तीन मडकी - १

एक होता गाव. त्या गावात एक मनुष्य राहत होता. त्याचे नाव होते भिकंभट. तो फारच गरीब होता; परंतु त्याचे कुटुंब फार मोठे होते. बायको होती. चार कच्चीबच्ची होती. घरात खाण्यापिण्याची सदैव पंचाईत पडायची. कधी कधी नवराबायकोचे कडाक्याचे भांडणही होई. त्या वेळेस मुले रडू लागत. शेजारीपाजारी मात्र हसत व गंमत बघत.
एके दिवशी तर गोष्टी फारच निकरावर आल्या. भिकंभट ओसरीत बसले होते. घरात खाण्यासाठी पोरे आईला सतावीत होती. सावित्रीबाई शेवटी एकदम ओसरीत येऊन गर्जना करू लागल्या, 'काय द्यायचे पोरांना खायला ? घरात एक दाणा असेल तर शपथ. बसा येथे ओटीवर मांडा ठोकून. संसार चालवता येत नाही तर लग्न कशाला केलेत ? नेहमी गावात चकाट्या पिटा. पानसुपाऱ्या खायच्या, पिचकाऱ्या मारायच्या. दुसरा उद्योग नाही तुम्हाला. काही जनाची नाही तर निदान मनाची तरी लाज. लोकांजवळ तरी कितीदा तोंड वेंगाडायचे ? ही पोरे घेऊन विहिरीत जीव द्यावा झाले. शंभरदा सांगितले की काही थोडे फार तरी मिळवून आणा. कोठे बाहेर जा, उद्योगधंदा पाहा; परंतु घरकोंबडे येथेच माशा मारीत बसता. मला तर नको हा संसार असे वाटत आहे.'
सावित्रीबाईंचा पट्टा सारखा सुरू होता. बिचारे भिकंभटजी. त्यांना कोण देणार नोकरी चाकरी ? कोणतेही काम त्यांना येत नसे; परंतु त्या दिवशी त्यांना फार वाईट वाटले. बायको रोजच बोलत असे; परंतु आज त्यांचा स्वाभिमान जागा झाला होता. त्यांची माणुसकी जागी झाली. एकदम उठले व म्हणाले, 'आज पडतो घराबाहेर. काही मिळवीन तेव्हाच घरी परत येईन. पोराबाळांचे पोट भरण्यास समर्थ होईन तेव्हाच परत तोंड दाखवीन. ही तोपर्यंत शेवटचीच भेट.' परंतु सावित्रीबाईंस त्या बोलण्याने तेवढेसे समाधान झाले नाही, त्या चिडविण्याच्या आवाजात म्हणाल्या, 'आहे माहीत तुमची प्रतिज्ञा. आजपर्यंत सतरादा जायला निघालेत; परंतु अंगणाच्या बाहेर पाऊल पडले नाही. जाल खरोखरच तेव्हा सारे खरे.' भिकंभट खरोखरच घरातून बाहेर पडले. लांबलांब चालले. पाय नेतील तिकडे जात होते. कोणाकडे जाणार, कोठे जाणार ? ना कोठे ओळख, ना कोणापाशी वशिला.' दमेपर्यंत चालत राहावयाचे असे त्यांनी ठरवले होते. शेवटी ते अगदी थकून गेले. पोटात काही नव्हते. एक पाऊलही पुढे टाकवेना. शेवटी एका झाडाखाली ते रडत बसले.

