यांच्या कुटुंबाबद्दल माझ्या बालपणाच्या आठवणी. कायम अर्ध्या बाह्यांचा स्वतः शिवलेला सदरा व पांढरा पायजमा हा त्यांचा पोशाख ! बुटकी म्हणण्याइतपत सर्वसाधारण उंची, मध्यम शरीरयष्टी, पुढचे दोन दात.... मला आठवते तेव्हापासूनच पडलेले, पांढरेशुभ्र केस व सुपारीच्या खांडाचेही व्यसन नसलेला हा माणूस मला लहानपणापासून आवडायचा.
शिवलेले कपडे देण्यावरून मात्र माझे त्यांच्याशी चांगलेच वितुष्ट होते. एकदा शाळेच्या गणवेशाची चड्डी त्यांच्याकडे शिवायला टाकली. मे महिन्यात कापड आणून दिले होते; पण साहेबांनी शाळा उघडून महिना झाला तरी चड्डी शिवून दिली नव्हती. आदल्या वर्षाची चड्डी एक तर तोकडी पण होत होती व ढुंगणावर दोन तीन वेळा रफू करूनही झाली होती. रफू केलेला भाग लपवण्यासाठी काही दिवस 'शर्ट इन' न करता शाळेत जायचो, पण एकदा फटके पडल्यावर थेट दिघूकाकांकडे जाऊन रडत उभा राहिलो......ज्यांनी फटकवले ते बी. टी. पाटीलसर नेमके समोरून जात होते. मी डबडबलेल्या डोळ्यांनी व रडक्या स्वरात पाटीलसरांचे नाव दिघूकाकांना सांगताच, ते तडक शिवणयंत्रावरून उठले व "ए भागवत, इकडे ये," अशी सणसणीत हाक मारली. तेव्हा दिघूकाकांना "चड्डी नको; पण संताप आवर," असेच सांगावेसे वाटले. पुढे कधी त्या गणिताच्या बी. टी. पाटीलसरांकडून मार खाल्ल्याचे मात्र आठवत नाही !
पांढऱ्या रंगावर गुलबट छोटे गोळे असलेले एक सदऱ्याचे कापड मला मावशीने दिले व याचा चांगल्यातला 'शर्ट' शीव, असे मला सांगितले. बघताच क्षणी मला ते कापड आवडले होते. कधी एकदाची ही मावशी जाते व कधी आपण ते कापड दिघूकाकांकडे नेऊन पोहोचते करतो, असे मला झाले होते. अगदी टेचात "माझ्या मावशीने 'शर्ट' साठी मला हे कापड आणले आहे," असे दिघूकाकांना मी सांगितले व 'लवकरात लवकर 'शर्ट' शिवा' असा हुकूम देत मी तेथून गेलो खरा; पण ते तो सदरा कितपत लवकर देतील, ही शंकाच होती. नेहमीप्रमाणे दिघूकाकांकडे वाऱ्या सुरू झाल्या..... "तू शाळेतून ये, तोवर कापड 'कट' करून ठेवतो," हे त्यांचे वाक्य, त्यांच्या लकबीसह मला तोंडपाठ झाले होते. 'शर्ट' चे कापड मी जवळपास रोज जाऊन बघून येत असे...... हळूहळू नव्या कापडाचे नावीन्य नाहीसे होत गेले व मला दिघूकाकांकडे त्या सदऱ्यासाठी जाण्याचा विसरही पडला.