सकाळी एकदम जाग आली आणि काहीतरी बिघडल्याची जाणीव झाली. तसंही सकाळी जाग येताना माझ काहीतरी बिघडलेलं असतंच.कधी डोके ठणकत असतं, तर कधी कानातून आवाज येत असतो, तर कधी नाक सुरसुरायला लागतं. काहीच नसलं, तर निदान माझा मूड तरी बिघडलेला असतो असं सौभाग्यवती सुमतीचे मत ! "माझ्या मूडकडे इतकं कसं काय लक्ष देऊ लागलीस?" असं विचारायला गेलं तर तिचाच मूड बिघडायचा म्हणून, तसं विचारत नाही. त्यामुळे या नियमित बिघाडापेक्षा खरेच काही अधिक भयंकर होत असेल तरच तिकडे लक्ष द्यायचे, असं मी ठरवून टाकले आहे. त्यादिवशीची परिस्थिती गंभीर या सदरात मोडण्यासारखी असली, तरी नेमके कारण लक्षात येईना. पण दात घासण्यासाठी टूथपेस्टसह टूथब्रश तोंडात घातला मात्र, एकदम चारशे व्होल्टचा तीव्र झटका बसावा असे झाले. आणि मग लक्षात आले की दुखण्याचे उगमस्थान दातात आहे.
अशावेळी दंतवैद्याकडे जाणे योग्य असले, तरी तो आपले क्लिनिक उघडे ठेवून यावेळी माझी वाट पाहत बसला असण्याची शक्यता नसल्यामुळे शेजारीच राहणाऱ्या डॉक्टर मित्राकडे जावे, असे ठरवून त्याच्याकडे धाव घेतली.त्याच्या घराची घंटी दाबली, पण दरवाजा न उघडल्यामुळे ती वाजली नसावी म्हणून पुन्हा जोरात दाबली आणि मला बाहेर स्पष्ट ऐकूही आली. पण माझ्या मित्राच्या घोरण्याच्या आवाजापुढे ती कदाचित नगाऱ्यापुढे टिमकीच ठरली असावी. "त्यामुळे आता काय करावे?" म्हणून गालावर हात ( दात दुखत असल्यामुळे) दाबून उभा राहिलो. पण या संकटातून त्याच्याकडे येणाऱ्या दूधवाल्या भय्याने माझी सुटका केली. कारण, त्याला माझ्या मित्राची अथवा त्याच्या पत्नीची अथवा त्या दोघांच्या संयुक्त घोरण्याची पट्टी आणि त्यावर मात करण्यासाठी आपला आवाज किती चढवावा लागतो, याची परिपूर्ण कल्पना असल्यामुळे, त्या पट्टीत त्याने "दूऽऽध!!" अशी आरोळी ठोकताच काही क्षणातच दरवाजा थोडासा किलकिला झाला. आणि त्या फटीतून एक हात पातेल्यासह बाहेर आला. त्यावेळी प्रसंगावधान राखून भय्याने मला मागे खेचले नसते, तर शिवरायाच्या वाघनखाने अफझलखानाची जी अवस्था केली तीच माझी झाली असती आणि दुसऱ्याच हॉस्पिटलात मला दाखल करावे लागले असते. भय्याने मला त्या संकटातून वाचवले येवढेच नव्हे तर बाहेर आलेल्या हाताच्या मालकाला झोपेतून शुद्धीत आणून त्याच्या पुढ्यात ढकलण्याचे महत्कार्यही पार पाडले.