  त्या वेळेस शंकर आणि पार्वती तिकडून जात होती. पार्वती शंकराला म्हणाली, 'देवा, रडण्याचा आवाज कानांवर येत आहे. कोणी तरी दु:खी मनुष्य जवळपास असावा. चला, आपण पाहू.' ती दोघं कोण रडतो ते शोधू लागली. त्यांना झाडाखालचा भिकंभट दिसला.
'तो पाहा रडणारा माणूस. चला का रडतोस ते त्याला विचारू. चला देवा.' पार्वती म्हणाली.
भगवान शंकर म्हणाले, 'या जगातील लोक एकाच गोष्टीसाठी रडत असतात. त्यांना पैसा पाहिजे, धनदौलत पाहिजे, परंतु जगाला देऊन देऊन आपण भिकारी झालो. आता आपणाजवळ देण्यासारखे काय बरे आहे ? नाही म्हणायला भस्म आहे. त्याला का पडगुलीभर भस्म देऊ ?'
पार्वती म्हणाली, 'देवा, आपणाजवळ अद्याप तीन मडकी शिल्लक आहेत. ती आहेत तोपर्यंत तरी काय द्यावे ही पंचाईत नाही. चला जाऊ त्या दु:खी माणसाकडे. दु:खी मनुष्य पाहून माझ्याने पुढे जाववत नाही.'
भगवान शंकर म्हणाले,' तू पर्वताची मुलगी म्हणून तुला पार्वती म्हणतात. परंतु तुझे हृदय पर्वतासारखे कठीण नाही. तुझे हृदय लोण्याहून मऊ कसे ?'
पार्वती म्हणाली,'देवा, माझा पिता हिमालय काही कठोर नाही. त्याच्या पोटातून सिंधू, ब्रह्मपुत्रा, गंगा, यमुना वगैरे शेकडो नद्या वाहतात. माझ्या पित्याचे हृदय दयेने भरलेले आहे; परंतु ते राहू दे. चला त्या दु:खी माणसाकडे व पुसू त्याचे डोळे.'
शेवटी शंकर व पार्वती त्या भिकंभटाजवळ आली, 'का रे ब्राह्मणा, का रडतोस ? काय झाले ? या रानात असा दु:खी कष्टी होऊन का बसलास ?' शंकराने विचारले.

ब्राह्मण रडत म्हणाला, 'काय करू रडू नको तर ? मला गरिबीने गांजले आहे. घरात बायको, चार मुलेबाळे आहेत; परंतु त्यांना खायला काय देऊ ? आपल्या मुलांची उपासमार कोणाला बघवेल ? शेवटी येथे रानात येऊन रडत बसलो.'
भगवान शंकर म्हणाले, 'आम्ही सुद्धा गरीबच आहोत; परंतु आमच्याजवळ तीन मडकी आहेत. त्यातले एक तुला देतो ते तू घे.'
भिकंभट म्हणाला, 'रिकामे मडके घेऊन काय करू ? माझ्या घरात हंडे घंगाळे नसली तरी मातीची मडकी पुष्कळ आहेत; परंतु त्या मडक्यांत ठेवायला मात्र काही नाही. त्या मडक्यांत का दु:ख भरू, डोळ्यांतील पाणी भरू ?'
शंकर म्हणाले, 'अरे, हे मडके असे तसे नाही. हे मंतरलेले मडके आहे. या मडक्यातून डाळेमुरमुरे बाहेर पडतात. 'पड पड' असे म्हटले की गरमागरम माल बाहेर पडतो. त्याचे दुकान घाल. लोक तुझ्या दुकानावरच येतील; कारण असा माल दुसरीकडे मिळणार नाही.'
भिकंभट आनंदला. आपल्यासमोर प्रत्यक्ष शंकर पार्वती आहेत हे त्याला माहीत नव्हते. नमस्कार करून व मडके घेऊन तो निघाला. वाटेत त्याला एक गाव लागले. तेथे तो थांबला. एका वाण्याच्या दुकानावर आपले मडके ठेवून म्हणाला, 'वाणीदादा वाणीदादा, मी नदीवरून अंघोळ करून येतो, तोपर्यंत माझे हे मडके सांभाळा.' वाणीदादा बरे म्हणाला, भिकंभट थोडेसे चालून गेल्यावर परत माघारी आला व त्या वाणीदादाला म्हणाला, 'वाणीदादा, खरोखरच सांभाळा बरे मडके. पोरेबाळे येतील, फोडतील बिडतील, हे मडके माझा प्राण आहे. हे मडके म्हणजे माझे सारे काही. मी येतोच चाली चाली स्नान करून.'
भिकंभट लगबगीने गेले. नदीवर पोचले व अंघोळ करू लागले. इकडे त्या वाण्याच्या मनात आले की हा ब्राह्मण एवढ्याश्या मडक्याला इतका काय म्हणून जपतो. त्या मडक्यात काय आहे ते पाहण्याचे त्याने ठरविले. त्याने मडक्यात डोकावून पाहिले तो काही दिसेना. ते मडके हालवावे असे त्याला वाटले. त्याने ते हातात घेऊन सहज 'पड पड' असे म्हटले. तो काय आश्चर्य ? आतून गरम गरम डाळेमुरमुरे यांची रास पडू लागली. त्याला आनंद झाला. त्याने आपल्या बायकोला हाक मारली तो तिला म्हणाला, 'हे बघ, हे मडके घरात ठेव घरातील अगदी असेच एक मडके बाहेर आणून ठेव.' बायकोने त्याप्रमाणे केले वाणीदादा जणू काही झालेच नाही अशा साळसूदपणे तेथे बसला होता. भिकंभट अंघोळ करून आले. 'वाणीदादा, माझे मडके आहे ना रे ?' त्यांनी विचारले. वाणीदादा म्हणाला, 'अहो मडक्याला कोण लावील हात ? तो का सोन्याचा हंडा आहे की कोणी चोरील बिरील ? ते आहे तेथे मडके. जा एकदाचे घेऊन.'

