दुसऱ्याच दिवशी दातांच्या डॉ. देशपांडेंकडे जाणे, हे क्रमप्राप्तच होते. खरं तर सौ. सुमतीचा आधार बरोबर असावा, अशी इच्छा होती. पण असं म्हटल्यावर " आता काही कुक्कुलंबाळ राहिला नाहीत" अशा शब्दांत माझी बोळवण झाली. शिवाय लग्नापूर्वी ती नाकातलं हाडसुद्धा एकटी जावून काढून आली होती, अशी तिची कीर्ती तिच्या आईबाबांनी माझ्या कानावर घातली होती. अशा धाडसी स्त्रीचा नवरा शोभण्यासाठी, अगदी कारगिल युद्धात भाग घेतला नाही, तरी निदान स्वतःचा दात काढायला तरी एकट्यानं जावं, अशी तिनं अपेक्षा करणं तसं काही अयोग्य नव्हतं. तसा दात काढून घेण्याचा अनुभव माझ्या गाठीस नव्हता, असे नाही. यापूर्वीही दोन दातांचा बळी गेलेलाच होता. पण त्यावेळीही आमचा पिंटू ( अर्थात, त्यावेळीच त्याला आम्ही 'पिंटू' म्हणत होतो. आता त्याला अनिरुद्ध असेच म्हणावे लागते.) छोटा होता आणि खरे सांगायचे झाले, तर त्याचाच दात दुखतोय, म्हणून आम्ही दातांच्या डॉक्टरकडे गेलो होतो. आणि त्याचा दात डॉक्टरने हसतहसत ( म्हणजे पिंटूसुद्धा हसत होता, डॉक्टर तर काय आम्ही दवाखान्यात पाय ठेवल्यापासून हसतच होता.) काढलेला पाहून मी पण धाडस करून माझाही दात काढून घेतला. म्हणजे अगदी एखाद्या लग्नात घरातल्या लहान मुलाची मुंज उरकून घेतात तशीच परिस्थिती. फक्त येथे मुलाच्या मुंजीत घरातल्या मोठ्या माणसाचे लग्न उरकून घ्याव असा प्रकार झाला एवढेच !
डॉ. देशपांडेच्या दवाखान्याच्या रस्त्यावर जवळजवळ एकूणएक इमारतीत दवाखाने होते आणि त्यापैकी एकूणएक दातांचे होते. डॉक्टरांची संख्या फारच वाढल्याचे यावरून सूचित होत होते.एवढे दवाखाने चालत असतील, तर त्यावरून एकूणच जनतेचे आरोग्य फारच बिघडले असावे किंवा मग लोक आपल्या आरोग्याविषयी खूपच जागरुक झाले असावेत, असे मला वाटून गेले. डॉ.देशपांडे यांच्या क्लिनिकचे नाव वाचून मात्र माझ्या छातीत धडकी भरली. कारण, नाव होते एकदंत क्लिनिक. आता हे विघ्नहर्त्या गजाननाचे नाव असलं तरीही पेशंटच्या दातांच्या भावी परिस्थितीचे अगदी अयोग्य दिग्दर्शन त्या नावातून सूचित होत होते. म्हणून अथर्वशीर्षाचाच जप करत मी वरच्या मजल्यावरील क्लिनिककडे जाणाऱ्या पायऱ्या चढू लागलो.इमारत दोन मजली असल्याने त्याला लिफ्ट नव्हती आणि तो जिनाही इतका अरुंद होता, की त्यावरून घसरून पडून बऱ्याच लोकांचे दात दवाखान्यात प्रवेश करण्यापूर्वीच पडत असतील, अशी शंका मनात चमकून गेली. त्यामुळे हायवेवर ज्याप्रमाणे प्रवेश करतानाच टोल वसूल करण्याचा नाका असतो, तसे जिन्याच्या खालच्या पायरीवरच दात पाडण्याचे बिल वसूल करायला डॉक्टरनी एखादा असिस्टंट ठेवावा, अशी सूचनाही करण्याचा विचार मी केला. पण, पुढे मात्र मला तो विचार तहकूब करावा लागला. कारण मी वर पोचल्यावर 'डॉक्टर आज येणार नाहीत' अशी पाटी क्लिनिकच्या दारावर लावलेली पहायला मिळाली.
