साने गुरुजींच्या कथा

नमस्कार,
साने गुरुजींच्या कथा अजरामर तर आहेत पण मराठी संकेतस्थळावर त्या नित्यनेमाने प्रकाशित झाल्यास ज्यांना पुस्तके उपलब्ध होऊ शकत नाहीत त्यांना आंतरजालावर तरी वाचायला मिळतील ह्या हेतूने येथे देत आहे.
मुलींना शाळेला सुटी लागली व 'मी काय करू ?..... कंटाळा येतो....' अशी भुणभूण चालू झाली. मोठीला मराठी विषय पाचवीपासून आहेच पण तिचे वाचन म्हणजे गोगलगायीशी स्पर्धा ! कुठे वाचताना चुकत तर नाही ह्यावरही लक्ष ठेवावे लागते. चुकलेले शब्दोच्चार बरोबर करून द्यावे लागतात. हे सर्व करत असताना एक विचार डोक्यात आला. साने गुरूजींचे जुने बाइंडींग केलेले पुस्तक होतेच.... संगणकाशेजारी तिला वाचनांस बसवून तिच्या वेगाने वाचन करत असता ह्याच कथा जसजसा वेळ मिळत जाईल तसं तश्या बरहा मध्ये साठवून ठेवायच्या. जेणे करून एकाच दगडात तीन चार पक्षी मारल्याचे समाधान मिळेल.
मुलीचे साने गुरुजींच्या पुस्तकांचे वाचन होईल, त्यात तिचा वेळही जाईल. माझे टंकलेखन थोडे सुधारेल, माझ्याही कानांवरून परत साने गुरुजींचे विचार जातील (कानांत कितपत जातील ती शंका !) सोबत आपणा सर्वांसोबत ह्या कथांचा आस्वाद वाटून घेता येईल. आज एक कथा येथे देण्याचा प्रयत्न करतोय- जसा वेळ मिळेल, तश्या त्या देईनच.