भिकंभट मडके घेऊन निघाले. मनात मनोराज्ये करीत ते चालत होते. मी आता श्रीमंत होईन. माड्या-महाल बांधीन, बागबगीचे करीन, असे मनात म्हणत चालले होते. रस्ता कसा संपला ते कळलेही नाही; गावची नदी आली तेव्हा आपले घर जवळ आले असे त्यांच्या ध्यानात आले. आले लगबगीने घरी. त्यांनी दारावर थाप मारली. सावित्रीबाईंनी दार उघडले तो दारात पतीची स्वारी !
'आलेत ना परत ! मी केलेच होते मुळी भाकीत. एक दिवस जाल. दोन दिवस जाल. शेवटी हात हालवितं परत याल-' सावित्रीबाई म्हणाल्या.
'हात हालवितं परत आलो नाही. हे पाहा मडके आणले आहे.' भिकंभट म्हणाले.
'मडके आणले आहे ! घरात का थोडी मडकी आहेत ?' सावित्रीबाई वेडावीत म्हणाल्या.
भिकंभट म्हणाले, 'तुम्हा बायकांचा फारच उतावळा व अधीर स्वभाव. जरा नीट ऐकून तर घेशील की नाही ? आलो नाही तो तुझी तोफ आपली सुरू. जरा धीराने घे.'
सावित्रीबाई उसळून म्हणाली. 'आज दहा वर्षे तुमच्याबरोबर संसार केला तो का धीर असल्यावाचून ? पोराबाळांना खायला देता येत नाही. थंडीवाऱ्याला अंगावर पांघरूण घालता येत नाही. तरी मी सारे मुकाट्याने बघते, सहन करते. म्हणे धीर नाही ? लक्षात ठेवा, तुम्हा पुरुषांपेक्षा आम्ही बायकाच अधिक धीराच्या असतो, खंबीर असतो, सोशिक असतो. अगस्ती ऋषी सात समुद्र प्यायला. आम्ही बायका अपमान, दु:ख, कष्ट, हाल, अपेष्टा यांचे शेकडो समुद्र पीत असतो. म्हणे धीर नाही. धीर नसता तर केव्हाच जीव दिला असता !'
भिकंभट म्हणाले, 'कशी छान बोलतेस ? तू पुराणिकबाई का नाही होत ? माझे मुलाबाळांचे पोट तरी भरेल.'
सावित्रीबाई म्हणाली, 'घरचे पुराण संपून वेळ असेल तेव्हा की नाही ?'
भिकंभट म्हणाले, 'बरे, ते राहू दे. अग हे मडके आहे ना, ते मंतरलेले मडके आहे. याच्यातून डाळेमुरमुरे बाहेर पडतात सारखी अखंड धार सुरू होते. आपण दुकान घालू. श्रीमंत होऊ. मग तुला सोन्यामोत्यांनी नुसती मढवीन.'
सावित्रीबाई हसून म्हणाली, 'मडक्यातून का कोठे डाळेमुरमुरे बाहेर पडतात ? वेड लागले तुम्हाला.'
भिकंभट म्हणाले, 'तुला प्रत्यक्षच दाखवतो. तू पोती आण भरायला.' असे म्हणून ते ते मडके हालवू लागले. 'पड पड' म्हणून हालवू लागले; परंतु एक दाणा पडेल तर शपथ !
'आता किती वेळ ते मडके हालवितं घुमणार ? ठेवा खाली. दमले, घामाघूम झालेत.' सावित्रीबाई रागातही हसून म्हणाली.
परंतु भिकंभट हसला नाही. त्या वाण्याने आपल्याला फसवले असे त्याला वाटले. ते मडके त्याने हातात घेऊन तो तसाच घराबाहेर पडला. सावित्रीबाई रडणाऱ्या मुलांना समजावीत बसली.

लेखक : साने गुरुजी.
*******************
वाचनांस सोपे जावे म्हणून कथेचे दोन भाग पाडले (दुसरा भाग सोबत जोडला) आहेत.


कॉपीराइट्स: केशव भिकाजी ढवळे.
************************