डॉ.देशपांडेच्या दवाखान्यातून मी थोड्याशा सुटकेच्या भावनेनेच बाहेर पडलो. कारण बायको भांडू लागली म्हणजेच जसा संन्यास घ्यावा वाटतो, तसा दात दुखू लागला म्हणजेच काढून टाकावा वाटतो. दात दुखणे बंद झाले की मग दाताचा विरह नको वाटेनासा होतो. पण मी जिन्यावरून खाली पाय ठेवताच माझा एक दुसरा मित्र समोर अचानक दत्त म्हणून उभा राहिला. आणि दुर्दैवाने याची बायकोच डेंटिस्ट होती. आमच्या सर्व मित्रमंडळीतील कोणाच्याही दाताकडे त्याचे बारीक लक्ष असे. त्यामुळे आम्ही दोस्त त्याच्यापुढे दाताचा विषय चुकूनही निघणार नाही याची दक्षता घ्यायचो. चुकून एखादा गालावर जास्त माया करतोय, असे त्याच्या निदर्शनास आले की झालेच ! नुसत्या संशयावरून गुन्हेगारास अटक करून गजाआड दाखल करणाऱ्या पोलिसापेक्षा जास्त चपळाईने, तो त्याला आपल्या बायकोच्या दातखान्यात दाखल करीत असे. मग आता तर मी अगदी रंगे हात पकडला गेलो होतो. त्यामुळे माझी सुटकाच नव्हती.
"काय डॉ.देशपांडॅकड गेला होतास की काय ?" आता तर त्याला माझा पुळका येण स्वाभाविकच होतं. त्याला टाळणं मला आता शक्यच नव्हतं. " अरे, मग घरच्या डॉक्टरला सोडून त्याच्याकडे कशाला गेला होतास ? परवा विन्याचं रूट कॅनाल करता-करता त्याच्या चांगल्या दातांची त्यानं पार वाट लावली. माहीत आहे ना?" हा बहुतेक सगळ्या दंतवैद्यांच्या कुंडल्या घेऊन फिरत असावा. " बरं झाल सुटलास त्याच्या तडाख्यातून , चल आता माझ्याबरोबर. सीमा आता अगदी एक्स्पर्ट झालीय बघ. बघ आता तुला दात काढलेलं कळणार सुद्धा नाही." चला, 'आलिया भोगासी असावे सादर' म्हणत, कसायाच्या बरोबर जाणाऱ्या बोकडासारखा, मी त्याच्या पाठोपाठ त्याच्या बायकोच्या दातखान्यात शिरलो.
सीमावहिनीनी फारच प्रेमळ विचारपूस केल्याने मला बराच धीर आला. आणि त्यांनी अगदी योग्य तोच दात काढायचा सल्ला दिल्यावर आपली परिस्थिती अगदी चिमणराव आणि गुंड्याभाऊसारखी होणार नाही, याची खात्री पटली. खरं तर त्या दाताजवळचे दोन दात अगोदरच स्वर्गवासी झाले होते. त्यामुळे वहिनींनी भुलीचे इंजेक्शन दिल्यावर, कदाचित मी आपल्या हातानेसुद्धा उपटून माझा दात काढू शकलो असतो. पण, तज्ज्ञाला मान द्यायचा म्हणून, मी त्यांना ते काम करू दिले. या वहिनींच्या हातचलाखीमुळे माझा त्यांच्यावरचा विश्वास बराच वाढला. आपण उगीचच घाबरत होतो आणि इतक्या चांगल्या डॉक्टराविषयी उगीचच गैरसमज करून घेत होतो, असे मला वाटूही लागले.
" आता तुम्ही त्या चार दातांच्या जागी डेंचर का बसवत नाही? एवढ्या मोठ्या पोकळीमुळे तुम्हाला त्या बाजूने खायला अडचण होणार, " वहिनींनी सल्ला दिला . अर्थात मीही नेहमीच्या पद्धतीने हा सल्ला शिरोधार्य मानला आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी यायचे कबूल केले. खरं तर, एकदा मित्राच्या आग्रहाचा मान राखून मित्रकर्तव्य बजावल्यामुळे, दुसऱ्या दिवशीही जाण्याचे बंधन माझ्यावर नव्हते. पण शब्दाला जागण्याच्या माझ्या घातक सवयीला
अनुसरून, मनात नसूनही, माझे पाय सीमावहिनींच्या दातखान्याकडे वळलेच. मित्राची पत्नी असल्यामुळे मला दवाखान्यात खास दर्जा असल्यामुळे, फारशी वाट न पाहता मला लगेचच प्रवेश मिळत असे. मी आत जाताच त्या प्रशस्त खुर्चीत स्थानापन्न झालो. मग एका विशिष्ट प्रकारचे रोगण तयार करून, त्यावर दातांचे ठसे घेण्याचे काम मित्रपत्नीने केले आणि तीन चार दिवसात डेंचर तयार होईल, असे सांगितले आणि मला घरी जाण्याची परवानगी मिळाली. चौथ्या दिवशी मला दूरध्वनीवरून डेंचर तयार झाल्याची खबर मिळाली आणि मी तडकाफडकीने ते बसवूनही आलो आणि इतके दिवस 'घी देखा, लेकिन बडगा नही देखा' याचा अनुभव आला कारण डेंचर हा प्रकार केवळ शोभेचाच असतो हे प्रत्ययास आले. डेंचरमुळे टाळ्याचा बराच भाग झाकला गेल्याने चव घेऊन जेवणे वा खाणे शक्यच नसायचे. पण खरी डोकेदुखी आणखीच वेगळी. म्हणजे डेंचर जरा सैल असल्यामुळे, जेवताना घासाबरोबर डेंचरही गिळले जाऊन, कदाचित श्वास कोंडून आपला जीव जाण्याची धास्ती मला वाटू लागली. म्हणून मग जेवताना ते काढून ठेवणेच मी पसंत करू लागलो.माझे वडील आणि आई पण, खास जेवण्यासाठी कवळी तयार करून, शेवटी जेवतानाच का काढून ठेवायचे याची थोडीफार कल्पना मला येऊ लागली. शेवटी काही दिवसांनी शोभा म्हणूनही ते डेंचर वापरणे बंद करून टाकले.