अशा अवेळी मला आपल्या दारात पाहूनही माझा मित्र मात्र अगदी शांत होता.रोग्याला कितीही भयंकर रोगाने पछाडले असले, तरी डॉक्टराने मात्र कसे शांत राहावे, याचा आदर्शच जणूतो मला दाखवत होता. आत शिरून कोचावर स्थानापन्न झालो आणि मित्रमहाशय आत अंतर्धान पावले ते एकदम हातात चहाचे दोन कप घेऊनच बाहेर आले. माझ्या पुढ्यात चहाचा कप ठेवत त्याने विचारले," बोल! आता, इतक्या सक्काळी सक्काळी काय काम काढलंस ?" मी सकाळपासून मला होणाऱ्या भयंकर त्रासाचे वर्णन करू लागलो तर मला सहानुभूती न दाखवता हा पठ्ठ्या चक्क हसू लागला अन् वर म्हणतोय कसा ," उगीच थापा मारू नकोस माझा नाही विश्वास बसत तू काय सांगतोस त्यावर ." अर्थात प्रसूतितज्ज्ञ असल्यामुळे त्याला याहून खरच अधिक वेदना होणाऱ्या रोग्यांना पाहण्याची सवय असण्याचा तो परिणाम ! त्यामुळे मी त्याला माफ करून त्याच्या हास्याची उकळी थांबण्याची वाट पाहत बसलो.पण मग आपल्या पेशाला जागून त्याने मला 'आ' करायला सांगितल्यावर जो 'आ' मी केला त्याचा परिणाम होऊन त्याचा बहुतेक माझ्या सांगण्यावर विश्वास बसला असावा. कारण पुराणातील राक्षसाने अथवा मगरीने समोरील प्राण्यास गिळण्यासाठी 'आ' वासावा, तसा मी जबडोद्घाटन केले होते. डॉक्टर लोकाना तोंड उघडायला सांगितल्यावर असेच तोंड उघडण्याची सवय मी लावून घेतली आहे. कारण आपला साधा 'आ' त्याना मुळीच पसंत पडत नाही.रुग्णाच्या तोंडात शिरून त्याला काय होतेय, याचा शोध त्यांना घ्यायचा असतो की काय न कळे. माझ्या मित्राने मला तोंड बंद करायला सांगितले. श्रीकृष्णाच्या तोंडात विश्वरूप दर्शन झाल्यावर यशोदामय्याने केला असेल तसा गंभीर चेहरा करीत, मान हालवीत ' ओ,टेरिबल ' म्हणून मला न कळणाऱ्या अगम्य इंग्रजीत तो काहीतरी बडबडला. दुखण्याचे निदान करताना हे लोक बहुधा इंग्लिशचा आधार घेतात,त्यामुळे त्याना काही कळले नाही हे रोग्याला कळत नाही अशी त्यांची समजूत असावी. अर्थात, मातृभाषेतही ते अशाच अगम्य शैलीत बडबड ते करू शकतात म्हणा. काही डॉक्टर पेशंटला काय होते, हे विचारण्याचे श्रम घेतात. तर काही मात्र ते काम पूर्णपणे आपलेच आहे असे समजतात. माझा हा मित्र त्या वर्गात मोडत असल्याने त्याने ताबडतोब निदान जाहीर केले,"तुझ्या टॉन्सिल्स खूपच वाढल्या आहेत. त्याचाच हा परिणाम. तेव्हा डॉ. देशपांडेकडे जा मी चिठ्ठी देतो तो लगेच ऑपरेशन करून तुला मोकळे करील."
"पण मग माझ्या दातांच काय ? त्यावर काही तडकाफडकी इलाज केला नाही, तर टॉन्सिल्स काढण्यासाठी तरी मी जिवंत राहीन की नाही शंका आहे," माझ्या आवाजाला उपरोधाची धार लावत मी उद्गारलो.
" अच्छा, तर मग तुला टॉन्सिल्स वाढून मरण्याची इच्छा आहे तर !" मित्राने आपणही उपरोधिक बोलू शकतो हे दाखवत म्हटले.
" नाही. त्यापूर्वी तुला मारून मग काय होईल ते पहावं असा विचार करतोय," माझ्या सहनशीलतेचा अंत झाल्यामुळे मी म्हणालो. " शांत हो मित्रा असा धीर सोडू नको, दातांचंही काय करायचं ते आपण बघूया. आता परत एकदा तोंड उघड बरं, " आपला शांतपणा न सोडता मित्र वदे .पुन्हा जबडोद्घाटन व विश्वरूपदर्शन झाले.मी तोंड मिटल्यावर, समाधानाने मान हालवीत मित्र म्हणाला," गुड न्यूज ." माझ्या तोंडात पाहून याला काय चांगली बातमी मिळाली? मला समजेना. हिंदी चित्रपटात वा कुठल्याही दूरदर्शन मालिकेतील 'आता बरी होती की नव्हती' असे म्हणावे अशी बहू अथवा बेटी एकदम चक्कर येऊन पडते, की तिचे आईवडील सासू सासरे इ. जे हजर असणारे लोक तिला धावतपळत डॉक्टरकडे नेतात.काय भानगड झाली असावी ? हे आपल्यासारख्या दररोज मालिका बघणाऱ्या अथवा कधीही न बघणाऱ्या चाणाक्ष दर्शकांच्या झटकन लक्षात येते. पण ही मंडळी मात्र आता डॉक्टर हा प्राणी काय बातमी आणतोय याची चिंतातुर मुद्रेने वाट पाहत असतात.तेवढ्यात तो डॉक्टर एखादी सोन्याची खाण सापडल्यासारखा चेहरा करत तेथे येऊन एकदम "गुड न्यूज " असे गोड शब्द उच्चारतो आणि सर्वाना "ती" गोड बातमी देतो.