पण माझा हा निर्णय पसंत न पडणारी बरीच माणसे जगात होती. उदा. सौ. सुमती ! तिच्या मते अशी वस्तू वापरायची नसेल तर आणायचीच कशाला ! पण तिचा विरोध मुख्य ज्या कारणाने होता, ते म्हणजे मी डॉक्टरणीच्या डोंबलावर जे काहीशे रुपये खर्चून आलो होतो, त्याचा मोबदला मला मिळायलाच हवा. त्यामुळे ते डेंचर परत करून पैसे परत आणावे किंवा ते बदलून तरी आणावे असे तिला वाटत होते. आणि नेहमीप्रमाणे तिच्या इच्छेला बळी पडून मी पुन्हा त्या दातखान्यात पाऊल टाकले. मी वहिनींना माझी अडचण सांगताच त्यानी कुठलीच अडचण उपस्थित न करता ते डेंचर
बदलून किंवा दुरुस्त करून देण्याची तयारी दाखवली.पुन्हा एकदा, माप घेण्यासाठी, त्यांनी त्या रोगणाचा लेप माझ्या हिरड्याना देऊन, दातांचा ठसा त्याखाली ठेवून जोरात दाबून, काही वेळ बसायला सांगितले . मी आज्ञाधारकपणे हाताची घडी तोंडावर बोट ठेवून बसलो आणि तोच माझा घातक्षण ठरला. कारण वहिनीना मला परत 'आ' करण्यास सांगायला थोडा उशीर झाला आणि तेवढ्यात त्या रोगणाने आपले काम अगदी नको तितके चांगले बजावले होते. माझ्या उघडलेल्या तोंडातून दातांचा ठसा काढण्यासाठी त्यानी जंग जंग पछाडले, पण तो ठसा "नाही मी सोडत नाथा " म्हणून जो काही माझ्या हिरड्यांना चिकटून बसला तो काही सुटायला तयार होईना. अनेक वेगवेगळे उपाय करून वहिनी थकल्या,त्याही घामाने चिंब झाल्या. मी म्हटले, "आता राहू दे हेच दात." पण त्यात धोका होता हे त्यांना माहीत असल्यामुळे, शेवटी मला नको होती तीच वेळ माझ्यावर आली. म्हणजे वहिनींनी मला सांगितले आता कापूनच काढावे लागतील. झाले! मग इंजेक्शन देणे, बधीर करणे, पुरेशी भोके पाडणे अशा सर्व संकटातून पार पडलो, तेव्हा कोठे त्या दातांच्या तावडीतून माझी सुटका झाली.
दुसऱ्या दिवशी माझे सुजलेले तोंड पाहून मला डॉक्टर मित्राने विचारले, " अरे असा का दिसतोस ? " मी काहीही न बोलता 'आ' करून दाखवल्यावर तो आश्चर्याने म्हणाला ," अरे हे काय इथे तर तुला दातच नव्हते." त्याला मला सांगावे लागले, " हो बाबा लोक असलेले दात काढतात मी मात्र नसलेले दातच काढून आलो आणि त्याचाच हा परिणाम !" "एकूण काय, अक्कलदाढ आली, तरी अक्कल मात्र आलेली दिसत नाही" मित्राने मारलेला टोला मी आ वासून ऐकत राहिलो. तेवढेच मला शक्य होते.
कुशाग्र