कधीकधी मुलीचे लग्न झालेले नसल्यास ही गुड न्यूज बरीच धक्कादायकही ठरू शकते ही गोष्ट वेगळी. पण माझ्या बाबतीत हा डॉक्टर मित्र काय "गुड न्यूज" देतोय याची मला उत्सुकता वाटू लागली." अरे चांगली बातमी म्हणजे तुला अक्कल येऊ लागलीय," मित्रवर्यांनी स्पष्टीकरण केले.
"म्हणजे आत्तापर्यंत नव्हती की काय ? आणि हे तुला माझ्या तोंडात पाहून कसे कळले ?" आता माझ्या मित्राच्याच अकलेविषयी मला शंका येऊ लागली. "अरे मूर्खा, याचा अर्थ तुला अक्कलदाढ येऊ घातलीय ,सॉरी पण त्याचा तुझ्या अक्कल येण्याशी संबंध लावल्याबद्दल माफ कर,कारण त्यामुळे तुझ्या अकलेचा दुष्काळ मात्र थोडाही कमी झालेला दिसत नाही," माझ्या दुःखात भर टाकत तो म्हणाला.
"पण माझ्या या दुखण्याचे काय, त्यावर काही उपाय करणार आहेस का?" मी गालावर हात दाबत विव्हळलो. "ते मात्र इथं शक्य नाही " मित्र तेवढ्याच शांतपणे.
" मग तुझ्या नावापुढे लिहिलेल्या त्या लंब्याचवड्या पदवीच्या अक्षरांचा उपयोग काय?" रागारागाने मी तणतणलो.
" मी येथे काही करू शकत नाही, म्हणजे त्यासाठी आपल्याला माझ्या दवाखान्यात जावे लागेल. मग तेथे मी तुला जालिम विषदेखील देईन,"मित्राने मुक्ताफळे उधळली. "पण त्यामुळे माझी दाढदुखी थांबणार का ?" मी त्याचा उपरोध दुर्लक्षित केला. "अरे दाढदुखीच काय सगळ्याच यातनांतून तुला मुक्ती मिळेल !" आता माझ्या मित्रात आसारामबापू अथवा अशाच बापूचा, वा बाबाचा संचार झाल्याचा भास मला झाला.
घराच्याच शेजारी असणाऱ्या आपल्या दवाखान्यात नेऊन, त्याने माझ्या दुखणाऱ्या दातावर कसल्याशा द्रवात कापूस बुडवून, बोळा माझ्या दाताच्या पोकळीत ठेवल्यावर हळूहळू माझा ठणका व संताप जरा कमी झाला. " पण हा तात्पुरता इलाज आहे,जमेल तेवढ्या लवकर देशपांडेकडे जाऊन दात वाचतो का बघ,"मित्राने मला सल्ला दिला.
आता मी बराच ताळ्यावर आलो होतो. त्यामुळे मघाशी टॉन्सिल्स काढण्यासाठी त्याने देशपांडेची शिफारस केली होती, हे मी त्याच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर त्याने "तो देशपांडे वेगळा," असे सांगितल्यावर आपण दातांऐवजी टॉन्सिल्स गमावणार नाही, अशी खात्री होऊन मी निर्धास्त झालो व इतकावेळ त्याला दिलेल्या बऱ्याच शिव्या व त्रास याची भरपाई करण्याच्या हेतूने म्हणालो,"अरे,तुझ्या वहिनीने जेवायला बोलावले आहे तुम्हा दोघाना , केव्हां येताय बोला."
"ते तुझ्या वहिनीला विचारून कळवतो," मित्राने माझ्याच भाषेत उत्तर दिले.